रफ स्केचेस् : विर्सजन

विसर्जन ही एक हळुवार प्रोसेस आहे. जन्म आणि मृत्यूच्या सायकलबरोबर ती पाठोपाठ चालत राहते.

सुभाष अवचट Subhash.awchat@gmail.com

रेखाचित्र : अन्वर हुसेन

अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. चित्रकार हुसेन- आमच्यासाठी ‘आब्बाजान’- हे कोलकाता येथे मुक्कामाला गेले होते. तेथे त्यांनी ‘काली’ची मोठी पेंटिंग्ज त्यांच्या स्टाईलने चितारायला सुरुवात केली. आर्ट वर्ल्डमध्ये भारतभर ही बातमी पसरली. तेथे महिनाभरात त्यांनी ती पूर्ण केली. अर्थातच ती पाहायला गर्दी होतीच. त्याचे प्रदर्शन होणार याची उत्सुकताही होती. पण झाले भलतेच. आब्बाजाननी ती पेंटिंग्ज मोकळ्या जागेत आणली आणि पांढरा रंगाचा वॉश मारून दिसेनाशी केली. लोकांना, आर्ट वर्ल्डला तो धक्का होता. ‘प्रसिद्धीसाठी हुसेननी पुन्हा हे गिमिक केले’ असे मथळे वर्तमानपत्रांत झळकले. आब्बाजाननी इंटरवू दिला. त्यात सांगितले, ‘मी कालीचे विसर्जन केले.’’ ते प्रतीकात्मक विसर्जन होते कालीचे. पुढे त्यावर चर्चा सुरू होऊन ती संपलीदेखील; पण ‘विसर्जन’ हा शब्द किंवा विचार वयानुसार वयाबरोबर वाढत राहिला.

वाडय़ात अनेक माणसे होती. त्यात दामोदरकाकाही होते. त्यांचे वय मला कधी कळले नाही. ते एका खांबाला गुडघे पोटापाशी घेऊन बसायचे. पहाटेच्या काळोखात उठायचे आणि ‘दिगंबरा.. दिगंबरा’ घोकत राहायचे. दिवसा त्यांची विचारपूस करायला कुणी आले की म्हणायचे, ‘‘अरे अरे, माझं ‘इसर्जन’ करा रे!’’ सगळे म्हणायचे, ‘‘काका, किती घाई तुम्हाला! अजून लै टाईम आहे.’’ विसर्जनाच्या गावातल्या व्याख्या वेगळ्याच होत्या. त्या मला कळायच्या नाहीत. गणपती विसर्जनाला ते म्हणायचे गणेशाला ‘पोहचवून’ आलो. विसर्जनाचे अर्थ गावागावाप्रमाणे, बोलीभाषेनुसार, प्रांतांनुसार, प्रथांप्रमाणे बदलतात. ही आजची गोष्ट नव्हे. पुराणे, पंचतंत्र, नवीन चोला मंदिर, जुने चोला मंदिर, गरुड, स्कंध, ब्रह्मांड पुराणातही विसर्जनाचे वेगवेगळे अर्थ लपलेले आहेत. पण त्यांचा मूळ आत्मा एकमेकांशी जुळलेला आहे.

