देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू एका कवीला सांगतात की, गेल्या ३०० वर्षांतल्या विविध विषयांवरच्या उत्तमोत्तम उर्दू कविता संकलित करा आणि एक ग्रंथ प्रकाशित करा. कवी जां निसार अख्तर हे काम हाती घेतात आणि खपून पुरं करतात. ‘हिन्दोस्तॉं हमारा’ हा द्विखंडी ग्रंथ तयार व्हायला १९६५ साल उजाडतं. इंदिरा गांधींच्या हस्ते तो प्रकाशित होतो. स्वत:च्या कल्पनेतला ग्रंथ बघायला नेहरू हयात नसतात, पण तो त्यांनाच समर्पित असतो- ‘‘पंडित जवाहरलाल नेहरू की याद में, जिन्होंने हिंदुस्तान को सेक्युलरिजम और जम्हुरियत प्रदान की.’’

नेहरूंचे कवी, कवितांशी आणि जां निसार अख्तर यांचे बंध होतेच. उर्दू वाड्.मयाचे जाणकार रघुपती सहाय म्हणजेच सुप्रसिद्ध उर्दू शायर फिराक गोरखपुरी आणि कवी जोश मलिहाबादी यांच्याशी नेहरूंची मैत्री होती. नेहरूंच्या कारकीर्दीत ऑक्टोबर १९६२ मध्ये भारतावर चीनने आक्रमण केलं. पंतप्रधान या नात्याने नेहरूंनी त्या अवघड काळात राष्ट्राला एकजुटीने उभं राहण्याचं आवाहन केलं होतं. जां निसार अख्तर यांनी तेव्हा ‘आवाज दो हम एक हैं’ हे गाणं लिहिलं. गाण्याचे संगीतकार खय्याम आणि गायक मोहम्मद रफी. या गाजलेल्या गाण्याने तेव्हा भारतीयांना संघटित होण्याची प्रेरणा दिली होती.

जां निसार अख्तर यांनी संपादित केलेला ‘हिन्दोस्तॉं हमारा’ हा ग्रंथ हिंदुस्तानी बुक ट्रस्टकडून पुन्हा १९७३ साली प्रकाशित झाला. नंतर तो उपलब्धच नव्हता. गेल्या वर्षी राजकमल प्रकाशनने हे दोन्ही खंड नव्याने पुनर्मुद्रित केले आहेत. दोन्ही खंडांची मिळून हजारहून जास्त पृष्ठसंख्या आहे. काय आहे या ग्रंथात?

हेही वाचा : विद्यार्थ्यांचा ओढा का?

उर्दू कवींनी लिहिलेल्या शेकडो- या आधी वाचकांसमोर फारशा न आलेल्या कविता. हे उर्दू कवी म्हणजे उर्दूतून लिहिणारे. यात धर्माने हिंदू आणि मुस्लीम दोन्ही आहेत. प्रत्येक पानावर तळटिपांमध्ये उर्दू शब्दांचे हिंदीत अर्थही दिले आहेत. उर्दू शायरी म्हणजे फक्त प्रेम, प्रणय, करुणा आणि विद्रोह असा समज आहे. असं समजणं किती चुकीचं आहे हे या पुस्तकाच्या दोन्ही खंडांमध्ये संग्रहित केलेल्या कवितांवरून कळतं. फक्त अनुक्रमणिका वाचली तरी या काव्यविषयांची सर्वसमावेशकता जाणवते. हिंदुस्तान देशातली माणसं, त्यांचं जगणं, त्यांचे देव, उत्सव, इथला निसर्ग, देशाचा इतिहास असं सारंच आहे. १८५७ ते १९७२, स्वातंत्र्यचळवळपूर्व काळापासून, स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवापर्यंतच्या विविध घटना, स्वातंत्र्यसैनिक, चळवळीचे पुढारी, कलाकार, देशगौरव, देशप्रेम, देशातला बंधुभाव असेही या कवितांचे विषय आहेत. या कवितांना हिंदुस्थानातला कोणताही विषय वर्ज्य नाही. या अर्थाने या कविता राष्ट्रवादी आहेत.

