हल्ली दर वर्षी अनेक देशांत युवतींसाठी सौंदर्य स्पर्धा होते. देशात पहिली आलेली सुंदरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जाते. तिथे जागतिक सौंदर्यसम्राज्ञी निवडली जाते. युवकांसाठी शरीरसौष्ठव स्पर्धा होतात. सर्वात कुरूप तरुण-तरुणी निवडण्यासाठी स्पर्धा घेण्याची कल्पनाही कोणी करणार नाही. पण प्राण्यांच्या बाबतीत असं घडलं आहे.
चीनमधील गोंडस, देखणा पांडा जेव्हा संकटग्रस्त झाला तेव्हा त्याच्या संरक्षणासाठी जगाचे लक्ष वेधण्याकरिता जागतिक वन्य संरक्षण निधी या हहा संस्थेने त्याला आपल्या बोधचिन्हात स्थान दिले. त्यासाठी त्याच्या सौंदर्याचा प्रभाव पडला असावा. देखण्या प्राण्याच्या संरक्षणाची जबाबदारी उचलण्यासाठी अनेक संस्था, व्यक्ती पुढे येतात. वाघासारख्या उमद्या रुबाबदार प्राण्याच्या संरक्षणासाठी व्याघ्रप्रकल्प उभे राहतात. जगभरात देखणे प्राणी आहेत, तसेच ओंगळ, कुरूप, प्राणीही आहेत. निसर्गात तेही आपली भूमिका बजावत असतात. तेही संकटग्रस्त होतात पण त्यांच्या संवर्धनासाठी कोणी पुढे सरसावत नाही. ही खंत उरी बाळगून इंग्लंडमध्ये अग्ली अॅनिमल प्रिझर्वझेशन सोसायटी ही संस्था निर्माण झाली. त्यांनी जगातील सर्वात कुरूप प्राण्याला आपल्या बोधचिन्हात स्थान देण्याचे ठरवले. असा प्राणी ठरविण्यासाठी त्यांनी एक जनमत चाचणी घेतली. चाचणीत जनतेने त्यांना वाटणारा कुरूप प्राणी सुचवावा असे आवाहन केले. त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. काही नावे पुढे आली. त्यातून दहा नावांची प्राथमिक यादी तयार झाली. त्यात तांबडय़ा ओठाचा बॅटफिश, तारानाकी चिचुंद्री, बॉथॅॅगि, मोल रॅट, कॅलिफोर्निया काँडार, टिटिका बेडूक, काकापो, सोंडनाक्या माकड आणि ब्लॉब फिश यांचा समावेश होता. त्यातून विजेता म्हणजे ‘कुरूपोत्तम’ आणि उपविजेता निवडला गेला. एकंदर मतदान होते तीन हजार. त्यापैकी ७९५ मते मिळवून ब्लॉबफिश कुरूपोत्तम ठरला आणि उपविजेतेपद आले सोंडनाक्या माकडाकडे.
हल्ली कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये अगोदर उपविजेत्याची दखल घेतली जाते, त्याप्रमाणे सोंडनाक्या माकडाची ओळख करून घेऊ.
लांब सोंडेसारखे नाक असलेले माकड सापडते फक्त आशिया खंडातील बोर्निओमध्ये. ते प्रोबोसिस मंकी (Proboscis Monkey -Nasalis Larvatus) या नावाने ओळखले जाते. त्याच्या कुरूपतेचा मोठा वाटा आहे त्याच्या लांब नाकाकडे. सुमारे १४ सें.मी. लांबीचे फताडे नाक त्याच्या ओठाखाली ओघळलेले असते. आशियाई माकडात ते सर्वात मोठे माकड. त्यातही नराचे नाक मादीच्या मानाने अधिकच बेढब. त्यापाठोपाठ लक्ष जाते त्याच्या ढेरपोटाकडे. अन्य कुठल्याही जातीच्या माकडाचे पोट सुटलेले नसते. झाडावर धावपळ करीत उडय़ा मारत असूनही पोट सुटते कसे? नराचा आकार ६५ ते ७५ सेमी आणि वजन १६ ते २२ किलो. शरीराएवढेच लांब शेपूट. अंगावरचे केस नारिंगी, लाल, किरमिजी- मादी आकाराने बरीचशी लहान.
ज्या दिवसांत झाडांवर फळे असतात त्या दिवसांत फळांवर गुजराण. त्यातही पिकलेल्या फळांपेक्षा कच्ची फळे खाण्याची आवड. त्यामुळे पचनक्रिया अव्यवस्थित असावी. फळे नसतील तेव्हा पाने, फुले, कोंब यांवर ताव. ती नेहमीच झाडावर राहतात आणि त्यातही आडव्या फांदीवर ताठ बसतात. गॅस निघून जाण्याकरिता तर ते असे बसत नसतील? अलीकडे त्यांचे व्हिडीओ चित्रण झाले असता एक नवीन बाब समोर आली. ती म्हणजे पोटातील अर्धेकच्चे पचलेले अन्न ती पुन्हा तोंडात आणतात, चावतात, चघळतात आणि खाली ढकलतात. काहीसे रवंथ पण गायी-म्हशीप्रमाणे नाही. खाल्लेले अन्न तो लगोलग पोटात उतरवत असल्याने दिवसभर एक सारखे तोंड चालू असते.
