हमारी मांगे पुरी करो, हम तुम्हारे साथ है या घोषणेत थोडा फार फरक करत तरुणांनी बदललेली घोषणा आहे, ‘हमारी मांगे पुरी करो फिर ही हम तुम्हारे साथ रहेंगें..’
आजची तरुण पिढी असं म्हणते कारण आजची व्यावहारिक तरु ण पिढी नुसत्या वचनांना भुलणारी नसून कामावर त्यांचा विश्वास जास्त आहे. येत्या निवडणुकीसाठीपण आजची तरुण पिढी तेवढीच सतर्क आहे का? तितक्याच गांभीर्याने जागरूक नागरिक म्हणून मतं देण्याची जबाबदारी पार पाडू इच्छिते का? का फक्त ही बोलाची कढी आणि बोलाचा भातच आहे?
तरुणाईशी निगडित हे आणि असे बरेच प्रश्न आपल्याला पडतात. येत्या निवडणुकीनंतरच त्या शंकांचं निरसन होण्याची शक्यता आहे. आपल्या देशाकडे सध्या सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून बघितला जातो. या तरुणाईचा एकंदरीतच सर्व गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला दिसतो. याआधीच्या बऱ्याच निवडणुकांमध्ये तरुण मंडळींचा सहभाग मोठय़ा प्रमाणात दिसून आलेला नव्हता. ही परिस्थिती आता बदललेली आहे. मतदार यादीत ज्यांचे नाव नाही असे यंगस्टर्स नाव नोंदणीकरता मोठय़ा संख्येने रांगेत उभे दिसतात. या वेळी पहिल्यांदा मत देणारी लोकसंख्या ही जवळजवळ १५ कोटींपर्यंत जाईल अशी शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस आहे असे बऱ्याच जणांचे वागणे असे. काहींचा समज होता की आपल्या एका मताने असा काय फरक पडणार आहे? पण आता याबद्दलची जागरूकता वाढलेली बघायला मिळते. ही सतर्कता नुसती स्वत:पुरती नसून आपल्या दोस्त मंडळींना याचे महत्त्व पटवून देणारी दिसते. याचे उदाहरण द्यायचे झाले तर ते म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक समस्यांवर काम करणाऱ्या संस्था म्हणजेच एन.जी.ओ.मध्ये बरेच युवक काम करतात आणि लहानथोर सर्वानीच मतदानाबाबत संवेदनशील व्हावे यासाठी प्रयत्न करतात. होर्डिग लावणे, पोस्टर्स बनवणे, मतदानाचे महत्त्व पटवून देणे इत्यादी कामांसाठी ही तरुण मंडळी स्वत:हून पुढे येताना दिसतात.
माध्यमांमधून येणाऱ्या शासनपुरस्कृत जाहिरातींमध्येही तरुणांचा समावेश जास्त केल्याचे दिसून येते. यामागचा उद्देश कदाचित तरुणांमध्ये जागरूकता वाढवणे व त्यांना मतदानाबद्दल तसेच कोणाला मत द्यायचे याबाबत गंभीर व्हावे असा असेल. जाहिरातीत दाखवलेल्या तरुण मुला-मुलींप्रमाणे खऱ्याखुऱ्या राजकारणातदेखील तरुण उमेदवारांचा समावेश झाल्याचे दिसते. तरुणांची ऊर्जा,जोश या गोष्टी आपल्याप्रमाणेच तरुण उमेदवारांमध्ये आहेत या साधम्र्यामुळे कदाचित तरुणाई त्यांच्याकडे आकर्षित होत असावी. आकर्षणाबरोबरच उमेदवारांकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत.
काही वर्षांपूर्वी राजकारण हे क्षेत्र वयस्करांसाठी आहे असे बऱ्याच जणांना वाटे. म्हणून या क्षेत्राकडे कोणी करिअर घडवण्याच्या दृष्टीने पाहत नसे. गांभीर्याने विचार करत नसे. चांगल्या घरातील शिक्षित मुलं या क्षेत्राकडे क्वचितच जात. सुशिक्षित लोकांचा राजकारणात समावेश असला तर देश प्रगती करू शकेल हा देशबांधवांचा आता झालेला दृष्टिकोन आहे. एकंदरीतच फक्त तरुणाई नव्हे तर सर्वानाच असे वाटते की तरुणांनी इतर क्षेत्राप्रमाणे या क्षेत्राकडेही गांभीर्याने बघावे.
प्रचार व प्रसार करायला ज्याप्रमाणे प्रौढ मंडळी येतात, त्याचप्रमाणे मतदानाबद्दल जागरूकता वाढवण्याकरता जर तरुण कार्यकर्त्यांनी त्या त्या भागात, घराघरात जाऊन लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले, तर कदाचित तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग बघून आपणही याचा विचार केला पाहिजे असे इतर तरुणांना वाटल्याशिवाय राहणार नाही.
पूर्वी राजकारण म्हटले की ज्येष्ठ अनुभवी अशा प्रौढ लोकांचा समावेश असे. तरुण म्हणजे अपरिपक्व अन् अनुभवी असे समजत असत. त्यांच्या विचारांची दखल तितकीशी घेतली जात नसे. पूर्वी मतदानाचा अधिकार एकवीस वर्षे पूर्ण झाल्यावर दिला जात असे. जागतिकीकरणामुळे जग जवळ आल्यासारखे झाले आहे. इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे विविध क्षेत्रांतील जागतिक घडामोडींबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे. म्हणून तरुणांच्या विचारांच्या कक्षाही रुंदावल्या आहेत. हे सर्व विचारात घेता मतदानाचा अधिकार एकवीस वर्षांवरून अठरा वर्षांपर्यंत खाली आणला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांचा निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभाग असलेला दिसतो. तसेच आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे बरीचशी तरुण मंडळी एकंदरीतच राजकारण व मतदानाबद्दल लक्ष घालताना दिसतात.
वरील विवेचनावरून जसे राजकारण तसेच मतदानाच्या बाबतीत तरुणांचा सहभाग जितका महत्त्वाचा आहे तितकाच प्रौढांचा अनुभवदेखील महत्त्वाचा ठरतो.
संग्रहित लेख, दिनांक 18th Apr 2014 रोजी प्रकाशित
निवडणूक विशेष : तरुण @ निवडणूक..
यंदाच्या निवडणुकीतला तरुण टक्का सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारा आहे. हे तरुण मतदानाला उतरले तर निवडणूक लक्षणीय ठरण्याचीही शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर तरुणांच्या सहभागाबद्दल तरुणांशी बातचीत-
First published on: 18-04-2014 at 01:28 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yout at election