सरिता आवाड लिखित ‘हमरस्ता नाकारताना’ या राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत असलेल्या आत्मकथनात एका प्रथितयश लेखिकेच्या संवेदनशील मुलीने आपल्या आईकडे तटस्थ दृष्टिकोनातून पाहत तिच्या आईपणाची आणि लेखकपणाची केलेली उत्कट चिकित्सा.. संपादित अंश…
२१ जानेवारी १९८२..
प्रिय आई,
शेवटी ज्या क्षणाला इतकी वर्ष भीत होते तो क्षण आलाच. रात्री मधेच धसकून जाग यायची अन् तू झोपलेली असलीस तर पांघरूण वर-खाली होतंय ना, हे मी पाहायची.. बेल वाजवल्यावर लगेच दार उघडलं गेलं नाही तर श्वास रोखला जायचा. तू बाहेर गेलीस आणि यायला उशीर झाला तर अंधारात नजर खुपसून बसायची. अशा वेळी रामरक्षा म्हणावी असं तूच शिकवलं होतंस ना? कधी कधी तुझ्याशी वाद घालावा असं वाटायचं. पण तुझ्या गळ्यावरच्या अनियमित गतीनं उडत राहणाऱ्या शिरांचा धाक वाटायचा. खरं म्हणजे धाक वाटायचा तो तुझ्या जाण्याचा. आता तू नाहीस. ‘सरू..’ अशी तीव्र आवाजात हाक नाही. नाराजीच्या बरोबरीनं प्रेम, काळजी यांची पखरण करणारी पत्रं नाहीत. मी काम करत असलेल्या ठिकाणी अचानक न कळवता येणारी, चालताना झोक जाणारी कोणीही कृश, काळजीनं काळवंडलेली स्त्री नाही दिसणार आता.. नजर वळवता सहज कुठेतरी एकाएकी तूच पुढे नाही दिसणार.
आता मागे वळून पाहताना आपल्या संबंधांचं अवघं चित्र समोर उभं राहतंय. खरं तर मी समजूतदार, आज्ञाधारक मुलगी. तुझ्या मनातही अशीच प्रतिमा जोपासलीस तू. जसं काही या प्रतिमेला छेद देणारं काही घडणारच नाही माझ्या हातून. पण माझ्या मनात बंड धुमसत होतं. माझं..माझं जग मला उभं करायचं होतं. ही ऊर्मी का तुला दुर्लक्षणीय वाटली? तूसुद्धा उभं करत होतीसच नं तुझं..तुझं असं जग. काळाचा पडदा बाजूला करत रमत होतीस ना टॉलस्टॉय राहत असलेल्या यास्नाया पोल्यानाच्या घरात.. शेवटी त्या आडबाजूच्या रेल्वे स्टेशनात- जिथे तुझ्या मनात जिवंत झालेला वृद्ध दाढीवाला अखेरच्या घटका मोजत होता.. किंवा आफ्रिकेच्या निबिड जंगलात खिळे ठोकता ठोकता आलेली नोबेल पारितोषिक मिळाल्याची बातमी ऐकूनही विचलित न होणारा, एक उतारवयाकडे झुकूनही न झुकलेला ‘कार्यनिष्ठ ’तू साक्षात् पाहत होतीसच नं? आता नेहमीप्रमाणे एकटे सरू किंवा विरू तुझे श्रोते नव्हते, तर तुझा श्रोतृवृंद सर्वदूर पसरला होता. त्यांची आदरभावनेनं ओथंबलेली पत्रं म्हणजे तुझ्या लेखी सुकत चाललेल्या पानावरच्या शुभशकुनांच्या रेषाच होत्या. तुला तुझा सूर सापडला होता.