‘‘हिंदियों के दिल में बाकी है मुहब्बत राम की

मिट नही सकती कयामत तक हुकूमत राम की

जिंदगी की रूह था, रूहानित की शान था

वो मुजस्सम रूप में इंसान के, इरफान था’’

ही रामस्तुती संस्कृतमधल्या रामस्तोत्रांहून कुठेही कमी नाही. आणि भगवान शंकर यांच्यावरच्या एका कवितेच्या समारोपाच्या या ओळी :

‘‘क्यों न मालिक हो सफेद और सियह के दोनों

मस्त-ओ-मसरूर हैं कैलास में रहके दोनों’’

जैन धर्मात क्षमायाचनेचा एक दिवस पाळला जातो. यावर एक वाचनीय कविता आहे, छमावनी :

‘‘दिल में नए अरमान बसाने का दिन आया

गुंचे की तरह दिल को खिलाने का दिन आया

फूलों की तरह हंसने हंसाने का दिन आ गया

आपस में गले मिलने मिलाने का दिन आया

इक साल के बाद आज ठिकाने का दिन आ गया

आंख की तरह सर झुकाने का दिन आ गया

आदाब ए वफा सबको सिखाने का दिन आया’’

कृष्ण, गौतम बुद्ध, गुरू नानक, शिवाजी राजा, झाशीची राणी यांच्यावरही कविता आहेत. यातल्या डझनभर कवितांचे विषय हिमालय, गंगा, यमुना, संगम वगैरे आहेत. फ्लेमिंगो, मेंढपाळाची बासरी, भातशेती यावरच्या कविता आहेत. दिवाळी, होळी, वसंतोत्सव, ईद यांसारख्या सणांवरही कविता लिहिल्या आहेत. यापैकी ‘मीर’ आणि ‘नजीर’ या रचना खूप गाजल्या. ताजमहाल तर या कवितांमध्ये आहेच आणि अजिंठा, वेरूळ, नालंदाही आहे. देशातली विविध शहरं आहेत. ‘कुमार संभवम्’, ‘अभिज्ञान शाकुंतलम्’, ‘मेघदूत’ यांसारख्या उत्तम संस्कृत कवितांचं उर्दूमध्ये भाषांतर झालं आहे. त्याचीही झलक या संकलनात आहे. नेहरूंवरच्या काही उत्कट कविता इथे आहेत.

हेही वाचा :  आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’

१९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘युगंधर’ या चित्रपटासाठी कृष्णाची आरती लिहिण्याचा जावेद अख्तर यांचा किस्सा लोकप्रिय आहे. त्या आरतीत त्यांना कृष्णाची अनेक नावं गुंफता आली. त्याचं कारण उर्दू भाषेतून ही ओळख त्यांना आधीच झाली होती, असं ते सांगतात. त्यांच्या या सांगण्याला ‘हिन्दोस्तॉं हमारा’ ग्रंथातल्या उर्दू कवितांनी पुष्टीच मिळते. सेतू माधवराव पगडी यांचं एक पुस्तक आहे, मिर्झा गालिब आणि त्याच्या उर्दू गजला. त्यात त्यांनी जुन्या काळातले उर्दू समीक्षक इबादत बरेलवी यांचा हवाला देऊन म्हटलंय की अध्यात्म, भक्तिमार्ग, ईश्वरप्राप्ती, जगण्याचा अर्थ, जीवनातलं श्रेयस-प्रेयस असे आणि ज्योतिष, खगोल विद्या, आयुर्वेद यांसारखेही अनेक विषय उर्दू कवींनी हाताळले. या कवितांमधल्या प्रतिमा वरवर बघता नेहमीच्या प्रेम-प्रणयाच्या वाटतील. पण याच प्रतिमांनी भोवतालची सामाजिक, राजकीय स्पंदनं टिपली. खरं तर राजकीय, सामाजिक घडामोडींपासून उर्दू कवितेने कधीही अंतर राखलं नाही. हे शतकानुशतकं घडत आलं. अगदी तेच या ग्रंथात दिसतं. असं अन्य एखाद्या भारतीय भाषेबद्दल क्वचितच घडलं आहे.

