अभिजीत रणदिवे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वर्षीच्या ऑस्कर स्पर्धेत ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स’नं ११ नामांकनांसह आघाडी घेतली होती. सोहळय़ात सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्री, साहाय्यक अभिनेता-अभिनेत्री, मूळ पटकथा वगैरे सात पुरस्कार त्यानं पटकावले. आशियाई वंशाच्या अमेरिकन कुटुंबाची कहाणी सांगणाऱ्या चित्रपटाला एवढे पुरस्कार मिळाल्यामुळे इतिहास घडला आहे, अशा बातम्या येत आहेत. त्याचप्रमाणे ‘ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट’ या युद्धविरोधी जर्मन चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि इतर तीन पुरस्कार मिळाले आहेत. परकीय भाषेतल्या एका चित्रपटानं चार पुरस्कार मिळवणंदेखील उल्लेखनीय आहे. त्यातच ‘दी एलिफंट व्हिस्पर्स’ आणि ‘नाटू नाटू’च्या यशानं भारतीय हुरळून गेलेले दिसताहेत. जागतिक सिनेविश्वात काहीही चालू असो; स्वत:वर खूश असण्यासाठीच प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन सिनेव्यवसायानं आणि त्यांच्या अकादमीनं खरंच कात टाकली आहे का?

 ‘‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स’मधलं चिनी वंशाचं मध्यमवयीन जोडपं एक ‘लाँड्रोमॅट’ म्हणजेच आकर्षक ‘धोबीघर’ चालवतं. व्यवसाय फार यशस्वी नसला तरी तग धरून आहे. कारभार प्रामुख्यानं पत्नीच्याच (एव्हलिन) हातात आहे. तो सुरळीत चालू ठेवण्यात तिचा फार वेळ आणि ऊर्जा जात असल्यामुळे ती सतत कातावलेली असते. त्यातच नव्या वर्षांच्या सोहळय़ासाठी तिचे म्हातारे वडील येऊ घातले आहेत. नेमक्या अशा वेळी समस्यांचे डोंगर कोसळतात. व्यवसायासंबंधी सादर झालेल्या बिलांवर प्राप्तिकर खात्याच्या कार्यालयातली एक अधिकारी आक्षेप घेते. त्यावर नीट स्पष्टीकरण देता आलं नाही तर व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देते. निष्प्रेम वैवाहिक आयुष्याला कंटाळलेला नवरा (वेमंड) घटस्फोटाची नोटीस देतो. वयात आलेली मुलगी (जॉय) समिलगी आहे. आपल्या गोऱ्या जोडीदारणीला स्वीकारायला आई तयार नसल्याचं पाहून ती वैतागली आहे. या सर्व समस्यांचं निराकरण होऊन शेवट गोड होतो. आपल्या जीवनसंघर्षांला सामोरी जाताना एव्हलिनला काही साक्षात्कार होतात. लोकांशी गोड बोलणं, त्यांच्याविषयी कणव बाळगणं, कुटुंबीयांना समजून घेणं, त्यांच्याविषयीचं प्रेम वेळोवेळी व्यक्त करणं आणि त्यांना वेळ देणं महत्त्वाचं आहे, अशा प्रकारचे हे बाळबोध साक्षात्कार आहेत.

