लोकेश शेवडे – lokeshshevade@gmail.com
सध्या शहामृगाची पिसे पांघरणाऱ्या बगळ्यांचे दिवस आले आहेत. गाता न येणारे गायक झाले आहेत. विवेकशून्य व्यक्ती विचारवंताचा आव आणून समाजाला ज्ञानामृत पाजत आहेत. समाजमाध्यमंरूपी नवतंत्रज्ञानाने जशा अनेक चांगल्या गोष्टी जन्माला घातल्या, तशाच अनेक अनिष्ट गोष्टींनाही जन्म दिला. आणि समाजात अशा लोकांचीच बहुसंख्या असल्याने हा गलबला दिवसेंदिवस वाढतोच आहे.
मध्यंतरी मला अचानक एका मित्राचा फोन आला. तो म्हणाला, ‘‘काय रे, किती मेसेजेस पाठवले तुला..? तुझं काही उत्तरच नाही!’’ ‘‘व्हॉट्सअॅपवर मेसेजेसचा प्रचंड भडिमार असतो, त्यामुळे राहून गेलं,’’ असं स्पष्टीकरण देऊन मी विचारलं, ‘‘काही खास काम होतं का?’’ ‘‘हो. अरे, मी काही ऑडियो क्लिप्स पाठवल्या आहेत मुद्दाम तुझ्यासाठी.. त्यावर तुझा अभिप्राय हवा होता. मी गायलेली गाणी आहेत तीन. तू गाण्यातला दर्दी आहेस म्हणून मुद्दाम पाठवली तुला.. तुझ्या ‘एक्स्पर्ट्स कॉमेंट्स’ जाणून घ्यायची इच्छा आहे. फार काही वेळ लागणार नाही. चार- चार मिनिटांच्या तीन क्लिप्स आहेत..’’ त्यानं खुलासा केला. त्यानं गाणी गायली आहेत हे ऐकून मी आश्चर्यानं विचारलं, ‘‘तू गायलेली गाणी? तू केव्हापासून गायला लागलास? कोणाकडे शिकतोयस?’’ ‘‘शिकतबिकत नाही रे, जुनी हिंदी पिक्चर्समधली गाणी आहेत.. कराओकेवर गायलोय मी.’’ ‘कराओके’चा अर्थ मला अंधूकसा कळला असला तरी त्या मित्राच्या गाण्याच्या ऑडियो क्लिप्स आहेत हे ऐकून मी थक्क झालो. हा माझा शाळेपासूनचा मित्र. आयुष्यभर त्याचा सूर आणि तालाशी कधी संबंध आला नव्हता. पण दारूची मैफल सुरू झाली की याला हमखास गाणं सुचत असे. त्याचं गाणं, ताल इतकं भयानक असे की त्या गाण्याला आम्ही ‘बेसूर’ म्हणण्याऐवजी ‘भेसूर’ म्हणत असू. असा हा आयुष्यभर सुरांवर ‘सुरा’ चालवून संगीताची हत्या करणारा माझा मित्र आता आयुष्याच्या उत्तरार्धात ‘क्लिप्स’ बनवण्याइतपत गायला लागला ही बातमी चकित करणारी होती. मी त्याला ‘ऐकून कळवतो,’ असं सांगून उत्सुकतेनं लगोलग व्हॉट्सअॅप स्क्रोल करून त्यानं पाठवलेल्या क्लिप्स ऐकल्या. रफी, मन्ना डे आणि सुधीर फडके अशा दिग्गजांची गाणी त्या क्लिप्समध्ये होती. आमच्या या मित्रानं ही गाणी गाऊन त्यांच्या क्लिप्स बनवल्या तेव्हा हे तीनही गायक हयात नव्हते हे त्या गायकांचं नशीब! कारण या मित्राच्या गाण्यात इतक्या वर्षांत काहीही फरक पडला नव्हता.. ते पूर्वीइतकंच भेसूर होतं.
