एका गावात दोन सख्खे भाऊ राहत होते. त्यातला एकजण भांडखोर म्हणून प्रसिद्ध होता. दारू पिऊन गोंधळ घालणे, घरी बायको-पोरांना मारणे, शेजाऱ्यांशी भांडणे करणे हेच त्याचे काम. दुसरा भाऊ मात्र याच्या एकदम विरुद्ध. निव्र्यसनी, शांत, प्रेमळ असलेला हा दुसरा भाऊ बायको-मुलांची काळजी घ्यायचा, शेजाऱ्यांना आणि इतरांना जमेल तशी मदत करायचा, सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचा. गावातल्या लोकांना खूप आश्चर्य वाटायचे : सख्खे भाऊ, पण दोघांत एवढा फरक? दोन ध्रुवच जणू! गावातल्या एका माणसाने याचे कारण शोधून काढायचे ठरवले. तो पहिल्या भावाला भेटला आणि त्याने त्याला त्याच्या अशा वागण्याचे कारण विचारले. तो म्हणाला, ‘‘माझे वडील असेच होते. रोज दारू पिऊन यायचे आणि आईला, मला आणि माझ्या भावाला मारायचे. लहानपणापासून त्याच वातावरणात वाढलोय तर मी तरी वेगळा कसा होणार?’’ तो माणूस दुसऱ्या भावाकडे गेला. त्यालाही त्याने तोच प्रश्न विचारला. तो म्हणाला, ‘‘माझे वडील रोज दारू पिऊन यायचे आणि मला, माझ्या भावाला आणि आईला मारायचे. लहानपणापासून तेच बघत होतो. त्यांच्या अशा वागण्याचा दुसऱ्यांना किती त्रास होतो ते मी अनुभवले आहे आणि म्हणून मी तसा झालो नाही.’’ दोन सख्खे भाऊ.. एकाच वातावरणात वाढलेले; तरी त्यांचे स्वभाव एकदम वेगळे.. याचे कारण दोघांनी आपल्याबाबतीत घडलेल्या घटनांचा लावलेला वेगवेगळा अर्थ.

घडणाऱ्या किंवा घडून गेलेल्या घटनांचा आपल्या मनावर परिणाम होतो हे आपल्याला माहितीच आहे. पण हा मानसिक परिणाम केवळ त्या घटनेचाच नसतो, तर त्या घटनेचा आपण आपल्या समजुती व श्रद्धा याद्वारे काढलेल्या अर्थावरही अवलंबून असतो. याच तत्वावर अल्बर्ट एलिस यांनी Rational Emotive Behaviour Therapy (R.E.B.T.) ही प्रसिद्ध मानसोपचार पद्धती विकसित केली. पण मानसोपचार पद्धती असे गंभीर नाव देण्यापेक्षा आपण तिला एक विचारपद्धती किंवा तत्त्वज्ञानही म्हणू शकतो; ज्याचा उपयोग आपल्याला मानसिक स्वास्थ्य टिकवण्यात होऊ शकतो.

आपण रोजच्या आयुष्यात ताणतणाव, राग, नराश्य, चिंता यांसारख्या नकारात्मक भावना  कमी-अधिक प्रमाणात अनुभवतोच. ताणाचा शरीरावर होणारा परिणाम, अति नकारात्मकतेमुळे आत्महत्यांचे वाढलेले प्रमाणदेखील आपण आजूबाजूला बघतोच आहोत. फएइळ मधला फ  म्हणजे ज्याला आपण विवेकनिष्ठ, तर्कसंगत, व्यवहारी विचार असे म्हणू शकतो. अशा विवेकनिष्ठ विचारसरणीनुसार नकारात्मक भावनांचं मूळ कोणत्या एखाद्या घटनेत दडलेलं नसून, त्या घटनेचा अर्थ लावणाऱ्या आपल्या अवास्तव आणि अविवेकी अपेक्षांत दडलेले असते.