नेहरूंनी सुस्पष्टपणे म्हटलं होतं – There is only one India of which all of us are inheritors. It belongs to all of us. हा एकात्मतेचा लोलक उर्दू कवितेत नेहमीच प्रकाशमान राहिला आहे. स्वातंत्र्यप्राप्ती नजरेच्या टप्प्यात आल्यावर नवभारताची स्वप्नं बघणारा कवी लिहितो :

‘‘जज्बात ने करवट बदली है, एहसास ने अंगडाई ली है

आजाद-रवी से इंसा ने तामीर नई दुनिया की है

फितरत के हसी मैखाने से, बेदारी की सहबा पी है

उस दुनिया के इंसानं की, हर बात पयाम- ए-दिल होगी

हर सांस में एक नग्म होगा, हर गाम पे एक मंजिल होगी

साहिल कैसा, तूफां कैसा, हर मौज वहां साहिल होगी’’

स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्याच्या नोंदी या कवींनी केल्या आहेत. तसंच सर्व नेत्यांविषयीचा आदर, प्रेम भरभरून व्यक्त झालं आहे.
‘बाल गंगाधर तिलक’ नावाच्या कवितेत कवीने म्हटलंय :

‘‘मोजिजा अश्क- ए – मोहब्बत का दिखाया तूने

एक कतरे से यह तूफान उठाया तूने

मुल्क को हस्तिए-बेदार बनाया तूने

जज्ब – ए – कौम के जादू को जगाया तूने’’

आणि ‘गोपाल कृष्ण गोखले’ नावाच्या कवितेतल्या या ओळी :

‘‘वतन को तूने संवारा किस आबो-ताब के साथ

सहर का नूर बढे जैसे आफ्ताब के साथ

चुने रिफाह के गुल हुस्न-ए-इंतिखाब के साथ

शबाब कौम का चमका तिर – ए – शबाब के साथ’’

स्वत: जां निसार अख्तर यांच्याही काही कविता या ग्रंथात आहेत. त्यापैकी हमारी तारीख ही कविता. स्वातंत्र्यचळवळीतल्या मूल्यांची, त्यांना अजूनही लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करायचं आहे याची आठवण करून देणाऱ्या या कवितेतल्या काही ओळी :

अय वतन हम तिरी तारीख लिखेंगे फिर से

तेरी तारीख है दिलजोए – ओ – दिलदारी की

तेरी तारीख मोहब्बत की वफा की तारीख

तेरी तारीख उखूवत की रवादारी की

तेरी तारीख है कुद रूह के आदर्शों की

तेरी तारीख है कुरआन का गीता का वरक

आश्ती, अमन, अहिंसा के उसुलों का सबक

आजही आपल्या देशात या प्रकारची तारीख उगवण्याची गरज वाटते आहे. जान निसार अख्तर यांनी ग्रंथाचे संकलक, संपादक या भूमिकेतून लिहिलेली दीर्घ प्रस्तावना हा या ग्रंथातला मोठा ठेवा आहे. पहिल्या खंडात त्यांनी उर्दू भाषेचा जन्म, सूफी आणि हिंदुस्तानातल्या दक्षिणोत्तर भक्तिमार्गांचा परस्परांवरचा प्रभाव, त्यातून उमललेली ‘मिली-जुली’ संस्कृती, या संस्कृतीची मुद्रा मिरवणाऱ्या विविध कला आणि भारतातली गंगा-जमनी तहजीब यांचा आढावा घेत भाष्य केलंय.

हेही वाचा : पंचम देणे सामाजिक जाणिवेचे !

