|| मकरंद देशपांडे
‘बसंत का तीसरा यौवन’ या नाटकावर आधारित फिल्म बनवायची हे ठरवण्यापेक्षा ती सुरू करू या हे ठरवलं. पहिला फोन सोनालीच्या तेव्हाचा Talent Manager गिरीशला केला आणि मी त्याच्याकडे सोनालीच्या तारखा मागितल्या. त्यावर तो प्रेमाने म्हणाला, की चार दिवसांत फिल्म कशी बनवणार? मी म्हटलं की, फिल्म पूर्ण करायची नाहीए, फक्त सुरू करायची आहे. कारण खरं तर तेव्हा बँकेत माझ्याकडे तेवढेच पसे होते. पण मनात त्या निर्णयाने खूपच श्रीमंती आली होती. दुसरा फोन सयाजी शिंदे यांना केला. मला खरा वाटेल असा जमीनदार आणि कविमन यांची सांगड असलेला अभिनेता हवा होता. दानवासाठी मी माझ्याऐवजी आर्यन वेद या India Gladrag winner ला फोन केला. खरं तर तो आमची बरीचशी नाटकं पाहायला यायचा आणि त्याला नाटकात काम करायचं होतं. पण त्याच्या नशिबात फिल्म होती. त्या फिल्मच्या सगळ्या मीटिंग्ज पृथ्वी थिएटर कॅफेमध्ये झाल्या. तेव्हा मला फायनान्सरनी ऑफिसचा पत्ता विचारला होता. मी त्याला ‘पृथ्वी थिएटर’ सांगितला होता. आणि खरंच, सगळ्यांना कुतूहल वाटायला लागलं. मी शूटिंगसाठी रवी काळे आणि त्याचा बंधू राजू काळे यांची मदत घेतली. घोडेगावला जायला पृथ्वी थिएटरवरून बस निघाली.
तेव्हा जो नट भेटला आणि ज्यांनी काम मागितलं त्या सगळ्यांना सांगितलं- बसमध्ये बसा. मला आठवतंय, हबीब तन्वीर सरांचा एक अनुभवी नट बस निघायला पाच मिनिटं असताना भेटला. त्याच्याशी बोलता बोलता बस निघाली. मी नंतर गाडीनं जाणार होतो. कारण मला विशाल भारद्वाजकडून गाणं घेऊन जायचं होतं. असो. मी त्यांना सांगितलं की, ‘नाटक में तो अभी काम दे नहीं सकता, पर नाटक पर जो फिल्म बन रही है उस में ज़्ारूर काम दे सकता हूँ. उस बस में बठ जाइए!’ तो नट बसला. त्याने फक्त खिडकीतून विचारलं की, ‘कपडे? कितने दिन?’ मी म्हटलं, ‘बरोबर कॉस्च्युमची पेटी आहे. और पसा खतम हो जायेगा तो शूटिंग भी खतम हो जायेगी.’
विशालनं फारच सुंदर चाल बनवली. मी अट्टहासाने (पसे देऊन) जावेद अख्तरांकडून गाणं लिहून घेतलं. ते विशालमुळे आशाताईंनी गायलं. गाणं फारच गोड झालं. बस पृथ्वीवरून निघून बरेच तास झाले होते. मी मध्यरात्री निघालो. उजाडताच पोहोचलो. पण राजू म्हणाला, ‘बस अजून पोहोचलेली नाही.’ मला वाटलं, ही फारच ट्रॅजिक सुरुवात आहे. वाटलं, चुकून कुठे बस अंधारात दरीत तर पडली नाही ना? आपल्यामुळे बावन्न लोक मृत्युमुखी तर पडले नाहीत ना? मनात वाट्टेल ते येत होतं. कारण दुपार झाली तरीही बसचा काही पत्ता नव्हता. संध्याकाळी बस पोहोचली तेव्हा कळलं की, आणखीन एक घोडेगाव आहे- जे इथून आठ तास दूर आहे.
कॅमेरामन राज रेवणकर हा केवळ २२-२३ वर्षांचा होता. टेडी मौर्यालाच फिल्मचं कलादिग्दर्शन करायला दिलं. सेटवर संजय दायमा (‘लगान’चा स्क्रीन-प्ले रायटर आणि सहाय्यक दिग्दर्शक) हाच काय तो फिल्मचा माणूस. (ज्याने नाटक केलं नव्हतं.) त्याला माझी प्रोसेस पदोपदी झोप उडवणारी; पण आत्मविश्वास वाढवणारी वाटली. कारण मी, सोनाली, सयाजी, आर्यन वेद घोडेगावच्या साधारण पन्नास किलोमीटर परिसरातील आमराई, द्राक्षांची बाग, उसाचे मळे, नदीचा तट, पर्वताचे शिखर फिरत फिरत शूटिंग करायचो. सीन शक्यतो मी स्थळावर पोहोचल्यावर उत्स्फूर्त लिहायचो. सयाजी गमतीत विचारायचा-
‘‘आजचा पेपर फुटला का?’’
