दारूच्या व्यसनापायी परंपरागत शेती, घरदार विकल्यामुळे पाल टाकून राहण्याची पाळी निलंगा तालुक्यातील अन्सरवाडा येथील झरे कुटुंबीयांवर २५ वर्षांपूर्वी आली. गावातील शाळेत शिकणाऱ्या नरसिंगची गावकऱ्यांना दया आली. तू गावातल्या लहान मुलांचा अभ्यास घे, त्यांनाही तुझ्यासोबत शिकव, आम्ही तुझ्या कुटुंबासाठी ज्वारी, डाळ, भाजीपाला देऊ, असे सांगत गावकऱ्यांनी नववीत शिकणाऱ्या या हुशार मुलाला धीर दिला आणि गावच्या समाजमंदिरात पहिली ते चौथीपर्यंतच्या २०-२५ मुलांची दुसरी शाळा सुरू झाली. संध्याकाळी चार ते सात या वेळात समाजमंदिरात मुलांच्या पाठांतराचे बोल घुमू लागले. गणितापासून भाषेपर्यंत सर्व विषयांच्या अभ्यासात मुलांना गोडीही वाटू लागली. सहशिक्षणाचा एक अनोखा पाठ गाव अनुभवत होते.. गावात पलीकडच्याच बाजूला एकदा कसरतीचे खेळ करणारी काही कुटुंबे आलेली होती. त्यातील काही लहान मुलांनी एका संध्याकाळी समाजमंदिरात अभ्यास सुरू असताना दगड भिरकावले. शिकवणी संपली की त्यांच्या आई-वडिलांकडे जाऊन तक्रार करायची, असे ठरवून नरसिंग तेव्हा गप्प बसला. संध्याकाळी मात्र त्याची पावले तडक दगड मारणाऱ्या त्या मुलांच्या घराकडे वळली. एका घराच्या दरवाजाशी थांबून त्याने चाहूल घेतली. आत काहीजण अक्षरश: बरळत होते. त्यांची भाषा वेगळी होतीच, पण ते शुद्धीवर नाहीत, हे त्यांच्या सुरावरूनच समजत होते. नरसिंग आत डोकावला. त्याच्यासाठी ते दृश्य धक्कादायकच होते. घरातील सारेच पुरुष, स्त्रिया दारूच्या नशेत लडबडत होते. यांच्याकडे कोणत्या भाषेत तक्रार करायची, ते नरसिंगला समजलं नाही. आता तर त्याहीपुढचा पेच उभा राहिला होता.. त्याला आपले वडील आठवले. त्याच्या घरात तर एकटय़ा वडिलांनाच दारूचं व्यसन होतं. तरी त्यापायी घरादाराचं वाटोळं झालं. इथे तर सगळं कुटुंबच दारूच्या विळख्यात अडकलंय. काय होणार या घराचं? छोटा नरसिंग अक्षरश: हादरला होता.. सुन्नपणे तो माघारी परतला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा त्या घरातली मुलं समाजमंदिरासमोर घुटमळत होती. नरसिंगने त्यांना आत बोलावले. प्रेमाने जवळ घेतले. त्यांची भाषा कळत नव्हती. मग त्यांच्यासोबत खेळ खेळण्यात तोही रंगला. असं दोन-चार दिवस झालं आणि त्या वस्तीवरल्या मुलांशी नरसिंगची दोस्ती जमली.
ही घटना आहे जवळपास पंचवीस वर्षांपूर्वीची.. १९९२ च्या सुमाराची. मग त्यातील काही मुलांनाही त्याने शिकवणी वर्गात दाखल करून घेतलं. पुढे या मुलांनाही अभ्यासाची गोडी लागली. मग त्यांना घेऊन नरसिंग गावातील शाळेत गेला. या मुलांना शाळेत घ्या, अशी गळ त्याने मास्तरांना घातली. पण हेडमास्तरांनी चक्क नकार दिला. मग नरसिंग हट्टाला पेटला. वस्तीवरच्या सात मुलांसाठी समाजमंदिरात वेगळा वर्ग सुरू झाला. त्यांची घोकंपट्टी सुरू झाली. मुलं तयार होत होती. नरसिंगने त्यांची अशी काही तयारी करून घेतली, की काही दिवसांतच ही सात मुले बहिस्थ विद्यार्थी म्हणून थेट चौथीची परीक्षा देण्यासाठी तयार झाले होते. सातपैकी सहा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व सर्वजण उत्तीर्ण झाले. एका मुलीचे लग्न झाल्यामुळे ती परीक्षा देऊ शकली नव्हती.
