प्रशांत कुलकर्णी
पांढराशुभ्र हाफ शर्ट आणि पांढरी लुंगी नेसलेले ८७ वर्षांचे मल्याळम्मधील ज्येष्ठ व्यंगचित्रकार सुकुमार खुर्चीत ताठ बसलेले असतात. मल्याळम्मधील पहिल्या व्यंगचित्राची गोष्ट सांगण्यासाठी ते इतके अधीर झालेले असतात, की माझ्याकडे पाहून ते मल्याळम्मधूनच सुरुवात करतात. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव पाहून ते दिलखुलास हसतात आणि अस्खलित इंग्रजीतून तो ऐतिहासिक प्रसंग सांगायला सुरुवात करतात..
‘‘बऱ्याच वर्षांपूर्वी मी त्रिवेंद्रममध्ये राहत असताना तिथे एका मोठय़ा ग्रंथालयाच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. बरीच पुस्तकं त्यांनी व्हरांडय़ामध्ये रचून ठेवली होती. ते पाहून मी त्यांना काही मदत करू का, अशी विचारणा केली. होकार आल्यावर मी रोज संध्याकाळी जाऊन पुस्तकांची वर्गवारी करत असे. ‘विनोद’ हा माझा आवडता विषय असल्याने त्यासंदर्भातली काही पुस्तकं, नियतकालिकं मी हाताळत होतो. त्यातच मला एक जुनापुराणा अंकांचा गठ्ठा सापडला. त्या नियतकालिकाचं नाव होतं- ‘विदूषकन्’! त्याचे सगळे अंक मी चाळू लागलो. आणि पाचव्या अंकात मला एक चित्र दिसलं. मुखपृष्ठावर एका विदूषकाचं रेखाचित्र होतं आणि आतमध्ये एक व्यंगचित्र दिसलं. साल होतं- १९१९! माझे डोळे विस्फारले. कारण त्यापूर्वी कोणत्याही मल्याळम् नियतकालिकात मला कधी व्यंगचित्र दिसलं नव्हतं. पी. एस. गोविंद पिल्ले हे या व्यंगचित्रकाराचं नाव. आम्ही यापुढे अशी ‘विनोदी चित्रे’ प्रकाशित करत राहू, असंही या अंकात लिहिलं होतं.’’
मल्याळम् भाषेतील व्यंगचित्रांचा सुकुमार यांचा अभ्यास दांडगा असल्याने हे चित्र मल्याळम्मधील पहिलं व्यंगचित्र असल्याचं त्यांनी ताडलं. त्या काळात केरळ प्रांतात महाभयंकर दुष्काळ पडला होता. त्या पार्श्वभूमीवरचं हे चित्र होतं. दुष्काळ नावाचा ‘महाश्यामदेवता’ नावाचा राक्षस उगवला असून ब्रिटिशांचा त्याला वरदहस्त आहे, तर दुसरीकडे दुष्काळग्रस्त लोक सुरणसदृश कंदमुळं खाऊन जगत आहेत अशा आशयाचं ते व्यंगचित्र आहे.
ब्रिटिशांवर इतक्या कडक शब्दांत (खरं तर रेषांत!) टीका करणारी काही चित्रं पिल्ले यांनी ‘विदूषकन्’मध्ये काढली. वाचकांमध्ये असलेली उत्सुकता लक्षात घेऊन त्या सुमारास इतर वर्तमानपत्रांनीही ‘विनोदी चित्रे’ प्रकाशित करण्याचा विचार सुरू केला.
गोविंद पिल्ले हे मल्याळी आद्य व्यंगचित्रकार (१८७६-१९३२). पण त्यांच्याबद्दल फारच तुटक माहिती उपलब्ध आहे. संस्थानातील दिवाणजींकडे काही वर्षे काम केल्यावर तिथे त्यांचा भ्रष्टाचारावरून वरिष्ठांशी खटका उडाला. पुढे कट-कारस्थानांचे बळी ठरून शिक्षा म्हणून त्यांची रवानगी ब्रिटिशांनी चक्क अंदमानला केली. यात कदाचित त्यांच्या ब्रिटिशविरोधी व्यंगचित्रांचंही कारण असू शकेल. तिथे दोन वर्षांनंतर हिवतापाचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांची सुटका करण्यात आली. तथापि केरळमध्ये आल्यावर अल्पावधीतच त्यांचं निधन झालं, अशी माहिती त्यांची नात डॉ. लेखा सुरेश यांनी दिली. या आद्य व्यंगचित्रकाराचे सुभाषचंद्र बोस यांच्याशी उत्तम संबंध होते. त्यामुळे त्यांची दोन मुलं आझाद हिंद सेनेत दाखल झाली होती.
या मल्याळम्मधील पहिल्या व्यंगचित्राच्या शताब्दीच्या निमित्ताने जिथून हे ‘विदूषकन्’ प्रकाशित होत होतं त्या कोळ्ळम् या शहरात नुकतंच एका व्यंगचित्र परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात केरळ मीडिया अकादमीने तरुण पत्रकारांसमोर देशभरातील निवडक व्यंगचित्रकारांना विविध विषयांवर मतं मांडण्यासाठी आणि सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. १८८० साली ‘हिंदू पंच’ या साप्ताहिकापासून मराठी व्यंगचित्रकलेची सुरुवात होऊन पुढे शंकरराव किलरेस्करांनी या कलेला खतपाणी घातलं आणि ही कला पुढे अनेक अंगांनी विस्तारली, असं सादरीकरण प्रस्तुत लेखकाने या परिषदेत केलं.
तत्पूर्वी सर्व व्यंगचित्रकारांनी कायम्कुळम् या गावाला भेट दिली. इथे एक अनोखी वास्तू आहे. भारतीय राजकीय व्यंगचित्रकारांचे आद्य गुरू शंकर पिल्ले (‘शंकर्स वीकली’चे संस्थापक-संपादक) यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘शंकर कार्टुन म्युझियम’ नावाची भव्य आर्ट गॅलरी उभी करण्यात आली आहे. अशा प्रकारचं एखाद्या व्यंगचित्रकाराचं देशातील हे पहिलंच स्मारक आहे. शंकर यांची शंभरहून अधिक मूळ व्यंगचित्रं या गॅलरीत दोन मजल्यांवर मांडलेली आहेत. सोबत त्यांची असंख्य छायाचित्रं, पद्मविभूषण मानपत्र, बातम्या इत्यादीबरोबरच त्यांची आरामखुर्ची आणि चित्र काढण्यासाठीचा ड्रॉइंग बोर्ड, खुर्ची हेही आत्मीयतेनं मांडून ठेवलं आहे. गॅलरीत इतर व्यंगचित्रकारांसाठी एक स्वतंत्र दालन राखून ठेवलेलं आहे. गॅलरीच्या परिसरात असंख्य शिल्पंही मांडली आहेत. व्यंगचित्रांबद्दल केरळमधील समाजामध्ये किती जागरूकता आहे, हे वरील दोन्ही प्रसंगांतून समजून येईल.
prashantcartoonist@gmail.com