सुपरडुपर स्पेशालिस्ट

आजच्या ‘हम दो हमारे दो’च्या जमान्यात मुलाला आजारी पडण्याची मुळी मुभाच नाही. त्याला चार शिंका आल्या तरी आई-वडिलांचे धाबे दणाणते आणि दोन आज्या व दोन आजोबा अगदी हवालदिल होऊन जातात.

आजच्या ‘हम दो हमारे दो’च्या जमान्यात मुलाला आजारी पडण्याची मुळी मुभाच नाही. त्याला चार शिंका आल्या तरी आई-वडिलांचे धाबे दणाणते आणि दोन आज्या व दोन आजोबा अगदी हवालदिल होऊन जातात.
माझा रोजचा अनुभव आहे. साधारण महिन्याचे बाळ असते. बरोबर आई-वडील, आजोबा-आजी असतात. आईकडे तक्रारींची यादी लिहिलेला एक कागदच असतो. ती वाचून दाखवते- ‘बाळाला आतल्या आत ताप असतो. त्याच्या पोटात सारखं दुखतं. त्याला थेंबभरसुद्धा दूध पचत नाही. दूध पोटात गेलं की, लगेच उलटी करून काढतो. दिवसातून सात-आठ वेळा शी होते. शीची जागा लाल झालीय. तिथे लहान-लहान जखमाही झाल्यात. शू करतानासुद्धा त्याला त्रास होतो. शू करताना ते रडतं. त्याला श्वासही घ्यायला त्रास होतो आणि सारख्या उचक्या लागतात.’ आता एवढा त्रास होतोय म्हटल्यावर त्यांनी आधी दोन-तीन डॉक्टरांकडून उपचार करून घेतलेले असतातच. नेमका कोणता आजार आहे, त्याचे अजून निदानच झालेले नसते. त्यांनी सगळ्या डॉक्टरांच्या फायली आणि बाळाने आतापर्यंत घेतलेली औषधे बरोबर आणलेली असतात. औषधाच्या पिशवीचे वजन बाळाच्या वजनापेक्षा जास्त असते.  सगळी औषधे पिशवीतून काढून समोर मांडली जातात. त्यात दोन-तीन तापाची औषधे (दोन-तीन डॉक्टरांनी ‘बदलून’ दिलेली.) दोन-तीन पोटदुखीची औषधे, एक ग्राइप वॉटर, एक जन्मगुटी, एक थेंबाचे औषध, एक कॅल्शियमचे औषध, एक-दोन अ‍ॅण्टिबायोटिक्स, एक उलटीवरचे औषध, एक संडासवरचे औषध, नाकात टाकायचे थेंब आणि एक संडासच्या जागेला लावायचे मलम असते. कोणत्याच औषधाला गुण आलेला नसतो. म्हणून पुढील तपासणीकरिता त्यांनी स्पेशालिस्ट गाठलेला असतो.
मी दीर्घ श्वास घेते. चिडायचे नाही, असे मनाला बजावते. जास्त बोलायचे नाही, अशी जिभेला तंबी देते आणि प्रथम बाळाला तपासते. त्याचे वजन जन्मत: होते त्यापेक्षा एका किलोने वाढलेले असते. त्याला ताप नसतो. प्राथमिक तपासणीत कोणताही दोष आढळत नाही. शीची जागा मात्र खरंच खूप लाल झालेली दिसते. मी चेहऱ्यावरची रेषही हलू न देता सांगते, ‘बाळ छान आहे. त्यात कोणतेच औषध देऊ नका.’ हे त्यांना अगदीच अनपेक्षित असते. थोडा वेळ शांतता पसरते. मग प्रत्येकाकडून पुन्हा एकदा, एकापाठोपाठ एक सगळ्या तक्रारी सांगितल्या जातात. मी सांगते, ‘लहान बाळ म्हणजे मोठय़ा माणसाची छोटी आवृत्ती नसते. त्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते. त्याच्या शरीराची वेगळी गणितं असतात. सारखी उचकी लागणं, दूध प्यायल्यावर गुळणी येणं, थोडी थोडी पातळ शी होणं हे अगदी नैसर्गिक आहे. फक्त बाळाच्या वजनाकडे लक्ष द्या. पहिल्या तीन महिन्यांत दिवसाला २५-३० ग्रॅम वजन वाढत असेल तर किती वेळा शी होते आणि किती वेळा उलटी होते, ते मोजूच नका.’
