प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेंपे (Jean Jacques Sempe. जन्म : १९३२) हे  केवळ फ्रेंचच नव्हे, तर जगभरातील हास्यचित्र कलेतील एक महान कलावंत आहेत.. अगदी नि:संशयपणे! त्यांच्या चित्रांची अनेक पुस्तकं निघाली आहेत. त्यांची नावंही मजेदार आहेत. उदाहरणार्थ, एका पुस्तकाचं नाव आहे ‘नथिंग इज सिंपल’, तर दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे ‘एव्हरीथिंग इज कॉम्प्लिकेटेड.’ तर या पुस्तकांतून त्यांची शेकडो हास्यचित्रं पाहायला मिळतात. ती शांतपणे, सावकाशीने, चवीचवीने ( फ्रेंच वाइनप्रमाणे घुटके घेत) पाहत राहावीत अशी आहेत. त्यांत ुमर तर आहेच, पण तो खदाखदा हसवणारा नाहीये आणि फार गंभीरही नाहीये. पण तो आहे, हे नक्की. आणि तो ुमर  खास सेंपे यांचा आहे.

वास्तविक सेंपे यांचं बालपण फार विचित्रपणे पार पडलं. कारण त्यांची कोणतीच गोष्ट धड होत नव्हती. त्यांना शाळेतून काढून टाकलं होतं. पोस्ट ऑफिस, बँक यांच्या प्राथमिक परीक्षासुद्धा ते पास होत नव्हते. घरोघरी सायकलवरून जाऊन वाइनवाटप करण्याचं कामसुद्धा त्यांनी केलं. (आपल्या इथे भारतात मुलं सायकलीवरून दूधवाटप करतात आणि तिकडे फ्रान्समध्ये वाइनवाटप करतात, इतका फरक दोन्हींत असणारच!) शेवटी वयाबाबत खोटी माहिती सांगून त्यांनी सैन्यात कसाबसा प्रवेश मिळवला. ते म्हणतात, त्यामुळे एक फार बरं झालं की माझी जेवणाची आणि झोपायची चिंता मिटली! पण तिथेसुद्धा डय़ुटीवर असताना रेखाटनं केल्याबद्दल त्यांनी शिव्या खाल्ल्याच!

अखेरीस त्यांचं (खरं तर फ्रेंच संस्कृतीचं) नशीब उघडलं असं म्हणावं लागेल. कारण पुढे ते अनेक प्रकाशन संस्थांसाठी चित्रं काढू लागले. लहान मुलांच्या पुस्तकांसाठी सेंपे यांनी केलेली रेखाटनं खूप गाजू लागली आणि त्याचबरोबर त्यांना स्वत:ची रेषाही सापडली.

खूप लांबून किंवा उंचावरून एखादं दृश्य पाहावं तशी त्यांची बरीच चित्रं असतात. जणू  १९६० साली ते ड्रोन वापरून ही चित्रं काढत असावेत असं वाटतं. त्यांची चित्रं पाहणं हा एक  प्रसन्न करणारा नितांतसुंदर अनुभव असतो, एवढं मात्र नक्की.

सेंपे यांच्या हास्यचित्रांची धाटणी ही एखादी गोष्ट सांगावी याप्रकारची आहे. त्यांची एकाच फ्रेममध्ये किंवा कॉलममध्ये संपणारी हास्यचित्रं ही तुलनेनं खूप कमी आहेत. आणि जी आहेत ती बहुतेक ‘न्यू यॉर्कर’ या जगविख्यात साप्ताहिकाची मुखपृष्ठं आहेत. एरवी त्यांची बहुतेक चित्रं ही बारा-पंधरा चित्रांच्या फ्रेम्सने बनलेली आहेत. जणू एखादा सिनेमाच!  म्हणजेच गोष्ट खुलवत नेणारी, गप्पा मारणारी त्यांची शैली आहे. आजूबाजूचं वर्णन करणारी भाषा असावी तशी त्यांची रेषा आहे. ‘एकदा काय झालं..’ या पद्धतीनं त्यांची गोष्ट सांगण्याची रीत आहे. साधारण पहिल्या चित्रात वातावरण, पात्रं, प्रसंग वाचकाला कळतो. नंतर प्रत्येक फ्रेममध्ये गोष्ट हळूहळू उत्कंठावर्धक होत जाते आणि शेवटी अनपेक्षित, पण हसवणारा, किंचित धक्का देणारा शेवट! शब्दांचा वापर जवळपास नाहीच. त्यामुळेच किरकोळ भाषांतर करून त्यांच्या फ्रेंच व्यंगचित्रांचा आस्वाद जगभरातले रसिक घेत असतात.

सेंपे हे अस्सल फ्रेंच आहेत. त्यांच्या चित्रांमध्ये फ्रान्सच्या शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही पाश्र्वभूमी असतात. टुमदार कौलारू प्रशस्त घरं, भरपूर झाडी, आखीवरेखीव रस्ते, आजूबाजूला बागबगीचा, घरांचं सुंदर बारूप, मोठय़ा खिडक्या, पडदे, व्हरांडा, कारंजं, विविध जातींचे कुत्रे, डिझाइनवालं कुंपण इत्यादी सौंदर्यवर्धक तपशील असल्यामुळे त्यांची चित्रं प्रेक्षणीय बनतात. त्याचवेळी शहराचं वर्णन करताना ते अवाढव्य मोठे रस्ते, प्रचंड ट्रॅफिक, माणसांची धावणारी गर्दी, उंचच उंच इमारती, सिग्नल, मोर्चे, सिनेमागृह, ऑफिसमध्ये चाललेली धावपळ  वगैरेंचं चित्रण करतात.

