|| मकरंद देशपांडे
‘सर सर सरला’ नाटकामुळे माझ्या नाटकांना आवर्जून येणारा प्रेक्षक सुखावला. कारण त्यांना नाटककार म्हणून मी ‘प्रोफेसर आणि विद्यार्थी’ हे सगळ्यांना माहीत असणारं, सर्वानी अनुभवलेलं नात्यावरसुद्धा लिहू शकतो- आणि तेही मॅजिकल रिअॅलिझमशिवाय- याचा आनंद झाला. मॅजिकल रिअॅलिझम म्हणजे वास्तविक घटनांना फॅंटसीचं रूप द्यायचं आणि एक जादुई यथार्थाचं चित्रण प्रेक्षकांसमोर मांडायचं.
त्यामुळे काय व्हायचं, की प्रेक्षक माझ्या नाटकांना सर्कस किंवा ‘आऊट ऑफ द बॉक्स’ नाटक पाहायला मिळणार म्हणून यायचा आणि गंमत अशी असायची- की नाटकाच्या शीर्षकावरून किंवा पहिल्या प्रवेशानंतर काय घडणार हे मनात पाहणाऱ्या प्रेक्षकांना नेहमीच धक्का बसायचा. पण ‘सर सर सरला’ नाटक धक्कादायक कमी आणि भावनिक जास्त होऊन गेलं. पण त्यामुळे माझ्या प्रायोगिक नाटकांचे काही समर्थक नाराजसुद्धा झाले. त्यातलेच एक नासीरुद्दिन शाह सर. ते नेहमी प्रयोगानंतर पृथ्वीच्या बॅकस्टेज ग्रीनरूममध्ये (पहिला मजला चढत) येऊन भेटायचे, बसायचे, मिठी मारायचे, हसत हसत बोलायचे. पण ‘सर सर सरला’च्या प्रयोगानंतर ते आले नाहीत. मला कोणीतरी सांगितलं की ते म्हणाले, ‘अब सब कुछ समझ में आया. अब मकरंद का नाटक क्यों देखें?’ (कदाचित त्यांना म्हणायचं होतं, की मला त्या मकरंदचं नाटक पाहायचंय- जो नाटकाचं नुसतं शाब्दिक मंचन करत नाही, तर त्यात जोडीला फॉर्मलेस फॉर्म जोडतो.) मी जेव्हा नसीर सरांची ही प्रतिक्रिया आमच्या (गुरुस्थानी) लाडक्या पंडित सत्यदेव दुबेजींना सांगितली तेव्हा ते त्यांचा सेन्स ऑफ ह्य़ुमर वापरत म्हणाले, ‘मकरंद, नसीर चाहता नहीं हैं की तुम सक्सेसफुल हो.’ आणि आम्ही खूप हसलो. खरं तर नसीर सर आजही माझ्या नाटकाच्या तालमीला येऊन जातात आणि काही मार्मिक, अनुभवी शब्दांत नाटकाला उपयोगी प्रतिक्रियाही देतात.
एक गोष्ट या नाटकाने केली, ती अशी की एक वेगळा डाय हार्ड फॅन- नाटकवेडा प्रेक्षकवर्ग भेटला. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अनिल कृष्णा आपल्याबरोबर नेहमी सहा ते दहा लोक घेऊन या नाटकाला हजर होई. तेसुद्धा तासभर आधी.. म्हणजे मग पहिल्या रांगेत बसता यायचं. जर एखाद्या वेळी तो विमानतळाहून परस्पर प्रयोगाला आला तर त्याची ७५ वर्षांची मय्या (आई) त्याच्यावर रागवायची. हा कधी कधी तर दिल्ली, पाटण्याहूनही नाटकासाठी विमान पकडून आलाय. त्याने त्याच्या कुटुंबातल्या सर्वाना आणि जे परिचित आहेत त्यांना हे नाटक बघायला भाग पाडलंय. आता तर त्याला नाटक तोंडपाठच आहे.
सुरेश शेलार नावाचा एक दिग्दर्शक आहे आणि हे सदर तो वाचतो. दोन आठवडय़ापूर्वी ‘सरला’चा नुसता उल्लेख झाला आणि त्याने एसएमएस केला- ‘सर, आजचा संडे फुल पसा वसूल. दानव ते सरला. सरला आली फायनली. थॅंक यू.’ प्रेक्षकांचं वेडेपण मी थोडंबहुत समजू शकतो, पण क्षिती जोग (अप्रतिम नटी) हिला ‘सर सर सरला’ तोंडपाठ होतं.