क्लिप्स ऐकताना एका गोष्टीनं मात्र मी अचंबित झालो. माझा हा मित्र जरी कसाही गात असला तरी त्याच्या गाण्याबरोबर जो वाद्यवृंद वाजत होता तो मात्र सही सही मूळ गाण्याबरहुकूम होता. माझ्या मित्राचा आवाज जर बंद करता आला असता तर एखाद्या श्रोत्यास ते वाद्यसंगीत मूळ गाण्यातलंच आहे की काय असं वाटलं असतं. मी कुतूहलानं माझ्या मित्राला फोन लावला आणि त्याला त्या वाद्यवृंदाबद्दल विचारलं. तेव्हा तो म्हणाला, ‘‘अरे, तुला माहीत नाही? आता मोबाइलवर नवीन अॅप आलं आहे.. ‘कराओके.’ फ्री आहे. तुला हवं ते गाणं निवडायचं आणि सुरू करायचं. संपूर्ण गाण्याचं ऑर्केस्ट्रेशन वाजतं.. एकदम ओरिजिनल गाण्यात जे ऑर्केस्ट्रेशन असतं तस्संच ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत चालू राहतं. आपल्याला काहीच करायला लागत नाही. आपण फक्त गायचं! पण ते महत्त्वाचं नाही.. माझं गाणं कसं वाटलं, ते सांग ना!’’ यावर काय उत्तर द्यावं याचा मी विचार करायला लागलो, तेवढय़ात ‘‘अरे, आपल्या सगळ्या जुन्या मित्रांना पाठवल्या या क्लिप्स!! ते तर इतके बेहद्द खूश झालेत, काय सांगू!! तुला साल्या, कौतुकच करता येत नाही दुसऱ्याचं..’’ तो म्हणाला आणि पुढे त्याच्या या क्लिप्स जुन्या मित्रवर्गात कशा लोकप्रिय झाल्या आहेत, मी एकटाच कसा त्याचं कौतुक करत नाही.. मी स्वत:ला कसा शहाणा समजतो याचं त्यानं पाल्हाळ सुरू केलं. त्याच्या बोलण्यातनं असंही कळलं की, त्याच्या अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये शेकडो मित्र-मैत्रिणींनी अशा स्वत:च्या गाण्याच्या क्लिप्स बनवून ‘व्हायरल’ केल्या आहेत. वानगीदाखल त्यातल्या काही क्लिप्स त्यावरच्या कॉमेंट्ससकट त्यानं माझ्याकडे पाठवल्या. त्या ऐकून तर मी हतबुद्धच झालो. माझा मित्र त्यांच्यातला सर्वोत्कृष्ट गायक म्हणावा असे बाकीचे होते! त्यातल्या बहुतांशाना मी ओळखत होतो. त्यांच्या गाण्यांवरच्या व्हॉट्सअॅपवरच्या कॉमेंट्समध्ये ते सर्व गाणारे परस्परांना दाद देत होते आणि त्यांचा तमाम मित्रवर्गही त्याला दुजोरा देत होता. त्यातले सर्व गायक ते स्वत: उत्कृष्ट गातात असं समजूनच कॉमेंट्सना उत्तरं देत होते. एकंदरीत सर्व भेसूरांना आत्मविश्वास होता की, आपल्याला गाता येतं. आणि न गाणाऱ्या मित्रवर्गाला दृढविश्वास होता की, ‘आपल्याला संगीतातलं कळतं..’!
