|| नीलिमा बोरवणकर
शीर्षकाबद्दल उत्सुकता वाढवणारी ही अनुवादित कादंबरी. धीवर हा गोव्यात दिसणारा एक निळ्या रंगाचा पक्षी. या पक्ष्याबद्दलची एक रूपककथा कादंबरीतली एक आजी सांगते.. खूप वर्षांपूर्वी या भूमीवर एक शूर राजा राज्य करत असतो. त्याची राणी जुळ्या मुलांना जन्म देते. त्यापकी पहिल्यांदा जन्मलेल्या निळ्या रंगाच्या शरीराच्या मुलाला बघून राणी किंचाळून म्हणते, ‘हे मूल माझं नाही, त्याला नाहीसं करा.’ दुसरं गोरं मूल मात्र ती प्रेमानं जवळ घेते. पहिल्या निळ्या मुलाला नाहीसं करण्याचं काम दाईच्या हातून होत नाही. त्याऐवजी ती स्वत: त्याला सांभाळते. तो मोठा झाल्यावर राजवाडय़ातला स्वयंपाकी बनतो; मात्र कुणालाही हे कळत नाही, की तो थोरला राजपुत्र आहे. पुष्कळ र्वष जातात. राजा-राणी मृत्यू पावतात. निळ्या मुलाला सांभाळणारी दाईसुद्धा हयात नसते. गोरा राजपुत्र राजा बनतो. एके वर्षी दुष्काळ पडतो, पिकं जळून जातात. यावर उपाय सांगण्यासाठी राजा एका ज्ञानी ऋषींना बोलावतो, पाऊस न पडण्याचं कारण विचारतो. ऋषी ध्यान करून सांगतात, ‘थोरल्या राजपुत्राला राज्यपद न मिळाल्यामुळे हे अघटीत घडतंय. तो निळ्या रंगाचा असून तुमच्याच स्वयंपाकघरात काम करतो.’ राजाच्या आज्ञेवरून त्याला बोलावलं जातं. हातात साफ करत असलेला मासा घेऊन तो बिचारा घाबरून तसाच हजर होतो. एक खुद्द राजा आणि दुसरा कळकट कपडय़ातला स्वयंपाकी. तरीही त्या दोघांमधलं साम्य पाहून दरबारी अवाक् होतात. पण राजाला हे सहन होत नाही. तो ऋषी आणि त्या निळ्या भावाला मारून टाकायचा हुकूम करतो. कुणीच त्याचा हुकूम पाळत नाही, हे बघून राजा स्वत: त्यांच्यावर वार करतो. ऋषी आकाशात नाहीसे होतात. राजपुत्रसुद्धा नाहीसा होतो आणि त्याच जागेवरून एक निळा पक्षी आकाशात झेप घेतो. त्या पक्षाचं ओरडणं इतकं कर्कश असतं, की प्रजा घाबरून जाते. त्या पक्षाला मारायला जावं, तर एकाच्या जागी दोन पक्षी जन्म घेतात. पुढे दुष्काळामुळे ते साम्राज्य लयाला जातं..
ही कथा म्हणजे आयुष्यात जवळच्या माणसांकडून होणाऱ्या अन्यायाचं प्रतीक म्हणून सबंध कादंबरीच्या रंगमंचावरील मागच्या पडद्यासारखी व्यापून राहते.
गोव्याच्या पाश्र्वभूमीवर घडणाऱ्या, आशा आणि धर्य यांचा मिलाफ असणाऱ्या या कादंबरीत तीन वेगवेगळ्या स्त्रियांना उद्ध्वस्त करणाऱ्या आणि पुन्हा उभारी देणाऱ्या आयुष्यांची कहाणी आहे.
इंग्लंडमध्ये मोठी झालेली, श्रीमंत कुटुंबातली असूनही आईवडिलांचं प्रेम न मिळालेली डॉना; सुंदर पण वादळी स्वभावाच्या मोठय़ा बहिणीमुळे आयुष्य झाकोळून गेलेली मायोला, जी डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञ आहे आणि खेडय़ात, अंधश्रद्धाळू गरीब कुटुंबात चौथ्या क्रमांकावर जन्माला आलेली सुक्कोरीना अशा तिघींच्या आयुष्याची ही गोष्ट.
मायोला गोव्यात येते, तेव्हा तिच्या आजीपासून त्यांच्या घरात कामाला येणारी सुक्कोरीना तिच्यासाठी काम करू लागते. डॉना आणि सुक्कोरीना दोघींना मायोलाच्या मानसोपचारांचा उपयोग होतो. मायोला रुग्णांना खूप वेळ देते, त्यांची दु:खं ऐकून घेते आणि मग त्यांना योग्य तो सल्ला देते. औषधं देण्यापेक्षा ती समुपदेशनावर जास्त भर देते. मायोलाची उपचारपद्धती गोव्यातल्या पुष्कळ जणांना फायद्याची ठरते. पण तिच्याकडे लोक मन मोकळं करत असल्यानं घरातली गुपितं बाहेर पडतात, म्हणून लोकांना ते आवडत नाही.
कादंबरीची रचना काहीशी गुंतागुंतीची आहे. अनेक पात्रांची आपापसांतली नाती समजून घेताना जरा गोंधळ उडू शकतो. पण जसजसं त्यांचं स्वभावचित्र तयार होत जातं, तशी कादंबरी मनाची पकड घेऊ लागते. भाषा अतिशय थेट, काहीशी ‘बोल्ड’ म्हणावी अशी आहे. एकूण मनुष्य स्वभावातले असंख्य कंगोरे, भावछटा उलगडून दाखवणारी ही कादंबरी वेगळ्या जगाची सफर घडवते.
- ‘धीवराची आर्त साद’ – बेलिंडा व्हिएगस,
- अनुवाद – श्यामल चितळे,
- मेहता पब्लिशिंग हाऊस,
- पृष्ठे – २४२, मूल्य – २९५ रुपये