विसर्जन ही एक हळुवार प्रोसेस आहे. जन्म आणि मृत्यूच्या सायकलबरोबर ती पाठोपाठ चालत राहते. जन्मापासूनच तो कोश तुमच्याबरोबर वाढत जातो आणि विसर्जनाबरोबर तो कोश फुलपाखरू होऊन तुमच्याबरोबर उडत जातो. विसर्जन हा एक Derivable form आहे. हा मूळ शब्द ग्रीक भाषेतून आला आहे. आयुष्यातील चढउतारांची अनुभूती प्रत्येकाला मिळते. त्यातून सिंहावलोकनातून हा फॉर्म आपोआप तयार होत जातो. काहींना तो जाणवतो; काहींना भावतो. तर कित्येकांना तो स्पर्श करूनही जाणवत नाही. हे खरे तर अनुभवी प्रस्थानाचे सुंदर अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग असते. हाच फॉर्म, घटना, निसर्गात आहे आणि आपण निसर्गाचा एक छोटा हिस्सा. त्यामुळे तो आपलाच असतो. सतत जाणवत राहतो. विसर्जन हा गणपती विसर्जनाशी प्रामुख्याने जोडला गेला. गणपती हे ज्ञानाचे, कार्याच्या आरंभाचे दैवत मानले गेले आहे. तो इतर दैवतांपेक्षा वेगळा आहे. तो प्रत्येकाला आपल्या मनातल्या भावानुसार, प्रेमानुसार वैयक्तिक फॉर्ममध्ये दर्शन देतो. तो गुरू आहे. तो जंगलातल्या आदिवासीपासून ते फॅक्टरीतल्या कॉम्प्युटपर्यंत, हॉस्पिटल ते कामगार, अनेक परदेशांत वेगवेगळ्या रूपांत सिद्ध होतो. सर्वाना तो आपला वाटतो. त्यात लहान मुलांपासून ते त्यांच्या गोष्टीतली पुस्तके ते वृद्ध आजी-आजोबा, खेळाडू ते नाटय़गृहातील कलावंत, सिनेमासृष्टीतील मुहूर्तापासून ते लग्नकार्यात प्रत्येकाला तो जवळचा वाटतो. तो शुभारंभ करतो. कार्यातली संकटे दूर करतो. त्यामुळे अत्यंत जिव्हाळ्याची, गोड प्रतिमा त्याला लाभली आहे. त्याच्या निर्मितीचा इतिहासही मोठा आहे. गुप्तकालापासून तो आपल्याला वाचता येतो. तो वाजतगाजत येतो. सारे नटूनथटून, सारं घर सजवून त्याला आमंत्रित करतात. एक पवित्र उत्साह घराघरांत, रस्त्यांत, चौकांत, चाळी ते स्कायस्क्रेपरमध्ये दाटलेला असतो आणि विसर्जनाचा दिवस येतो. गजाननाचे भाग्य असे की त्याला वाजतगाजत नेतात. अनेकांची मने भरून येतात. सारं रिकामं वाटू लागतं. विसर्जन अत्यंत रिस्पेक्टफुली होतं. मनात एक ‘इटर्नल हॅपीनेस’ असतो. ‘पुढच्या वर्षी लवकर या!’ अशा प्रार्थनेने त्याला विश्रांतीला पाठवतात. विसर्जन हा एक ‘मिस्टिकल डिस्चार्ज’ म्हणावा लागेल. बाप्पाचे विसर्जन हे प्रतिमात्मक आहे. ते आपल्या जीवनाशी जोडलेले आहे. खरे तर जन्म हा Spotless Worship आहे. शिवपुराणात तर सोळा प्रकाराने ते मांडलेले आहे.

मनुष्याचे जीवन, जन्म, मृत्यू हा निसर्गाचा एक भाग आहे. तो वेगळा, स्वतंत्र करता येत नाही. जगण्याचा हव्यास कितीही केला तरी त्या अट्टहासाने ही प्रोसेस बदलत नाही. त्यासाठी अनेक दाखले पुराणापासून ज्ञानी देत आले आहेत. विशेषत: ते सर्व निसर्गाच्या आधारावरच आहेत. ‘प्रस्थान’ हा त्यातलाच एक आहे. ‘डिसचार्जिग’ हे सूत्र सांगताना ते नदीकडे पाहतात. धबधबे तारुण्यासारखे उफाळून सुरू होतात. उंच कडय़ावरून प्रचंड ऊर्जेने ते गरजत खोल दरीत धाव घेतात. त्या ऊर्जेचे सौंदर्य पेलत डोंगरदऱ्या सजतात. शेवटी ते खोल भूमीवर सामावतात. त्या वेगाचे रूपांतर नदीत होते. आणि नदी हजारो मैलांचे किनारे तयार करत निघते. झाडे, फुले, पक्षी, जनावरे, माणसांची तहान भागवत, वयाप्रमाणे वेगळे रूप धारण करत शेवटी ती संथ तरंगत वाहते आणि समुद्रात विसर्जित होते.

