सर ज. जी. कला महाविद्यालयातील प्राध्यापक व चित्रकार काशिनाथ साळवे यांची ओळख कलाजगताला एक चतुरस्र कलाकार म्हणून आहे. त्याचं एक स्वप्न म्हणून विकसित झालेला उपक्रम जहांगीरमध्ये एका प्रदर्शन रूपात पाहायला मिळत आहे. या प्रदर्शनात १११ चित्रकारांच्या प्लेटोग्राफ या तंत्रात तयार झालेल्या प्रिंट्स पाहायला मिळतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रिंट हे तसे महत्त्वाचे, पण कला बाजारात तसे दुर्लक्षिलेले माध्यम. या माध्यमात काम करणे तसे सोपेही नाही. प्रक्रिया वेळखाऊ . चित्र आधी छाप्यामध्ये रूपांतरित करायचे.  मग त्याची शाई लावून छापील प्रत काढायची, प्रत्येक प्रतीसाठी ही कृती परत गिरवायची.  या माध्यमाचा असा इतिहास आहे की, चित्रकार आपल्या चित्रांच्या प्रती तयार करायचे.  जे ग्राहक मूळ चित्र खरेदी करू शकत नसत तेव्हा ते त्याच्या छापील प्रती घ्यायचे.

लाकूड, धातूची प्लेट अशा माध्यमाचे छापे बनत. आधुनिक काळात युरोप/ अमेरिकेत हे माध्यम अभिव्यक्तीचे साधन बनले. चित्राबरोबरीने कलाकार या माध्यमाला महत्त्व देऊ लागले. त्यांच्या प्रत्येक निर्मितीला अभिव्यक्तीच्या दृष्टीने आता पाहिले जात होते. कलाकार हे आर्थिक मंदीच्या, सरकारी दडपशाहीच्या काळात या माध्यमाकडे सहज अभिव्यक्तीचे साधन म्हणून पाहू लागले होते.

आपल्याकडे स्वातंत्र्यपूर्व काळात राजा रविवर्मानी आपली चित्रे अशीच छापून आणली आणि भारतीय समाजाच्या दृश्य इतिहासात एक नवे पर्व सुरू झाले. रवि वर्मा यांनी चित्र छापण्यासाठी, ओलिओग्राफी तंत्र वापरले. यासारखेच तंत्र म्हणजे लिथोग्राफ. यामध्ये शिळेवर रेखाचित्र काढून त्यावर प्रक्रिया करून त्याच्या प्रती काढल्या जातात.

यासारखेच तंत्र म्हणजे प्लेटोग्राफ. लिथोतंत्रात लागणाऱ्या विशिष्ट शिळा सहज उपलब्ध होत नसल्याकारणाने ऑफसेट प्रिंटिंगसाठी लागणारी प्लेट वापरून त्यावर चित्र तयार करून छापील प्रती तयार करणे. यामध्ये कलामूल्य अबाधित राहून मग त्याच्या मर्यादित संख्येत प्रती तयार होतात.

महाराष्ट्रात कला महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर जर का प्रिंट या माध्यमात काम करायचे असेल तर त्याकरिता सोय नाही.

सर ज. जी. कला महाविद्यालायातील प्राध्यापक व चित्रकार काशिनाथ साळवे यांची ओळख कलाजगताला एक चतुरस्र कलाकार म्हणून आहेच. त्याचं एक स्वप्न म्हणून विकसित झालेला उपक्रम जहांगीरमध्ये एका प्रदर्शन रूपात पाहायला मिळत आहे. या प्रदर्शनात १११ चित्रकारांच्या प्लेटोग्राफ या तंत्रात तयार झालेल्या प्रिंट्स पाहायला मिळतील .

काशिनाथ साळवे, ‘साळवे सर’ हे एक चित्रकार, म्युरल आर्टिस्ट व प्रिंट मेकर म्हणून ओळखले जातात. शंकर पळशीकर, मोहन सामंत, वसंत परब व कृष्ण रेड्डी यांना ते या विविध क्षेत्रांतील त्यांच्या अनुभवामागचे गुरू मानतात. या तिघांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.

साळवे सरांनी जे.जे.मधून निवृत्त  झाल्यावर सुरुवातीला रॉबर्ट मनी हायस्कूल येथे आणि मग ठाण्यात आपला प्रिंट मेकिंग स्टुडिओ चालू केला, त्यामध्ये त्यांची वर्ग मैत्रीण माया झांगियानी यांचा मोठा वाटा आहे. यासोबत चित्रकार सुधीर पटवर्धन, अकबर पदमसी यांचा आधार, प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले.

या दोघांनी आपली रेखाचित्रे प्रिंट करण्यासाठी लगेच उपलब्ध करून दिली. मग हळूहळू भारतातल्या अनेक चित्रकारांनी त्यांची कला प्रिंट उपक्रमात सहभागी होऊ दिली.

असे करत करत १११ कलाकारांची कला एकत्र झाली, त्यात अकबर पदमसी, के. जी. सुब्रमण्यम, क्रिशेन खन्ना, सतीश गुजराल, जोगेन चौधरी, ज्योती भट्ट, सुनिल दास हे तर आहेतच त्यांच्याशिवाय तसंच गणेश हलोई, निर्मलेंदु दास, अमीत अंबालाल, ललिता लाजमी, सनर कर, सुधीर पटवर्धन, गिएव पटेल, एस. जी. वासुदेव यांच्यासारख्या ज्येष्ठ चित्रकारांचाही समावेश आहे. त्याशिवाय अनेक उभरत्या कलाकारांच्या कलाकृतीही या प्रदर्शनात पाहायला मिळतील. अर्थात हे सर्व करणे एकटय़ाने शक्य नव्हते. साळवेंना निर्मलेंदू दास, अजित सिअल, रामन कास्था या कलकत्ता येथील कलाकारंची मोलाची मदत झाली.
महेंद्र दामले – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kashinath salve platographic expressions jehangir art gallery