वाचताना हे कथासूत्र विशेष वाटणार नाही, पण त्याच्या आधारानं एक चमत्कृतींनी ओतप्रोत नवलकथा चित्रपटात उभी राहते. त्याच व्यक्तिरेखा असणाऱ्या अनेक समांतर विश्वांचं एक ‘मल्टिव्हर्स’ त्यात आहे. या व्यक्तिरेखांनी वेळोवेळी आयुष्यात घेतलेल्या निर्णयांनुसार विश्वांच्या बहुशाखा निर्माण झाल्या आहेत. एका विश्वात एव्हलिन मार्शल आर्ट्समध्ये पारंगत आहे, तर एका विश्वात ती सिनेतारका आहे. एका विश्वात ती आणि जॉय दगड आहेत, तर एका विश्वातल्या सर्वाच्या हातांची बोटं लांबोळक्या ‘सॉसेजे’सची आहेत. शिवाय, विश्व नष्ट करण्याचे खलनायकी प्रयत्न थांबवण्याची क्षमता केवळ नायिकेकडे आहे. म्हणजे हॉलीवूडचा नेहमीचाच पण यशस्वी फॉम्र्युला इथं आहे. म्हटलं तर हे सगळं उथळ आहे; म्हटलं तर डोकं बाजूला ठेवून मजा घेण्याजोगं हलकंफुलकं आहे. विनोद, अ‍ॅक्शन, भावनांचा कल्लोळ असा सगळा मसाला त्यात आहे. झालंच तर समीक्षकांना त्यात अस्तित्ववाद आणि शून्यवादाचंही (निहिलिझम) दर्शन घडलं आहे. ‘मल्टिव्हर्स’ची कल्पना अलीकडे फॅशनेबल झाली आहे (उदा. स्पायडरमॅन, डॉ. स्ट्रेंज, अ‍ॅव्हेंजर्स वगैरे). लहानपणापासून आभासी जगात, गेम्स खेळत वाढलेल्या प्रेक्षकांच्या काही पिढय़ा आता आहेत. त्यांना सिनेमात अशा गोष्टी पाहायला आवडतात. म्हणजे धंद्याचा हिशेब यामागे आहे हे स्पष्ट आहे. मात्र केवळ अशा हिशेबांनी चित्रपटाच्या ऑस्करयशाचा उलगडा होत नाही, कारण तसं म्हटलं तर ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ किंवा ‘टॉप गन : मेव्हरिक’ हे गेल्या वर्षीचे याहून मोठे सुपरहिट चित्रपटही ऑस्करच्या स्पर्धेत होते, पण त्यांना फारसं यश मिळालेलं नाही. मग ‘एव्हरीथिंग..’च्या यशामागे काय असेल?

एक तर, आशियाई वंशाच्या कुटुंबाची अमेरिकेत टिकून राहण्याची आणि ‘अमेरिकन ड्रीम’ प्रत्यक्षात आणण्याची धडपड हा कथेचा पाया आहे. समिलगी मुलीला कुटुंबाकडून स्वीकारलं न जाण्याचा मुद्दा त्यासोबत आहे. त्यामुळे अकादमीच्या आधुनिकतावादी- उदारमतवादी मतदारांची सहानुभूती चित्रपटाला मिळालेली असू शकते. आताच्या समाजमाध्यमांच्या आभासी, पण काही वेळा वास्तवापेक्षाही अधिक निर्घृण भासणाऱ्या जगात वावरताना, तिथे ‘लाइक्स’ मिळवताना आणि काळजीपूर्वक उभारलेली सर्वगुणसंपन्न स्व-प्रतिमा जपताना लोकांची दमछाक होते. त्यातून त्यांना नैराश्यही येतं किंवा कशालाच काही अर्थ नाही असंही वाटू लागतं. त्यामुळे संसार आणि व्यवसाय चालवता चालवता दमलेली एव्हलिन, वेगवेगळय़ा विश्वांमध्ये टिकून राहण्यासाठी तसंच सर्वनाश टाळण्यासाठी धडपडणारी एव्हलिन प्रेक्षकांना जवळची वाटू शकते. या सगळय़ा घटकांचा परिणाम म्हणजे चित्रपटाचा एक ‘कल्ट’ तयार झाला. तो दबावगट म्हणून कार्यरत होता. चित्रपटाशी संबंधित अनेक कलाकारांनीही हिरिरीनं समाजमाध्यमांवर त्याची प्रसिद्धी करताना आशियाई वंशाच्या मुद्दय़ाला अधोरेखित केलं.

दर वर्षी ऑस्कर सोहळय़ाचा दिवस जसजसा जवळ येत जातो तसतसे कोणाला कोणता पुरस्कार मिळणार याविषयीचे अंदाज प्रसारमाध्यमांमध्ये येऊ लागतात. ह्य वर्षीचे बरेचसे अंदाज ‘एव्हरीथिंग..’ला निर्भेळ यश देणारे होते. त्यामागे कदाचित वरचे घटक कार्यरत होते. मतदाराला आपल्या चित्रपटाकडे वळवण्यासाठी मार्केटिंगवर सगळेच भरपूर खर्च करतात (‘आरआरआर’चं कँपेनही व्यवस्थित खर्चीक होतं). त्यात ‘एव्हरीथिंग..’ विशेष यशस्वी ठरत असल्याचं दिसत होतं. एका पातळीवर डोकं बाजूला ठेवून चित्रपट ‘एन्जॉय’ करता येतोय आणि दुसऱ्या पातळीवर उपेक्षित लोकांची दखल घेतल्याचं नैतिक समाधानही मिळतंय अशा दुहेरी आनंदात मतदारांनी आपला कौल त्या बाजूला दिला असावा.

