मराठी भाषेला कोशवाङ्मयाची समृद्ध आणि सातत्यपूर्ण परंपरा आहे. श्रीधर व्यंकटेश केतकरांपासून सुरू झालेली ही परंपरा गेल्या पंच्याण्णव वर्षांमध्ये तत्वज्ञान, शेती, रसायनशास्त्र आणि वनस्पतिशास्त्रासारख्या अनेकविध विषयांपासून पर्यावरणशास्त्रासारख्या आधुनिक विद्याशाखांपर्यंत विस्तारत गेली आहे. ती सन्मानपूर्वक पुढे नेणारा, स्वरानंद प्रतिष्ठान निर्मित मराठी भावसंगीत कोश अनुबंध प्रकाशनानं अलीकडेच प्रकाशित केला आहे.

या कोशाची मूळ संकल्पना प्रख्यात कवी आणि स्वरानंद प्रतिष्ठानचे संस्थापक कार्याध्यक्ष सुधीर मोघे यांची. मराठी भावसंगीताची वाटचाल हा त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि चिंतनाचा विषय होता. मराठी भावसंगीताचे लोकप्रिय कार्यक्रम करणारी संस्था एवढीच स्वरानंदची ओळख राहू नये, अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच त्यांनी भावसंगीताची वाटचाल स्पष्ट करणारा एखादा मोठा ग्रंथ स्वरानंदनं प्रकाशित करावा, अशी कल्पना संस्थेच्या विश्वस्त सभेत मांडली. अर्थात सर्वांनीचं या कल्पनेला सानंद मान्यता दिली. मोघे यांच्या पुढाकारानं २००५-०६ पासून प्रकल्पाची आखणी सुरू झाली खरी, पण एकेका ग्रंथाचंही नशीब असतं असं म्हणावं लागेल; कारण सुरुवातीपासून अनेक तज्ञ, अनुभवी व्यक्तींची व्यावसायिक स्वरुपात मदत घेऊनही हा कोश सिद्ध झालेला बघण्याचं भाग्य मोघे यांना लाभलं नाही. काम फारसं मार्गी लागलेलं नसतानाच २०१३मध्ये त्यांचं अकस्मात निधन झालं. एरवी, या धक्क्यामुळे हे अवघड आणि प्रचंड व्याप्ती असणारं काम बंद पडायचं, पण स्वरानंदच्या विश्वस्त मंडळानं नेट सोडला नाही आणि सुकाणू धरणारे हात बदलत बदलत अखेर चित्रकार रविमुकुल आणि अदिती वळसंगकर-कुलकर्णी या संपादकद्वयीनं हा बृहद प्रकल्प अतिशय शिस्तबद्ध रीतीनं आणि चिकाटीनं सिद्ध केला.

मराठी चित्रपट बोलू लागला तो १९३२ मध्ये. तेव्हापासून मराठी चित्रपट संगीताचा प्रवास सुरू झाला आणि भावगीतांचा उगमही याच सुमाराचा. १९३० च्या दशकापासून सन २००० पर्यंतच्या चित्रपट-नाट्य आणि भावसंगीताच्या वाटचालीचा आलेख या कोशानं मांडला आहे. ११,६५०हून अधिक मराठी नाट्यगीतं, भावगीतं आणि चित्रपटगीतं यांची गीतारंभ सूची असणारा हा मराठी भावसंगीत कोश दोन खंडांमध्ये विभागलेला आहे. पहिल्या खंडात भावसंगीतविषयक दहा लेखांखेरीज महत्त्वाचे गीतकार, संगीतकार आणि गायक-गायिका यांच्याविषयीच्या तज्ज्ञांनी लिहिलेल्या नोंदी आणि नाट्यगीतांची सूची समाविष्ट आहे. दुसऱ्या खंडात भावगीतांविषयीचे लेख/ मुलाखती आणि भावगीत आणि चित्रपटगीतांची सूची आहे.

जवळजवळ ७०० छायाचित्रांनी या कोशाचं संग्रहमूल्य वाढवलं आहे. कोशाच्या प्रारंभी असलेला ‘मराठी भावसंगीताची वाटचाल’ हा सुधीर मोघे यांचा नवभारतमधला पूर्वप्रसिद्ध सुदीर्घ लेख केवळ भावसंगीताचे कालानुक्रमे टप्पे सांगणारा नाही; मराठी भावसंगीताचा वटवृक्ष ज्यांच्या प्रतिभेवर पोसला गेला आहे, त्या सगळ्या गीतकार-गायक- संगीतकारांची सामर्थ्यस्थळं त्यांनी वाचकांपुढे ठेवली आहेत. याखेरीज ‘कविता- गीत-चित्रपटगीत’ हा त्यांचाच आणखी एक लेख, मंगेश पाडगावकर आणि श्रीनिवास खळे यांची अशोक रानडे यांनी घेतलेली मुलाखत, ‘भावगीत आणि भावकविता : स्वरूप आणि प्रकृती’ हा डॉ. अरुणा ढेरे यांचा लेख, ‘विसाव्या शतकातली गझल’ हा डॉ. प्रभा अत्रे यांचा लेख, शाहिरी भावसंगीताविषयीचा मधु पोतदार यांचा लेख, भावसंगीत घराघरात पोचविणाऱ्या आकाशवाणीविषयीचा प्रभा जोशी यांचा लेख, वासंती मुझुमदार यांनी घेतलेली अशोक रानडे यांची मुलाखत आणि भावसंगीत आणि नाट्यगीतविषयक इतरही आशयसंपन्न लेखांनी या भावसंगीत कोशाचं मूल्यवर्धन केलं आहे.

