प्रयोग : अवकाश अपंगांचंही!

विविध प्रकारची शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तीही सुरक्षितरीत्या अंतराळप्रवास करू शकतात का, हे पडताळून पाहणं हा या प्रयोगामागचा उद्देश होता.

space tour for disable person
एरिकने अंतराळवीर होता यावं म्हणून दोनदा अर्ज केला होता, मात्र तो दोन्ही वेळा फेटाळण्यात आला. शारीरिक अपंगत्व हा त्यांच्या वाटेतला मोठा अडथळा होता.

जय पाटील – response.lokprabha@expressindia.com
‘माझ्यासाठी शून्य गुरुत्वाकर्षणात तरंगणं हा जेवढा अनोखा अनुभव होता, तेवढाच स्वत:हून उभं राहता येणं हा देखील अविस्मरणीय अनुभव होता..’ हे उद्गार आहेत, एरिक इन्ग्राम यांचे. य्सॅटेलाइटचे सुटे भाग तयार करणाऱ्या ‘स्काउट’ या कंपनीचे अधिकारी असलेले एरिक यांना फ्रीमन-शेल्डन सिन्ड्रोम या आजारामुळे जन्मत:च अपंगत्व आलं. या अपंगत्वाने त्यांचं अंतराळवीर होण्याचं स्वप्न हिरावून घेतलं होतं. पण सर्वाना अंतराळप्रवासाची संधी मिळावी या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘अ‍ॅस्ट्रोअ‍ॅक्सेस’ या संस्थेने नुकत्याच हाती घेतलेल्या एका मोहिमेच्या निमित्ताने त्यांना शून्य गुरुत्वाकर्षणात वावरण्याचा अनुभव घेता आला. त्यांच्यासारख्याच एकूण १२ शारीरिकदृष्टय़ा अपंग असलेल्या व्यक्तींना या प्रयोगात सहभागी होण्याची संधी मिळाली. विविध प्रकारची शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तीही सुरक्षितरीत्या अंतराळप्रवास करू शकतात का, हे पडताळून पाहणं हा या प्रयोगामागचा उद्देश होता.

एरिकने अंतराळवीर होता यावं म्हणून दोनदा अर्ज केला होता, मात्र तो दोन्ही वेळा फेटाळण्यात आला. शारीरिक अपंगत्व हा त्यांच्या वाटेतला मोठा अडथळा होता. पण आपण पृथ्वीवरील वातावरणाच्या तुलनेत शून्य गुरुत्वाकर्षणात अतिशय कमी साधनांचा वापर करून अधिक सहजतेने वावरू शकतो, हे या मोहिमेमुळे एरिक यांना जाणवलं. यापूर्वी कधीच घेता न आलेला उभं राहण्याचा अनुभव त्यांना या प्रयोगाने मिळवून दिला. त्यांचे सहप्रवासी असलेले २७ वर्षीय सॉयर रोझेन्स्टाइन यांना माध्यमिक शाळेत असताना झालेल्या अपघातात कमरेखाली अपंगत्व आलं. अपंगत्वामुळे आपल्याला अवकाशात जाणं शक्य नाही, हे माहीत असल्यामुळे त्यांनी या क्षेत्राशी संबंधित पत्रकारिता करण्यास सुरुवात केली. शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेतल्यानंतर, ‘अशा स्वरूपाचे प्रयोग अनेक शोधांना वाट मोकळी करून देऊ शकतात,’ असं त्यांनी मत मांडलं. व्हीलचेअरसाठी वापरण्यात येणाऱ्या हलक्या धातूचा शोध हा नासाच्या अवकाश संशोधनातूनच लागल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या खास स्पेससूटला असलेल्या पट्टय़ांचा उपयोग करून ते स्वत:चे गुडघे स्वत:च वाकवू शकत होते. एरवी सतत होणाऱ्या वेदनाही त्यांना या उड्डाणादरम्यान जाणवल्या नाहीत. ‘आपलं शरीर पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहे, अधिक लवचीक झालं आहे आणि आपण शरीराच्या विविध क्षमतांचा वापर करू शकत आहोत, हा अनुभव अवर्णनीय होता,’ अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

शारीरिकदृष्टय़ा अपंग असलेल्या व्यक्तींना शून्य किंवा कमी गुरुत्वाकर्षणात आलेला अनुभव पाहता, अशा स्वरूपाच्या वातावरणाचा उपयोग अपंगांवर उपचार करण्यासाठीही केला जाऊ शकतो, असं मत इनग्राम आणि रोझेन्स्टाइन या दोघांनीही व्यक्त केलं.

