व्हेनिसजवळच्या एका छोटय़ा शहरातले कॉफी हाऊस – स्टारबक्स, सी.सी.डी. किंवा बरिस्तासारखे.. कॉफी घेताना लक्ष शेजारच्या टेबलाकडे गेले. एक मध्यमवर्गीय, सुखवस्तू ग्राहक.. त्याने आल्या आल्या दोन कॉफीची ऑर्डर दिली.. ‘‘एक मला, दुसरा कप भिंतीवर’’.. आदबशीर वेटरने त्याला त्याची कॉफी दिली आणि दुसऱ्या कपाचा निर्देश करणारा एक चिठोरा भिंतीवर चिकटवला. दोन कॉफीचे पसे देऊन तो निघून गेला. थोडय़ाच वेळात आणखीन दोन सद्गृहस्थ.. त्यांनी तीन कॉफीची ऑर्डर दिली.. दोन कप ते प्यायले.. ‘‘तिसरा भिंतीवर’’.. त्यांनी सांगितले. तीन कपांचे पसे देऊन ते चालते झाले. वेटरने तिसऱ्या कपाचा निर्देश करणारे नवे चिठोरे भिंतीवर लावले. काही वेळाने रेस्टॉरंटच्या भपक्याला न शोभणारा असा एक निष्कांचन ग्राहक रुबाबात कॉफी शॉपमध्ये शिरला. त्याची वाढलेली दाढी, ओंगळ कपडे त्याच्या विपन्नावस्थेची साक्ष देत होते.. ‘‘एक कप कॉफी भिंतीवरची’’.. त्याने रुबाबात ऑर्डर सोडली. वेटरने पूर्वीइतक्याच आदबशीर, आतिथ्यशील पद्धतीने कॉफीचा कप त्याच्यासमोर ठेवला. घुटक्या-घुटक्याने स्वाद घेताना त्याच्या चेहऱ्यावर कोणताही ताणतणाव नव्हता. कॉफी संपवून, एक नवा पसाही न देता तो चालता झाला. वेटरने शांतपणे भिंतीवरचा कॉफीच्या एका कपाचा एक चिठोरा काढून कचरापेटीत टाकला. घडणाऱ्या प्रसंगाचा खरा अर्थ आता कुठे आमच्या लक्षात आला. या चिठोऱ्यांना अंगावर वागवणारी त्या रेस्टॉरंटची भिंत ही सर्वात सुंदर भिंत ठरली. शहरातील ‘आहे रे’ (Haves’) या सदरात मोडणाऱ्या सहृदय, सुजाण नागरिकांनी ‘नाही रे’ (Have nots’) या वर्गातील निधर्नाच्या निर्वाहाची सोय अगदी सहजतेने केली होती. त्यात दान देण्याचे अवडंबर नव्हते, उपकार करतो आहोत ही भावना नव्हती, भीक देतो आहोत या विचाराचा तर लवलेशही नव्हता. आपल्या समाजात आपल्याइतकेच सुदैवी आणि सधन काही लोक नाहीत. ते आपल्याला ज्ञातही नाहीत. त्यांचा आणि आपला परिचय नाही, साधी तोंडओळखही नाही, पण त्यांच्यासाठी थोडेफार मागे ठेवणे महत्त्वाचे. त्यांचे नाव माहीत करून घेण्याचा प्रयत्नही नको. कारण एकदा का नाव कळले की, आपण त्या व्यक्तीची िलग,धर्म, जात, प्रांत, वर्ण अशी विभागणी करू लागतो आणि मग नेमके त्याच्यातील आणि आपल्यातील ‘माणूस’ हे नाते विसरतो. गरजा आपल्याप्रमाणेच त्यांच्याही असतात. बरे ते केवळ अन्न, वस्त्र, निवारा एवढय़ाचेच अधिकारी होऊ नयेत. कधीकाळी थोडी मौज करावी, उत्तम हॉटेलात प्यावे-खावे असे त्यांना वाटले तर तेही अप्रस्तुत ठरू नये. उत्तम दाता कोण? तर घेणाऱ्याकडे पाठ फिरवून जो पुढे मार्गक्रमण करू लागतो तो. पण कॉफी शॉपमध्ये शिरताना त्या निर्धन माणसाला स्वत:चा आत्मसन्मान गमाविण्याची वेळ आली नाही, हे महत्त्वाचे. त्याला वेटरकडे कॉफी ‘फुकट’ मागावी लागली नाही, तर ‘िभतीवरची कॉफी’ हा जणू त्याचा सामाजिक हक्क होता. ती मागताना त्याला संकोच किंवा ओशाळलेपण नव्हते.
पाश्चिमात्य प्रगत देशात सधनता विपुल आणि जनसंख्या कमी त्यामुळे हे शक्य आहे, हे निर्वविाद सत्य मीही मान्य करतो. पण समाजाच्या विविध स्तरांमधील माणसांच्या वैचारिक प्रगल्भतेचेही कौतुक केल्याशिवाय मला राहवत नाही.
आपल्याला हे अगदीच अशक्य नाही. किंबहुना थोडय़ाफार प्रमाणात विचारी मध्यमवर्ग आणि सशक्त श्रीमंतवर्ग हे भारतातही आचरणात आणतो, त्याला ‘गिफ्ट’, ‘सबसिडी’, ‘ग्रॅटीस’ अशी कोणतीही भारदस्त नावेही मला इथे द्यायची नाहीत. मला फक्त एवढेच सुचवायचे आहे की, टपरीवर उभे राहून ‘चायपे चर्चा’ करतानाही आपल्याला पुढच्या एखाद्या अनामिकासाठी एक कप चहाचे पसे देता येतील. दातृत्वाच्या भावनेने माझ्या प्रौढीला भरती येऊ नये आणि लाचारीच्या कुतरओढीने त्याच्या स्वाभिमानाला ओहोटी लागू नये.
चहा या पेयात जबरदस्त ताकद आहे हे खरेच! द बोस्टन टी पार्टीच्या निमित्ताने त्याने अमेरिकेत आंदोलनांची बीजे रोवली, ईस्ट इंडिया टी कंपनीच्या रूपाने माझ्या लाडक्या देशाचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आणि त्याच ‘चाय पे चर्चा’ माध्यमातून २०१४ मध्ये लोकशाहीची राजकीय ताकदही दाखवून दिली. राजकीय परिवर्तन झाले, आता सामाजिक संस्कार अधिक विचारी करण्यासाठी यासारखा दुसरा सोपा
मार्ग नाही.
..विमानप्रवास संपायला आल्यावर हवाईसुंदरी, ‘‘निम्न स्तर के बच्चों के लिए’’ वर्गणी मागत एक काळा डबा फिरवितात. प्रवासी त्याकडे पाहात नाहीत, यापेक्षा ते पाहणारही नाहीत याची खात्री असल्यामुळे हवाईसुंदरी ती विमानातील फेरी काही मिनिटांतच आटोपती घेते. मीही याला अपवाद नाही. पण आज एक वेगळा निर्णय घेतोय.. गेली २० वष्रे मुलुंड स्टेशनबाहेरचा एक ‘अमृततुल्य’ टपरी चहा पिण्याचे माझे व्रत मी कुलगुरू झाल्यावरही सोडलेले नाही. पुढच्या वेळेला ‘मामाकडे’ एका अनामिकाच्या ‘कटिंगचे’ पसे एक्स्ट्रा देऊन ठेवेन म्हणतो..