आणि मी माझा सूर शोधत होते. ही साधी, सरळ, सोपी गोष्ट का नाही कळली तुला? यामागचं कारण मला आता कळतंय : आता- वयाच्या ६३ व्या वर्षी. ते कारण हे, की तुझ्या लेखी मी कधी मोठी झालेच नव्हते. आई, आपली मुलं मोठी झाली हे पचवणं कठीण असतं गं.. कळतं, पण वळता वळत नाही बघ. समोर दिसत असते अवघड काटय़ाकुटय़ांची वाट. आपल्यासमोर मोठं झालेलं पोर.. त्याच्या हळव्या जागा माहीत असतात. सरळसरळ अपघाती वळणांच्या दिशेनं जातेय त्याची गाडी असं दिसलं तर जिवाच्या आकांतानं ‘थांब.. थांब’ असं किंचाळायला होतं. ‘तुला वाचवायला काहीही करीन. मी सांगतेय एवढी जीव तोडून.. का नाही समजत?’ असं बरंच वाटून माझंही झालंय आता. पण मी सावरलं स्वत:ला. म्हटलं, की एका मर्यादेच्या बाहेर मुलांच्या भवितव्याचं ओझं मला डोक्यावर घेऊन कसं चालेल? धोक्याची सूचना देण्याचं काम माझं. ते मी केलं ना? तुम्ही काय आहात, हे मीच सांगितलं ना त्यांना? माझ्याच शब्दांवर विसंबून त्यांनी स्वत:चं स्वत:शी चित्र उभं केलं नं? बोलायला शिकवलं त्यांना. पण ते माझेच शब्द कसे बोलतील? मीच आखून दिलेल्या रस्त्यावरून कसे जातील? माझ्या नजरेला न दिसणारं परिमाण त्यांना दिसत असेलही. त्यांच्या या शक्तींवर विश्वास न ठेवणं म्हणजे माझाच माझ्यावर विश्वास नसणं ठरेल. म्हणून अवघड वळणावरच्या माझ्या पोरांना ‘शुभास्ते पंथान:’ असं मी म्हणाले. चुकलात, रस्ता झेपेनासा झाला तर मागं फिरा, माझ्या जिवात जीव असेपर्यंत तुमच्यासाठी सावली अंथरेन. ज्याची लढाई त्यालाच लढावी लागणार आहे. पण कोणीतरी जखमेवर फुंकर घालणारी आहे, थकलास तर ‘बस बाबा, सावलीला चार घटका..’ असं म्हणणारी आई आहे, ही जाणीव लढण्यासाठी बळ देईल त्यांना. तुला खरंच सांगते, असा अवकाश देत राहणं एका अर्थी तपश्चर्या असते.
मला माहितेय, तू म्हणशील.. ‘‘मला शहाणपणा शिकवतेस होय?’’ तसं नाही गं बाई. मी तुझ्याच ना खांद्यावर उभी होते.. आणि आहे. तू ‘तू’ होतीस, म्हणून मी ‘मी’ आहे. समजतंय का तुला?
आजकाल म्हणे एक द्रावण शिरेतून टोचतात. आपल्या शरीराच्या कानाकोपऱ्यात जातं ते. अडचणीच्या जागा नीट दाखवून देतं. तुझ्या मनाच्या कानाकोपऱ्यात जाणारं मी द्रावण होते. उगाच नाही मला तू बहिश्चर प्राण म्हणायचीस. पण एक विसरलीस, की तो माझा प्राण होता. जवळपणाचं बंधन नको असतं कुणालाच. पण याचा अर्थ तुला त्रास देणाऱ्या, सुखावणाऱ्या, रडवणाऱ्या जागा मी विसरले असं अजिबात नाही होत. इतरांचं सोड, पण तुझं तुला का नाही कळलं हे?
घरसंसाराची घट्ट चौकट तुझ्या मनात होती. दणकट आणि दाट सावली देणारा पुरुष तुला तुझ्या आयुष्यात हवा होता. त्याच्या अवतीभवती तू गुंजारव करत राहिली असतीस. त्याची स्वप्नं स्वत:ची मानली असतीस. स्वत:च्या स्वप्नांचा सुखेनव बळी दिला असतास. यालाच करंदीकर स्वप्नसती होणं म्हणतात ना? पण वास्तव तसं नव्हतं. तुझ्या बुद्धीला, स्वप्नांना, आतून धडका देणाऱ्या ऊर्जेला सामावून घेण्याची कुवत नव्हती तुझ्या साथीदारात. पण हा त्याचा दोष नव्हता. कुवत कमी असणं हा दोष नाही. नसलेल्या कुवतीचा आव आणणं हा मात्र दोष आहे. असा आव तुझ्या साथीदारानं कधीच आणला नाही. तुझ्याकडून खास पुरुषसुलभ अशा अपेक्षाही केल्या नाहीत. आणि तुला तुझा अवकाश मिळाला. मृत्यूची भयंकर दरी दिसली तेव्हा त्यालाही जिंकायची विजिगीषु वृत्ती तुझ्यात जागी झाली आणि किती सुंदर लिहिलंस तू!