नाट्य, चित्रपट आणि भावसंगीताच्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुमारे १८९ नोंदी या कोशात आहेत. नोंदी लिहून घेण्यासाठी संपादकांनी एक नमुना तयार करून नोंदलेखकांना दिला असला तरी त्याबरहुकूम सगळ्या नोंदी हातात येणं अवघड होतं. शिवाय त्या त्या व्यक्तींच्या कामानुसार नोंदी लहान-मोठ्या होणंही स्वाभाविक होतं. त्यामुळेच मोठ्या, मध्यम, लघु अशी त्यांची विभागणी करणं, आलेल्या मजकुराची अचूकता तपासणं, आवश्यक संपादन करणं, गरज असेल तिथे नोंदीखाली पूर्वप्रकाशित लेख/ पुस्तकांचे संदर्भ देणं हा सगळा खटाटोप संपादकद्वयीनं केला आहे आणि त्यामुळे कोशाची अचूकता आणि वैधता वाढली आहे. कुठल्याही कोशाकडे प्रामुख्यानं संदर्भग्रंथ म्हणून पाहिलं जातं. पण भावसंगीतकोशानं ही मर्यादा ओलांडून तो अत्यंत वाचनीय केला आहे. पहिल्या खंडातली तब्बल १०६ पानपूरकं आणि दुसऱ्या खंडातली विविध क्षेत्रातल्या ७५ मान्यवरांची आवडती दहा गाणी यांनी कोशाची बहार वाढवली आहे. मुळात भावसंगीत हा प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय! गीतांचे शब्द, चाली, आवाज आणि पार्श्वसंगीतामुळे आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर, कुठल्या तरी एखाद्या क्षणी जिचा जीव हुरहुरला नाही अशी व्यक्ती सापडणं दुर्मिळ. त्यामुळे या कोशाचं संदर्भग्रंथाखेरीजही महत्त्व आहेच आणि ते वाढावं आणि कोश वाचनीय व्हावा म्हणून आशय आणि निर्मिती या दोन्ही बाबतीत संपादकांनी विशेष लक्ष दिल्याचं स्पष्ट जाणवतं. कोशाचा डबल डेमी आकार, फॉन्ट साइज, सुटसुटीत मांडणी, छायाचित्रांचा वापर, बालगंधर्व, ग. दि. माडगूळकर यांच्या हस्ताक्षरातली पत्रं आणि गीतं, आठ-नऊ दशकांपूर्वीच्या रेकॉर्डस्, ग्रामोफोन कंपन्यांच्या जाहिराती यांचा नेटका उपयोग केल्यामुळे कोश अत्यंत देखणा झाला आहे. अर्थात याचं श्रेय संपादक रविमुकुल यांच्या कलादृष्टीला आहे. संपादक स्वत:च उत्तम कलावंत असल्यामुळे भावसंगीत कोशाचं निर्मितीमूल्य वाढलं आहे हे निश्चित. इथे अनुबंध प्रकाशनाचे अनिल कुलकर्णी यांचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. एकूण १२२० पानांच्या या द्विखंडात्मक कोशाची निर्मिती करताना त्यांनी कणभरही हात आखडता न घेता चित्रकार असलेल्या संपादकाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं, ही नक्कीच उल्लेख करण्याजोगी बाब आहे. बाजारपेठेच्या प्रतिसादाबाबत कुठलीच खात्री नसलेल्या अशा अवाढव्य प्रकल्पातली प्रकाशकाची भावनिक गुंतवणूक आणि आत्मीयता विशेष म्हणावी अशीच आहे.

या कोशाच्या आराखड्यात योजलेल्या, पण प्रत्यक्षात हातात न आल्यामुळे समाविष्ट न झालेल्या लेखांचा उल्लेख संपादक रविमुकुल यांनी आपल्या मनोगतात केला आहे. आजपर्यंतची जगभरातली कोशपरंपरा पाहता, देशाच्या परिपक्वतेची खूण असणारे विख्यात ज्ञानकोश त्या देशाच्या संस्कृतीचं चित्र संतुलित स्वरुपात आणि बहुतांशी अचूकपणे मांडण्याचं काम करतात, असं दिसतं. त्यामुळेच कोशवाङ्मय ही एक प्रकारे त्या त्या देशाच्या आदर्शांना आणि त्या त्या काळाला वाहिलेली आदरांजली असते. मराठी भावसंगीत कोशाच्या निमित्तानं अशी आदरांजली अभिजात मराठी भावसंगीताला तर वाहिली गेली आहेच, पण ती मराठी गीतलेखनालाही वाहिलेली आहे.

मराठी भावसंगीत कोश (खंड १ आणि २), संपादक – रविमुकुल, सहसंपादक- अदिती वळसंगकर-कुलकर्णी, अनुबंध प्रकाशन, पुणे,पाने- १२२०, किंमत- ३०००(दोन्ही खंड मिळून.)