सयाजी आणि सोनालीच्या विश्वासाशिवाय हे शक्य नव्हतं. मी एकदा त्यांना दंतकथेतल्या वाटणाऱ्या छोटय़ाशा बोटीतून नदीत उडी मारायला सांगितली. त्यांनी विचार न करता मारलीही. घोडय़ासारखी वाहणारी घोडेगावची नदी. त्या वाहत्या पाण्यातसुद्धा दोघांनी सहज सीन केला. सीनच्या शेवटी सयाजीचा पाय धोतरात अडकला. पण सयाजी हा सराईत पोहणारा असल्यानं संकट टळलं. सोनाली लाँग स्कर्टमध्ये कशी पोहली यांचं नंतर आश्चर्य वाटलं.
सोनाली हिनं नाटकात आंब्याची बाग, पक्षी, उसाशी खूपच परिणामकारकपणे संवाद केला होता, पण आता तो खराखुरा बघताना खरंच दंतकथा वाटायला लागली.. मलाही.
मला पॅकअप्नंतर राजूच्या ढाब्यावर बसून व्हाऊचर लिहायला आवडायचं. एका नवीन कामाचा-अकाऊंटंटचा रोलही मी वास्तवात केला.
एका वसंतऐवजी दोन वसंतात या ‘दानव’ फिल्मचं शूटिंग पूर्ण झालं. रामगोपाल वर्माच्या फिल्मच्या एडिटरने- चंदनने फोन करून सांगितलं की, ही फिल्म मीच एडिट करणार. मी म्हटलं की, पसे संपले आहेत. तो म्हणाला, फोन मी केलाय. मला तुझी फिल्म एडिट करायची आहे. आकाशदीपमुळे काही पसे उभे राहिले. माझे काही बँकेत होते. आणि वरून माझ्या मोठय़ा भावाने- श्रीकांतने पाठवले. कमी पडले तेव्हा जुळ्या भावाने- मििलदने दिले.
रामगोपाल वर्मा थोडा नाराज झाला होता. कारण तो माझा जवळचा मित्र; पण मी त्याला न सांगता फिल्म बनवली. त्याचं म्हणणं होतं की ती फिल्म बंद कर. पहिली फिल्म अशी बनव, की ज्यानं अख्खं करिअर बनेल. (तो प्रोडय़ुस करायला तयार होता.) आणि मला करिअर सोडाच; फिल्मसुद्धा बनवायची नव्हती. मला फक्त तेव्हा ते नाटक खऱ्या लोकेशनवर घडताना पाहायचं होतं.
राकेश रोशन यांच्या ‘व्हीडिओ क्राफ्ट’ या एडिटिंग रूममध्ये फिल्म एडिट झाली. जाता जाता फिल्म इंडस्ट्रीतले बरेच जण आत डोकवायचे आणि म्हणायचे की, ही काय ‘अजीबो गरीब’ फिल्म!! फिल्मचं एडिटिंग पूर्ण झालं तेव्हा पूजा भट्ट ही माझी मत्रीण श्ॉम्पेन घेऊन आली. आपल्या मनाला भावेल तीच फिल्म बनवली म्हणून कौतुक वाटलं तिला.
फिल्मचं बॅकग्राऊंड संगीत हितेश सोनीकने फारच सुंदर केलं. फिल्म आता डिस्ट्रिब्युटरला दाखवायची होती. त्यासाठी राजेंद्रकुमार यांचं िडपल थिएटर बुक केलं. तिथे सगळ्या िभतींवर हिंदी चित्रपटसृष्टीतील मातब्बरांचे फोटो लावले होते. प्रायोगिक अंग समजणारे डिस्ट्रिब्युटर आले. फिल्म संपल्यावर वेळ न घालवता मला म्हणाले की, ‘या तो तुम जिनिअस हो, या तो तुम मुरख हो. यह फिल्म कभी रिलीज नहीं होगी. इसका कुछ नहीं होगा.’
मला थोडं वाईट वाटलं. पण मनात विचार आला तो फक्त पसे परत करण्याचा.. ज्यांचे घेतले होते त्यांचे. उपाय एकच होता- फिल्म्समध्ये अभिनय करणं. आणि झालं. मी ‘दानव’ डब्यात बंद केली. आणि ती कुणालाही न दाखवता उगाच मेलोड्रामा न करता जीवनाचं नाटय़ जगायला सुरुवात केली.