निशिकांत कामत या दर्जेदार दिग्दर्शकानं ३१ डिसेंबरच्या रात्री ठेवलेल्या एका अनौपचारिक पार्टीला मी गेलो होतो. साधारण पार्टीला म्युझिक वाजतं. काहीजण नाचत असतात. काही मोठय़ानं ओरडत असतात. पण निशिकांत म्हणाला, ‘मॅक, I am jealous of you.(प्रेमानं!) अरे, या मुली ‘सर सर सरला’चे संवाद म्हणताहेत.’ त्या मुली होत्या- क्षिती जोग, अमृता संत आणि (बहुतेक) मनवा नाईक. या नाटकाची जादू काय आहे हे सांगणं मुश्कील आहे; पण मी मराठीत करणार आहे तेव्हा जरूर पाहा.
एका सोमवारी साफसफाई आणि टेक्निकल मेंटेनन्ससाठी पृथ्वी थिएटर बंद असल्यानं थिएटरमध्ये मी एकटाच बसलो होतो आणि मनात विचार आला. एखादं नवीन नाटक करायचा विचार मनात आला तरी तो भीतीही बरोबर घेऊन येतो. ती भीती त्या संहितेच्या मंचन करण्याच्या शक्यतेची, अभिनेत्याच्या अभिनयाच्या प्रभावाची, नेपथ्य-मांडणीची!
पण प्रेक्षकांना तेवढी भीती वाटत नाही. त्यांना उत्सुकता असते- नवीन काय पाहायला मिळणार याची! मी ठरवलं- की पुढच्या नाटकात भीती प्रेक्षकांना वाटायला हवी. आणि जागेवरनं उठलो. विंगेत थिएटरच्या लाइटचं बटण आहे, ते बंद केलं. रंगमंच, बॅकस्टेज, प्रेक्षागृह अंधारात दिसेनासं झालं. आणि एका हॉरर नाटकाच्या लिखाणाला (मनात) सुरुवात केली.
एका हिल स्टेशनवर असलेल्या हॉटेलचा एक भाग बंद आहे- जो डोंगराच्या कडेला आहे. खोलीची खिडकी दरीत उघडते. तिथं एका बाईचं भूत आहे. ती हनिमूनला आलेल्या दाम्पत्याला किंवा प्रेमी युगुलाला त्या खोलीत राहू देत नाही. तिचं नाव सीमा. आणि नाटकाचं नाव- ‘सीमा बदनाम है’! एका चिडलेल्या भुताचं नाटक. हॉटेलचा तो भाग बंद असला तरी एखाद्या वेळी साफसफाईसाठी किंवा हॉटेल फुल्ल असल्यामुळे कधी कोणी अडचणीत असल्याने किंवा आगाऊ सूचना देऊनही ‘आमचा भुतावर विश्वास नाही’ किंवा ‘भूत मला काही करू शकत नाही’ किंवा ‘एका बाईचं भूत भेटलं तर मज्जाच!’ अशा विचारांची काही माणसं त्या खोलीत राहतात- जिथं सीमाचं वास्तव्य आहे. ती खूप सुंदर होती असं ऐकिवात आहे.
पहिल्या प्रवेशात तीन टारगट मुलं दारू पिऊन धांगडिधगा करत सीमालाच आव्हान देतात आणि अभद्र बोलतात. त्यांना सुंदर सीमा पाहायची असते. आणि समोर येतं- चिडलेल्या सीमाचं भूत! खोलीच्या दरीकडे उघडणाऱ्या खिडकीतून ते तिघेही बाहेर फेकले जातात. अंधारात किंकाळ्या.. प्रवेश संपतो.
दुसऱ्या प्रवेशात एक दाम्पत्य त्यांच्या दुसऱ्या हनिमूनला येतं. त्यांच्यातलं प्रेम कमी झालेलं असतं म्हणून ते हनिमूनला आलेले असतात. पण नवरा त्यांच्यातल्या कमी झालेल्या शारीरिक आकर्षणासाठी पत्नीला जबाबदार ठरवतो. त्यांच्यातलं भांडण हातापाईवर येतं. तो आपल्या पत्नीला मारणार असतो तेव्हा सीमाच त्याला दरीत फेकते. प्रवेश संपतो. अंधारात किंकाळी.
तिसऱ्या प्रवेशात एक नास्तिक लेखक त्या खोलीत एक कथा लिहायला राहतो. हळूहळू त्याच्या लिखाणात एका बाईची गोष्ट सुरू होते. त्याचा प्रोडय़ुसर त्याला भेटायला येतो तेव्हा तो चक्रावतोच- हा लेखक वेगळीच गोष्ट लिहितोय. हे ऐकून लेखकही विचारात पडतो. तो ती गोष्ट पुढे लिहायला लागतो आणि त्याच्या लक्षात येतं की कुणीतरी त्याच्याकडून गोष्ट लिहवून घेतंय. त्याचं उत्तर त्याला सीमा लिखाणातून देते.
