प्राजक्त देशमुख
यंदा वारीला जायची इच्छा आहे. पण ती रखुपांडुरंगाला भेटण्यापेक्षा थोडय़ा वेगळ्या कारणासाठी. साधारण तीनेक वर्षांपूर्वी वारीत गेलो होतो. तेव्हा अनेकांसोबत निर्हेतुक गप्पा मारल्या होत्या. ज्यांच्याशी गप्पा मारल्या त्यांची नावं-गावं माहिती नाही. तेव्हा विचारलीदेखील नव्हती. आज ती लोकं आठवताय. काही नुसत्याच अस्पष्ट आकृत्या. काही स्पष्ट चेहरे. काही चेहऱ्यावरच्या खुणा.
एक हिरवं लुगडं नेसलेली एकटी आजी होती. शांतपणे बसल्या होत्या. झाडाला टेकून. पैसे मोजत. जरा चिंतेतच.
‘‘काय झालं आजी?’’
‘‘काय नी. पाचचा ठोकळा होता.. कुठं पल्डा की काय..’’
‘‘मग आहे की गेला?’’
‘‘गेला वाटतं बहुतेक.’’
मी विचारलं, ‘‘असे किती आणले होते पैसे?’’
‘‘मोप हुते. चांगले रग्गड साडेपाच्शे अन् वरती चाळीस.’’
पाचशे चाळीस रुपयेदेखील रग्गड असू शकतात, हे मला नव्यानं समोर आलं.
‘‘देऊ का?’’ माझा प्रतिक्षिप्त प्रतिसाद.
‘‘नाय.. नाय. अशी कनवटीला बांधेल वस्तू अशी जाते कशी?’’ असं मोघम बोलत बोलत नवी गाठ मारून त्या निघून गेल्या. एखादी आपली वस्तू आपल्या परवानगीशिवाय आपल्याला सोडून जाऊ कशी शकते, याचं त्यांना अप्रूप होतं.
एक शाळकरी मुलगा होता. तो शाळकरी वाटला, कारण पाठीवर थेट दप्तर होतं. तो सतत गर्दीत नाहीसा होत होता. माझी चालता चालता त्याच्यावर नजर होती. तो सतत हरवत होता. पुन्हा दिसत होता. शेवटी जेवताना एका पंगतीत पकडला.
‘‘कोणासोबत आला आहेस?’’
नि:शब्द.
‘‘पळून आलायस?’’
तो पळू लागला. त्याला हाताला धरला.
‘‘कुणाला नाही सांगणार. बोल तरी..’’
‘‘नक्की नाही सांगणार?’’
‘‘नाही. कितवीत आहेस तू?’’
‘‘नववीत.’’
‘‘कुठे फिरतोयस?’’
‘‘एका दिंडीसोबत माझं कुत्रं जाताना दिसलं. त्याला शोधतोय.’’
‘‘आणि घरच्यांना सांगितलंस? ते शोधत फिरतील ना?’’
‘‘जगन्याला सांगितलंय.’’
‘‘बरं, चल शोधू. मी पण मदत करतो.’’
‘‘नको. मोठय़ांवर विश्वास नाही माझा. ते फसवतात.’’
तो परत दिसेनासा झाला.
एक होता असाच. तुफान नाचायचा. दिंडीतल्या भजनाला टाळ वाजवायचा. नाचायचाच असा, की लक्ष जावं. बेभान नाच. चालता चालता हापसा दिसला. तो तिथे गेला. मी त्याच्या मागे. न सांगता. न बोलता. नजरानजर झाली. तो ओंजळ घेऊन उभा राहिला. मी हापसलं.
हे ही वाचा : पालखी सोहळ्याला सुरुवात तरी पंढरीच्या वाटेची प्रतीक्षा!
‘‘हो म्होरं.. मी हापसतो.’’
मग आमची अदलाबदली झाली.
‘‘कुठलं?’’ त्यानं विचारलं.
‘‘नाशिक.’’
‘‘टेक वाईच.’’
आम्ही टेकलो तिथंच.. हापशाच्या सिमेंटच्या कठडय़ावर.
‘‘सिगरेट?’’
मी ‘नाही’ म्हणालो. त्याने शिलगावली.
‘‘मस्त नाचतोस तू.’’ मी त्याला म्हटलं.
तो हसला. सवयीनं. बरेच जण त्याला म्हणाले असतील, तसाच मीही एक.
‘‘टेन्शनच इतकेय, की नाचण्याशिवाय काय करू शकतो?’’ तो म्हणाला.
टेन्शन आल्यावर नाचायचं? मी त्याच्याकडे फक्त पाहिलं.
