‘आम्ही हिशोब घेऊ’ हा जितेंद्र अहिरे यांचा पहिला काव्यसंग्रह. सभोवतालच्या परिस्थितीचं भेदकपणे वास्तववादी चित्रण करणाऱ्या या कविता आहेत. समाज, निसर्ग, स्त्री, विद्रोह अशा अनेक अंगांना स्पर्श करणारी अशी ही कविता आहे. माणसाच्या वेदना त्यांच्या कवितेतून डोकावतात. वाचकाला समाजातील भयाण वास्तवाची जाणीव करून देतात. त्यांच्या कवितेतून विद्रोहाचा हुंकार असला तरी त्यात आक्रस्ताळेपणा नाही. तो संयतपणे डोकावत राहतो. या कवितासंग्रहातील ‘अस्तित्वासाठी’ या पहिल्याच कवितेतून त्यांच्या काव्याची चुणूक दिसते.

‘तुझे हात माफीसाठी

नरमले तेव्हा

तू अस्तित्वासाठी

का उगारले नाहीत’

हा संयत हुंकार जसा आहे, तसाच ‘आभाळातून’ या कवितेत-

‘आभाळातून शब्द

पावसासारखे टपकत गेले आणि

हृदयाची माती ओली झाली’

असा हळुवारपणाही आहे.

‘माणसाची जात’ या कवितेत-

‘तू हवेचा पत्ता विचारत नाही

तू पाण्याला धर्म विचारत नाही

तू मातीला आई म्हणतो

तू आभाळाला बाप म्हणतो

मात्र,

तू माणसाची जात का विचारत असतोस?’

 वरवर निरागस वाटणारा हा प्रश्न वाचकाला अंतर्मुख करून जातो. मग कवीच्या मनाला पुढील आस लागते-

‘जात न शोधली जाईल

असं ठिकाण तू दे

धर्म ना ओळखला जाईल

असं नाव तू दे’

जितेंद्र अहिरे यांच्या कवितांमध्ये ‘स्त्री’ला विशेष स्थान आहे. स्त्रियांची होणारी घुसमट, त्यांना सहन करावी लागणारी अवहेलना याबद्दल कवी जागरूक आहे. पण स्त्रीच्या आत्मिक ताकदीची कल्पनाही त्याला आहे.

राजकीय, सामाजिक आशयाच्या अशा या कविता आहेत. माणसाला माणूस म्हणून जगू द्या, प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे हे अधोरेखित करणारी त्यांची कविता आहे. चारुदत्त पांडे यांचे मुखपृष्ठ आणि प्रमोदकुमार अणेराव यांची उत्तम रेखाटने कवितांचा आशय अधिक गडद करतात.

‘आम्ही हिशोब घेऊ’- जितेंद्र अहिरे, ललित पब्लिकेशन,

पाने- ९२,

किंमत- १६० रु.

रसाळ लेखणीचं ‘धुकं’

‘धुकं’ हा अनघा तांबोळी यांचा कथासंग्रह. ‘धुकं’, ‘आठवणींची कुपी’, ‘सुट्टीचे  दिवस’, ‘मृद्गंध’, ‘छोटा सूर्य’, ‘विजयचा विजय’, ‘गाड्यांचे स्वभाव’, ‘अबोला’, ‘ते एक वर्ष’, ‘अंधारानंतरचा सूर्याेदय’ अशा एकूण दहा कथांचा यात समावेश आहे. या सर्वच कथांना रूढार्थाने कथा म्हणता येणार नाही. यातील बहुतांशी लिखाण हे ललित आणि स्मरणरंजन या प्रकारामध्ये मोडणारे आहे. लेखिकेच्या लिखाणात एक रसाळपणा ठायी ठायी जाणवतो. सभोवतालच्या घटनांना, व्यक्तींना संवेदनशीलतेने टिपण्याचं काम लेखिका करते आणि आपल्या गोष्टीवेल्हाळ लेखणीने वाचकाला आनंद देते. त्यांच्या लेखणीत जाणवतो तो अकृत्रिमपणा. हे लेखन कधी नर्मविनोदी, तर कधी तरल, संवेदनशील शैलीतले आहे. भोवतालच्या निसर्गाचे लोभस चित्रण यात लेखिकेने केले आहे. त्या उत्तम शब्दचित्र रेखाटतात. लेखिकेचं रसाळ निवेदन वाचकाला खिळवून ठेवतं.

‘धुकं’- अनघा तांबोळी, डिम्पल पब्लिकेशन, पाने- ११८, किंमत- १५० रुपये.६