तुला माहितेय का, की अजून मला झोप येत नसेल तर तुझं लिखाण मी वाचते. तुझी मराठी भाषा रवि वर्माच्या चित्रातल्या बाईसारखी आहे. घरंदाज आणि समृद्ध. छान दिसते डोळ्याला. पण मला ती माझी वाटत नाही. वाङ्मयीन अभिरुचीची माझी वाट तुझ्यातूनच निघाली खरी; पण आपला रस्ता रापित रापित निराळ्या दिशेला गेली. ओढ वास्तवातल्या प्रश्नांची लागली. आयुष्याला सामोरं जायचं ते पुस्तकांच्या माध्यमातून नाही, तर प्रत्यक्ष अनुभवांच्या माध्यमातून- आयुष्याला भिडून, असं वाटायला लागलं. मग वाचन व्हायला लागलं ते आंबेडकरांच्या ‘अनिहीलेशन ऑफ कास्ट’चं, राजवाडय़ांच्या ‘विवाहसंस्थेचा इतिहास’चं, एंगल्सच्या ‘ओरिजिन ऑफ फॅमिली’चं. नेमाडे खूप आवडायचे. सुव्र्याना भेटलेला मार्क्स मला भेटायचा. कवितेतल्या गर्दीत मी असायची. तुझ्यासारखं वाचन आणि प्रत्यक्ष आयुष्य मला वेगळं वेगळं ठेवायचं नव्हतं. ते एकमेकांत गुंतवायचं होतं. हे घडत असताना तू होतीस. पण आपल्यातले संवादाचे पूल हरवले. का हरवले? रमेशशी लग्न करण्याच्या बाबतीत ठाम असणं आपल्या संबंधांच्या एवढं का आड आलं? ते बाजूला करून आपण संवाद करूच शकत नव्हतो- असं का? तू काळाच्या पडद्याआड गेलेल्या माणसांमध्ये रमलीस, त्यांना समजून घेतलंस. मी जिवंत माणसांमध्ये रमले. जिवंत माणसांना समजून घेता घेता स्वत: घडत गेले. हे कळलं का तुला?
तू लेखिका होतीस. नावाजलेली. वाचकप्रिय. आदरणीय. तुझं अफाट वाचन, सौष्ठवपूर्ण लेखन याला भरभरून दाद मिळाली. या प्रतिक्रियांनी तुझं आत्मभान उजळलं. पण मला मात्र दुरावलीस. का?
या प्रश्नाच्या वळणावर मी स्वत:लाही तपासते. कितीतरी लेखकांच्या मुलांनी त्यांच्या वडलांवर लिहिलंय. वडलांना मिळालेली प्रसिद्धी, त्यांचं लेखक असणं किती सहज स्वीकारलं जातं, मिरवलं जातं! मी मात्र आईचं आई असणंच घट्ट पकडून ठेवलं का? आईचं व्यक्ती असणं मी दुय्यम समजले की काय, अशी शंका येते. हे प्रश्नचिन्ह मनाला कुरतडत राहतं.
हाच नाही तर खूप प्रश्न पडतात. आता तू तर अबोलाच धरलायस.. तर मग जिगसॉ पझल सोडवण्याशिवाय मी तरी काय करू? तू या जगाचा निरोप घेतलास आणि कितीतरी प्रश्न अनुत्तरित राहिले. कितीतरी जणांना तुझी पुस्तकं सही करून तू भेट दिलीस; पण मी मागितलं तेव्हा अल्बर्ट श्वैतझरचं तू लिहिलेलं चरित्र मला दिलं नाहीस. इतकंच नाही तर ‘बाजारातून विकत घे..’ असंही बोललीस. का एवढी कठोर झालीस? पुढे तुझ्याशी मत्री असलेल्या सरोजिनी वैद्यांना मी माझ्याकडे ‘टॉलस्टॉय- एक माणूस’ नाही असं सांगितलं. तेव्हा त्यांच्याकडची जास्तीची प्रत त्यांनी मला दिली. आता खरोखरच तुझी पुस्तकं विकत घेऊन विचक्षण वाचकांना भेट देते. सगळं कसं छान छान वरकरणी- पण आत एक कळ येतेच.
असेच अनेक प्रश्न. ज्या रमेशला तू आपल्या घरावर पडलेली काळी सावली म्हणायचीस ना, त्यानंसुद्धा पूर्ण कफल्लक अवस्थेतही ‘आईकडून पैसे आण..’ असं चुकूनही मला म्हटलं नाही. का नाही ओळखलंस जिवंत माणसांना?