जुन्या खेळाडूंची पीछेहाट..

‘एव्हरीथिंग..’च्या मार्केटिंगपुढे स्पीलबर्गसारखा जुना खेळाडूही मागे पडला. करोनाच्या काळात स्पीलबर्गला आपल्या नश्वरतेची तीव्र जाणीव झाली. उद्याची शाश्वती नाही अशा वेळी कोणती गोष्ट सांगायची आपल्याकडून राहून गेली आहे, असा प्रश्न त्यानं स्वत:ला विचारला, आणि त्यातून ‘द फेबलमन्स’ आकाराला आला. ही एकीकडे स्पीलबर्गच्या आई-वडिलांच्या अपयशी वैवाहिक आयुष्याची गोष्ट आहे, तर त्या पार्श्वभूमीवर वयात येणाऱ्या आणि सिनेमाचा नाद लागणाऱ्या स्पीलबर्गचीही ती गोष्ट आहे. वाढत्या वयात त्याला ज्या ज्यू-द्वेषाला सामोरं जावं लागलं त्याचंही चित्रण त्यात आहे. सिनेमाकडे वळण्यामागच्या त्याच्या धारणा, त्याच्या सिनेनिर्मितीमागच्या प्रेरणा, अशा अनेक गोष्टींचे संदर्भ त्यात येतात. विविध महोत्सवांत तो गाजला; त्याला समीक्षकांची पसंती मिळाली; गेल्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या काही याद्यांत त्याचा समावेश झाला; गोल्डन ग्लोबसारखे काही महत्त्वाचे पुरस्कारही मिळाले. निष्प्रेम विवाहात अडकलेल्या आईच्या भूमिकेसाठी मिशेल विलियम्सची बरीच प्रशंसा झाली. त्यासाठी तिला ऑस्कर नामांकन मिळालं. शिवाय सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, पटकथा वगैरे एकूण सात नामांकनं चित्रपटाला मिळाली, परंतु एकही पुरस्कार मिळाला नाही. अकादमीच्या सदस्यांनी त्याकडे पाठ फिरवण्यामागे विषयाचं गांभीर्य हे तर कारण नसेल? किंवा स्पीलबर्गच्या कारकीर्दीचा ऐन बहर ओसरल्यानंतरच्या काळात वाढलेल्या तरुण अकादमी सदस्यांना स्पीलबर्गच्या प्रेरणा जाणून घेण्यात किंवा पारंपरिक शैलीत गोष्ट सांगणाऱ्या चित्रपटांत रस वाटत नसेल का? गेल्या काही वर्षांत स्पीलबर्गच्या चित्रपटांच्या ऑस्करयशाची कहाणी नरमगरमच आहे. (उदा. ‘द पोस्ट’ पुष्कळ नावाजला गेला, पण त्याला केवळ दोन नामांकनं होती आणि एकही पुरस्कार मिळाला नाही.) बॉक्स ऑफिसवर आणि ऑस्करच्या शर्यतीत पूर्वी उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या जेम्स कॅमेरॉनची गतही अशीच झाली. या वर्षीच्या ‘अवतार’नं २००९च्या ‘अवतार’पेक्षाही गल्ल्यावर अधिक यश मिळवलं, पण तो ऑस्कर मात्र एकच (व्हिज्युअल इफेक्ट्स) मिळवू शकला. ह्या दोन दिग्गजांना ऑस्करनं अशी हूल देणं हे कदाचित काळ बदलल्याचंच लक्षण आहे.

तगडे प्रतिस्पर्धी असूनही..

‘टार’ किंवा ‘बॅन्शीज ऑफ इनिशेरिन’सारख्या समीक्षकांना प्रिय असलेल्या तगडय़ा प्रतिस्पर्ध्याचाही ‘एव्हरीथिंग..’समोर टिकाव लागला नाही. पटकथा, दिग्दर्शन आणि अभिनयासारख्या मुद्दय़ांवर हे चित्रपट नावाजले गेले होते. इतर काही महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळाले, परंतु ऑस्कर अप्राप्य ठरलं.

