ऊन-पावसाच्या खेळात उन्हाचीच भर पडत होती. वातावरणात दमटपणा वाढला होता. त्यात चालण्यामुळे घामाघूम झालो होतो. फलाटावर पोहोचलो तेव्हा १४.१२ची टिटवाळा लागली होती. लोकल स्लो होती तरी आत घुसलो. जलद लोकल १४ मिनिटांनंतर  होती. दुपारची वेळ असल्यामुळे गर्दी कमी होती. एका बाकडय़ावर एक जागा रिकामीच होती. जाऊन बसलो. गाडी लागलीच सुरू झाली. मी घडय़ाळाकडे पाहत हाताशी उरलेल्या वेळेचे गणित मांडू लागलो. तीनपर्यंत कलिनाला पोहोचायचे होते. मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो. पावसाने कुजलेल्या कचऱ्याकडे पहावे लागू नये म्हणून खाली वाकून उंच इमारतींकडे पाहत होतो. ‘मस्जिद’ येईपर्यंत गाडीतली गर्दी हालली. काही जण उतरले; फारच थोडे चढले.

खिडकीत, माझ्या समोरच्या बाकडय़ावर बसलेल्या माणसाने वरच्या रॅकवरील त्याची बॅग काढली. मांडीवर आडवी ठेवली. खिडकीतल्या वाऱ्याने त्याचे विरळ केस भुरभुरत होते. पंचविशीच्या आतला हा तरुण बॅगेतला टॅब नाही तर लॅपटॉप काढील नि ‘कामाला’ लागेल असे वाटले तोच त्याने आपल्या शर्टाच्या बाह्य बटने खोलून मुडपल्या. कोपरापर्यंत. बॅगेतून पाण्याची बाटली काढून झाकणभर पाण्याने हात धुतले. मला त्याची हालचाल आवडू लागली. त्याच्या डोळ्यात लहान मुलाचे भाव होते. त्याची थोडी दाढी वाढली होती. म्हणजे थोडीच. नाही तरी इतरांपेक्षा त्याचा गोरापान रंग त्याच्या उमद्या व्यक्तिमत्त्वात भरच टाकत होता. एखाद्या टाटा नाही तर रिलायन्स कंपनीत मॅनेजरप्रमाणे दिसणारा तरुण भर डब्यात जेवणाचा डबा उघडून चपाती नि गवारीची भाजी खाऊ लागला. मांडीवर आडव्या ठेवलेल्या बॅगवर स्टीलच्या डब्यातून आणलेल्या कोरडय़ा चपातीचे तो हलकेच तुकडे तोडी. छोटय़ा स्टीलच्या डब्यातून नाजूकपणे गवारीच्या शेंगांचे तुकडे चपातीच्या तुकडय़ात पकडी. खिडकीतून बाहेर पाहत-पाहत उजवा हात तोंडाजवळ नेई. तोंड हलकेच ‘आ’ करून हतातला घास आत ठेवी. हलकेच चावत तो इतर प्रवाशांकडे पाही. मी चपापल्यागत नजर खिडकीतून इतरत्र नेई. मला त्याचे शांतपणे, मनसोक्त जेवणे आवडत होते. सँडहर्स्ट रोड पार केले. त्याच्या बाकडय़ावरचा दुसरा माणूस उठला. भायखळ्याला उतरला. भायखळ्याची गर्दी आत घुसली. डबा भरून गेला. एकदम दोन जण आले. तो तरुण खिडकीकडे सरकत बसायला खुणावू लागला. चौथ्याची नजर त्याच्या तोंडातल्या घासाकडे नि मांडीवरच्या जेवणाच्या डब्याकडे गेली. ‘‘नाही.. नाही.. बसा. जेवा तुम्ही आरामशीर..’ असे म्हणत तो मोबाइलवर ‘काम’ करू लागला.

पुन्हा तो शांतपणे जेवू लागला. माझे एकटक पाहणे, त्याला जाणवले असावे. मी नजर चोरत राहिलो. उभे प्रवासीही त्याचे ते शांतपणे जेवणे बघत असावेत. बघतच होते. तो खिडकीतल्या तुषारांकडे पाहून घास अलगद गिळायचा. मगच दुसरा घास मोडायचा.