‘पण मग ते शू करताना का रडते?’
‘ते शू करताना रडत नाही. रडायला लागलं की, त्याला शू होते. कारण रडताना पोटाच्या स्नायूंचे आकुंचन होते. त्यामुळे मूत्राशयावर दाब पडतो आणि शू होते.’
‘प्रत्येक वेळी दूध प्यायलं की बाळ शी करतं. मग अंगाला लागणार तरी कसं?’
‘अंगाला तर लागतंच आहे ना? महिन्यात एक किलो वजन वाढलं, हा अंगाला लागल्याचाच पुरावा आहे. दूध प्यायलं की आतडय़ाची हालचाल वाढते. त्यामुळे शी होते. पण ती थोडी असते. शी झाली की आवळून धरायची, दिवसातून एकदा करायची, हे शिकायला अजून बाळाला वेळ हवाय.’
‘पण बाळाच्या पोटात का दुखतं?’
‘कशावरून पोटात दुखतं?’
‘ते रडतं ना सारखं!’
‘रडणं ही बाळाची भाषा आहे. त्याला भूक लागली तर ते कसं सांगणार? ते रडतं. उकडलं तरी रडतं. थंडी वाजली तरी रडतं. चड्डी ओली झाली तरी रडतं. आईचा स्पर्श हवाय म्हणूनही रडतं. आपण त्याची भाषा समजून घेऊ या.’
‘बाळाची शीची जागा पाहिलीत? किती लाल झालीय, जखमाही झाल्यात. का तेही नॉर्मलच आहे?’
‘नाही. ते नॉर्मल नाही. तुम्ही ही जी दोन अ‍ॅण्टीबायोटिक्स दिली आहेत त्यामुळे आतडय़ातील ‘वातावरण’ बदलते. दुधातील ‘लॅक्टोज’ या साखरेचे पचन होत नाही. त्याचे ‘लॅक्टिक अ‍ॅसिड’ बनते. ते शीबरोबर बाहेर येते. ते त्वचेला लागले की ती जागा लाल होते. छोटय़ा जखमाही होतात.’
‘मग आता काय करायचे?’
‘काही करायचे नाही. सगळी औषधे बंद करायची. थोडे दिवस वाट पाहायची. आठ दिवसांनी पाव किलो वजन वाढले तर छानच, नाही तर पाहू त्या वेळी.’
‘कोणतीच तपासणी करायला नको? आम्ही शी-शू बाटलीत धरून आणलीय. निदान सोनोग्राफी तरी?’
‘काही जरुरी नाही. आठ दिवसांनी वजन वाढले नाही तर पाहू.’
माझ्या अपेक्षेप्रमाणे त्यांचा मोठाच अपेक्षाभंग झालेला असतो. काही जण आठ दिवसांनी येतात. त्यांना माझे म्हणणे पटते, पण काही जण येत नाहीत. ‘या डॉक्टरलाही निदान झाले नाही’ म्हणून नवीन डॉक्टर गाठतात.
मूल मोठे झाले तरी पालकांचे वागणे बदलत नाही. रात्री ताप आला की सकाळी डॉक्टरांकडे घेऊन येतात. ‘तापाचे औषध दिले, पण तेवढय़ापुरताच ताप उतरला. पुन्हा चढला. तापाचे औषध बदलून द्या,’ असे त्यांचे म्हणणे असते. दोन दिवसांत दोन डॉक्टर्स होतात. तिसऱ्या दिवशी रक्त-लघवी फोटो तपासणीसाठी घेऊन येतात. मी सांगते, ‘थोडा धीर धरा. तापाच्या औषधाने ताप तात्पुरताच उतरणार. बाळ हसतंय, खेळतंय. ताप-सर्दी- खोकल्याशिवाय कोणती तक्रार नसेल तर चार दिवस वाट पाहा. ताप आपोआप उतरेल.’