त्यांच्या चित्रांतील माणसंसुद्धा टिपिकल फ्रेंच आहेत. म्हणजे सडपातळ तरुण मुलं जॉगिंग करणारी, प्रिय व्यक्तीबरोबर फिरणारी, नाचणारी, वाइन पिणारी आहेत, तर प्रौढ वयातील स्त्री-पुरुष थोडे जाडे आहेत. त्यांची चित्रकला अप्रतिम आहे. परिणाम साधणारी आहे. मोजक्याच, नाजूक, पण प्रमाणबद्ध रेखाटनांनी ते वातावरण उभं करतात. आकृती पूर्ण केली पाहिजे असा त्यांचा अट्टहास नसतो. रेषा अर्धवट सोडण्याचं धाडस ते सहज करतात.

सेंपे हे कदाचित मानसशास्त्रज्ञ असावेत. अर्थात त्यासाठी त्याची काही पदवी असण्याची गरज नाही. पण त्यांच्या चित्रांतील पात्रांच्या डोक्यात ज्या कल्पना येतात त्यावरून मानवी मनाचा त्यांचा अभ्यास उत्तम असावा असं वाटतं.

शहरी जीवनावरची त्यांची काही चित्रं अत्यंत परिणामकारक आहेत. शहरातील लोक हळूहळू कसे आत्मकेंद्रित होत आहेत हे दाखवणारं त्यांचं एक व्यंगचित्र आहे. त्यात त्यांनी उंच उंच ठोकळ्यासारख्या इमारती दाखवल्या आहेत. प्रत्येक इमारतीच्या प्रत्येक चौकोनी खिडकीत आतमध्ये लोक टीव्ही बघत आहेत आणि या सर्व टीव्हींवरती एकच दृश्य आहे.. ते म्हणजे रात्रीच्या काळ्या आकाशात दिसणारा पौर्णिमेचा भला मोठा चंद्र! आणि या सर्व ठोकळेबाज उंचच उंच इमारतींच्या वर काळ्या आकाशात खरोखरच एक भलामोठा पौर्णिमेचा चंद्र तरंगताना दाखवला आहे. मात्र, रसिकांच्या प्रतीक्षेत असलेला हा चंद्र तिथे किंचित उदासपणे तरंगतोय असं वाटत राहतं. (यालाच कदाचित ‘लाइव्ह टेलिकास्ट’ म्हणत असावेत!!)

सेंपे यांची स्त्री-पुरुष या विषयावर असंख्य चित्रं आहेत. आदिम काळापासून स्त्री आणि पुरुष यांचे स्वभाव हे एकमेकांना न कळणारे  आहेत. याचं प्रतिबिंब त्यांच्या हास्यचित्रांतून  दिसतं. कधी ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात, तर कधी एकमेकांसमोर जीवघेण्या शत्रूच्या भूमिकेत असतात. कधी तुटक कोरडेपणा, तर कधी विलक्षण आसक्ती! कधी नि:संदिग्धपणे झोकून देणारं प्रेम, तर कधी न फिटणारा संशय! या विलक्षण नात्यावरची त्यांची अनेक चित्रं आहेत. ही चित्रं पुढे पुढे एकामागून दुसऱ्या फ्रेममध्ये जात गोष्ट सांगत राहतात.. आणि शेवट अर्थातच अनपेक्षित!

सोबतच्या चित्रात प्रेयसीला पाहून चक्राकार जिन्यातून धावत येणारा प्रियकर आणि त्यांचं ते अनपेक्षित नृत्य हा एक चकित करणारा अनुभव आहे. तर दुसऱ्या चित्रात नाइलाजाने एकमेकांच्या सोबत राहणारं, पण आतून एकमेकांचा पराकोटीचा तिरस्कार करणारं जोडपं त्यांनी रेखाटलं आहे. या जोडप्यांच्या मनातील विचार रेखाटून सेंपे हे धक्कादायक विनोदनिर्मिती तर  करतातच, पण माणसाच्या मनातील हिंसेलाही ते चित्ररूप देतात.

त्यांचं सोबतचं ‘सायलेन्स’ हे चित्र खूप वेळ पाहावं असं आहे. बारीकसारीक तपशीलही ते ओझरत्या रेखाटनानं दाखवतात. या चित्रात कदाचित जखमी वाचकाला ओरडायलाही तिथे बंदी असावी असा भास होतो. दुर्दैव! दुसरं काय!!

निखळ फ्रेंच वातावरण दाखवणारा ‘लिटिल बिट ऑफ फ्रान्स’ हा त्यांचा फक्त रेखाटनांचा संग्रहही प्रेक्षणीय आहे.

पॅरिसच्या ज्या रस्त्यावरून किशोरवयीन सेंपे हे सायकलवरून फिरून कष्टाची कामं करीत, त्याच हमरस्त्यावर आता सेंपे यांची अनेक हास्यचित्रं मोठय़ा आकारात लावून त्यांचा सन्मान केला जातोय. खरं तर हा फ्रेंच रसिकतेचाच सन्मान आहे!

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jean jacques sempe french cartoonist hasya ani bhashya dd70