यासाठी एलिस ABCDE असे विश्लेषणाचे प्रारूप वापरतो. A (Affective events/ adversary) म्हणजे घटना, B (belief) म्हणजे त्या घटनेबद्दल आपली झालेली समजूत आणि C (consequences) म्हणजे त्या घटनेचा परिणाम किंवा दिलेली भावनिक प्रतिक्रिया. उदा. प्रेमाला मिळालेला नकार ही घटना (A) असेल तर ‘मला आयुष्यात कधीच प्रेम मिळणार नाही’ किंवा ‘मी कधीच दुसऱ्या कोणावर प्रेम करू शकणार नाही’ ही मनाची झालेली समजूत (B) आणि त्याचा परिणाम (C) म्हणजे नराश्य किंवा आता जगूच नये असे वाटणारी तीव्र भावना. एलिसच्या म्हणण्यानुसार, अशा वेळेस आपल्या मनाची झालेली समजूत (B) ही अतक्र्य, अवाजवी, अविवेकी आणि अव्यवहारिक असते; ज्याचा परिणाम नकारात्मक भावना निर्माण होण्यात होतो.

एलिसच्या मते, आपल्यामध्ये तीन मूळ अविवेकी समजुती असतात- ज्याने आपण स्वत:लाच इजा पोहोचवतो. एक- मी नेहमीच (सर्वच बाबतीत आणि सगळ्याच वेळी) यशस्वी झालो पाहिजे आणि त्याबाबतीत लोकांची मान्यता मिळवली पाहिजे. तसे झाले नाही म्हणजे मी पूर्णत: अयशस्वी आहे. दोन- सर्व लोकांनी मला नेहमी चांगलेच वागवले पाहिजे. तीन- माझे आयुष्य  नेहमीच सहज, सोपे, त्रासमुक्त, आनंददायी असले पाहिजे. तसे ते नसेल तर ते फार भयंकर, भयानक, सहन न करण्याजोगे आणि न जगण्यायोगे असेल.

जेव्हा एखादी वाईट गोष्ट घडते तेव्हा आपल्या याच समजुतींमुळे निर्माण होणाऱ्या भावना आपली परिस्थिती आणखी वाईट बनवतात. या समजुती ओळखून आणि नवे विचार किंवा कृतीने त्या खोडून काढून आपण त्यांनी निर्माण होणाऱ्या भावना बदलू शकतो. म्हणजे वरील प्रेमभंगाच्या उदाहरणात अगदीच ‘तू नहीं तो और सही’ म्हणणे जमणार नसेल तरी एका व्यक्तीच्या मतावर आपले स्वत:चे मूल्यमापन करणे योग्य आहे का? भावनेच्या भरात मी ‘मला पुढे प्रेम मिळणारच नाही’ असे म्हणतो आहे; पण या म्हणण्याला खरेच काही आधार आहे का? सध्या मला वाईट वाटते आहे आणि अजून काही काळ वाटत राहील; पण मी ते सहन करू शकतो, स्वत:चा जीव द्यावा एवढी काही परिस्थिती वाईट नाही असा व्यावहारिक विचार करून मनाची नकारात्मकता कमी करता येऊ शकते. अशा या स्वतशीच वाद घालून आपल्या गैरसमजुती खोडून काढण्याच्या अवस्थेला D (Dispute) असे एलिस म्हणतो आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या भावनेला E (Effect) म्हटले जाते.

अर्थात सगळ्याच नकारात्मक भावना पूर्णत: वाईट असतात असे नाही. आपल्या मनात योग्य प्रमाणात निर्माण होणारा ताण, राग, नराश्य, चिंता या आपल्याला पुढच्या सक्षम वाटचालीसाठी आवश्यकच असतात. पण त्याचे प्रमाण वाढून मनाच्या मंदिरातला अंधार वाढायला लागला, की गरज निर्माण होते विवेकाचा दिवा लावण्याची! त्या दिव्याच्या प्रकाशात मनातील भूते तर दूर पळतीलच, पण गाभाऱ्यातील आपल्याच संयमी, सहनशील, शक्तिशाली अशा आनंदी स्व-रूपाचं दर्शनही आपल्याला घडू शकेल. REBT मधून आपण हे शिकू शकतो. नाही का?

parag2211@gmail.com