चिंचपोकळी.. करीरोड.. गर्दी कमी होत चालली होती. माझ्या मनात मात्र विचारांची गर्दी वाढली होती.

या तरुणाचा आताच्या आता एखादा फोटो किंवा जेवतानाचे छायाचित्रण करावे नि त्याच्या पत्नीला तिच्या मोबाइलवर धाडावे. कुठे असेल बरे ती? नोकरी करत असेल का? बहुतेक नसावीच. कदाचित असेलही. पण ती बहुधा घरीच गृहिणी म्हणून असावी. म्हणजे ती गृहिणी असणेच मला आवडेल. आता या दुपारच्या वेळी ती तिच्या छोटय़ा बाळाला पोटाशी घेऊन झोपली असेल. तिला लाख टी.व्ही. पाहायचा असेल, पण छोटय़ा बाळाने तिला जवळ झोपावे असे वाटते. त्यामुळे ते झोपावे म्हणून, आवाज नको म्हणून ती बाळाला पोटाशी घट्ट धरून त्याच्या कोवळ्या केसांत बोटे फिरवत असेल. बाळाच्या कोमल स्पर्शाने ती घरातला पसारा विसरून गेली आहे. छताला टांगलेल्या पंख्याचा तेवढा आवाज आहे. हलणाऱ्या पडद्याकडे ती एकटक पाहतेय. डोक्याखाली घेतलेला हात तिला काढायचाय. पण हालचाल होईल नि बाळ उठेल म्हणून ती हात तसाच ठेवते. उशीपलीकडचा मोबाइल ती दुसरा हात लांबवत उचलते. सायलेंट झोनवर ठेवते. आता ती बाळाच्या झोपण्याची वाट पाहते. त्याच्या मिटल्या डोळ्यांकडे पाहते.. पाहता पाहता त्याच्या चेहऱ्यावरून तिला आपल्या पतीची आठवण येते. मान तिरकी करून ती भिंतीवरच्या घडय़ाळाकडे पाहते. पावणेतीन वाजलेले असतात. ‘जेवले असतील का हे?’..

आज सकाळी त्याला घाई झाली होती. डबा भरायला उशीर झाला म्हणून तो चिडलाच असता, पण तिने गप्प राहून पटकन डबा भरला नि स्वत:च बॅगेत ठेवला. पाण्याची बाटलीपण! तो खूश झाला. म्हणजे चिडला नाही.

ती त्याची आवड सांभाळत असेलच. त्याला आवडत असेल म्हणूनच तिने त्याच्यासाठी चार कोरडय़ा पोळ्या बनवल्या होत्या. आपल्या नवऱ्याला बाहेरचे खाऊ लागू नये म्हणून ती लवकरच उरकून डबा बनवत असावी.. दादर आले तशी माझी तंद्री भंगली. बाहेरचा कलकलाट आत घुसला. गाडीतला दमटपणा वाढला. त्याने चाटून-पुसून डब्यातले सारे संपवले. तितक्याच नाजूक हाताने त्याने डबा झाकणाने बंद केला. बाटलीतील पाणी पोटभर प्यायला. पोट भरल्याचा आनंद त्याच्या डोळ्यात, चेहऱ्यावर जाणवत होता. त्याचा हा आनंद मला खूप आवडला. हलकेच त्याने रुमालाने तोंड पुसले. डबा बॅगेत ठेवला. बाटलीही. सैलसर बसत त्याने बॅगेतून कागद काढला. अवयवदानाच्या अभियानाची राज्य सरकारची ती जाहिरात होती. क्षणभर वाटले या तरुणाचे अवयव तेवढे शुद्ध, सशक्त, निरोगी असतील.. अनेकांचे जंकफूड, अपेयपान, धूम्रपान.. चिक्कार कारणे आहेत. या सर्वामुळे अवयवदान करायची इच्छा असूनही अवयवच ठीक नसतील तर त्यांचा उपयोग काय?