काही वर्षांपूर्वी मी या ‘कराओके’बद्दल ऐकलं होतं. त्यावेळी ही सोय असलेलं एक बरंच महाग उपकरण बाजारात आलं होतं आणि त्या उपकरणावर वाजवण्याच्या मुद्रिकाही बाजारात मिळत. त्या मुद्रिकांवर हव्या त्या गाण्यांचं वाद्यसंगीत वाजत असे आणि माइक हाती घेऊन कोणालाही त्या वाद्यसंगीतावर ते गाणं म्हणता येई. हे मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं, त्याकाळी सामान्य आर्थिक कुवत असणाऱ्या गायक-गायिकांना वाद्यवृंदाबरोबर तालीम करणं, रियाझ व अभ्यास करणं परवडत नसे. परिणामत: वाद्यवृंदाला मानधन देणं ज्याला परवडेल तोच वाद्यवृंदाबरोबर गाण्याच्या तालमी व रियाझ करू शके, गाण्याचे कार्यक्रम करू शके अशी परिस्थिती होती. सिनेमातली गाणी खासगी किंवा जाहीर कार्यक्रमांत म्हणणं किंवा त्यासाठी तालमी करणं हे फार खर्चीक प्रकरण होतं. उदयोन्मुख, गरीब होतकरू गायकांना ते परवडणं अशक्य होतं. आता या ‘कराओके’ उपकरणामुळे निदान तालमी, अभ्यास, कार्यक्रम यांचे खर्च निम्म्याहून कमी झाले आहेत. यामुळे फारशी चांगली आर्थिक स्थिती नसणाऱ्या उदयोन्मुख, होतकरू गायकांनादेखील मोठा वाव मिळेल, फायदा मिळेल.. परिणामी संगीताचा प्रसार होईल असं मला तेव्हा वाटलं होतं आणि आनंदही झाला होता. तेव्हा मला असंही वाटलं होतं की, हे ‘कराओके’ उपकरण अध्र्या किमतीत उपलब्ध झालं तर आणखी गरीब आणि जास्त गायकांना त्याचा फायदा होईल. गरीब गायकदेखील कमी पैशात तालमी-रियाझ करून आपली कला जोपासू शकेल आणि साहजिकच संगीताचा आणखी प्रसार होऊन कलावंत-रसिक श्रोते यांच्या संख्येत वाढ होईल. आता हे अर्धी किंमत सोडाच; पूर्णत: फुकट, कोणाच्याही मोबाइलवर ‘फ्री डाऊनलोड’ होणारं ‘कराओके अॅप’ आलंय. याचा अर्थ गरीबातला गरीब गायकदेखील आता त्याला वाट्टेल तेवढा रियाझ, हव्या तेवढय़ा तालमी फुकटात करू शकेल, छोटे-मोठे खासगी, घरगुती कार्यक्रम मिळवू शकेल, चरितार्थ चालवू शकेल आणि त्याची कला जोपासू शकेल आणि एकंदरीत संगीत क्षेत्र विस्तारेल, फोफावेल वगैरे वगैरे.. असा निष्कर्ष माझ्या अगोदरच्या तर्कानुसार निघतो.
तथापि, माझ्या मित्राच्या आणि त्याच्या अन्य मित्र-मैत्रिणींच्या ऑडियो क्लिप्सने मला जबरदस्त धक्का बसला आणि अगोदरच्या माझ्या तर्काच्या ठिकऱ्या उडाल्या. मोबाइलवर फुकट डाऊनलोड होणाऱ्या त्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानानं ‘कलावंतां’च्या अभ्यासाला, रियाझाला आणि कार्यक्रमांना वाव मिळेल, अभ्यासक- कलावंत- रसिक- संगीत क्षेत्र वृद्धिंगत होईल, इथपर्यंतच माझी बुद्धी पोहोचली होती. पण ज्यांचा गायनाशी, सुरांशी, संगीताशी, रियाझाशी किंवा अभ्यासाशी दूरान्वयेही संबंध नाही; किंबहुना जे मूळ अभ्यास- रियाझ- कला या साऱ्या प्रकारांचे शत्रू आहेत, जे संख्येनं अभ्यासक व कलावंत यांच्या दसपट आहेत, त्या ‘असुरां’च्याही हाती हे ‘अॅप’ येईल आणि त्यातून ते ‘भेसूर’ता फैलावतील आणि त्यांच्या समसुखी असुरांकडून वाहवाही मिळवतील हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. ज्ञानार्जनासाठी साधनांची नितांत आवश्यकता असते. ज्ञानार्जनाची जेवढी मुबलक आणि स्वस्त साधनं उपलब्ध होतील तेवढय़ा जास्त ज्ञानोपासकांना ज्ञान प्राप्त होईल, हे माझं सोपं गणित केवळ अर्धसत्य होतं. साधनं ‘मुबलक होणं, सुलभतेनं ती प्राप्य होणं’ याचा अर्थ ती साधनं बहुसंख्य असलेल्या ‘असुरां’नाही प्राप्य होणं, हे उरलेलं अर्धसत्य माझ्या मित्रानं पाठवलेल्या या क्लिपमुळे मला उलगडलं.
