|| आसाराम लोमटे

हिंदूीतील प्रसिद्ध कवी ज्ञानेन्द्रपति यांच्या ‘संशयात्मा’ या कवितासंग्रहाच्या मराठी अनुवादासाठी कवी-अनुवादक प्रफुल्ल शिलेदार यांना नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार (अनुवाद) जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने..

कवी प्रफुल्ल शिलेदार यांच्या ‘पायी चालणार’ या कवितासंग्रहात ‘कवितेचा अनुवाद’ या शीर्षकाची एक कविता आहे. अनुवाद करायला कवी हा कवितेत शिरतो, तर त्याला भाषेच्या वळणावळणाच्या रस्त्यानं एक कवी धुक्याच्या डोंगरात घेऊन जातो आणि सगळी मानवजात नजरेच्या टप्प्यात येईल एवढय़ा उंचीवर नेतो. एक कवी संथ लयीत चालणाऱ्या काळाच्या नाडीचे ठोके ऐकवतो, एक कवी कविता लिहिण्याआधी पाठीवर उमटलेले वळ दाखवतो, एक कवी हात धरून हिंस्र झालेल्या गर्दीत घुसवतो. हे सगळे कवी कधीही न दिसलेल्या खिडक्या उघडतात आणि सरतेशेवटी दार उघडून आपल्या कवितेत कवीचे मनापासून स्वागत करतात. एका अर्थाने अनुवादप्रक्रियेची ही अनुभूतीच ‘कवितेचा अनुवाद’ या कवितेतून व्यक्त होते.

प्रफुल्ल शिलेदार यांनी मल्याळम् लेखिका मानसी यांच्या कथांचे अनुवाद ‘पूल नसलेली नदी’ या शीर्षकाने केले आहेत. प्रसिद्ध कवी विनोदकुमार शुक्ल यांच्या ‘अतिरिक्त नहीं’ या कवितासंग्रहाचा अनुवाद त्यांनी ‘जास्तीचे नाही’ या नावाने केला आहे. ज्ञानेन्द्रपति यांच्या ‘संशयात्मा’ या कवितासंग्रहाचा अनुवाद त्यांनी केला, ज्याला यावर्षीचा अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. मूळ कवितासंग्रहालाही साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे. कवी शिलेदार हे स्वत: मराठीतले महत्त्वाचे कवी आहेत. ‘स्वगत’, ‘जगण्याच्या पसाऱ्यात’ या दोन कवितासंग्रहांनंतर ‘पायी चालणार’ हा त्यांचा तिसरा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे.

अनुवाद म्हणजे केवळ एखादी साहित्यकृती दुसऱ्या भाषेत जाणे नाही. मूळ कलाकृतीचा आशय त्यातल्या भाषिक वैशिष्टय़ांनिशी आपल्या भाषेत आणणे हे तसे आव्हानाचे काम आहे. जसाच्या तसा आशय आपल्या भाषेत आणताना मूळ साहित्यकृतीचा पोत कायम राहील ही खबरदारी घ्यावी लागते. पर्यायी शब्द शोधताना प्रत्येक शब्दाची एक वेगळी छटा असते. अशा वेळी शब्दा-शब्दाजवळ अडावे लागते. त्यातून मार्ग काढत ही प्रक्रिया पार पडते. अनुवादालाही एक स्वतंत्र भाषिक ओळख मिळवून देण्याचे काम अनुवादकाला करावे लागते.

ज्ञानेन्द्रपति यांचा ‘संशयात्मा’ हा कवितासंग्रह अनुवादाच्या दृष्टीने आव्हानात्मक आहे. बोली भाषेतले बारकावे स्थानिक संदर्भासह वाचकांपर्यंत पोहचवणे हे तसे कठीण काम आहे. ज्ञानेन्द्रपति यांच्या कवितेत अवधि, बुंदेलखंडी, भोजपुरी अशा बोलीभाषांमधील शब्द येतात. प्रसंगी संथाली भाषेतील काही शब्द आढळतात. या संदर्भातला शिलेदार यांचा अनुवादाच्या प्रक्रियेतील अनुभव वैशिष्टय़पूर्ण आहे. काही शब्दांचे अर्थ शोधतानाचा प्रवासही वेधक आहे. ते म्हणतात, ‘लोकभाषेतले ‘भुरुकवा’सारखे शब्द ज्ञानेन्द्रपतिंच्या कवितेत येतात, जे प्रचलित हिंदीत येत नाहीत. हिंदी शब्दकोशांमध्येही त्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरतो. तेव्हा सरळ कवीकडे जाण्याखेरीज मार्ग उरत नाही. बोलीतील ‘भुरुकवा’ या शब्दाचा अर्थ ‘भोर का तारा’- म्हणजे शुक्रतारा आहे, असे कळते तेव्हा शुक्रतारा दिसल्याचाच आनंद होतो.’