माटुंगा.. सायन.. येईपर्यंत मी घडय़ाळाकडे किमान दहादा पाहिले असेल. मला खूप बरे वाटत होते. मला माझ्या कामाची फिकीर वाटली नाही. मी कुर्ला स्टेशनवर उतरलो. गर्दीतून मागे राहिलो. फलाट खाली होईपर्यंत थांबलो. मला त्याची गोष्ट पूर्ण करावीशी वाटली. मी भरभर चालू लागलो. शेवटच्या डब्याकडून जवळच बसल्यामुळे बरेच चालावे लागले.

उशाजवळचा मोबाइल चमकला. तिच्या नजरेने ते हेरले. बाळाच्या डोळ्याच्या पापण्या झाकल्या होत्या. अंगावरचा पदर अलगद उचलत ती मागे सरली. त्याची चाहूल न्याहाळत उठली. मोबाइल हातात घेऊन तिने पासवर्ड टाकला. व्हॉट्स अ‍ॅपवरील तिच्या नवऱ्याचा जेवतानाचा फोटो नि छायाचित्रण ती न्याहाळू लागली. किती तरी वेळ.. तशीच एक मांडी मुडपून.. तिला गहिवरून आले. डोळे पाझरू लागले.

मी ‘कलीना कॅम्प’च तिकीट काढून सीटवर बसलो. खिडकीतून जुन्या गाडय़ांच्या, चारचाकी, दुचाकी गाडय़ांच्या सामानांची दुकाने बघू लागलो. लॉलीपॉप, कबाब, मटनाची दुकाने रांगेत होती.

माझ्या डोळ्यांसमोरून गवारीची भाजी जात नव्हती. मला त्याची गोष्ट आठवली.. ती रडू लागली. लहानपणीची, शाळेत शिकलेली ‘भाकरीची गोष्ट’ तिला आठवली मैत्रिणींचे नवरे ऑफिसला नेलेला डबा न खाताच परत आणल्याच्या, शिपायाला, वॉचमनला दिल्याच्या गोष्टी तिला माहीत होत्या. चायनीज, पंजाबी डिश, स्पाईसी, वडे-समोसे आजूबाजूला असूनही आपला नवरा आपण बनवलेल्या अन्नाचा घास आनंदाने खातोय हे पाहून तिला खूप आनंद झाला. ती पुन्हा पुन्हा तो व्हिडीओ पाहू लागली. त्याच्या चेहऱ्यावरचा, फोटोतला आनंद ती न्याहाळत राहिली.

तो इतरांसारखा तिने बनवलेल्या जेवणाचे कौतुक करीत नसे म्हणून ती सुरुवाती सुरुवातीला नाराज व्हायची. मग एकदा तिने त्याला तसे बोलूनच दाखवले. तरी तो बदलला नाही. तो वाईटही बोलत नसायचा. तिला आता या क्षणी वाटले, उगीच आपण तसे वागलो. त्याच्या खाण्यातूनच आपण जाणायला हवे होते..

बाळाने पाय झटकत हालचाल केली. बंद मूठ तिच्या मांडीवर पडली तशी ती भानावर आली. अजून ती जेवली नव्हती. आता तिला कडकडून भूक लागली होती.

‘चला कॅम्पस्..’ बेस्टच्या वाहकाने हाळी दिली. इतर प्रवाशांच्या मागे मागे करत मी उतरलो. घडय़ाळात दोन पन्नास झाले होते. कुठे हॉटेल दिसते का म्हणून नजर भिरभिरत होती. मलाही कडकडून भूक लागली होती.

काय योगायोग पाहा, आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या शहरात दुपारच्या तीनच्या सुमारास गवारची भाजी वाटीत यावी. याला योगायोगच म्हणावे लागेल. मग मी ठरवले आपण आनंदाने जेवायचे. शांतपणे. ‘भाकरीची गोष्ट’ आठवत. मी घास चघळू लागलो. पटकन खिशात हात घातला नि जेवताना आनंदी असल्याचा सेल्फी काढू लागलो.. मघापासून शोधतोय, त्या सेल्फीतला आनंद कुठे दिसत नाही.. त्यामुळे सेल्फी अजून मी शेअर केलेला नाही. हा आनंद गवसला की तुम्हाला लवकरच शेअर करीन.
यशवंत सुरोशे – response.lokprabha@expressindia.com