बोर्निओतही मोजक्या भागात राहणारी ही माकडे शिकारीमुळे व वृक्षतोडीमुळे झपाटय़ाने कमी झाली आहेत. गेल्या चाळीस वर्षांत त्यांची संख्या निम्मी झाली आहे. सध्या ती जेमतेम हजारभर असतील. त्यामुळे जागतिक संघटनेने त्यांना ‘संकटग्रस्त’ घोषित केले आहे.
त्याला उपविजेतापदाचा (अव)मान मिळाला असल्याने त्याने टीव्हीला बाइट दिली असती तर तो म्हणाला असता, ‘‘हा म्हणजे आमचा घोर आपमान आहे. परीक्षकांनी आमच्यावर अन्याय केला आहे. खरं म्हणजे सोंडनाकामुळे मुली आमच्याकडे आकृष्ट होतात. मग माणसांनी आमच्या नाकावरून आम्हाला नावे का ठेवावीत. त्यांनी त्यांचे मानदंड आमच्यावर लादू नयेत. त्यांनी दिलेला हा सन्मान मी मुळीच स्वीकारणार नाही.’’
‘कुरूपोत्तम’पदाचा मान बहुमताने ब्लॉबफिशच्या वाटय़ाला आला. हा मासा ऑस्ट्रेलिया, टास्मानिया, न्यूझीलंडजवळच्या समुद्रात सुमारे ८००-१२०० मीटर खोलीवर असतो. त्यामुळे तो माणसाच्या नजरेला येत नाही. इतक्या खोलीवर पाण्याचा प्रचंड दाब असल्याने त्याचे शरीर चिरपरिचित जलचरासारखे असते तर शरीरातील पोकळय़ा दाबामुळे फाटून त्याचे शरीरच उचकटून गेले असते. म्हणून त्याची शरीररचना वेगळीच झालेली आहे. तो एखाद्या थुलथुलीत, मऊ लिबलिबीत गोळय़ासारखा दिसतो. त्याचे शास्त्रीय नाव Psychrocyted Marcidus. त्याच्या शरीराची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा थोडी अधिक आहे. त्यामुळे तो खोलवर पाण्यात तरंगत असतो. इकडून तिकडे जाण्यास त्याला अत्यल्प ऊर्जा लागते. तिथे मिळणारे मृदुकाय, कालवं, जीवजंतू इ.खाद्यावर तो आपले पोट भरतो. हा मासा म्हणजे कार्यक्षम ऊर्जा खर्चणारे इंजिन आहे. तो ३० सें.मी. आकाराचा आहे. खोलवर मासेमारी करणाऱ्या जहाजांच्या जाळय़ात अडकून ते प्राणाला मुकतात. त्यामुळे त्यांची संख्या घटते आहे. तोही संकट ग्रस्त झालेला आहे.
दिसायला ओंगळ, बटबटीत असल्याने त्याच्या वाटय़ाला हा (अव)मान आला आहे.
प्रसारमाध्यमे त्याची भूमिका समजू शकतील तर ती अशी असेल, ‘‘विकासक्रमात माझ्या वाटय़ाला माझं असं रूप आलं त्याला माझा नाइलाज आहे. पाण्याबाहेर काढून आमचं ओंगळ रूप जगाला दाखवून माणसानं माझी अवहेलना करावी हे एकदम अयोग्य आहे. तुमच्या स्मिथ सोविअत संस्थेनं, जी जगविख्यात आहे, कॉलिन शूल्ट्झच्या द्वारा हेच सांगितलं आहे. हा निकाल दिला आहे माणसातील काही लोकांनी. खरं तर त्यांनाच माणसाची ओळख पटलेली नाही. ही माणसं लहान मुलांना गोळय़ा घालतात, त्यांच्यावर बॉम्ब फेकतात, हॉस्पिटलमध्ये अंदाधुंद गोळीबार करतात. माणसाला संपविण्यात त्यांना धन्यता वाटते. ते राहतात त्या धरतीवरच काय, पण सागराचं पाणी, वातावरण प्रदूषित करताना त्यांना काहीच वाटत नाही. तेव्हा तोच खरा कुरूप आहे. म्हणून हा मुकुट त्यालाच बहाल केला पाहिजे असं मी म्हणेन.’’
संग्रहित लेख, दिनांक 4th Apr 2014 रोजी प्रकाशित
विचित्र वन्यविश्व : कुरूपोत्तम
सर्वात कुरूप तरुण-तरुणी निवडण्यासाठी स्पर्धा घेण्याची कल्पनाही कोणी करणार नाही. पण प्राण्यांच्या बाबतीत असं घडलं आहे. दहा प्राण्यांमधून कुरुपोत्तम विजेता व उपविजेता निवडय़ात आला.
First published on: 04-04-2014 at 01:14 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weird wildlife