अद्भुत खेळाच्या बळावर दंतकथा सदरात मोडणाऱ्या मायकेल फेल्प्सने लंडन ऑलिम्पिकनंतर औपचारिक निवृत्ती पत्करली असली तरी ती मागे घेऊन तो रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे.

जैविकदृष्टय़ा तो आपल्यासारखाच हाडामांसाचा माणूस आहे. प्रत्येक माणसाला आशा, आकांक्षा, अपेक्षा, समस्या असतात. त्यालाही आहेत. आपल्या विचाराला, प्रतिभेला, शारीरिक हालचालींना, आकलनाला मर्यादा आहेत. त्याला मर्यादा हा शब्दच ठाऊक नाही. रूढार्थाने तो क्रीडापटू आहे, जलतरणपटू. जगात जलतरणपटू असंख्य आहेत, त्यात अनोखं असं काहीच नाही. पण मायकेल फेल्प्सला पाहिल्यावर आपण काहीतरी विलक्षण अनुभवतोय याची जाणीव होते. साडेसहा फूट उंची, अजानबाहू, पीळदार शरीरयष्टी आणि माशासारखा शरीराचा निमुळता होत जाणारा आकृतिबंध आणि टपोरे डोळे. जलतरणपटूने जसं असायला हवं अगदी तस्साच. पण हे पाण्याबाहेरच्या फेल्प्सचं वर्णन झालं. शर्यत सुरू झाल्याची शिट्टी वाजते- अजस्र जहाज जसं पाणी बाजूला सारतं तसा फेल्प्स पसाराभर हातांनी पाण्याला लोटत पुढे सरकतो. डोळ्याचं पातं लवेपर्यंत शर्यतीचा अर्धा टप्पा गाठणाऱ्या फेल्प्सला टिपताना अत्याधुनिक कॅमेऱ्यांचीही दमछाक होते. पावसाळ्यात विजेचा लोळ सरकताना जी अवस्था होते, तीच फेल्प्सला पाहताना होते. आपल्याला घडामोडींचं पूर्णत: आकलन होण्याआधीच फेल्प्स शर्यतीच्या टोकाला पोहोचतो. पंच तो जिंकल्याची खूण करतात. कॅनव्हासवर रंग ओघळावेत तसं पाणी त्याच्या उजळ वर्णाच्या शरीरावरून निथळतं. तो गॉगल डोळ्यांवरून बाजूला करतो आणि त्याच्या चेहऱ्यावर लोभस हास्य पसरतं. अतिव्यावसायिकतेमुळे जिंकण्याला खुनशी किनार असते तसं फेल्प्सच्या बाबतीत होत नाही. एवढा सराव केलाय तर जिंकणारच ना, इतका साधा भाव चेहऱ्यावर विलसतो. प्रतिस्पध्र्याच्या शुभेच्छांचा तो स्वीकार करतो. काही वेळेत पदक वितरण सोहळा सुरू होतो. सुवर्णपदकाचा मान अर्थातच त्यालाच मिळतो. एरवी पदकामुळे मानकरी झळकतो. फेल्प्समुळे सुवर्णपदकाला झळाळल्यासारखं वाटतं.