एकेकाळी आपले विचार लोकांसमोर मांडणं अत्यंत दुर्लभ होतं. विशेषत: लेखकांसाठी, विचारवंतांसाठी आपले विचार प्रसिद्ध करण्यासाठी अत्यंत तोकडी साधनं उपलब्ध होती. भाषणं, पुस्तकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं किंवा पत्रकं अशी काही तुटपुंजी साधनच तेव्हा होती. त्यात अशा व्यासपीठांची उपलब्धी अत्यल्प असे. नियतकालिकांमध्ये जागा मर्यादित असे. त्यातील लेखांच्या शब्दसंख्येवर बंधने असत. (खूप लहान किंवा खूप मोठा लेख प्रसिद्ध केला जात नसे.) शिवाय त्यांवर संपादकांची चाळणी लागे. अशा कारणांमुळे अनेक लेखक व विचारवंत आपले विचार प्रसिद्ध करण्यासाठी बराच काळ खोळंबून राहत. कित्येक विचारवंत आपले विचार मांडण्यापासून कायमचे वंचितही राहत. साहजिकच चोखंदळ आणि प्रगल्भ वाचकही चांगले विचार, माहिती व ज्ञानापासून वंचित राहत. एकंदरीत वैचारिक देवाणघेवाण, माहिती व ज्ञानाचे आदानप्रदान, ज्ञानार्जन या बाबी एकेकाळी सामान्यांना उपलब्धच नव्हत्या. एका विशिष्ट मर्यादित वर्गाची लेखन, वाचन, माहिती व ज्ञान यांवर मक्तेदारी होती. नवीन सहस्रकाच्या पहिल्या दशकात आंतरजाल व संगणकामुळे माहिती व ज्ञान बहुतांश लोकांपर्यंत पोहोचलं. पुढील दशकात मोबाइलवरही आंतरजाल उपलब्ध झालं. आणि मोबाइल व आंतरजाल या दोन्हींची किंमत गरीबातल्या गरीबालाही परवडू शकेल या पातळीवर आली. एकंदरीत माहिती, ज्ञान व विचार यांचं आदानप्रदान होऊन ज्ञान आणि विचारांच्या कक्षा वाढल्या. मोबाइल, आंतरजाल व संगणक ही नि:संशय ज्ञानार्जनाची साधनं आहेत आणि पर्यायाने प्रगती व विकासाचीदेखील ती साधनं आहेत. आता विचारवंतांना आपले विचार मांडण्यासाठी पुस्तकं, नियतकालिकं यांच्या प्रकाशकांकडे, संपादकांकडे हात पसरण्याची गरज राहिली नाही. ज्याच्याकडे विचार, माहिती व ज्ञान असेल तो कोणीही व्हॉट्सअॅप, ब्लॉग, फेसबुक अशा अनेकविध माध्यमांचा वापर करून ते वाचकांपर्यंत पोहोचवू शकतो. तद्वतच ज्याला माहिती, ज्ञान मिळवायचं असेल असा अभ्यासू त्या माहिती-ज्ञान असलेल्या संकेतस्थळांवर जाऊन ती माहिती व ज्ञान प्राप्त करू शकतो. व्हॉट्सअॅप हे अशाच प्रकारचं ‘फ्री डाऊनलोड’ साधन होतं. २००९ मध्ये हे ‘अॅप’ सुरू झालं आणि पुढच्या वर्ष- दोन वर्षांत बहरात येऊन सर्वाधिक लोकप्रिय झालं. याच काळात फेसबुक, ब्लॉग आणि अन्य अनेक ‘फ्री डाऊनलोड’ आंतरजाल स्थळं व माध्यमंदेखील तुफान लोकप्रिय झाली आहेत.
