आपण पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली की निसर्गाकडे पाहायची आपली नजरच जणू बदलून जाते. वेगवेगळे पक्षी, त्यांच्या निवासाच्या जागा, त्यांचं खाणं नि त्या खाण्याची उपलब्धता, पक्ष्यांची वाढती किंवा घटती संख्या याच्या जोडीला निसर्गात होणारे बदल या सगळ्याचा कळत-नकळत विचार सुरू झालेला असतो. निसर्गातल्या संक्रमण काळात होणारे बदल आपण किती तत्परतेने पाहत असतो, टिपत असतो हे स्वतलाच विचारणं गरजेचं आहे. दररोजची प्रभातफेरी किंवा संध्याकाळी चालायला बाहेर पडल्यावर, एखाद्या सुट्टीच्या दिवशी जवळच्या उद्यानात, टेकडीवर, जंगलात चौकस नजरेने पाहिलं तर निसर्गात होत असलेले बदल सहज जाणवतात. हल्ली बहुतेक मोबाइल्स उत्तम फोटो काढू शकतात. त्याचा उपयोग केल्यास, लहानशी नोंदवही नि पेन जवळ बाळगल्यास निसर्गनिरीक्षण करण्याची नि टिपणं काढण्याची उत्तम सवय लागते. अपरिचित झाड, अनोळखी किडा, नवीन पक्षी जाणून घेतल्यावर होणारा आनंद काही औरच असतो.
अनेकांना एक प्रश्न नेहमी पडतो तो म्हणजे नवशिक्यांनी पक्षी पाहिल्यावर त्याची नोंद कशी ठेवायची? सुरुवात करताना कुठलीही गोष्ट सोप्पी नसतेच. आपल्या परिचयाच्या पक्ष्यांची नोंद करणं आपल्याला अवघड नसतं. त्याचाच आधार घेऊन पुढच्या पायरीवर जायचं असतं. नोंदवहीत पक्षी पाहिलेला परिसर आणि वेळ इथपासून सुरुवात करून ढोबळमानाने पक्ष्याचा आकार लिहायचा. पाहिलेला पक्षी चिमणीएवढाच असेल तर चिमणी = अशी नोंद करावी. जर त्यापेक्षा लहान असेल तर, चिमणी- आणि मोठा असेल तर चिमणी+ अशी नोंद ठेवावी. साधारण चिमणी ही आपल्याला चिरपरिचित असल्याने तिचा आकार लक्षात ठेवायला सोयीचा ठरतो. हीच गोष्ट मोठा पक्षी असल्यास कावळा = कावळा- अथवा कावळा+ असे करावे.
नोंदवहीत, अंदाजे चिमणीच्या किंवा कावळ्याच्या आकाराचे दोन गोळे काढून त्यात पाहिलेल्या पक्ष्याचा दिसलेला रंग, चोच, शेपूट यांचे वर्णन लिहावे. निरीक्षणानंतर हे वर्णन, आपल्याकडे असलेली पुस्तके अथवा तज्ज्ञ व्यक्ती यांच्या मदतीने ताडून पाहता येतं की तो पक्षी कुठला होता. अनेकदा असं होतं की सोबत उत्साहाने नेलेली पक्ष्यांची माहितीपुस्तकं उघडेपर्यंत पक्षी उडून गेलेला असतो. अशा वेळेस, ही
पुढे याची गरज पडत नाही, कारण आपण बरेचसे पक्षी ओळखायला लागतो. आपल्या चित्रकलेचा आणि या नोंदवहीत काढलेल्या चित्रांचा अजिबात संबंध जोडायचा नाही. हे आकार आपण अंदाजाने काढत असतो. तेव्हा ही नोंदवही कुणासमोर उघडताना लाज वाटून घ्यायची नाही. बरेचदा, आपल्याला दिवसाच्या वेगवेगळ्या वेळांमध्ये तोच पक्षी वेगळा वाटू शकतो आणि नोंद चुकीची केलीय की काय असा विचार मनात येऊन चूकही होऊ शकते. हीच शिकण्याची पहिली पायरी असते. निराश न होता ही टिपणं करत राहायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शक्यतो, जाणून ओळखून घेतलेल्या पक्ष्याची मराठी आणि इंग्रजी अशी दोन्ही नावं लक्षात ठेवत जावी. इंग्रजी नावांचा उपयोग परप्रांतात पक्षीनिरीक्षणाला गेल्यावर होतो.