ज्ञानेन्द्रपति हे हिंदीतले अत्यंत महत्त्वाचे कवी मानले जातात. झारखंडमधल्या संथाल परगण्यात जन्मलेल्या या कवीचे शिक्षण पाटणा येथे झाले. बिहार शासनामध्येच त्यांनी जेलर म्हणून नोकरीही केली. दहा वर्षांनंतर नोकरी सोडली आणि बनारसला ते स्थायिक झाले. पूर्ण वेळ कवी असलेल्या ज्ञानेन्द्रपति यांनी भारतभर फिरून भारतीयत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कवितेची नाळ थेट लोकजीवनाशी आहे. भाषिकवैविध्य किंवा निरनिराळ्या बोलींमधील शब्दांचा आढळ एवढेच त्यांच्या कवितेचे वैशिष्टय़ नाही, तर विस्तृत असा कालावकाश आणि लोकतत्त्व हीसुद्धा त्यांच्या कवितेची मोठी वैशिष्टय़े आहेत.

‘आदिवासी गावातून जाणारा रस्ता’ या नावाची त्यांची ‘संशयात्मा’मधील कविता आहे. आदिवासी गावाच्या छातीवरून जाणाऱ्या रस्त्याचं मर्म ते उलगडतात. शोषण करणाऱ्या संस्कृतीचे दर्शन ते या कवितेत घडवतात. ही अशी संस्कृती- जिचे बाहू राजधानीपासून या आदिवासी गावांपर्यंत आले आहेत. आणखी एका कवितेत झारखंडमधल्या पर्वतांचे अरण्यरुदन येते. पहाड, वनस्पती आणि खनिजांवर डोळा असणाऱ्यांची हाव या कवितेत आहे. ‘हे तेच पूर्वज-पर्वत आहेत, ज्यांची हाडं हावरट मानवी गिधाडाचं अन्न झाली आहेत’ या शब्दांत पर्यावरणाची नासाडी करणाऱ्या राक्षसी मनोवृत्तीचे सूचन ज्ञानेन्द्रपति करतात. क्षितिज हिरावून घेणारी सिमेंटची जंगले वाढतात, तेव्हा ‘क्षितिजशोक’ या कवितेत कवी अशी नोंद करून ठेवतो-

‘एक दिवस अचानक

शहर आपलं आणखी एक नख वाढवतं

आकाशात उंचावतं काँक्रीटच्या कुत्र्याच्या छत्रीचं एक टोक.’

‘स्वातंत्र्य ऊर्फ गुलामी’ या कवितेत स्वातंत्र्याचा गुलामीत परावर्तित झालेला अर्थ स्पष्ट होत जातो. स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे आपल्याला बाजारातून हवी ती वस्तू निवडण्याचे स्वातंत्र्य, वस्तूंचा गुलाम बनण्याचे स्वातंत्र्य! बाजाराच्या हाती आपला मेंदू दिल्यानंतर बाजारच आपले विश्व बनत जाण्याची प्रक्रिया कवी उलगडत जातो आणि ‘एका विद्रोही मेंदूचा भार अखेर समाजालादेखील सहन होत नाही’ हे सत्य तो सांगतो.

ज्ञानेन्द्रपति यांच्या कवितेचा पट असा विस्तीर्ण आहे. त्यात नद्या, पर्वत, वनराईपासून छोटय़ा-छोटय़ा जीवांपर्यंतचे संदर्भ येतात. राक्षसी महत्त्वाकांक्षेच्या भक्ष्यस्थानी येणारी ही निसर्गाची रूपे या कवितेत आढळतात. साम्राज्यवादी मनोवृत्तीचा वेध घेत असतानाच राजनतिक, धार्मिक सत्तेचा चेहराही ‘संशयात्मा’मधील कवितांतून ठळक होत जातो. विकासाच्या नावाखाली होणारा पर्यावरणाचा विध्वंस, दुर्गम भागातल्या विकासवंचित गावांचे, आदिवासी पाडय़ांचे दुष्कर जगणे या कवितेत उमटते. ज्ञानेन्द्रपति यांच्या कवितेची रचना ही खास त्यांची आहे. कवितेच्या कोलाहलात ती वेगळी उमटून पडते. जाणकारांच्या मते, मुक्तिबोधांनंतर हिंदी भाषेत भव्य आणि अभिजात अशी कविता गांभीर्याने लिहिणाऱ्यांमध्ये ज्ञानेन्द्रपति यांचे नाव अग्रभागी आहे. शिलेदार यांनी ‘संशयात्मा’ या कवितासंग्रहाच्या अनुवादाच्या माध्यमातून महत्त्वाची कविता मराठी भाषेत तिच्या मूळ पोतासह आणली आहे.

