‘लोकरंग’मधील (२६ फेब्रुवरी) ‘भाषेच्या खऱ्या वैभवासाठी’ हा भूषण कोरगांवकर यांचा लेख आवडला. भाषा आणि धर्माचा काही संबंध नसतो, हा विचार अतिशय सुंदर पद्धतीने लेखकाने मांडला आहे. मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी भाषेत बोलणे आणि इंग्रजी भाषेत शिकूनसुद्धा मराठी भाषेत आपण बोललो, त्या भाषेतील करमणुकीचे कार्यक्रम पाहिले, पुस्तकं वाचली आणि आता सोशल मीडियावरील मराठी मुलांचे कन्टेन्ट पाहूनसुद्धा आपण ते करू शकतो. मी ख्रिश्चन मुलगा असून एक मराठी अभिनेताही आहे. माझे शालेय शिक्षण मराठी माध्यमातच झाले आहे. मी मराठी, मालवणी या दोन्ही भाषा बोलतो, तरीसुद्धा जेव्हा मी एखाद्या मराठी ऑडिशनला जातो, तेव्हा ऑडिशन संपल्यावर मी माझं नाव सांगतो, त्या वेळेस ऑडिशन घेणारा एका वेगळय़ा संशयाने बघतो (की याला मराठी बोलता येईल का). मी माझं नाव सांगितल्यावर मला दुसरा प्रश्न विचारला जातो- ‘ख्रिश्चन असून मराठी कसे बोलता?’ हा प्रश्न ऐकून मला प्रचंड चीड येते. मुळात धर्माचा आणि भाषेचा काही संबंध नसतो. मल्याळम, तमिळ, कन्नड बोलणारे किती तरी ख्रिश्चन अभिनेते आहेत; पण मराठीत एकही ख्रिश्चन अभिनेता नाही, असं का? हा प्रश्न मला नेहमीच पडतो. असोमला याबाबतीत माझं कोकण लय आवडतं. तिथे माझं नाव ऐकून कुणीही उपरोक्त प्रश्न विचारत नाही. अनेक जण मला सल्ले द्यायचे की, ‘तू हिंदूी सीरिअल्समध्ये अॅिक्टगचं करीअर कर. मराठीमध्ये तुला स्वीकारणं कठीण आहे.’ माझी मातृभाषा मराठी आहे आणि मी स्वत:ला एक अस्सल मालवणी मुलगा मानतो. लोकांनाही मी माझ्या कामामुळे नक्कीच कधी ना कधी हे पटवून देईन की, मी मराठी चित्रपटसृष्टीत काम करू शकतो.-वॉल्टर डिसोझा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मायबोली टिकवणं गरजेचं
‘भाषेच्या खऱ्या वैभवासाठी’ हा लेख वाचला. मराठी भाषक म्हणून बघण्याऐवजी हिंदू मराठी भाषिक म्हणून बघणं हा हट्ट अनाठायी आहे. अनेक मुस्लीम व्यक्ती अतिशय सुंदर मराठी बोलतात. त्यांना मराठी लोकांपेक्षा जास्त त्यांच्या संस्कृतीची जाण व ज्ञान आहे. वारकरी संप्रदायातही शेख महंमद नावाचे ‘नारळ कठिण दिसे बाहर, भितरी खोबरे अरूवार’ म्हणणारे संत होऊन गेले. संत तुकाराम, नाथ महाराजांचे गुरूही सूफी परंपरेतले होते. संत कबीरांचे गुरूही हिंदू आध्यात्मिक परंपरेतील आहेत. दुसऱ्या बाजूला बरंच लोकसाहित्य प्रमाण भाषेत नसतं. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या महाराष्ट्रातील कायम दुर्लक्षित भागांमधलं असतं. संत बहिणाबाई, संत ज्ञानेश्वर यांचं वऱ्हाडी – खानदेशी बोलीतलं लिखाण विपुल आहे. बहुजन साहित्यातही बोलीभाषेतलं प्रचंड लिखाण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे ते सध्याच्या पिढीतील अनेक लेखकांचं लिखाणही यात मोडतं. नागराज मंजुळे म्हणतात तसं शुद्ध-अशुद्ध भाषा नसतेच, ती फक्त विचारभावना पोहोचवण्याचं माध्यम आहे. फक्त आपली मायबोली टिकवणं आजच्या काळात गरजेचं आहे आणि ते फक्त ‘धन्य भाग्य आमुचे बोलतो मराठी’ असं म्हणून भागणार नाही तर त्यासाठी प्रयत्नही करावे लागतील. रिअॅलिटी शोचंही उदाहरण मस्त आहे-ऋषिकेश तेलंगे.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padsad religion and language have nothing to do with each other amy