सुंदर सीमाला तिचा नवरा (ज्याला पटकन् कंपनीत टॉपवर जायचं असतं!) हनिमूनच्या नावाखाली आपल्या बॉसला ऑफर करतो. या गोष्टीस सीमा नकार देते म्हणून तिला तो खिडकीतून ढकलतो. पण सीमानं त्याचा हात धरल्यानं तो दरीत पडतो. सीमा वाचते. सीमावर आपल्या नवऱ्याला मारल्याचा गुन्हा दाखल होतो. घटनेचा साक्षीदार असलेल्या बॉसची साक्ष खरी मानली जाते. सीमा नंतर आत्महत्या करते. तिच्या मृत्यूनंतर तिच्यावर देहविक्रीचाही आरोप केला जातो. एकूणात- सीमा मेल्यावरही विनाकारण बदनाम होते.
या नाटकाची मांडणी नाटक लिहिण्यापेक्षा जास्त अवघड होती. हॉरर दाखवताना हास्य अगदी जाणीवपूर्वक टाळायचं असतं. आणि गंमत अशी की- भीतीतून सावरण्यासाठी प्रेक्षकांना हसायला आवडतं. त्यामुळे जरी प्रेक्षक हसले, तरी ते भीतीपोटी हसताहेत हे लक्षात ठेवून नाटक बांधावं लागतं.
सीमाचं त्या खोलीतलं अस्तित्व दाखवताना तिची खुर्ची अधांतरी लटकवली होती. आणि सतत धूर.. त्यामुळे अंधारातून उजेडात येताना ती रिकामी खुर्ची अचानक हलायची आणि पुन्हा लाइट आल्यावर त्या खुर्चीत बसलेली सुंदर सीमा दिसायची. दरीकडे उघडणारी खिडकी आणि त्यात ढकलली जाणारी पात्रं हाही एक अवघड प्रसंग. मी हल्ली प्रचलित असलेला ‘पार्कर मूव्हमेंट’(म्हणजे एक प्रकारचं आर्मी रुटीन- अडथळे पार पाडायचे.. कसल्याही साधनांशिवाय!) हा प्रकार वापरला. यामध्ये जी गती आणि त्यामुळे झालेली स्वाभाविक मूव्हमेंट फक्त वरच्या लेवलवरून खालच्या लेवलवर केली की ती दरीत उडी मारल्यासारखी वाटे.
लेखकाची भूमिका मी केली. सीमाचं भूत जेव्हा ती गोष्ट माझ्याकडून लिहून घ्यायला लागतं तेव्हा तिच्या मृत नवऱ्याचं भूत माझ्या अंगात संचारतं. हे भुतांचं द्वंद्व माझ्या शरीरात चाललेलं दाखवताना माझी पार दमछाक व्हायची. आणि हे दृश्य आणखी परिणामकारक करण्यासाठी पृथ्वीच्या कॅटवॉकवरून बऱ्याच गोष्टी पडायच्या आणि त्या हवेत तरंगायच्या. काही तर प्रेक्षकांच्या डोक्यावरही! तेव्हा प्रेक्षक ओरडताना ऐकले होते.
एका शोला एकता कपूरही येऊन बसली होती. हे पाहायला- की स्टेजवर हॉरर कसं दाखवलं जातं! नंतर मला निरोपही आला होता की ती स्क्रिप्ट मिळेल का?
सीमाची भूमिका गीतांजली राव या एका अप्रतिम अॅनिमेशन फिल्म-मेकरनी केली होती. तिनं दुबेजींच्या नाटकात आधी काम केलं होतं. तिला तिच्या अॅनिमेशन फिल्म मेकिंगमधून बाहेर येऊन वास्तवात स्वत:ला नव्यानं शोधायचं होतं आणि त्यासाठी नाटकाच्या तालमीपासून ते प्रयोगापर्यंतच्या यात्रेएवढा जिवंत पर्याय नाही.
नेपथ्य आणि इफेक्ट टेडी मौर्य. संगीत शैलेन्द्र बर्वेचं..अंगावर काटा आणणारं.
हे नाटक बघून सुधीर मिश्रा (‘धारावी’, ‘हजारो ख्वाईशे ऐसी’ चित्रपटांचा दिग्दर्शक) म्हणाला, ‘‘मॅक, तेरे नाटक के दो कॅरॅक्टर्स- पुलिस इन्स्पेक्टर और उसने टायर में बांध के रखा हुआ कैदी- इन दोनों का रिश्ता मं अपनी फिल्म में कभी ना कभी लाऊंगा. यह मं तुझे अभी बता देता हूँ.’’
खरंच, नाटकात पात्रं जिवंत होतात. हॉरर नाटकात भुतांमुळे जास्त!
जय भय! जय जय!
जय नाटक! जय प्रेक्षक!
mvd248@gmail.com