अर्थातच जगात कमअस्सल, ज्ञानद्वेष्टे ‘असुर’ नेहमीच बहुसंख्य होते आणि पुढेही बहुसंख्यच असणार आहेत. परिणामत: ‘कराओके’ हे ‘फ्री डाऊनलोड’ झाल्यावर संगीताच्या बाबतीत जे घडलं, तेच या अन्य बाबतीतही अधिक वेगानं घडत गेलं. (यापुढे आणखी प्रचंड पट वेगानं हे घडेल.) कारण आंतरजाल-मोबाइल या दोन्हींत संपर्काचा वेग अतिजलद आहे. आता कोणालाही विचारवंत, लेखक म्हणवून घेण्यासाठी कुणा संपादकाची किंवा प्रकाशकाची गरज नाही. शब्दमर्यादा किंवा विषयाचं बंधन नाही. आणि अर्थातच.. सत्यकथनाचीही अजिबात गरज नाही. माझ्या मित्रानं जसं अत्यंत बेसूर, बेताल गाणं म्हणून त्याच्या गाण्याला ‘हुबेहूब मूळ गाण्याबरहुकूम’ वाद्यसंगीताची झूल पांघरली आणि ते शेकडो मित्रांना फॉरवर्ड केलं, अगदी तस्संच भ्रष्ट आणि असत्य कथनाला अस्सल ‘ज्ञान’ भासेल अशी झूल पांघरून एका वाक्यापासून लाखो शब्द लाखो लोकांना फॉरवर्ड करता येतात आणि स्वत:ला ‘संगीताचे जाणकार’ मानणाऱ्या माझ्या मित्राच्या श्रोत्यांनी या भेसूर मित्राला ‘वाहवा’ दिली, तश्शीच ‘वाहवा’ स्वत:ला ज्ञानी समजणारे कमअस्सल व हिणकस वाचक त्यांच्यासारख्याच ‘कमअस्सल व हिणकस’ लेखकाला दाद देतात. याखेरीज गेली अनेक र्वष एखादी गोष्ट सत्य, कसदार व अस्सल ठरवण्यासाठी ‘बहुमत’ हाच एकमेव निकष मानला जातो आहे. याचं कारण निकष ठरवणाऱ्यांमध्येदेखील कमअस्सल, हिणकस व ज्ञानद्वेष्टय़ांचीच बहुसंख्या असते. वेगळ्या शब्दांत मांडायचं तर- बहुसंख्येला जे आवडतं तेच योग्य, असा समज बहुसंख्याकांचा झालेला आहे. याचा अर्थ आंतरजाल, संगणक व मोबाइल हे तंत्रज्ञान सर्वदूर पसरून तमाम जनतेला उपलब्ध झाल्यामुळे बहुसंख्याक सुमार, हिणकस व ज्ञानद्वेष्टय़ांचीच चलती सुरू होऊन अस्सल, कसदार, सत्य मागे पडत चाललं आहे. अर्थात आंतरजाल, मोबाइल आणि त्यावरील व्हॉट्सअॅप, फेसबुक, ब्लॉग्ज आणि तत्सम अॅप्स व माध्यमं गेल्या दशकभरात फोफावली आहेत. त्यांचा वापर ज्ञानार्जनासाठी, सत्यशोधनासाठी, वैचारिक आदानप्रदानासाठी नि:संशय झाला असणार. कारण त्यासाठी त्याचा वापर करणारे तसा वापर करू शकतातच. त्यांना कोणी थांबवलेलं नाही. मात्र, त्याचा सर्वाधिक प्रभाव हा जगभरातील बहुसंख्याकांवर- आणि पर्यायाने जगभरच्या राजकारणावर पडलेला दिसतो. कारण राजकारणाचा पाया बहुसंख्या व बहुमत हाच असतो. बहुसंख्य लोकांच्या, किंबहुना प्रत्येकाच्या हाती आलेल्या आंतरजाल व मोबाइलमुळे असत्य आणि हिणकसतेचा तसंच कमअस्सलतेचा फैलाव गेल्या दशकात जेवढय़ा वेगानं झाला तेवढा यापूर्वी कधीही झाला नसावा. हिणकस व ज्ञानद्वेष्टे हे पूर्वीदेखील