मित्रा, प्रवासात खिडकीबाहेर बघण्याचा अभ्यास तुला-मला आवडत असला तरी मोठ्या लोकांना आवडत नाही. खिडकी म्हणजे त्यांना फक्त हवा खायची वस्तू वाटते. प्रवासभर आजूबाजूला वेगानं जाणाऱ्या गाड्यांची एकच झलक पाहून तू त्या गाडीची कंपनी, लोगो, नाव ओळखू शकतोस. नव्या आलेल्या गाड्या तुला नावासकट कळतात. त्यातील डिझाईन बदलदेखील! एखाद्या गाडीची हेडलाइट, टेललाइट, अलॉय व्हील तर तुझी तोंडपाठ झाली असेल. पण अमुक देशात त्या दिवशी फिरताना त्या ठिकाणी मला जाणवलं की, सर्व अभ्यासताना गाडीच्या ‘टायर’ या सर्वांत महत्त्वाच्या भागाकडे आजवर एकदम दुर्लक्ष करत आलोय. म्हणजे साफच ऑप्शनला टाकलेलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर चित्रास कारण की, त्या देशातल्या प्रवासात ४६०च्या वेगानं थापा मारत असताना फाटफुसऽऽऽ करून माझ्या गाडीचा टायर फुटला. बाकीचे टायरही टकलू झाल्यानं पहिल्यांदाच नवे टायर घ्यावे लागणार होते. दुकानात सुरुवातीलाच रबरी वासानं माझं जंगी स्वागत केलं. छोटे वाटणारे टायर इतके वजनदार, मोठे आणि महाग असतात हे त्या दिवशी एकत्रच कळलं. माझ्या गाडीसाठी सात प्रकारचे नक्षी असणारे टायर होते. त्यावरल्या नक्षीसारखा एकही शर्ट किंवा पँट माझ्याकडे नसल्यानं कुठल्या नक्षीचा टायर निवडावा हा प्रश्न मला पडला.

हेही वाचा : विळखा काजळमायेचा!

सुकडी सायकल ते ट्रक या बोजड वाहनांच्या टायरवरदेखील नक्षी कोरलेली असते हे मला आठवलं. टायर बनवणाऱ्यांना ही नक्षी कुठून सुचते? टायर बनवण्याआधी ते मेंदी काढत असावेत का? पावसात जमिनीवरही मेंदी उमटावी म्हणून ही वेगवेगळी नक्षी देत असतील का? असं होतं तर दुकानदाराला माझ्या गाडीच्या टायरवर माझ्या मनातली नक्षी काढून दिली. ‘‘जीजीप्यों द्यिाक्यास्त लुकयज्यो’’ असं त्याच्या भाषेत सांगून या नक्षीवाले टायर मागितले. पण दुकानदार ‘झ्यों झ्योन’ असा नाकातून आवाज काढत मोठ्यानं हसू लागला. तसं आजूबाजूचं पण ‘ज्ञोंस डण्योन’ आवाजात मोठ्यानं हसले. बहुतेक त्यांना माझ्या नक्षीत काही तरी विनोद दिसला असेल.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम

मित्रा, मला माहीत आहे की वहीच्या मागे तू तुझी ड्रीमकार चितारत असणार… त्यापुढे थोडं आणखी डोकं लावून माझ्या शर्टाशी मॅचिंग होईल अशी टायरची नक्षी काढू शकतो का? चार चाकांना वेगवेगळी नक्षी असली तरी चालेल. मला ईमेलवर ही चित्रे पाठव.

तुझाच खासम खास मित्र,
श्रीबा

shriba29@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokrang article on engravings on the wheels of vehicles running on the road css