स्वत: शिलेदार यांची ‘पायी चालणार’ या कवितासंग्रहातील कविताही ‘पृथ्वीचा खेळखंडोबा’ करणाऱ्यांविरुद्ध अत्यंत संयत शब्दांत बोलत राहाते. ‘या भूमीवर अश्वत्थ सळसळतो आहे, पण कुठलाच माणूस बुद्ध झाल्याचा आवाज दूरवरूनही ऐकू आलेला नाही’ अशी जाणीव शिलेदार यांच्या कवितेत व्यक्त होते. ‘पायी चालणार’ या शब्दांतच एक निग्रह आहे. ‘पायी चालणे’ म्हणजे जमिनीशी नाते ठेवणे, इथल्या सजीवसृष्टीशी एकरूप होत तिच्या विनाशाविरुद्ध उभे राहणे, मूल्यनिष्ठेसह भक्कम पाऊल टाकणे, माणूसपणाचे काळेभोर ढग दाटून आल्यानंतर तडकलेल्या मातीला सांधणे असे सारे तर आहेच; पण पायी चालल्यानं हवाच काय, कुणाचं मनही कलुषित होत नाही. पायी चालण्याचा हा निर्धार शिलेदार यांच्या कवितेत एका मूल्यगर्भ धारणेनिशी व्यक्त होतो-

‘कोटय़वधी वर्षांच्या प्रयत्नानं साधलेलं

ताठ उभं राहून पायी चालणं

मुश्किल होण्याच्या काळात

मी जगतो आहे

पायाखाली भरभक्कम उभी राहणारी माती

खचता खचता

पायी चालणं दुष्कर होण्याच्या काळात

मी जगतो आहे.’

शिलेदार यांची कविता आजच्या तुटत जाणाऱ्या काळाविषयी बोलते. दु:खाच्या नानाविध मितींचा शोध घेते. निसर्गाच्या हिरवाईला नष्ट करू पाहणाऱ्या माणसाच्या क्रूर लालसेला ठळक करते. दुबळ्यांना नष्ट करत ‘घुसत राहा’ हा आजच्या काळाचा गुणधर्म कवी पृथ्वीच्या विनाशाशी जोडतो. आपला बुटाचा पाय शेजाऱ्याच्या अनवाणी पायांवर ठेवल्यावर तो कळवळून बाजूला होणारच; त्याप्रमाणेच पांगळी पृथ्वीही काहीसुद्धा बोलणार नाही. यात या पृथ्वीची हतबलता आणि तिला ओरबडणाऱ्या माणसाची हावरट भूक या बाबींचे सूचन आहे. समकालीन वास्तवाचे संदर्भ शिलेदार यांच्या कवितेतून येत असले, तरी ही कविता बहिर्मुख नाही. आपल्या आतल्या आवाजाला विलक्षण संयमाने शब्दरूप देत ती आत्यंतिक अंतर्मुख होताना दिसते. पुस्तकांवर हल्ले होण्याचा, लेखकांना परांगदा करण्याचा, कवितेने व्यवस्थेच्या जाळ्यात अडकण्याचा इतिहास शिलेदार या कवितेत अधोरेखित करतात. मात्र, वर्तमानावर भाष्य करताना ही कविता जराही वक्तृत्वपूर्ण होत नाही, आवाजी होत नाही.

या कवितेत खरे खरे खिंकाळणारा घोडा सत्तेवर सत्याचा शहारा उठवतो; पायाच्या अंगठय़ाने चिरडली जाणार नाही अशी मुंगीही प्रलयाची चाहूल सांगते; पुस्तकांना समूहाचा स्वर मिळतो तेव्हा ती समुद्राच्या लाटांसारखी रोरावतात. या शिलेदार यांच्या कवितेतील काही जागा चांगल्या जगाकडे अंगुलीनिर्देशही करतात. वर्तमानातल्या दु:सह स्थितीचे दर्शन घडवतानाच ही कविता ‘माणूसपण सांडावं डोळ्यांतून, बोलण्याचालण्यातून, करण्याधरण्यातून, देण्याघेण्यातून’ अशी मानवी करुणेला साद घालते. ‘पायी चालणार’ असा निग्रह बाळगणाऱ्या एका महत्त्वाच्या कवीने ‘संशयात्मा’च्या रूपाने केलेले अनुवादकार्य हीसुद्धा एक स्वतंत्र अशी भाषिक कृतीच आहे!

aasaramlomte@gmail.com