दुसऱ्या खंडात अख्तर यांनी भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा आणि उर्दू कवितेने चळवळीला दिलेल्या सोबतीचा वेध घेतलाय. स्वातंत्र्यचळवळीतलं उर्दूचं योगदान निर्विवाद आहे. इन्कलाब जिंदाबाद ही चळवळीची मुख्य घोषणाच मुळी उर्दूने दिली. साहित्याने कलावादी असावं की जीवनवादी या मुद्द्याची चर्चा इथे केली आहे. जीवनापासून दूर जाणारी विशुद्ध कलात्मकता काय कामाची असा प्रश्न उपस्थित करून साहित्याने जीवनसन्मुख, समाजसन्मुख राहिलं पाहिजे असं विवेचन केलं आहे. साहित्याने जीवनातलं सौंदर्य आणि चैतन्य दोन्ही उज्ज्वल केलं पाहिजे आणि उर्दू कवितेने नेमकं हेच कसं केलं, ते अख्तर यांनी सोदाहरण विशद केलं आहे. उर्दू कवितेच्या जनवादी, समाजवादी पैलूचे पुरावे हिन्दोस्तॉं हमाराच्या दोन्ही खंडात पानोपानी आहेत. एका लेखात किती उदाहरणं देणार? तरी काही कवितांचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. कृष्ण और राधा की मुलाकात, रसुलन बाई की नज्म, लता मंगेशकर के नाम, भाकडा नांगल, रूह-ए- गौतम, गंगा के तीन रूप, पाकिस्तान चाहनेवालों से (फाळणीविरोधी मत मांडणारी कविता), हिंदी नौजवानों से, ईस्ट इंडिया कंपनी के फरजन्दों से खिताब.

साधारणपणे १२व्या शतकात फारसी, अरबी, पोर्तुगीज या भाषांतल्या शब्दांची स्थानिक भाषांबरोबर देवाणघेवाण सुरू झाली. आणि अनेक शब्द इथल्या भाषांत मिसळू लागले. स्थानिक संस्कृत भाषेचाही प्रभाव होताच. यातून भारतातल्या मातीत जन्मली हिंदुस्थानी भाषा. हीच हिंदवी किंवा रेख्ता किंवा उर्दू भाषा. रेख्ता शब्दाचा अर्थच मिश्रण असा आहे. ही उत्तर भारताच्या मैदानी भागात आधी विकसित झाली. ही जबान-ए उर्दू-ए मुल्ला-ए-शाहजहानाबाद शाहजहानाबादच्या कोर्टाची भाषा.

हेही वाचा : आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…

सूफी विद्वान अमीर खुसरो यांना उर्दू साहित्याचे जनक म्हणतात. त्यांच्याबद्दल एक कथा आहे. ते तुर्की, पर्शियन आणि अरबी भाषेत कविता लिहायचे. त्यांची आई मात्र त्यांना दिल्लीतल्या सामान्य लोकांना माहीत असलेल्या भाषेत लिहायला सांगायची. तसं लिहिण्यासाठी खुसरो संस्कृत आणि दखनी भाषांतून शब्द उधार घेऊ लागले. या मिश्रणातून उर्दू जन्मली. पर्शियनसारख्या भाषांच्या एकत्रीकरणामुळे उर्दूची निर्मिती झाली. उर्दूने फारसी, अरबी भाषांची लिपी, नस्तालीक वापरल्याने ती देवनागरीहून एकदम आगळीवेगळी ठरली. इस्लामी धर्मग्रंथ कुराण याच लिपीत असल्याने उर्दू भाषेचा संबंध इस्लामशी जोडला गेला. एरवी, लॅटिन भाषेचा ख्रिाश्चन धर्माशी जसा संबंध नाही तसाच उर्दूचा इस्लामशी नाही. उर्दू ही धर्मनिरपेक्ष भाषा आहे. ती पाकिस्तानची राष्ट्रभाषा असल्यानेही तिचा संबंध मुस्लिमांशी जोडला जातो. खरं तर पाकिस्तानात फक्त आठ टक्के लोक उर्दू बोलतात. तिथे सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या तीन भाषा म्हणजे पंजाबी, पश्तो आणि सिंधी. २२ अधिकृत भारतीय भाषांमध्ये उर्दूला स्थान मिळालं आहे. कारण भारत ही उर्दूची मातृभूमी. आणि भारताने आपलीशी केलेली खरी परकीय भाषा इंग्लिश आहे.