गावोगावी कसरतीचे प्रयोग करून उदरनिर्वाह करणाऱ्या गोपाळ (डोंबारी) समाजातील मुलांची लग्ने त्या काळात वयाची सहा वर्षे पूर्ण होण्याआधीच होत असत. या मुलांची चौथीची परीक्षा पार पडल्यानंतर आपण आणखी शिकलं पाहिजे, असं त्यांनाच वाटू लागलं. नरसिंगने त्यांच्या आई-वडिलांना गळ घातली आणि या लहानग्याचं मन त्यांनाही मोडता आलं नाही. त्यांची परवानगी मिळताच नरसिंगने त्यांना घेऊन लातूर गाठले. रा. स्व. संघाचे कार्यकर्ते तेथे जनकल्याण निवासी शाळा चालवितात. नरसिंगने त्यांना या शाळेत प्रवेश मिळवून दिला. आठवीपर्यंत ही मुले या शाळेत होती. पण निवासी शाळेच्या शिस्तीला कधी कधी ती कंटाळायची. अधूनमधून घरी पळून जायची. मात्र या मुलांना मोकळ्या वातावरणात फिरायची सवय होती. पक्षी, प्राणी मारून त्याचे मांस खाण्याची आवड होती. जनकल्याण शाळेत मिळणाऱ्या फक्त शाकाहारी जेवणाची चव त्यांना लागतच नव्हती. नरसिंगला त्यावर उपाय सापडला नाही. मग त्याने मुलांचं मन वळवायला सुरुवात केली. शिकायचं असेल, मोठं व्हायचं असेल, तर त्या सवयी संपविल्याच पाहिजेत. इथे मिळणाऱ्या जेवणाची सवय लावून घेतलीच पाहिजे, असं त्या मुलांना समजावण्यात त्याला यश आलं. मुलांचं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं.
आज त्यातील एक मुलगा कर्नाटकातील बीदर जिल्ह्यतील पालावरील शाळेत शिक्षक आहे. एकजण बँडवादन केंद्राचा प्रमुख आहे व गतवर्षी या मुलांच्या बँडपथकाने १७ लाखांची कमाई केली. १९९७ मध्ये नरसिंग रा. स्व. संघाच्या एका प्रचारकाच्या संपर्कात आला. त्यावेळी संघाच्या माध्यमातून भटके विमुक्त विकास परिषदेचे काम सुरू झाले होते. गिरीश प्रभुणे हे त्यावेळी प्रांताचे प्रमुख होते. निलंगा तालुक्यातील अन्सरवाडा गावात एक तरुण मुलगा गावातील गोपाळ समाजातील मंडळींच्या मुलांसाठी काही चांगले उपक्रम राबवतो आहे हे कळल्यानंतर प्रभुणे व लातूरची काही मंडळी त्याला भेटायला गेली. त्यावेळी झालेल्या चर्चेतून स्थिर पद्धतीचे काम करण्याची कल्पना पुढे आली. त्या गावात गोपाळ समाजाची १५ कुटुंबे तीन- चार वर्षांपासून रहात होती. कसरतीचे खेळ करून थकलेली मंडळी गावात थांबत असत. त्यातील गणपत मामा या वृद्धाचे पत्नीसोबत भांडण झाले व त्या भांडणात त्यांनी रागाने बांबू काढून पत्नीला मारहाण केली. त्या मारहाणीत बांबू तुटला व आत ठेवलेली शेकडो नाणी बाहेर आली. त्यांनी रुपया, दोन रुपयांची नाणी त्या बांबूच्या खाचेत ठेवलेली होती. पैसे कुठे ठेवायचे हे त्यांना माहिती नव्हते. वेळप्रसंगी अडचण आली तर ते कामाला येतील म्हणून ही मंडळी बांबूत पैसे ठेवत असत. याच दरम्यान नरसिंग झरेची दहावी पूर्ण झाली. गावातील सरपंच, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांच्या कार्यालयात लिखाणाचे काम तो करत असे. त्यांच्यासोबत निलंगा येथील तालुक्याच्या ठिकाणी बीडीओ, तहसीलदार आदींना भेटायला जाताना तो फायली घेऊन जायचा. त्यावेळी शरद कुलकर्णी या बीडीओंना त्याने गावातील गोपाळ समाजाची माहिती दिली व त्यांच्यासाठी बचत गट सुरू करता येतील का याची चौकशी केली. त्यांनी पाठिंबा दिला. पुरुषांसाठी एकलव्य पुरुष बचत गट व महिलांसाठी सावित्रीबाई फुले बचत गट सुरू झाले.
