पी. विठ्ठल

शिक्षणानं स्वभान आलेल्या आणि वाचनामुळे प्रगल्भ झालेल्या स्त्रियांना जेव्हा त्यांच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागली; तेव्हा अनेकजणी परंपरेनं दिलेलं जगणं नाकारून स्वत:चं अवकाश शोधायचा प्रयत्न करायला लागल्या. आता तर लेखिकांचे हे भान टोकदार झाले आहे. चंद्रपूरसारख्या दुर्गम भागात राहून वस्तुनिष्ठ लेखन करणाऱ्या पद्मारेखा धनकर या त्यातल्याच एक लेखिका.

गेल्या काही वर्षांत पद्मारेखा धनकर यांनी अत्यंत वैविध्यपूर्ण कविता लिहिली आहे. ‘शलाका’, ‘फक्त सैल झालाय दोर’, ‘घेतलंय स्टेअरिंग हाती’ आणि ‘स्मशानात फुलं वेचताना’ हे चार कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. ‘शलाका’ या प्रारंभीच्या संग्रहाचा अपवाद सोडला तर इतर संग्रहातील कविता चिंतनात्मक आणि स्त्रीवादी भावच्छटा प्रकट करणारी आहे. पद्मारेखा धनकर यांची कविता विलक्षण गतीने बदलत गेल्याचे दिसते. ही कविता कोणत्याही एक साच्यात अडकून पडली नाही. तर निर्मितीच्या आंतरिक गरजेतून ती ‘बाई’पणाची विविध स्पंदने आविष्कृत करत राहिली.

त्यांची कविता पहिल्या चिंतनात खूप हळुवार उत्कटपणे प्रकट होते, पण ‘तू होतास फक्त वीर्य’ या दुसऱ्या विभागात मात्र ती खूप टोकदार होते. या लिहिण्याला केवळ धीट आविष्कार किंवा स्त्रीवादी कविता म्हणून मोकळे होता येणार नाही. कारण ही कविता केवळ एखाद्या स्त्रीची नाही तर ती अनिर्बंध अशा पुरुषी मानसिकतेचाही वेध घेणारी आहे. या कवितेत उपरोध किंवा उपहास नाही, तर लोकलज्जेस्तव सांभाळलेल्या संकेतांना कवयित्री उघड उघड छेद देते. कारण तिच्याकडे तिचा म्हणून असलेला एक ठाम उच्चार आहे. ‘तू होतास फक्त वीर्य’ किंवा ‘गर्भनिरोधक गोळ्यांचे पाकीट’ या दोन कविता पुरुषी परिवेशाचा बुरखा फाडणाऱ्या आहेत.

‘तू हरवलास द्राक्षाच्या घनघोर अरण्यात’ या शीर्षकाचा तिसरा विभाग या संग्रहात आहे. या विभागात एकूण सहा कविता आहेत.

‘झालेच गँगरीन तर’ या चौथ्या चिंतनात चार कविता आहेत. स्त्रीच्या सर्जक मनाचा, तिच्या अस्तित्वाचा विचार करायला लावणारी ही कविता आयुष्याच्या पडझडीचे वर्तमान मांडते. पद्मारेखा धनकर यांच्या ‘स्मशानात फुलं वेचताना’ या संग्रहातील एकूणच कविता स्त्री मानसिकतेच्या आंतरिक पातळ्यांना आविष्कृत करते. तिची परवड, तिचा मानसिक संघर्ष खूप भेदकतेने या कवितेत आला आहे. मराठी स्त्री कवितेला अधिक संपन्न करणारा हा संग्रह आहे.

‘स्मशानात फुलं वेचताना’- पद्मारेखा धनकर, शब्दालय प्रकाशन,

पाने- १३५, किंमत- २५० रुपये.

p.vitthal75@gmail.com