तो झुरके मारत म्हणाला, ‘‘हे जरा आईचं मन राखायला थांबलोय. थोडी लाइन लावून दिली शेताची की निघेल. सुट्टी काढून आलोय. कॉन्ट्रॅक्टवर आहे एका शाळेत. कॉन्ट्रॅक्ट संपायला आलाय. परत रिन्यु होतो.. नाही होत. ती पहा आई आपली..’’
आई दीड पावली नाचत होती. खळखळून हसत होती.
‘‘बाप नाहीए आपल्याला. शेताचं टेन्शन उरावर घेऊन गेला. सुसाईट नाही केलं. उगा टेन्शन. अॅटेक. आईला म्हनलं, हे लास्ट टाईम जाऊ. पुढल्या खेपेला कुठंतरी कुल्लु फिल्लुला जाऊन येऊ. बर्फ दाखवतो तुला. भिंतीवर ढग घासल्यासारखा निवरून पडतो बर्फ. बाप निसता आषाढीत इकडं आणायचा. हीच तिची सहल. तेजायला देवाबिवाच्या पलीकडं असती की सहल. आमच्या आयबापाला सहल म्हटलं की शेवटं ठिकाण कुठलं तरी देवबिवच पाहिजे असतं.’’
‘‘शेतात काय लावलंय?’’
‘‘सोयाबिन लावलाय. मायला ती वेगळीच कटकट. यील यील. कुठं जातंय न येऊन?’’
तितक्यात आवाज आला. ‘‘हा आलो..’’ म्हणत सिगारेट चिरडून निघून गेला. दिंडी सरकत राहिली.
मधल्या काळात दोन आषाढी गेल्या. बिनादिंडीच्या. खूप मनात होतं- परत जाऊ. या लोकांना भेटू.
म्हातारीला तिचा पाचचा ठोकळा भेटला का? बारक्याला त्याचं कुत्रं मिळालं का? आईची सहल झाली का? कॉन्ट्रॅक्ट रिन्यू झालं का?
एक ना अनेक प्रश्न. मग वाटलं, ही लोकं नाचायला येतात की तिथल्या प्रश्नांपासून पळून यायला येत असतील? नाचायला येणारे असतीलच; पण नाचताना कोणत्या प्रश्नावर नाचत असतील ते?
ही लोकं भेटतील का या दिंडीत? यावेळी शोध घेणार आहे मी. पण कोविडकाळात ही लोकं उरली असतील तर.. ‘असतील’ असा आशावाद ठेवूनच जाऊ.
त्या रात्री परतीला गाडी बंद पडली होती. मित्र टायर बदलत होते. विचार आला..
काय आहेत या दिंडय़ा आणि ही वारी?
मी लिहिलं..
‘लोकहो, या दिंडय़ा नाहीतच
आनंदाचा, भक्तिरसाचा ओतप्रोत ओघ
हे आहेत जातिवंत दु:खांचे तांडे
छडी उगारलेल्या मास्तरासमोर
उभं राहिल्यानंतर
मिटल्या डोळ्यांमुळे छडी हळूच लागते
हा आंधळा आशावाद आहे या चालण्यात.
बी-पेरणीनंतर पावसाच्या आशेनं मार्गस्थ होणं
म्हणजे असतं तसलंच डोळ्यांचं मिटणं
पांढऱ्या पेहरावातला ढगाळ गावकरी
हिरवळ सोबत ठेवून
दिंडीत करडा वारकरी होतो
आणि पंढरीत पांडुरंगासोबत बरसत काळाभोर ढग होतो
सगळे पाश
सगळी देणी फिटल्याची कल्पना करत
रिंगणात बेभानता जगून घेतो
पण परतवारी चुकत नाही
जिथं देवांनाही भोगायला पाठवतात
तिथं जन्माला आलाय तुम्ही
मला सांग, इथं भोग कसे चुकतील?
पंढरपूरला निघालेल्या
जादा गाडीच्या बॅकला असलेल्या
सरकारी योजनेच्या
जाहिरातीवरच्या
हसऱ्या शेतकरी कुटुंबावर
उडतो यंत्रणेचा चिख्खल
मला सांगा, कसा म्हणू वारी पावेल?
तुक्याच्या बुडत्या चोपडय़ांमध्ये चमत्कार आहे,
तरंगत्या गाथांमध्ये नाही
दुखणं आणि दुष्काळ भोगणाऱ्यानं साजरं करावं
बघणाऱ्यानं नाही
लोकहो, या दिंडय़ा नाहीतच
हे आहेत जातिवंत दु:खांचे तांडे
deshmukh.praj@gmail.com