खरेच ‘निसर्ग’ हा डॉक्टरांचा डॉक्टर आहे. विविध प्रकारच्या जिवाणूंना आणि विषाणूंना नामोहरम करण्यासाठी शरीर अशा काही सूक्ष्म शस्त्रांची निर्मिती करते, की ते पाहून मन थक्क होते, अशी प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागते. एवढेच! याचा अर्थ नेहमी निसर्गावरच अवलंबून राहायचे, काही उपचारच करायचे नाहीत, असे अर्थातच नाही. चांगल्या डॉक्टरला निसर्गाच्या सामर्थ्यांची जाणीव हवी आणि मर्यादांचे भानही हवे. किती वाट पाहायची, कधी वाट पाहायची आणि का वाट पाहायची, हे रुग्णांना समजावूनही द्यायला हवे. रुग्णांनीही थोडा धीर धरायला हवा.
मेडिकल कॉलेजमध्ये आम्हाला बाळंतपण शिकविताना आमचे स्त्रीरोगतज्ज्ञ वाटवे सर सांगायचे, ‘बाळंतपण नैसर्गिक असते. बऱ्याच वेळा फक्त ‘वाट पाहणे’ एवढेच आपले काम असते. मात्र हे ‘वाट पाहणे’ सजग असले पाहिजे. ‘Watchful expectancy and masterly inactivity’ हे त्यांचे आवडते वाक्य होते. निसर्गात होता होईतो ढवळाढवळ करायची नाही, पण जाणकाराच्या नजरेने डोळ्यांत तेल घालून प्रत्येक पायरीवर लक्ष ठेवायचे आणि गरज पडल्यास परिस्थिती हातात घ्यायची. बाळंतपण नैसर्गिक असते, पण म्हणून फक्त निसर्गावरच अवलंबून राहिले तर किती स्त्रिया आणि मुले दगावतील, हे सगळ्यांना नीट माहिती आहे. इतर आजारांचेही तसेच आहे. कित्येक आजार
 निसर्गाने बरे होऊ शकतात; परंतु सगळेच नाही. आजारांच्या वेगवेगळ्या पायऱ्यांवर परिस्थिती आपल्या हातात घ्यावी लागते. सुदैवाने आज इतकी परिणामकारक औषधे उपलब्ध आहेत निदान करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान, अद्ययावत यंत्रे उपलब्ध आहेत.
प्रत्येक अवयवाचे स्पेशालिस्ट आणि सुपरस्पेशालिस्ट उपलब्ध आहेत. निसर्गाने जे आजार बरे होत नाहीत, ते कित्येक आजार आज आपण बरे करू शकतो. कितीतरी जीव वाचवू शकतो, कितीतरी दु:खं हलकं करू शकतो.
हे सारे खरे आहे, पण या सगळ्या झगमगाटात एका महत्त्वाच्या गोष्टीकडे आपले दुर्लक्ष होते आहे. आजच्या या स्पेशालिस्ट, सुपरस्पेशालिस्टच्या जमान्यात निसर्ग या सुपरडुपर स्पेशालिस्टचा आपल्याला विसर पडतो आहे. या सुपरडुपर स्पेशालिस्टची ‘फी’ मात्र आजच्या काळात आपल्याला परवडायला हवी.
ती आहे- थोडा धीर धरा..    

मराठीतील सर्व एक झाड, एक पक्षी ( Ekzhadekpakshi ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Consciousness over child health

Next Story
विरुद्धाहार भाग- ३
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी