डॉ. संजय ओक sanjayoak1959@gmail.com
‘he Black hole’ नावाची एक अतिशय सुंदर इंग्रजी लघुफिल्म माझ्या पाहण्यात आली. झेरॉक्स मशीनवर काम करणारा व कामाने त्रासलेला एक कर्मचारी एक कमांड देतो आणि मशीन काळ्या रंगाचे एक मोठे चित्र पांढऱ्या कागदाच्या पार्श्वभूमीवर छापते होते. हेच ते ब्लॅक होल! हे काही साधेसुधे चित्र नसते, तर या काळ्या भोकातून माणसाचा हात आरपार जाऊ शकतो. हे कळल्यावर त्या बापडय़ाला आश्चर्याचा धक्काच बसतो. पण हळूहळू त्या आश्चर्याच्या भावनेचे पर्यवसान मोहात होते. तो समोरच भिंतीला लागून असलेल्या वेंडिंग मशीनच्या काचेवर हा कागद ठेवतो. आता त्याचा हात या काळ्या भोकामुळे काचेच्या दरवाजातून आरपार जातो आणि आतली चॉकलेट्स तो विनासायास काढून घेतो. त्याला जणू मि. इंडियाचा फॉम्र्युलाच गवसतो. आता त्याचा मोर्चा आतल्या खोलीतील कंपनीच्या सेफ लॉकरकडे वळतो. मोहाचे पर्यावसान लोभात होऊ लागलेले असते. ब्लॅक होलचा कागद तो तिजोरीवर ठेवतो आणि त्याचा हात त्यातून आरपार जातो. आतील थप्प्या हळूहळू बाहेर येऊ लागतात. तिजोरी खाली होऊ लागते आणि लोभ अविचाराकडे झुकू लागतो. आणखी पैसे आत आहेत का, हे पाहण्यासाठी हाताऐवजी तो आपले डोके ब्लॅक होलमधून तिजोरीत घालतो आणि आत वाकताना तोल जाऊन तो तिजोरीत पडतो. इकडे बाहेर त्या धक्क्याने ब्लॅक होलचे चित्र असलेला कागद तिजोरीच्या दरवाजावरून खाली पडतो आणि लोभ सुटलेला तो माणूस कायमचा तिजोरीबंद होतो. फक्त दोन मिनिटांत संपणाऱ्या या लघुफिल्मने एकही शब्द न बोलता, कोणतीही सबटायटल्स न दाखवता मानवी जीवनातले एक शाश्वत सत्य उलगडून दाखवले होते. लोभ हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे हे अधोरेखित केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एखादी गोष्ट आवडणे, हवीहवीशी वाटणे, ती फक्त आपल्यालाच मिळावी हा आग्रह निर्माण होणे, याचीच पुढची पायरी म्हणजे अमर्यादित मोह आणि लोभ. सीतेला कांचनमृगाच्या कातडय़ाच्या काचोळीचा मोह झाला. पण परस्त्रीचे हरण करण्याची रावणाची कृती ही मात्र अविवेकी लोभाची होती. भरताला राज्याभिषेक व्हावा या मोहाचे रूपांतर कैकयीच्या एकाधिकारशाही लोभात न होते तर श्रीरामाला चौदा वर्षांचा वनवास न भोगायला लागता. द्रौपदीच्या सहवासाचा लोभ कौरवांच्या पतनाला कारणीभूत ठरला. आपला शिष्योत्तमच एकमेव धनुर्धर ठरावा या लोभापायी द्रोणाचार्यानी जगावेगळी गुरुदक्षिणा मागितली. लोभ कधी स्त्रीसुखासाठी अतिरेक करता झाला, तर कधी सत्तेच्या विस्तारलालसेने मदांध झाला. आक्रमण करून इतर राज्यांची आणि राष्ट्रांची सीमा ओलांडून सीमारेषा पार करण्याची राक्षसी लालसा लोभातूनच निर्माण झाली.

लोभ ज्या मनात निर्माण होतो ते मनच त्याच्या निर्मिती आणि प्रकटीकरणास कारणीभूत ठरते. एखादी गोष्ट हवीहवीशी वाटणे ही भावना जेव्हा पराकोटीला जाते तेव्हा हव्यास निर्माण होतो. हाव ही त्याची पुढची पायरी. निसरडय़ावर पाय घसरला की माणूस लोभी बनतो आणि येनकेनप्रकारेण त्या गोष्टीची प्राप्ती हेच त्याचे एकमेव उद्दिष्ट उरते. लोभ मालकी हक्काच्या अग्नीला प्रज्ज्वलित करतो. ज्या गोष्टीचा लोभ सुटतो त्या गोष्टीवर माणसाला त्याचा एकटय़ाचा संपूर्ण, सर्वथव आणि सदासर्वदा अधिकार हवा असतो. ती दुसऱ्याबरोबर भागीदारीत नको असते. आपलाच विचार प्रबळ झाला की अप्पलपोटेपणा जन्म घेतो. लोभाने माणसाचे स्खलन होते, ते असे.

लोभाने विवेकाचा क्षय केला. मानवी मनाच्या सत्त्वशील, सुशील विचारांचा गळा घोटला. मर्यादांच्या लक्ष्मणरेषा पुसल्या आणि मदमत्त स्वैराचाराला आमंत्रण दिले. इथे पती-पत्नी नाती तुटली. भाऊबंदकीने भावाभावांचे प्रेम संपविले आणि मागे फक्त एक काळ्या रंगाचे भोक.. ‘ब्लॅक होल’ मागे ठेवले.

करोना संपल्यावर वैश्विक नव्या जगाची निर्मिती करण्याची संधी आपल्याला मिळेल. ‘बॅक टू बेसिक्स’ अशी ही काहीशी अवस्था असेल. हवेहवेसे वाटण्याच्या भावनेला किती हवा द्यायची याचा सारासार विचार आपण सर्वानी करायलाच हवा. तसेही आयुष्य अकल्पित आणि क्षणभंगुर असते. ‘आहे त्यात समाधान शोधा’ हा सर्वात मोठा धडा कोविड १९ व्हायरसने दिला आहे. त्याचा साकल्याने विचार आणि स्वीकार करण्याची गरज आहे.

तस्मात्.. लोभ असावा, लोभी नसावे.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mokale akash dr sanjay oak article black hole unlimited temptation and greed zws