विविध क्षेत्रात भारतामधील मुस्लिमांनी उत्तम योगदान दिले आहे. क्रिकेटसुद्धा याला अपवाद नाही. याच गोष्टीचा वेध घेणारे ‘फिर भी दिल है हिंदूस्तानी’ हे पुस्तक शब्द पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. लेखक संजीव पाध्ये यांनी लिहिलेल्या या पुस्तकात भारतातर्फे खेळलेल्या मुस्लीम क्रिकेटपटूंची माहिती आहे. ती कुठेच कंटाळवाणी ठरत नाही. अनेक किस्से देत लेखकाने प्रत्येक क्रिकेटपटू माणूस म्हणूनही कसा होता यावर प्रकाश टाकला आहे. मोहम्मद निसार एवढा साधा होता की, तो घरी आल्यावर मुलांनी ‘किती धावा काढल्या,’ असे विचारल्यावर त्यांना प्रामाणिकपणे धावा सांगायचा, पण त्या कमी असूनही तो कधीही आपण आज इतके बळी घेतले हे सांगायचा नाही. मुश्ताक अली यांना प्रत्यक्ष भुत्तो यांनी पाकिस्तानकडून खेळायची ऑफर दिली होती, पण त्यांनी ती सपशेल धुडकावली होती. मन्सूर अली खान पतौडी शर्मिला टागोरबरोबर विवाहबद्ध होण्याआधी सिमी गरेवालवर प्रेम करत होता, अबिद अलीची सून किरमानीची मुलगी.. अशी रंजक माहिती या पुस्तकात आहे. या पुस्तकातून एकूणच प्रत्येक क्रिकेटपटूचे व्यक्तिमत्त्व वाचकाला समजते. सोबत आकडेवारीसुद्धा असल्याने क्रिकेट रसिकांना तीसुद्धा माहिती मिळते. याशिवाय भारताकडून खेळू शकले नाहीत अशा अनेक गुणी खेळाडूंचासुद्धा परामर्श लेखकाने घेतला आहे. आणि मुंबईतील विशेष करून जुने आणि आताचे मुस्लीम खेळाडू यांचीही दखल घेतली गेली आहे. मुस्लीम जिमखाना आणि काही मुस्लीम क्रिकेट कार्यकर्ते यांचे योगदानसुद्धा टिपले गेल्याने हे पुस्तक मुस्लीम बांधवांची भारतीय क्रिकेटमधील कामगिरी अधोरेखित करून जाते. सध्या मुस्लिमांबाबतचा दृष्टिकोन बदलत चालला आहे, द्वेष भावना वाढीस लागत आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक लिहिले गेल्याचे लेखकाने मनोगतमध्ये सांगितले आहे. लेखक संजीव पाध्ये  यांचा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ गौरी कांचन यांनी आकर्षक बनवले आहे. एकूणच पुस्तक नावापासून ते मजकुरापर्यंत वेधक झाले आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘फिर भी दिल है हिंदूस्तानी’, संजीव पाध्ये शब्द पब्लिकेशन. 

  पाने : १४८.  किंमत : २३० रुपये.  ६

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dakhal interesting and informative in various fields contribution ysh