पृथ्वी थिएटरला चक्कर मारली. पावसाळा सुरू झाला होता. पाऊस पाहत विचार करायला लागलो की, नाटक ते फिल्म या यात्रेत काय शिकलो? काय नाही शिकलो? तर उत्तर मिळालं की- आपल्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येकाला ती फिल्म बनवताना खूप मजा आली; पण डिस्ट्रिब्युटरला नाही आली. याचा अर्थ आपल्याला ‘नाटय़’ विकता येत नाही. पण पुढे आणखीन एक प्रश्न पडला, की आपण दाखवतोय ते नाटक प्रेक्षकांना पूर्णपणे समजतंय का? तर मनाने ‘नाही’ असे उत्तर दिले. मग ठरवलं, की एक असं नाटक लिहावं- जे पाहिल्यावर ‘खूप चांगलं आणि सगळं समजलं’ असं प्रेक्षक म्हणतील. आणि ते नाटक त्या पावसाळ्यात लिहून झालं. त्याचं नाव- ‘सर सर सरला’! २००१ साली. आता आपण जरा दोन र्वष पुढे जाऊ या आणि मागच्या ‘नाटक ते फिल्म’ या दंतकथेचा शेवट करू या आणि मग पुन्हा ‘सरला’कडे परतू या.
२००३ साली मला मीनाक्षी शेड्डेचा फोन आला. ती आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तेव्हा क्युरेटर म्हणून काम करायची. कान्स हे नाव हल्ली सगळेच ऐकून आहेत. एकीकडे ऑस्कर आणि दुसरीकडे कान्स- दोन्हीला खूप महत्त्व. मीनाक्षी म्हणाली, ‘कान्सचा प्रतिनिधी स्टीफान आला आहे आणि त्याला Directors Fortnight या विभागासाठी फिल्म्स हव्या आहेत. तर तो त्यासाठी देशभर फिरणार आहे. तू एक फिल्म बनवली आहेस ना?’ मी सहज म्हटलं, ‘बनवली होती. आता त्याला दोन र्वष झाली.’ त्यावर ती एवढंच म्हणाली की, त्यांना भेट तर! मी स्टीफानला भेटलो. हॉटेलच्या लॉबीत त्याला ‘दानव’ची व्हिडीओ कॅसेट दिली आणि त्याला सगळं म्हणजे सगळं सांगितलं. अगदी डिस्ट्रिब्युटर जे म्हणाले तेसुद्धा. त्यावर तो म्हणाला, ‘आता तर तुझी फिल्म लगेचच पाहीन.’ काही दिवसांनंतर त्रिवेन्द्रमवरून स्टीफानचा फोन आला. तो म्हणाला, ‘मी खूप फिल्म्स पाहिल्या. इंडियातून तुझी फिल्म शॉर्टलिस्ट केली आहे.’ मला फार काही वाटलं नाही. महिना लोटला. एके दिवशी संध्याकाळी फोन वाजला. स्टीफानने पॅरिसवरून तो केला होता. त्यानं प्रेमानं विचारपूस केली आणि फोन ऑलिव्हर पेर यांना दिला. ते कान्सच्या Directors Fortnight विभागाचे फेस्टिव्हल प्रमुख होते. त्यांनी आमच्या ‘दानव’ फिल्मची अशी तारीफ केली, की आता ते सगळं दंतकथेतलंच वाटतंय. ते म्हणाले की, रित्विक घटकनंतर अशी Raw Emotions मांडणारा लेखक-दिग्दर्शक भारतातून आत्ता पाहिला. त्यांना सोनालीची सुंदरता, तिचा अभिनय, आशाताईंनी गायलेलं गाणं, त्यांचा आवाज, जावेद अख्तरांनी लिहिलेले शब्द एवढे आवडले की ते अर्धा तास त्यासंबंधी बोलत होते. आणि मला म्हणाले की, ‘आम्हाला फिल्म एवढी आवडली आहे की आम्ही त्या फिल्मचं वर्ष २००१ ऐवजी २००३ केलं तर चालेल का?’ (तांत्रिक कारणासाठी!)
फिल्म दिग्दर्शक शेखर कपूर यांनी मला सांगितलं की, ‘मकरंद, कान्सची लोकं तुझ्यावर खूप खूश आहेत.’ विचार करण्यासारखं हे आहे- की त्यांना ही फिल्म एवढी का आवडली? उत्तर असं वाटलं की, ती फिल्म अहेतुक बनवली होती. त्यामुळे त्यात दंतकथा जिवंत झाली. आणि रंगमंचाची मजबूत पायाभरणी होतीच.
जय जीवन! जय दंतकथा!
जय कान्स! जय स्टीफान!
mvd248@gmail.com