या नोंद ठेवण्याच्या सवयीवरून मला एक खेळ आठवलाय. लहानपणी शाळेत असताना बहुतेक सर्वानी नाव-गाव- फळ-फूल- प्राणी हा खेळ खेळलेला असतो. नकळत्या वयात खेळलेल्या या खेळात आपण एकाच अक्षराची नावं, फुलं, फळं वगरे आठवतो. असाच काहीसा प्रकार सगळ्यांनी मिळून आसमंतात करायला काय हरकत आहे? जर या खेळात मला कुणी शिशिर असा शब्द दिला ना, तर शिशिरात निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनांची माझ्याकडे ही भली मोठी यादी तयार होईल.
या यादीपासून सुरुवात करायची म्हटली तर झाडांपासून सुरुवात करूया. आसेतुहिमाचल पसरलेल्या आपल्या देशाची नसíगक संपदा अत्यंत समृद्ध आहे. देशभर साधारण जानेवारीत थंडीचा कडाका वाढलेला असतो. ऐन मध्यावर आलेला शिशिर बहुतांश झाडांवर दिसायला लागलेला असतो. सगळीकडे झाडांची पानगळ सुरू झालेली असते आणि अचानक कुठेतरी फुलायला सुरुवात करणारी काटेसावर नजरेस पडते. मला तर कायम हे काटेसावरीचं झाड म्हणजे जणू बदकांच्या कळपातलं वेडं कुरूप पिल्लूच वाटत आलंय. इतर झाडं आपली पानं सांभाळत असताना हे झाड अगदी निष्पर्ण होऊन काटेरी होऊन बसलेलं असतं. आणि अचानक त्याच्या लुकडय़ा वाळक्या फांद्यांवर लहानसहान कळ्या दिसायला लागतात. संस्कृत भाषेत शाल्मली असं हळुवार नाव धारण करणारा हा वृक्ष बॉम्बेक्स सीबा या वनस्पतीशास्त्रीय नावाने ओळखला जातो. इंग्रजीत रेड कॉटन सिल्क म्हणून ओळखलं जाणारं हे भक्कम झाड आपण अगदी कुठेही सहज ओळखू शकतो. पानगळीनंतर निष्पर्ण होऊन अंगभर काटे मिरवणारं काटेसावर सहज वीस ते पंचवीस मीटर्सची उंची गाठतं. उतरत्या शिशिरात याच्या फांद्यांच्या टोकाकडे कळ्यांची गर्दी झालेली असते. या अंडाकृती आकाराच्या लहान लहान हिरवट कळ्या जणू बिनघरटय़ाची लहान अंडीच वाटावी अशा दिसतात. फांद्यांच्या टोकाटोकावर वाऱ्याने हलणाऱ्या या कळ्या आत्ता फुलू की केव्हा अशा तयारीत बसलेल्या असतात. जेव्हा, काटेसावरीच्या झाडाची ही मधुरसाने भरलेली आकर्षक फुलं फुलून येतात तेव्हा त्यांच्याभोवती पक्षी, कीटक, मधमाश्या यांची अगदी गजबज होऊन जाते.
सकाळच्या झुंजूमुंजू कोवळ्या उन्हाच्या वातावरणात, वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकेवर ही पांढरी पॅराशूट्स तरंगताना बघणं अगदी अवर्णनीय आनंद असतो. याच पॅराशूट्सना शेवरीचा कापूस म्हणतात. ‘सिमल’ नावाने ओळखला जाणारा हा कापूस आपल्याकडून पूर्ण युरोपात पाठवला जातो. काटेसावरीचं हे झाड खरंच बहुगुणी म्हणावं असंच आहे. याची पानं गुरांना उत्तम खाद्य, तर बिया सरकी म्हणून वापरल्या जातात. आदिवासी पाडय़ांमध्ये फुलांच्या हंगामात या तांबडय़ा भडक फुलांची भाजी केली जाते. काटेसावरीचं लाकूड मोठय़ा लाकूडकामांसाठी वापरलं जात नाही. कमी दणकट असलेलं हे लाकूड प्लायवूड निर्मितीत महत्त्वाचा घटक समजलं जातं. याच जोडीला, वजनाला हलकं असल्याने, चहाची खोकी, उंच टाचांच्या चपला बनवण्यासाठी याला प्राधान्य दिलं जातं. काटेसावरीच्या झाडापासून तयार केलेला लगदा, वृत्तपत्राच्या कागदासाठी उत्तम मानला जातो हे विशेष. लाकूड काढल्यावर निघणारी साल दोर निर्मितीसाठी वापरली जाते. असं बहुगुणी गुणी झाड आयुर्वेदाला माहीत नसेल असं होईल का? या झाडापासून बनणाऱ्या िडकाला ‘मोचरस’ म्हणतात ज्याचा वापर पोटाच्या दुखण्यांवर केला जातो. अगदी याचे काटेसुद्धा त्वचा साफ करण्यासाठी वापरले जातात. आहे ना बहुउपयोगी झाड?
िहदीत कचनार म्हणून संबोधलं जाणारं हे झाड आपल्या आपटय़ाचा जुळा भाऊ म्हणूनच ओळखलं जातं. साधारण आठ ते दहा मीटर्स उंच वाढणारं कांचन पानझडी प्रकारात गणलं जातं. हिरवीगार आणि तळहातात मावतील अशी पानं आपल्या आपटय़ाच्या पानांपेक्षा मोठी असतात. समान आकाराच्या जोडपानांमुळे संस्कृतमध्ये यांना युग्मपत्र असं नाव मिळालंय. आपल्याकडे कांचन दोन प्रकारचे आढळतात. सध्या सर्वत्र फुललेली कांचनची फुलं बॉहिनिया व्हेरिएगाटा या प्रकारची आहेत जी जानेवारी ते एप्रिलपर्यंत फुलतात. मंद वासाची ही सुंदर गुलाबी जांभळट रंगाची फुलं इतकी सुंदर असतात की त्याचं वर्णन करायला शब्द तोकडे पडावेत. हा सगळा नेत्रसुखद रंगखेळ इतका अप्रतिम असतो की बास रे बास. तळहाताएवढय़ा पाच पाकळ्यांच्या फुलांमधली एकच पाकळी गडद रंगाची असते. त्या एकाच पाकळीच्या गुलाबी जांभळ्या रंगछटेची निर्मिती कुठलीही रंगकंपनी करूच शकत नाही. याही झाडाच्या फुलांची गंमत म्हणजे, ही फुलंसुद्धा सावरीच्या फुलांसारखीच फांद्यांच्या अगदी टोकाकडे येतात. फुलांच्या बहराचा मौसम संपला की लगेचच हे झाड आपल्या चेहऱ्यावर शेंगांची उद्गारचिन्हं मिरवायला सुरुवात करतं. ही उद्गारचिन्हं वाळल्यावर कुरकुरीत होऊन सुकतात नि खाली गळून बियांचा बिछाना अंथरतात.
काटेसावर किंवा कांचन ही झाडं कुठेही सहज रुजतात नि फुलतात. यांचे औषधी गुणधर्म आपण इन्स्टंटच्या जमान्यात विसरायला लागलोय. रेताड, कमी पाण्याच्या, शुष्क जमिनीत वाढून ही झाडं त्या जमिनीचा कस वाढवायला मदत करत असतात. सध्या त्यांच्या सृजनाचा काळ सुरू आहे. आसमंतात सुरू झालेला हा रंगोत्सव जवळून निरखून पाहणार की दुर्लक्ष करणार?
रुपाली पारखे-देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com