आई, मला माहीत नाही, देव आहे की नाही. माझ्यात आणि भवतालात जे निर्मळ आहे, निखळ आहे, त्यात देवत्व आहे असं मी मानते. पण निदान या क्षणी स्वर्ग नामक काहीतरी असावं आणि तू तिथे मला भेटावंस असं मला खूप वाटतंय. कारण तुझ्याशी खूप खूप बोलणं शिल्लक राहिलंय. शब्द मनात धडका मारत राहतात; पण सीमा ओलांडत नाहीत.
२१ जानेवारी १९८२ या दिवसाने सलग काळाचे दोन तुकडे केलेत. दोन-तीन दिवस तू नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल झालीस. त्याआधी तू देवरूखला जाऊन आली होतीस. तुझ्या डायरीतल्या नोंदींवरून तुला तिथली ‘मातृमंदिर’ संस्था आवडली होती. तुझ्यासोबत आलेल्या अण्णांना तू परत पाठवलंस. आता सोबत नको म्हणून. का? सोबतीशिवायच्या प्रवासाचे वेध का लागले होते तुला? संध्याकाळच्या वेळेला एकटीच चालताना तुझं डोकं एका खांबावर आदळलं. तशीच परत आलीस. सोसायटीतल्या बदामाच्या झाडाखाली बसून गप्पा मारल्यास. दुसऱ्या दिवशी मात्र तापानं फणफणलीस. तुला नानावटीत नेण्यात आलं. तुझ्या शब्दांत सांगायचं तर ‘युवर बोट वॉज ऑबवियसली सिंकिंग.’ मला समजल्याबरोबर छोटय़ा अंशुमानला घेऊन संध्याकाळपर्यंत मुंबईत पोहोचले आणि तुझ्याकडे मी आले.
तू सुकून गेली होतीस. मी गेल्यावर क्षणभरच तुझ्या डोळ्यांत ओळख दिसली. नंतर मात्र सगळंच पुसून गेलं. डोक्याशीच दार होतं. तिथे तू सारखी बघे. कुणाची वाट पाहत होतीस? समोर असूनही आता तू हरवली होतीस.. तुझी हरवलेली नजर मला भेदत होती. नानावटीच्या जनरल वॉर्डात तुला ठेवलं होतं. भेटण्याची वेळ संपल्यावर सर्वाना जायला सांगितलं. आता तुझ्याजवळ कोणीच नव्हतं. मला तिथून बाहेर पडल्यावर प्रचंड रडू कोसळलं. छोटा अंशुमान कावराबावरा झाला होता. अण्णा आणि रमेश माझी समजूत घालत होते. पण अदृष्टाची सावली माझ्या मनावर स्पष्ट पडली होती.. हळूहळू त्या सावलीला नाक-डोळे आले. मन घाबरलं. तुझ्या वॉर्डसमोर अंधारात एका पाण्याच्या टाकीवर मी आणि विराज गोठल्यासारखे बसलो होतो. त्या जडशीळ अंधारातून मीनाक्षीताई आमच्या दिशेनं आल्या. आम्हाला जवळ घेऊन म्हणाल्या की, बाळांनो, तुमची आई गेली.
गोठलेलं वातावरण वितळायला लागलं. घरी पहाटेच पोहोचलो. तू घरी आलीस शेवटची. विराज पुरता विस्कटून गेला होता. फक्त अठरा वर्षांचा होता तो.. तुझी उणीव सहन करणं त्याला खरंच खूप कठीण होतं. त्याच्यामुळे मला अश्रू आवरावेत असं वाटलं. नंतर मात्र तो सावरला. इंजिनीअर झाला. उद्योजक झाला. खरंच- त्याच्या यशाची चढती कमान तू पाहायला हवी होतीस.
तू गेलीस आणि माझ्या आयुष्याचा एक तुकडा गळून पडला. लगेच नाही लक्षात आलं; पण तुझा अभाव झिरपत झिरपत गेला. मी आई झाले. आई ही भूमिका माझ्या अंगात भिनायला लागली तसतशी माझ्यात मुरलेली तू मला जाणवायला लागलीस.
