शहरांतील महानगरपालिकेच्या आणि ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळांची अवस्था शोचनीय झाली आहे असे उच्चरवाने म्हटले जाते. त्यामुळे या शाळांविषयी, त्यातल्या शिक्षकांविषयी आणि तिथे दिल्या जाणाऱ्या शिक्षणाविषयी पालकांमध्ये नकारात्मक मानसिकता तयार झाली आहे. हे निष्कर्ष काही प्रमाणात खरे असतीलही; नाही असे नाही. पण याचा अर्थ असा नाही, की हे वर्णन सरसहा सर्वच शाळांना लागू पडते. ग्रामीण भागातल्या कितीतरी शाळा चांगल्या आहेत. तेथील शिक्षक जीव तोडून विद्यार्थ्यांना शिकवतात. अशाच काही शाळांविषयी एका गटशिक्षणाधिकाऱ्याने लिहिलेले ‘शाळाभेट’ हे पुस्तक. जिल्हा परिषदेच्या शाळांची कोणतीही आगाऊ पूर्वसूचना न देता नामदेव माळी यांनी तपासणी करताना आलेले सुखद अनुभव या पुस्तकातील सोळा लेखांमधून मांडले आहेत. ते खूपच आश्वासक आणि दिलासा देणारे आहेत.
या पुस्तकातील बहुतांश शाळा या पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. शिवाय त्या सामान्य अशा खेडय़ांतील आहेत, हे विशेष महत्त्वाचे. ‘थर्टी फाइव्ह उपक्रमांची शाळा : शहापूर’, ‘उपळीत होतेय सहज शिक्षण’, ‘आष्टेच्या शाळेतील सावित्रीच्या लेकी’, ‘शेतीचे धडे देणारी शेळकेवाडीची शाळा’, ‘स्पर्धापरीक्षेचं बाळकडू :  नाधवडे गावात’ या शीर्षकांवरूनच या शाळांच्या स्वरूपाची कल्पना येते. जिल्हा परिषदेकडून पुरवल्या जाणाऱ्या सुविधांपलीकडे जाऊन या शाळांतील शिक्षक जे उपक्रम आपापल्या परीने राबवू पाहत आहेत, ते पाहून लेखक अनेकदा अचंबित झाले आहेत. पहिल्या लेखातच त्याचा प्रत्यय येतो. गावातील पालकांचा सक्रीय सहभाग, सरपंचांचं चांगलं सहकार्य आणि शिक्षकांची तळमळ या तिन्हीचा मिलाफ होऊन शहापूरच्या शाळेत मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी जे प्रयोग राबवले जातात, ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत.
अशीच दुसरी शाळा आहे उपळीतली. पहिली ते चौथीचे वर्ग. मुलं १८, मुली १२. या मुलांमध्ये शिक्षकांनी बाणवलेली स्वयंशिस्त, चौकसपणा, हुशारी, अगत्य आणि कामसूपणा प्रत्ययाला येतो तेव्हा शिक्षकांचं शिकवण्यावरचं प्रेम आणि त्यांच्या कष्टांचं चीज विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही वाचता येतं. शाळेत असंही सकारात्मक काही घडू शकतं, हा आल्हाददायक दिलासा मिळतो.
तिसरी शाळा.. शेरेवाडीचा बुटका बंटी. डोकं आणि पोट मोठं. हा बंटी दुसरीच्या वर्गात आहे. तो उत्तम ताशा वाजवतो. बंटीला कमरेत वाकता येत नाही, त्यामुळे प्रातर्विधीसारख्या गोष्टींसाठी शाळेतले त्याचे मित्र त्याला मदत करतात. बंटी घरीही आई-बहिणीला घरकामात मदत करतो. शिक्षक त्याच्या कलागुणांचा कुशलतेने शाळेच्या कार्यक्रमांत वापर करून घेतात. हा बंटी ‘तारे जमीं पर’मधल्या इशांतची आठवण करून देतो, असे लेखक म्हणतात.
अशी प्रत्येक शाळेच्या कल्पकतेची, तेथील शिक्षकांच्या धडपडीची कहाणी या पुस्तकांतील विविध लेखांमधून उलगडत जाते. हे पुस्तक वाचून त्यातून प्रेरणा घेत समस्त शिक्षकांनी प्रयत्न करायचे ठरवले आणि त्यासाठी पुरेसा वेळ दिला तर काय काय करता येऊ शकतं, याची ही उत्तम उदाहरणे आहेत. अशा शाळांची संख्या जेवढी वाढेल, तेवढा शिक्षणाचा दर्जा उंचावत जाईल. सकारात्मक संदेश देणारं आणि आदर्श शिक्षण नेमकं कशाला म्हणायचं, याचं उत्तम उदाहरण असलेलं हे पुस्तक समस्त पालकांनी आणि शिक्षकांनी आवर्जून वाचावं असं आहे.  
‘शाळाभेट’ – नामदेव माळी, साधना प्रकाशन, पुणे, पृष्ठे- १४० रुपये, किंमत- १०० रुपये.