मनुष्याच्या जीवनाचा आराखडा समजून घेताना हेच, आणि अनेक प्रतिमात्मक संदर्भ दिलेले आढळतात. जन्म, ऊर्जा, शरीर, वय, अनुभव, सुखदु:खाचा प्रवास आणि नंतर समंजसपणे स्थित्यंतर हे चालत राहते. हे मात्रांचे गणित आहे. Drive out the defects which more about within and without…

Letting goहे त्यातले सूत्र आहे. हे वयाप्रमाणे, अनुभव आणि चित्तवृत्तीने समजून घेतले तर एका विलक्षण आनंदाला तुम्ही सामोरे जाता. त्या पीरियडमागे जगलेल्या क्षणांचे कीर्तन असते. संपण्याची भीती किंवा पश्चाताप नसतात. हे उमगणे हीच रिअलायझेशनची मात्रा आहे.

कुठे, केव्हा, कसे थांबावे ही एक कला आहे. ती सर्व कलांमध्ये लागू होते. कविता, कथा, कादंबरी, चित्र, शिल्पात कुठे थांबायचे याला संयम आणि विवेक लागतो. अन्यथा आशय भरकटत जातो. तसे जीवनातही घडते. माझ्याभोवती तरुणपणी अलौकिक माणसे होती. त्यांच्यामुळेच ही जाणीव मला होत गेली. विंदा करंदीकर माझे शेजारी आणि प्रतिभावंत कवी. एकदा त्यांनी ठणकावले की, आता मी लिखाण बंद करतो आहे. आणि त्यांनी शब्द पाळला. स्वत:शी प्रामाणिक राहून या निर्णयापर्यंत यावयास धारिष्टय़ तर लागतेच; पण विसर्जनाची बूजही लागते. तसेच तात्या माडगूळकरही होते. तेही माझे मित्र होते. आयुष्याच्या उताराला लागले तेव्हा या उमद्या लेखक, चित्रकार, शिकारी आणि प्रवासी माणसाने हाच मार्ग अवलंबला. ते म्हणायचे, ‘‘गडय़ा, जगण्याची आतून उमेद राहिली नाही.’’ विंदा शेवटपर्यंत प्रसन्न राहिले. भाजी, मासे आणायला आम्ही सोबतीने जात असू. मासेवाल्या बाईशी घासाघीस करायला त्यांना मजा येत असे. तेव्हा त्यांच्यातला कवी बहुदा त्यांच्या पिशवीत त्यांनी लपवून ठेवलेला असे. तितक्याच आत्मीयतेने ते संगीतात रमत. तसेच तात्या होते. संध्याकाळी आम्ही गप्पा मारीत फेरफटका मारीत असू. तेव्हा त्यांच्यातल्या अद्भुत लेखकाची सावली कुठेही त्यांच्याबरोबर चालत नसे. उरलेले जीवन एखाद्या कवितेसारखे गुणगुणत ही माणसे कुठलेही आविर्भाव न घेता जगले. पु. ल. देशपांडय़ांनीही वेळेनुसार आवराआवर केली. देणग्या देऊन, पुस्तके/ पुस्तकांचे हक्क त्यांनी वाटून टाकून ते मुक्त झाले आणि उरलेले आयुष्य एक गिफ्ट मिळाल्यासारखे हसत जगले.

‘‘जोपर्यंत लोकांना वाटते आपण अजून खेळावे, तीच थांबण्याची योग्य वेळ असते..’’ हे सुनील गावस्करचे वाक्य तंतोतंत यात बसते. कोठे थांबावे हाच संयम त्यात आहे.

विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणजे आमचे आबा. त्यांचा व्यासंग, प्रभुत्व, त्यांची जाण, अभ्यास, समाज सुधारण्यासाठीचे त्यांचे दीर्घ कार्य सर्वानाच ठाऊक आहे. त्यांच्या सहवासात मला हेच जाणवते. या प्रचंड ज्ञानाच्या ग्रंथसंग्रहालयातून ते अचानक जुन्या महाबळेश्वरच्या घरी गेले. ड्रायव्हरला सांगितले, ‘‘सकाळी काही घाई नाही.’’ ड्रायव्हर जेव्हा आत आला तेव्हा छातीवर हात ठेवून आबांचे विसर्जन झाले होते. ज्ञानी आणि भक्कम जीवनाचा अर्थ कळलेले हे ऋषीच म्हणावे लागतील. साहित्य सहवासात संध्याकाळी फिरताना गंगाधर गाडगीळ एकदा भेटले. गाडगीळ हे ब्रिटिश शिस्तीतले होते. सगळं नीटनेटके, वेळेवर असायचे- जसे त्यांचे वाङ्मय आणि आयुष्य होते. त्या संध्याकाळी त्यांचा ड्रेसदेखील इस्त्री केलेला, तंतोतंत होता. त्यांच्या मदतीला बरोबर नोकरही होता. मला त्यांनी थांबवले आणि म्हणाले, ‘‘मिस्टर अवचट, बरे झाले आत्ताच भेट झाली! आता पुढे भेट शक्य नाही.’’