मुलांची भाषिक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणं हा वारसा तुझाच. मी तुझा वारसा जसाच्या तसा नाही स्वीकारला. तू जसं माझं खूप पाठांतर करून घेतलंस तसं मी कधीच जाणीवपूर्वक मुलांचं करून घेतलं नाही. ‘अगा प्रणतवत्सला म्हणती ज्या जना पावला..’ असलं काही तोंडपाठ करून वाणी स्पष्ट होत असेलही; पण त्यानिमित्ताने मी पापी आणि तू तारणहार असं का रुजवायचं मुलांच्या डोक्यात? त्याऐवजी मी मुलांना खूप बालकविता वाचायला दिल्या. पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’च्या कॅसेट्स मुलं आवडीनं ऐकायची.
तुझ्यापेक्षा मी निराळी होते. मुलांनी अभिव्यक्तीचे मार्ग स्वत:चे स्वत: घडवावेत, त्यांचा त्यांना अवकाश द्यावा असं मला वाटायचं.
मुळात तुझ्या आईपणातले धागे जरी माझ्यात आले तरी माझ्या आईपणाचा पोत फारच वेगळा होता. कारण रमेशचा- माझ्या नवऱ्याचा- मुलांवर खूप प्रभाव होता. याउलट, आई आणि वडील या दोन्ही भूमिका आपणच पार पाडायच्या आहेत असा ताण तुझ्यावर होता. हा ताण मला सहन करावा लागला नाही. मुलांना माझा कधीच धाक वाटला नाही. रमेशचा मात्र वाटायचा. याचा नीट विचार करताना मला अचानक माझ्यातलीच गाठ लिहिता लिहिता उलगडली.
आपल्या घरातलं वडिलांचं स्थान दुबळं आहे ही आपली कमतरता आहे असं माझ्या मनावर ठसलं होतं. मग स्वाभाविकपणे मी अशा मुलाची निवड केली, जो ‘पुरुषी’ होता. त्याचा अरेरावीकडे झुकणारा आत्मविश्वास, एक घाव चार-पाच तुकडे करण्याची आक्रमकता याचं मला आकर्षण वाटलं. या सगळ्याच्या पलीकडचा तो मला माझ्या आयुष्यात माझा सहचर म्हणून, माझ्या मुलांचा बाप म्हणून असायला हवा असं मनापासून वाटलं आणि त्यासाठी काहीही किंमत मोजायची माझी तयारी होती. प्रेमळ आई, कडक पिता आणि मुलं असं सर्वसामान्य कुटुंब उभं करावं असं माझ्या नेणिवेत होतं. मी अगदी आईसारखी आई झाले. बायकोसारखी बायको होण्याचा प्रयत्न केला. पण इथेच मेख होती.
रमेशला तुम्ही जो विरोध केलात त्यातून आपल्या समाजातली जातीय विषमता मला ढळढळीत जाणवली. रमेशमुळे मला जे सुरक्षित घराबाहेरचं दर्शन घडलं आणि मी बदलले. समतेचा आग्रह माझ्यात स्वाभाविक बिंबला. ही समता स्त्री-पुरुष संबंधांतलीही होती. स्त्री म्हणून तुझ्यावर झालेल्या अन्यायाची मला तीव्र जाणीव होतीच. घटस्फोट न घेता विसंवादी लग्न तू नाखुशीनं निभावलंस. कारण तुला माहेरची इभ्रत सांभाळायची होती. ही इभ्रत जन्मते स्त्रीची लैंगिकता नियंत्रित करणाऱ्या व्यवस्थेतून.. हे तू कधीच लक्षात घेतलं नाहीस. पण मला हे जाणवलं. तुझी तडफड मला नेहमीच अस्वस्थ करायची. आता मात्र तुझ्या जातीय अस्मितेची चीड यायला लागली.. खरंच, तो काळ माझ्यासाठी आवेगी वादळाचा होता. पण तू म्हणालीस तसा वासनांच्या आवेगी वादळाचा नव्हता. ते वादळ मूल्यांचं होतं, जीवनदृष्टीचं होतं. या उत्पातातून मीच एका विसंगतीला जन्म दिला. वैचारिक निष्ठा पुरुषप्रधानतेच्या विरोधातली; पण भावनिक ओढ मात्र वर्चस्व गाजवणाऱ्या पुरुषाची. हे खरं आणि तेही खरं! माझं वैवाहिक आयुष्य म्हणजे याच संघर्षांचा वास्तव परिणाम होता.
तू काळाच्या पडद्याआड गेलीस खरी; पण स्वत:ला माझ्यात रुजवून गेलीस.