ऑलिम्पिक म्हणजे सर्वोच्च क्रीडा व्यासपीठ. जगातले अव्वल खेळाडू एकमेकांविरुद्ध उभे ठाकतात. सर्वोत्तमाचा मुकाबला रंगतो आणि अत्युच्च क्रीडापटू कोण याचा फैसला होतो. ऑलिम्पिकसाठी पात्र होणं हेच खडतर असते, पदक तर दूरची गोष्ट. अनेक भल्या भल्या खेळाडूंना याच रिंगणरूपी सोहळ्याने दूर ठेवलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत १९०० पासून भारताचे पथक सहभागी होते आहे. अब्जावधी लोकसंख्येच्या भारताच्या नावावर इतक्या वर्षांत ३७ एवढीच पदके आहेत. मायकेल फेल्प्स या अवलियाच्या नावावर ऑलिम्पिकची २२ पदकं आहेत. अमेरिकेचा हा तरणाबांड पठ्ठय़ा एका पारडय़ात आणि मोठा इतिहास, संस्कृती लाभलेला आपला भारत दुसऱ्या पारडय़ात. असं काय आहे फेल्प्सकडे ज्यामुळे अविश्वनीय असे पराक्रम त्याच्या नावावर आहेत? अचंबित करणारं सातत्य त्याला जपता येतं? उत्तेजकांच्या ससेमिऱ्यात एकदाही न अडकलेला आणि अद्भुत खेळाच्या बळावर दंतकथा सदरात मोडणारा फेल्प्स रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. निवृत्ती पत्करली की कामाशी सलगता तुटते. कामाचा सराव राहत नाही. दैनंदिन सातत्य नसल्याने इतरांच्या मागे पडायला होतं. तंत्रज्ञानाच्या करामतींसह दाखल होणाऱ्या नव्या गोष्टींशी जुळवून घेता येतंच असं नाही. हे सगळं आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कळतंय ते फेल्प्सला ठाऊक नाही, असं नक्कीच नाही. तरीही ऑलिम्पिक त्याला खुणावतंय. तरणतलाव आणि नॅनो सेकंदासाठी रंगणाऱ्या शर्यतीसाठी आपण अजूनही वर्चस्व गाजवू शकतो हा विश्वास त्याला आहे. स्फटिकासारखं नितळ निळंशार पाणी त्याला साद घालतंय आणि गळ्याचं आभूषण ठरणारं पिवळंधम्मक सुवर्णपदक आपण अजूनही पटकावू शकतो याची त्याला खात्री आहे. फेल्प्सचा आदर्श असलेल्या इयान थॉर्पने निवृत्ती सोडून पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला. थॉर्पही महान खेळाडू होता. तो ऑलिम्पिकसाठी पात्रही ठरला पण पदक पटकावू शकलेला नाही. फेल्प्सला ‘नाही’ आवडत नाही. नकाराचा अर्थ मागे जाणं, कमी पडणं, प्रगती खुंटणं असं त्याला वाटतं. शरीर साथ देतंय, मन आणि मेंदू आसुसलेले आहेत. आणि म्हणूनच फेल्प्स ऑलिम्पिकमध्ये दिसणार आहे, कदाचित शेवटचा. जिंकण्यासारखं काहीच उरलेले नाही, मोडावा असा विक्रमही शिल्लक राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे टेनिसमध्ये रॉजर फेडरर म्हणतो तसा निखळ आनंदासाठी तो खेळू शकतो. बाल्टिमोर बुलेट आणि फ्लाइंग फिश अशा बिरुदावली मिळवलेल्या फेल्प्सला अनुभवणं चाहत्यांसाठी अनोखा अनुभव असेल.

आई मुख्याध्यापिका आणि नोकरी सांभाळून फुटबॉल खेळणाऱ्या वडिलांचा हा लेक. मोठी बहीण पोहते, म्हणून हाही पोहू लागला. तरणतलाव आणि पाणी हेच त्याचं आयुष्य झालं. लहानपणी हायपरअ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर आजाराने त्याला ग्रासलं होतं. पण शरीरातली सगळी ऊर्जा त्याने पोहण्याकडे केंद्रित केली. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत शास्त्रोक्त क्रीडा संस्कृती आहे. असंख्य एक्सलन्स सेंटर्स आहेत. असंख्य नैपुण्यवान खेळाडू घडवण्यासाठी अकादमी आणि प्रशिक्षकांचा ताफा सज्ज असतो. प्रशिक्षक बॉब बोवमन यांच्या मार्गदर्शनाखाली फेल्प्स अजूनही सराव करतो. दहाव्या वर्षीच त्याच्या नावावर राष्ट्रीय विक्रम आहे. २००० साली झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या संघात १५ वर्षांचा फेल्प्स होता. ६८ वर्षांच्या इतिहासात अमेरिकेच्या जलतरण संघातील तो सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे. त्या वेळी तो पदक मिळवू शकला नाही. अर्थात त्याच्याकडून तशी अपेक्षाही नव्हती. पण २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळवीत त्याने आपल्या कौशल्याची चुणूक सादर केली होती. आणखी काही महिन्यांतच याच प्रकारात त्याने विश्वविक्रम प्रस्थापित केला. २००४ अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत फेल्प्सने सहा सुवर्ण आणि दोन कांस्यपदके पटकावली. सूर मारायचा तो पदक पटकावण्यासाठीच असा दबदबा त्याने निर्माण केला. २००८ बीजिंग स्पर्धेत त्याने कळसाध्याय गाठला. फेल्प्सने तब्बल आठ सुवर्णपदकांवर कब्जा केला. त्याचा आदर्श इयान थॉर्पने असं भाकीत केलं होतं की फेल्प्स आठ सुवर्णपदके पटकावू शकणार नाही. फेल्प्सने आठवे सुवर्णपदक नावावर केले तेव्हा थॉर्प उपस्थित होता. माझे भाकीत चुकीचे ठरल्यावर एवढा आनंद मला कधीच झाला नाही, अशा शब्दांत थॉर्पने फेल्प्सच्या अविश्वसनीय कामगिरीचे कौतुक केले. पदके आणि असंख्य विक्रमांचा मानकरी ठरलेल्या फेल्प्सवर उत्तेजक सेवनाचे आरोपही झाले. उत्तेजकांशिवाय अशी कामगिरी होऊच शकत नाही अशी टीका होऊ लागली. ‘खेळभावनेचे पालन करणे हे प्रत्येक क्रीडापटूचे कर्तव्य आहे. पूर्ण नैसर्गिक क्षमतेच्या जोरावरच मी यश मिळवले आहे. आयोजकांतर्फे घेण्यात आलेल्या प्रत्येक उत्तेजक चाचणीत मी सहभागी झालो आहे. एकदाही मी चाचण्यांमध्ये दोषी आढळलेलो नाही,’ अशा शब्दांत फेल्प्सने टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.

मोठी माणसं खरोखरंच मोठी असतात याचा प्रत्यय घडवत फेल्प्सने तिशी गाठण्याआधीच भावी फेल्प्स घडवण्यासाठी मायकेल फेल्प्स फाऊंडेशनची स्थापना केली. २०१२ मध्ये झालेले लंडन ऑलिम्पिक फेल्प्सचे चौथे ऑलिम्पिक. ४०० मीटर वैैयक्तिक प्रकारात अमेरिकेच्याच रायन लॉक्टने सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि फेल्प्स संपला, अशा चर्चाना उधाण आले. फेल्प्स काहीही बोलला नाही. पुढच्याच दिवशी ४ बाय १०० मीटर रिले प्रकारात त्याने रौप्यपदक मिळवलं. ४ बाय २०० मीटर फ्रीस्टाइल रिलेमध्ये सुवर्णपदक नावावर केलं आणि ४ बाय २०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात रौप्यपदकाची कमाई करीत ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वाधिक पदकांच्या विक्रमावर नाव कोरले. फेल्प्सने जिम्नॅस्ट लॅरिसा लॅटिनिनीचा विक्रम मोडला. लॅरिसा फेल्प्सचा भीमपराक्रम पाहण्यासाठी उपस्थित होती हे विशेष. मला फेल्प्सला गौरवता येईल का अशी विनंती तिने ऑलिम्पिक संयोजकांकडे केली. अमेरिका आणि रशिया यांच्यातील ताणलेले संबंध आणि कठोर नियमांमुळे लॅरिसा फेल्प्सला सन्मानित करू शकली नाही. मात्र त्याने लॅरिसा आणि फेल्प्सच्या महानतेत तसूभरही फरक पडला नाही. लंडन ऑलिम्पिकनंतर फेल्प्सने औपचारिक निवृत्ती स्वीकारली पण तो खेळत राहिला. अफाट यशामुळे पैसा, प्रसिद्धीच्या तो शिखरावर होता.