या प्रवासादरम्यान करण्यात आलेल्या प्रयोगांना लक्षणीय यश आल्याची माहिती या मोहिमेच्या संचालक अ‍ॅन कपुस्टा यांनी दिली. मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व अंतराळविरांना विविध प्रकारच्या अल्प गुरुत्वाकर्षणात १५ प्रयोग केल्यानंतर स्वत:च स्वत:च्या आसनावर येऊन बसण्यात ९० टक्के यश आल्याचंही त्यांनी सांगितलं. यापैकी १२ प्रयोग हे शून्य गुरुत्वाकर्षणात, २ प्रयोग चंद्रावरील गुरुत्वाकर्षणसदृश वातावरणात आणि एक प्रयोग मंगळसदृश गुरुत्वाकर्षणात करण्यात आला. हे सर्व प्रयोग प्रत्येकी २० ते ३० सेकंद करण्यात आले. सब ऑर्बिटल फ्लाइटमध्ये अपंगांना सामावून घेता येऊ शकतं का, हे जाणून घेणं हा या प्रयोगांमागचा उद्देश होता.

नासाने आजवर तब्बल ६०० व्यक्तींना अंतराळात पाठवलं आहे. सुरुवातीला ही संधी केवळ गोऱ्या आणि शारीरिकदृष्टय़ा अतिशय सक्षम असलेल्या पुरुषांपुरतीच मर्यादित होती. नंतरच्या काळात गोरे आणि पुरुष हे निकष दूर करण्यात आले, मात्र तरीही अवकाशात जाण्यासाठी शारीरिक कणखरतेचा निकष पूर्ण करणं

अनिवार्यच राहील. त्यामुळे शारीरिकदृष्टय़ा अपंग असलेल्या व्यक्तीही उत्तम अंतराळवीर ठरू शकतात, हा दावा वारंवार केला जात असूनही अवकाशप्रवासाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंदच राहिले.

आता जगातील काही अतिश्रीमंत व्यक्ती आणि त्यांच्या कंपन्यांनी सरकारी अवकाश संशोधन संस्थांच्या मदतीने खासगी अवकाश प्रवासाच्या संधी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अवकाशात जाणाऱ्या संधी वाढल्या आहेत आणि त्यात आता अपंगांनाही सामावून घेतलं जाणार आहे.

अवकाशासंदर्भातल्या ज्ञानाच्या प्रसारासाठी कार्यरत असणाऱ्या आणि अ‍ॅस्ट्रोअ‍ॅक्सेसच्या मोहिमेची प्रायोजक असलेल्या ‘युरीज फ्लाइट’चे कार्यकारी संचालक टिम बेले यांच्यासाठी या मोहिमेचं यश हा सुखद धक्का ठरला. ‘शारीरिकदृष्टय़ा अपंग असलेल्या व्यक्तींची प्रकृती नाजूक असते, त्यामुळे त्यांना मोठय़ा प्रमाणात वैद्यकीय मदत द्यावी लागेल आणि ही मोहीम खूपच आव्हानात्मक ठरेल,’ असं मला वाटलं होतं. पण माझा अंदाज चुकीचा ठरला. माझ्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे.

पण मोहीम सर्वासाठीच पूर्णपणे सुखावह नव्हती. अमेरिकन लष्करात सेवा देताना जखमी झालेल्या ४५ वर्षीय सेन्ट्रा मॅझिक या देखील मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या मते, ‘शून्य गुरुत्वाकर्षणात वावरणं तेवढं सोपं नाही. आपलं शरीर पिसासारखं हलकं असल्याचा भास होतो. त्यामुळे आपल्याला आपल्या क्षमतांचा किंवा उणिवांचा अंदाज घेणं कठीण जातं.’

या मोहिमेमुळे अनेकांच्या २००७ मधल्या मोहिमेच्या आठवणी ताज्या झाल्या. त्यात प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग सहभागी झाले होते. पण आता हाती घेतलेल्या मोहिमेची उद्दिष्ट वेगळी होती. शारीरिकदृष्टय़ा अपंग व्यक्तींची अवकाशात स्वतंत्रपणे वावरण्याची क्षमता तपासून पाहणं आणि त्यांचा वावर सुकर करू शकतील अशी उपकरणं विकसित करणं हा या मोहिमेचा उद्देश होता. भविष्यात अनंत अवकाशाचे दरवाजे अपंगांना खुले करून देण्याच्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या अनेक प्रयोगांपैकी हा एक प्रयोग होता.

पॅराबॉलिक फ्लाइट

यात प्रत्यक्षात पृथ्वीच्या वातावरणाबाहेर न जाताच शून्य गुरुत्वाकर्षणासारखी स्थिती निर्माण केली जाते. यात यान पृथ्वीच्या वातावरणातच एकदा वरच्या आणि एकदा खालच्या दिशेने अर्धवर्तुळाकार फेऱ्या मारते. त्यामुळे त्यातील प्रवाशांना काही ठरावीक वेळाच्या अंतराने शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेता येतो. अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी अशा स्वरूपाच्या फ्लाइट्स अनेकदा घेतल्या जातात.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा ( Vishesha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Space tour for handicap person future for disable person in outer space prayog dd

Next Story
स्मरण : ‘गाझी’ची अंतिम बुडी
फोटो गॅलरी