बहुसंख्यच होते. त्यांच्याच बहुसंख्येच्या जोरावर हिटलर, मुसोलिनी आणि तत्सम नेते राष्ट्रप्रमुख म्हणून निवडून आले. त्याकाळीदेखील त्यांच्याविरुद्ध विचारवंत व ज्ञानी अल्पसंख्यच होते. मात्र, त्याकाळी विचारवंतांचा विरोध नेत्यांकडून चिरडला गेला होता. आजच्यासारखा तो बहुसंख्याकांकडून चिरडला गेला नाही. कारण लेखन, प्रकाशन व वाचन यासाठीची साधनं तेव्हा मुबलक नव्हती. परिणामी वैचारिक, सत्य, कसदार व अस्सल लेखन जसं कमी प्रकाशित होत असे, तसंच असत्य, हिणकस लेखन व वाचनदेखील कमीच होई. आता आंतरजाल व मोबाइलवर व्हॉट्सअॅप, फेसबुकसारखी अत्यंत वेगवान प्रसार साधनं मुबलक झाल्यामुळे ती बहुसंख्याक असलेल्या असत्याच्या आणि हिणकसतेच्या हाती आली आहेत. याचा परिणाम म्हणून जगभरात कुठेही आता नेतृत्व प्राप्त करण्यासाठी अस्सलता, कसदारपणा किंवा सत्याचा अंश असण्याची आवश्यकताच राहिली नाही. कराओके, फोटो मॉर्फिगसारखे असत्यावर सत्याची झूल ‘बेमालूम’पणे पांघरण्याचे ‘अॅप्स’ जेव्हापासून ‘फ्री डाऊनलोड’ झाले तेव्हापासून बहुसंख्याकांना सत्य, ज्ञान आणि अस्सलतेला चिरडणं अगदी सोपं झालं आहे. गेल्या दशकातल्या जगभरातल्या निवडणुकांचे प्रचार आणि निवडून आलेले राष्ट्रप्रमुख पाहिले तर आंतरजाल, मोबाइल आणि त्यावरील व्हॉट्सअॅप, ब्लॉग, फोटो मॉर्फसारखे अनेकविध अॅप्स वापरून सत्य, ज्ञान व अस्सलता यांना चिरडणाऱ्या बहुसंख्याकांचं प्रतिनिधित्व करणारे, त्यासाठी ‘लायक’ ठरलेले ज्ञानद्वेष्टे व हिणकस नेतेच जगभरातल्या बहुतांश देशांमध्ये प्रमुखपदी पोहोचलेले दिसतात. सत्य, ज्ञान व अस्सलता चिरडण्यासाठी या राष्ट्रप्रमुखांना फार कष्ट उपसावे लागत नाहीत. हिणकसतेवर अस्सलतेची, असत्यावर सत्याची झूल चढवणारी आंतरजाल, मोबाइल, व्हॉट्सअप, फेसबुक, मॉर्फिग वगैरे कराओकेसदृश साधनं हाती आलेले स्वत:ला ‘ज्ञानी व जाणकार’ मानणारे बहुसंख्याक ते काम परस्पर करून टाकतात.
मानवाच्या प्रगतीसाठी, सत्य, कला व ज्ञान मिळवण्यासाठी साधनांची मुबलकता अनिवार्य असते खरी; परंतु ती साधनं मुबलक झाल्यास असत्य, कमअस्सलता आणि हिणकसपणा फोफावतो आणि त्यात ज्ञान व सत्य चिरडलं जातं.. असं हे दुष्टचक्र आहे! ज्ञानार्जनाच्या साधनांचा दुष्काळ असलेल्या काळात ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही। मानियलें नाही, बहुमता।’ असं म्हणणाऱ्या संत तुकारामांना लोकांनी ‘युगपुरुष’ मानलं होतं. आज साधनांचा सुकाळ असताना असं एखाद्यानं म्हटलं तर त्याला ‘खलपुरुष’ मानलं जाईल.. कारण आता फ्री अॅप आणि बहुमत हेच निर्विवाद सत्य ठरतंय!!