रोज किमान एक रुपया बचत करायची असा नियम सगळ्यांनीच स्वत:वर घालून घेतला. वर्षभरातच अनेकांकडे तीन ते साडेतीन हजार रुपये जमले. त्या काळी गावात अडीच हजारात एक गुंठा जमीन मिळत असे. वीस जणांनी घरासाठी एक एक गुंठा जमीन घ्यायची असं ठरलं. संपूर्ण देशभरात पहिल्यांदाच या गावात गोपाळ समाजातील मंडळींनी स्वत:ची स्थावर मालमत्ता घेतली होती. रहिवाशी प्रमाणपत्र, ओळखपत्र त्यांना दिले गेले. ही वार्ता विविध ठिकाणी विखुरलेल्या या समाजातील लोकांना कळली व ही मंडळी अन्सरवाडय़ाकडे येऊ लागली. आज त्या गावात ८७ कुटुंबे आहेत. पहिल्यांदा इंदिरा आवास योजनेंतर्गत तत्कालीन आमदार माणिक जाधव यांनी १२ घरांची घरकुल योजना मंजूर केली. प्रत्येकी २७ हजार रुपये मिळाले. या लोकांना घर बांधण्याचे प्रशिक्षण दिले गेले व त्यांनी स्वत:च आपली घरे बांधली. आज ४७ कुटुंबांकडे त्यांची स्वत:ची पक्की घरे आहेत, तर उर्वरित घरांना यावर्षी मंजुरी मिळते आहे.
आता या वस्तीसाठी बालवाडी ते चौथीपर्यंतची जिल्हा परिषदेची स्वतंत्र शाळा आहे. त्यात ८३ मुले शिक्षण घेत आहेत तर ३७ मुले पाचवी ते आठवीच्या शाळेत शिकत आहेत. सहाजण तर तालुक्याच्या ठिकाणी पुढचे शिक्षण घेत आहेत. या मुलांमध्ये कसरतीच्या खेळाचे कसब अंगभूतच आहे. हे कसब विकसित व्हावे यासाठी जिम्नॅशियमचे स्वतंत्र वर्ग घेतले जातात. याच समाजातील मंडळी मुलांना ते शिकवितात. मुंबई विद्यापीठात सात वर्षांपूर्वी घेण्यात आलेल्या स्पर्धेत या मुलांचे कसब डोळ्यांत भरणारे ठरले. मुलींना विशिष्ट कपडय़ात आपले कसब लोकांसमोर दाखवावे लागते. मात्र पारंपरिक समजामुळे त्यांनी हे कपडे घालण्यास नकार दिल्याने मुलींना पुढे प्रशिक्षण देता आले नाही. मुलांची मात्र सध्या या क्षेत्रात चांगली प्रगती होत आहे.
जुन्या कपडय़ांपासून सतरंजा तयार करण्याचा एक उद्योग या कुटुंबातील २२ महिलांनी सुरू केला. १२ महिला चिंध्यांपासून दोऱ्या आणि पायपुसणी तयार करण्यात तरबेज झाल्या. सुरुवातीला या गोपाळ समाजाला गावातील नागरिकांकडून त्रास झाला. आता मात्र त्यांची प्रगती पाहून गावकरीही मदत करत आहेत. नरसिंग झरेने मुक्त विद्यापीठातून बीए व डीटीएडपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. भटके विमुक्त परिषदेचा प्रांत कार्यवाह म्हणून त्याची नियुक्ती झाली. गेल्या २१ वर्षांपासून तो हे काम करतो आहे. गावातील एका नातेवाईकाच्या लग्नात हुंडय़ावरून वाद निर्माण झाला व मुलीकडील मंडळी वैतागली. लग्न मोडून मुलीकडील मंडळी निघण्याच्या तयारीत असताना नरसिंगने त्यांना तुमची संमती असेल तर मी लग्न करायला तयार आहे असे सांगितले व त्याचे लग्न झाले. त्याची पत्नी सध्या मुक्त विद्यापीठातून बीए करते आहे.