भारतातलं काव्यसंकलनाचं काम म्हणूनही हिन्दोस्तॉं हमारा ग्रंथ वाखाणण्याजोगा आहे. मुळात आपल्याकडे दस्तऐवजीकरण बेताचं. विखुरलेला मजकुर संग्रहित करण्याचं कामही तसं उशिराच सुरू झालं. आपली पसंती मौखिकतेलाच आणि भरवसा स्मरणशक्तीवरच असायचा. संग्रहित, संकलित करण्याची रीत आपल्याकडे सुरू करण्याचं श्रेय गुरू नानक (पंधरावं शतक) यांचं. विविध भक्तिकाव्यांच्या मौखिक संकलनाचं काम पहिल्यांदा त्यांनी सुरू केलं. त्यांनी केलेल्या संकलनात शीख संप्रदायाच्या वचनांसोबत त्याहून वेगळी मतं मांडणारं काव्यही होतं. आणि शीख संप्रदायावर प्रभाव असलेल्या मुस्लीम भक्तिसंप्रदायातल्या कवितांचाही समावेश होता. शिखांचे पाचवे गुरू अर्जन देव यांनी संकलनाचं हे काम पुढे नेत त्याला ग्रंथरूप दिलं. आणि दहावे गुरू गोविंदसिंग (सतरावं शतक) यांनी भक्तीकाव्यसंकलनाचा ग्रंथ अधिक नेटका करण्याचा प्रयत्न केला. यात शीख गुरूंची काव्यं आहेत, मुस्लीम भक्तीसंप्रदायाची आहेत, कबीराचे दोहे आहेत आणि संत नामदेवांचे अभंगही आहेत. यानंतर भारतात संकलनाचं काम झालं नाही. १९६५ साली प्रसिद्ध झालेला हिन्दोस्तॉं हमारा ग्रंथ पुन्हा २०२३ साली नव्या रूपात आणणं हे आपल्याकडचं मोठं काम आहे.

हेही वाचा : चित्रास कारण की: समुद्रसरडा

खुशवंत सिंग म्हणायचे की, प्रेम करायचं असेल तर उर्दू शिकायला पाहिजे आणि उर्दू शिकायची असेल तर प्रेमात पडायला पाहिजे. उर्दू भाषेचा डौल, शालीनता, मिठ्ठास हे सारं मोहात टाकणारं. या भाषेचं रम्य रूप आणि कसदार आशय यामुळे कोणतीही रसिक, साहित्यप्रेमी, भाषाप्रेमी व्यक्ती उर्दूकडे वळणार, हे पक्कंच. उर्दू लोकप्रिय करण्यात २०१३ साली सुरू झालेल्या ‘रेख्ता’ या संस्थेचा वाटा मोलाचा आहे. त्यांची वेबसाइट, त्यांचं अॅप, त्यांचा शब्दकोश, ते प्रसिद्ध करत असलेली पुस्तकं, त्यांच्या मैफिली यांना उदंड प्रतिसाद असतो. या प्रतिसादाचं एक कारण असं की रेख्ताने उर्दू साहित्य हे नस्तालीकसह देवनागरी आणि रोमन लिपीतूनही उपलब्ध केलं आहे. मुख्य म्हणजे सर्व महत्त्वाची उर्दू पुस्तकं डिजिटाइज करून रेख्ताने जतन केली आहेत. इतक्या सुंदर भाषेचा समृद्ध वारसा सांभाळण्याचं काम रेख्ता ही संस्था करत आहे. ‘आईना – ए – गजल’ या नावाचा एक उत्तम शब्दकोश आहे. दिवंगत डॉ. जरिना सानी आणि डॉ. विनय वाईकर या दोन्ही नागापूरस्थित तज्ज्ञांनी तयार केलेल्या या कोशाची मदत घेऊन उर्दू साहित्याचा आस्वाद घेता येतो. यात आठ हजारांहून अधिक उर्दू शब्द आणि पाच हजार शेर यांचे अर्थ दिले आहेत. कॉंन्टिनेंटल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाच्या आजवर सात आवृत्या निघाल्या आहेत. उर्दूला मिळणारा तरुणांचा प्रतिसाद पाहून सध्याच्या मुस्लीम समाजाविषयीच्या विखारी वातावरणात थोडा दिलासा मिळतो. उर्दू भाषेचे प्रेमिक कोणाचा द्वेष करणार नाहीत, अशी खात्री वाटते. ती खरी की खोटी कोण जाणे? मात्र,‘हिन्दोस्तॉं हमारा’सारखा उर्दू भाषेविषयी आणि ती जन्मली त्या भारतीय भूमीविषयीची समज वाढवणारा ग्रंथ हा सध्याच्या विषवल्लीवरचा एक उतारा नक्की ठरू शकतो.

kulmedha@gmail.com