जर्मन सिनेमाचे अमेरिकी कौतुक.. 

‘ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट’ त्यातल्या त्यात तग धरू शकला. एरिक मारिया रमार्कच्या नावाजलेल्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. पहिल्या महायुद्धात लढणाऱ्या एका कोवळय़ा जर्मन सैनिकाची गोष्ट त्यात सांगितली आहे. आपण देशासाठी काही तरी   उदात्त काम करतो आहोत अशा रोमँटिक कल्पनेतून सैन्यात भरती झालेला नायक युद्धाच्या वास्तवाला सामोरा जातो तेव्हा त्याला युद्धाचा दणका अनुभवायला मिळतो आणि त्याची निरर्थकता जाणवते, असं थोडक्यात कथासूत्र आहे. नेटफ्लिक्सची खर्चीक निर्मिती असलेल्या ह्या चित्रपटात पहिल्या महायुद्धाचा काळ उभा करण्यावर पुष्कळ परिश्रम घेतलेले आहेत. विषयाला साजेसं, धीरगंभीर आणि गरजेनुसार जोरकस संगीत त्यात आहे. मोठय़ा पडद्यावर पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर येईल आणि पोटात ढवळू लागेल अशी वास्तवदर्शी हिंसा आहे. कोवळय़ा, देखण्या नायकाच्या युद्धविषयक रम्य कल्पनांचे इमले जसजसे ढासळू लागतात तसतशी प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारी भावनिकताही त्यात आहे. म्हणजे चित्रपट ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’, ‘डंकर्क’ किंवा ‘१९१७’सारख्या युद्धपटांच्या रांगेत शोभेलसा आहे. कदाचित त्यामुळेच अमेरिकेत त्याचं जितकं कौतुक झालं तितकं जर्मनीत झालं नाही. जर्मन समीक्षकांना तो मूळ साहित्यकृतीतली गुंतागुंत टाळणारा, ढोबळ आणि ऑस्कर मिळवण्यासाठी भुकेला वाटला. युक्रेनवरच्या रशियन आक्रमणाचा थोडा फायदाही त्याला मिळाला असावा. (तसा तो पुतिनविरोधी रशियन नेता अलेक्सेई नाव्हाल्नीवर आधारित माहितीपटालाही मिळाला असावा.)

विदाविज्ञान काय सांगते?..

विदाविज्ञानाचा वापर करून याआधीच्या ऑस्करनिवडींचं काहींनी विश्लेषण केलेलं आहे. काही कलाबा घटक ऑस्कर पुरस्कारांमागे कारणीभूत असतात हे त्यातून दिसतं. वॉर्नर ब्रदर्स, एमजीएम, सर्चलाइट, फोकस अशा काही निर्मात्यांचं ऑस्करवर वर्चस्व राहिलेलं आहे. या वेळचे दोन प्रमुख विजेते मात्र ए२४ आणि नेटफ्लिक्स या नव्या निर्मात्यांकडून आले होते. सर्वोत्कृष्ट चित्रपटाची स्पर्धा नेटफ्लिक्स गेली काही वर्ष नेटानं लढवत आहे, पण अद्याप त्यांना त्यात यश मिळालेलं नाही. मात्र, या वर्षी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट (‘ऑल क्वाएट..’), अ‍ॅनिमेशनपट (‘पिनोकिओ’) आणि लघुमाहितीपट (‘एलिफंट व्हिस्पर्स’) नेटफ्लिक्सची निर्मिती होते. विदाविश्लेषणानुसार मोठय़ा बजेटच्या चित्रपटांना नामांकनं मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अनेक छोटय़ा जीवाच्या आणि वेगळय़ा धाटणीच्या चित्रपटांना तिथे स्थान मिळत नाही. गुंतागुंतीच्या कथानकांपेक्षा सरधोपट भावनाप्रधान गोष्टी अकादमीच्या सदस्यांना अधिक भावतात, हेही ह्या वर्षी पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं दिसतं. थोडक्यात, जुने दिग्गज जाऊन त्या जागी नवे खेळाडू जरी आले, तरी ऑस्करच्या मूलभूत पठडीत फार बदल घडताना दिसत नाही.

rabhijeet@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about oscars 2023 winning movie everything everywhere all at once zws
First published on: 19-03-2023 at 01:10 IST