फेल्प्सच्या यशामागे त्याची अथक मेहनत, अचाट तंदुरुस्ती, प्रतिस्पध्र्याच्या आणि स्वत:च्या खेळाचा सखोल अभ्यास आहे. मात्र या सगळ्याबरोबरीने निसर्गाला त्याला दिलेलं शरीर हीच त्याच्यासाठी संपत्ती आहे. दुहेरी सांधा असलेला पायाचा घोटा फेल्प्सला लाभला आहे. अन्य जलतरणपटूंच्या तुलनेत १५ अंश जास्त वाकत असल्याने फेल्प्स साहजिकच आगेकूच करू शकतो. अन्य शर्यतपटूंच्या तुलनेत तरणतलावात सूर मारल्यानंतर दुहेरी सांधांच्या घोटय़ाद्वारे तो प्रचंड ऊर्जा निर्माण करू शकतो.

आपले हात आपल्या उंचीएवढय़ा अंतरापर्यंत फाकू शकतात. मात्र फेल्प्सचे हात त्याच्या उंचीपेक्षा तीन इंचापेक्षा जास्त फाकतात. हे सुपाएवढे अजानबाहू फेल्प्सचे मुख्य अस्त्र आहे. सूर मारल्यानंतर अन्य शर्यतपटूंच्या तुलनेत हे हात मोठय़ा प्रमाणावर पाणी बाजूला सारतात. बटरफ्लाय प्रकारात फेल्प्स यशस्वी होण्यामागचे हे शास्त्रीय रहस्य आहे. त्याच्या शरीराच्या दोन भागांची रचनाही फेल्प्सच्या यशात निर्णायक भूमिका बजावते. सिक्स पॅक अ‍ॅबसारख्या पीळदार शरीरयष्टीमुळे पाण्यात भक्कमपणे उभा राहू शकतो. मात्र कमरेखालचे शरीर निमुळते आणि काटक असल्याने हालचालींमध्ये वेगवानता राहते. जमिनीवर असताना गुरुत्वाकर्षणाची शक्ती जाणवत नाही. पण पाण्यात समीकरण बदलते. एकाच वेळी पाण्याला दूर लोटणे आणि त्याचवेळी पाण्यात स्थिर राहणे या दोन्ही आघाडय़ांवर फेल्प्सचे शरीर कामी येते. शारीरिक श्रम झाल्यानंतर मानवी शरीर लॅक्टिक अ‍ॅसिड निर्माण करते. त्यामुळे श्रमाचे काम झाल्यावर थकवा येतो, विश्रांती घ्यावीशी वाटते. लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे शरीराची हालचाल मंदावते. शास्त्रीय अभ्यासानुसार सामान्य माणसाच्या तुलनेत फेल्प्सच्या शरीरात निम्म्यानेच लॅक्टिक अ‍ॅसिड तयार होते. या किमयेमुळे फेल्प्सला कमीत कमी थकवा जाणवतो. यामुळेच एकाच दिवशी अनेक शर्यतीत तो खेळू शकतो आणि जिंकूही शकतो. शारीरिक देणगी वाया घालवणारे असंख्य महाभाग आपल्या आजूबाजूला पाहतो आपण. परंतु निसर्गदत्त शरीराचा आदर करीत त्याला अविरत मेहनतीची जोड देत फेल्प्सने आगळा मापदंड प्रस्थापित केला आहे.

फेल्प्सच्या रिओत खेळण्यावर व्यावसायिक दडपणं नाहीत. जिंकण्याची ऊर्मी माणसाला स्वस्थ बसू देत नाही याचं फेल्प्स हे उदाहरण. वाढतं वय शरीरावर मर्यादा आणतं, मानसिकता बदलवतं या समजांना छेद देत फेल्प्स रिओत सहभागी होणार आहे. यंत्रांमुळे आपलं जिणं यांत्रिक झालं आहे. आपले आविष्कारही गॅझेट्सच्या माध्यमातून व्यक्त होतात. अशा वातावरणात शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारा जलतरणासारखा खेळ ३१व्या वर्षी पुन्हा खेळावासा वाटणं विजिगीषु वृत्तीचं प्रतीक आहे. यासाठीच रिओत फेल्प्सला पाहणं खेळांशी संबंध नसलेल्या सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतं. माणसाच्या रूपातल्या सुवर्णमत्स्याची पुनरागमनी सुराची मैफल अनुभवणं रसरशीत आनंदाचा ठेवा असेल.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com