प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com
‘‘विज्ञान असो किंवा संगीत, स्वतंत्र प्रतिभा निर्माण करण्यासाठी ठरावीक कालावधीत घेतलेल्या पदवीपलीकडे तपश्चर्या करावी लागते. तोपर्यंत मिळालेले ज्ञान हे फक्त गुरूची आठवण ठरते. स्वतंत्र प्रतिभा निर्माण करण्याची क्षमता आजच्या तरुणांमध्ये नक्कीच आहे. प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम काम करणारे तरुण हे याचेच द्योतक आहेत,’’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ संशोधक, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर आणि ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांनी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सन्मान सोहळ्यात शनिवारी काढले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरुणाईच्या कामगिरीला दाद देऊन डॉ. काकोडकर म्हणाले, ‘‘ही पिढी उत्तम काम करीत आहे. हे तरुण प्रतिकूल परिस्थितीत खूप चांगले काम करत आहेत. काम न करू शकणारे तरुण जेव्हा दिसतात, तेव्हा त्यांना दोष देणे योग्य नाही. हा पूर्ण शिक्षण व्यवस्थेचाच प्रश्न आहे. आता टोकाची स्पर्धा, वेग अशा परिस्थितीत तरुणांना वाटचाल करावी लागते. त्यातही ते करत असलेले काम हे नक्कीच आशादायक आहे.’’ विज्ञान किंवा एखाद्या वैज्ञानिक घटनेवर आधारित चित्रपटांबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘ऐतिहासिक किंवा विशिष्ट घटनेवर बेतलेली कलाकृती असेल तर ती साकारताना सत्याशी फारकत घेऊ  नये. घटनेचा संदर्भ घेऊन काल्पनिक कथानकावर कलाकृती साकारली असल्यास त्याची स्पष्ट पूर्वकल्पना प्रेक्षकांना द्यावी.’’

गुरू-शिष्य परंपरेचे कालातीत महत्त्व पं. कशाळकर यांनी मांडले. ते म्हणाले, ‘‘संगीत शिक्षण हे पदवी स्वरूपातही मिळते. काही चौकटी सांभाळण्यासाठी ते योग्यही आहे. मात्र संगीत ही ठरावीक साच्यात शिकता येणारी विद्या नाही. त्यासाठी साधना आवश्यक असते, गुरू आवश्यक असतो.’’ जिद्दीने काही करू पाहणाऱ्या तरुण पिढीचे कौतुक करताना पंडितजी म्हणाले, ‘‘भविष्यात हाती नेमके काय लागेल हे माहीत नसतानाही तरुण पिढी कष्ट घेते, आयुष्य पणाला लावते. सक्षम कलाकार घडत आहेत. श्रोत्यांना खेचण्याची, खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. मात्र त्याचवेळी श्रोत्यांवर चांगल्या संगीताचे संस्कार व्हायला हवेत.’’

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta maharashtra tarun tejankit todays youth is intelligent