दोन वर्षांपूर्वी नरसिंगला गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत रीतसर नोकरी मिळाली. ही नोकरी सांभाळून तो सामाजिक सेवेचे काम करतो आहे. गुजराती, तेलगू, मराठी, हिंदीबरोबरच पारधी, मसनजोगी, पाथरवट, वडार समाजाच्या भाषाही त्याला अवगत आहेत. गेल्या पाच वर्षांत उस्मानाबाद, लातूर व सोलापूर या तीन जिल्ह्यंत विविध २० उपेक्षित समाजघटकांसाठी त्याने २० शाळा सुरू केल्या आहेत. प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थी- विद्यार्थीनींची तयारी या शाळांमधून करून घेतली जाते. एकूण २७४० मुले- मुली या शाळांमध्ये शिकत आहेत. विविध समाजातील मंडळींना कायमचे घर मिळवून देण्यासाठी नरसिंग प्रयत्न करतो. या प्रयत्नांमुळेच उस्मानाबाद जिल्ह्यतील उमरगा येथे मसनजोगी समाजाची ६३ कुटुंबे आता स्वत:च्या जागेत राहत आहेत. येथे प्राथमिक शाळा चालवली जाते. निलंगा तालुक्यात एका गावातील गायरानावर वडार समाजाची ४३ कुटुंबे राहतात. त्यांच्यासाठीही शाळा आहे. निलंगा येथे पारधी समाजाची १६ कुटुंबे आहेत. त्यांनी हणमंतवाडी येथे स्वत:ची जागा घेतली आहे. तसेच निलंगा तालुक्यातील इनामवाडी येथे मरीआई (पोतराज) समाजातील मंडळींनीही २८ प्लॉट घेतले आहेत.
तुळजापूरजवळील नळहंगरगा येथील बहुरूपी समाजाच्या मंडळींनी स्वत:ची जागा घेतली आहे. लातूर तालुक्यातील मुरूड येथे राईंदर समाजाच्या मंडळींनीही एकत्र राहण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय राज्यभरातील अशा सुमारे ४७ हजार वंचित लोकांना जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र मिळवून देण्यातही नरसिंगने पुढाकार घेतला आहे. या कामाबद्दल त्याला आतापर्यंत १६ पुरस्कार मिळाले आहेत. गेल्या वर्षी त्याला राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत २५ हजार रुपयांचा समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याचे जाहीर झाले, तेव्हा या समाजातील घराघरांत आनंदाला उधाण आले होते. एक लाख रुपयांचा केशवसृष्टी पुरस्कार सरसंघचालकांच्या हस्ते स्वीकारताना जुने दिवस आठवून नरसिंग गदगदला होता.
वंचित समाजासाठी आपल्याला काही करता आले याचा आनंद होत असल्याचे नरसिंग सांगतो. गोपाळ समाजात पुनर्विवाह होत नसत. तसेच बालविवाहाची पद्धत होती. परंतु त्यांच्या समाजातील जात पंचायतीत जाऊन सतत पाठपुरावा करत पाच वर्षांपूर्वी पहिला पुनर्विवाह सर्वसंमतीने लावला. आज १०० हून अधिकजणांनी पुनर्विवाह केले आहेत. अन्सरवाडय़ाच्या वस्तीत चारचाकी आठ वाहने आहेत. २६ जणांकडे दुचाकी गाडय़ा आहेत. ११ बँडपथके आहेत. गतवर्षी त्यांनी ४७ लाखांची कमाई केली, असे सांगताना नरसिंगचा चेहरा अभिमानाने फुललेला दिसतो.
‘भटक्या विमुक्तांचे शिक्षण’ या विषयावर समाजकल्याण आणि आदिवासी मंत्र्यांच्या आग्रहावरून राज्याच्या विधानसभेत त्यांनी २० मिनिटे हा विषय मांडला. याशिवाय ‘ग्रामीण भागातील कौशल्य विकासाच्या संधी’ यासंबंधी नेमक्या कोणत्या पद्धतीने विचार व्हावा याविषयी पंतप्रधानांच्या समक्ष दिल्ली येथील खादी ग्रामोद्योग केंद्रात नरसिंगने सात मिनिटे आपली भूमिका मांडली. आपण स्वत: बेघर असताना अन्य बेघरांना घर मिळवून देण्याचे स्वप्न पाहिले अन् ते प्रत्यक्षात उतरवू शकलो याचा आनंद नरसिंगच्या शब्दांत उमटत असतो.
दिनेश गुणे dinesh.gune@expressindia.com