‘‘परदेशी चाललाय का?’’ मी विचारले.

‘‘नाही. आत्ता सारे थांबवले आहे. लिखाण आणि इतर गोष्टी व्यवस्थित आवरल्या आहेत. औषधे बंद केली आहेत. आता एकेक मित्रांना भेटतो आहे. थँक्यू, तुमचा सहवास लाभला.’’ ते शांतपणे नोकराबरोबर फाटकापाशी चालत गेले. त्याच आठवडय़ात ते गेल्याचा निरोप आला. या लोकांनी हे विसर्जन किती समजूतदार आणि अलिप्तपणे स्वीकारले होते.

ओशोंनीही अत्यंत वेगळ्या संदर्भाने विसर्जनावर लिहिले आहे. Abandoning  करणे, सोडून देणे अशी सारी अंगे या विसर्जनात येतात. ओशोंनी शेवटी सांगितले, ‘‘माझ्या गळ्यात घातलेल्या माळा फेकून द्या. संन्याशी भगवे कपडे काढून टाका. स्वत:चा संन्यास स्वत: शोधा. जे मौनात विसर्जित होते तेच चांगले संगीत!’’ त्यांच्या या वाक्यातच जीवनाच्या संगीताचे अर्थ सामावले आहेत. जगण्याच्या या शर्यतीत प्रत्येक जण निराळे मार्ग शोधतो. बहुतेकांना ते आयते हवे असतात. कोणाच्या तरी खांद्याची, दैवताची डोके ठेवण्याची त्यांची गरज असते. पण विसर्जन हा तुमच्या बौद्धिक पातळीचा, मनाचा एक भाग आतल्या आत असतो; जो भाग एखादा गुरू प्रसाद म्हणून तुमच्या हातात देत नाही.

वयाप्रमाणे जीवनाशी सामील होणे यातच खरी ग्रेस आहे. अंगणात उन्हात तांदूळ निवडत बसलेल्या, साईसारखी त्वचा झालेल्या प्रेमळ आजीमध्ये ती ग्रेस असते.

कोऱ्या हॅण्डमेड पेपरवर रंगाचा पहिला ठिपका टाकल्यावर तो हळुवार पसरत जातो. पुन्हा अनेक रंगांत तो मिसळत जातो. त्याच्या कंट्रोल्ड ओघळांनी किंवा छटांनी एक चित्र बनते. कधी ते देखणे दिसते, कधी जमत नाही. हे महत्त्वाचे नाही. ती प्रोसेसच दैवी असते. त्या कागदावरच्या रंगाच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.. बदलत राहतात. विघटन हे अलौकिक अ‍ॅबस्ट्रॅक्ट नॅचरल चराचरातील मौनच असते.

‘समतया वसुवृष्टि विसर्जनै:’

जंगलात, ऋतुचक्रात हे सामावलेले असते. हत्तीला कळते आपले दिवस संपायला आलेत. कळपातून तो अपरात्री गुपचूप पाय न वाजवता निघतो आणि पूर्वीच शोधलेल्या गुप्त ठिकाणाकडे तो चालत राहतो. तो तेथे पोहोचतो आणि स्थिर उभा राहतो. त्याचा एवढा प्रचंड बलवान देह हळूहळू काही दिवसांत संपतो आणि मातीशी एकरूप होतो.. हे विसर्जन!

झाडाचे पिकले पिवळे पान फांदीवरून निसटते. हवेत तरंगत मौनाच्या प्रार्थनेसारखे जमिनीवर अलगद टेकते आणि विसर्जित होते. अगदी हळुवारपणे. विसर्जन ही मौलिक गिफ्ट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Painting rough sketches author subhash awchat visarjan zws

Next Story
पुस्तक परीक्षण : एकाकी व्यक्तीच्या अस्तित्वाच्या संघर्षकथा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी