|| दिलीप माजगावकर

एकोणसत्तर साली ‘राजहंस प्रकाशन’ अन् ‘माणूस’चं स्थलांतर होऊन आम्ही मळेकर वाडय़ात आलो. वाडय़ाची जागा मोठी असल्याने आणि ‘माणूस’ ज्या प्रेसमध्ये छापला जात होता, तो दूर कोथरूड भागात गेल्याने आम्ही स्वत:चा छापखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. लवकरच लक्षात आलं की, केवळ ‘माणूस’च्या कामावर छापखाना चालू शकणार नाही; म्हणून त्याला बाहेरच्या कामांची गरज लागेल.

त्यावेळी ‘बालभारती’चं मुख्य ऑफिस मुंबईत होतं. तिथून काम मिळण्याची शक्यता होती. त्याने प्रेसचा कामाचा प्रश्नही सुटला असता. प्रसिद्ध लेखक शंकर पाटील त्यावेळी ‘बालभारती’चा हा विभाग बघत होते. ‘माणूस’मध्ये द. मा. मिरासदारांचं ‘ग्यानबाचं गुऱ्हाळ’ हे विनोदी सदर सुरू झालेलं होतं. त्यानिमित्ताने मिरासदारांचं दर सोमवारी ऑफिसमध्ये येणं व्हायचं. ते श्री. गं.चे जवळचे मित्र. त्यांच्याकडे विषय काढला असता ‘तू माझ्याबरोबर मुंबईला चल. आपण शंकरला भेटू..’ असं मिरासदार म्हणाले. भेट ठरली, वेळ ठरली. आम्ही दोघे त्यांना भेटलो. कामाचं बोलणं झालं. त्या दोघांच्या मनमुराद गप्पा झाल्या. टाळ्यांची देवाणघेवाण झाली. तासाभराने आम्ही तिथून निघालो.

त्यावेळी ‘बालभारती’चं ऑफिस वरळी भागात होतं. तिथून बाहेर पडून आम्ही टॅक्सीसाठी चालत चालत येत असताना वळणावर उजव्या हाताला ‘दै. मराठा’चं ऑफिस ‘शिवशक्ती’ लागलं. तिथे आल्यावर मी सहज मिरासदारांना विचारलं, ‘‘तुमची अन् अत्र्यांची चांगली ओळख आहे का?’’

मिरासदार म्हणाले, ‘‘छे रे! मी त्यांना एकदाही भेटलेलो नाही.’’

मला आश्चर्य वाटलं. कारण तोपर्यंत मिरासदार, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर ही मराठी साहित्यातील ठळक नावं झाली होती.

मी विचारलं, ‘‘मग जायचं का भेटायला?’’

ते म्हणाले, ‘‘तुझी ओळख आहे का?’’

मी म्हणालो, ‘‘मी अलीकडेच एक-दोनदा त्यांना त्यांच्या घरी भेटलो आहे. आपण जाऊन तर बघू.’’ मी साधा विचार केला- मिरासदार बरोबर असताना माझी भेट अत्र्यांच्या लक्षात नसली तरी मिरासदारांचं नाव मोठं आहेच. आम्ही दोघं तसेच ‘शिवशक्ती’त गेलो. खाली ‘साहेब आहेत का?’ अशी विचारणा केली. आहेत- असं कळलं. वर गेलो. बाहेरून चिठ्ठी पाठवली. त्यावर पहिलं नाव मिरासदारांचं लिहिलं, दुसरं माझं. माझा अंदाज खरा ठरला. त्यांनी ताबडतोब आत बोलावलं.

मला लख्ख आठवतंय, बाहेरच्या मोठय़ा हॉलमध्ये अत्रे एका मोठय़ा आरामखुर्चीत रेलून बसले होते. अंगात निळसर चौकटीचा बुशशर्ट. नुकतंच पायाचं ऑपरेशन झाल्यामुळे एक पाय थोडा वर घेऊन. समोरच्या टीपॉयवर सुक्या मेव्याची बशी होती. पायाशी त्यांचा मोठा कुत्रा बसलेला होता. हातात कुठलं तरी इंग्रजी पुस्तक होतं.

मिरासदारांना पाहताच अत्रे गरजले, ‘‘या.. या.. या, मिरासदार, या. अहो, तुमचं लिखाण मी सगळं वाचलेलं आहे. इतके दिवस कुठे दडी मारून बसला होतात?’’ असं म्हणत त्यांनी आमचं स्वागत केलं. माझी भेट त्यांच्या थोडीफार लक्षात होती, कारण मी बाबासाहेबांचा मेहुणा आहे, याची त्यांनी मला आठवण करून दिली. नंतर लगेचच काही आठवल्यासारखं अत्रे बोलले, ‘‘अरे, त्या बाबाला मला एकदा भेटायला सांग. मला एक शंका आहे. त्याच्या शिवचरित्रात आठव्या भागात भवानीदेवी महाराजांच्या स्वप्नात येते आणि भगवा ध्वज अन् भवानी तलवार देते असा उल्लेख आहे. पण तिसऱ्या भागात महाराजांचं सन्य मोहिमेवर जात असताना तिथे भगव्या ध्वजाचा उल्लेख येतो. मग हा भगवा ध्वज आधी कसा आला?’’ नंतर अत्रे म्हणाले, ‘‘अरे, तुझा भाऊ ‘माणूस’ साप्ताहिक चालवतो ना? मी काही अंक चाळले आहेत. तुमच्या यंदाच्या दिवाळी अंकात तो कोण पटवर्धन- त्याची अमेरिकेहून आलेली पत्रं मी वाचली. फार सुरेख आहेत.’’ मग म्हणाले, ‘‘काय रे, तुमच्या डोक्यावर कोर्टाचे किती खटले आहेत?’’ मी एकदम चमकलोच आणि म्हणालो, ‘‘नाही हो, तसा कुठलाच खटला नाही.’’ मग एकदम आवाज चढवत ते म्हणाले, ‘‘अरे, मग कसलं साप्ताहिक चालवता? साप्ताहिक चालवायचं तर पाच-दहा खटले डोस्क्यावर हवेतच. अहो, आम्ही ‘नवयुग’ चालवायचो, तर दर आठवडय़ाला एकजण तरी बोंबलत उठायचा.’’ इतकं बोलून अत्र्यांनी बोलण्याचा रोख मिरासदारांकडे वळवला.

नंतर दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. मी त्यात श्रोता होतो. सुरुवातीला पाच-दहा मिनिटं मिरासदार थोडे बुजल्यासारखे वाटले, पण नंतर खुलले. अर्थात बोलण्याचं काम अधिक करून अत्रेच करत होते. मिरासदार ऐकतच होते. विषयाला बंधन नव्हतं. राजकारण आलं, काँग्रेसवाल्यांना शिव्यांची लाखोली वाहून झाली. बोलता बोलता म्हणाले, ‘‘या काँग्रेसवाल्यांना कितीही उघडं करा; ते म्हणणार, काय उकडतंय!’’ असे हास्यविनोद अधूनमधून चालू होते. राजकारणानंतर साहित्य आलं. या वयात अन् या आजारात अत्रे किती अन् काय काय वाचतात, याचे ते देत असलेले संदर्भ बघून आम्हा दोघांनाही आश्चर्यचकित व्हायला होत होतं. त्यांच्या वाचनात मराठीचे नेहमीचे लेखक तर होतेच, पण नवनव्या ग्रामीण अन् दलित लेखकांचे संदर्भही अत्रे अचूक देत होते.

मधेच अत्रे म्हणाले, ‘‘मिरासदार, तुम्ही मुंबईला कशासाठी आला आहात?’’

‘‘अहो, राज्य नाटय़स्पर्धा चालू आहेत. त्याचा एक परीक्षक म्हणून मी आलोय.’’

अत्र्यांनी विचारलं, ‘‘मग? ती भिक्कार नाटकं बघत रोज बसता की काय?’’

मिरासदार म्हणाले ‘‘हो, बसावंच लागतं! ’’

अत्र्यांनी दोन्ही हात जोडले. म्हणाले, ‘‘माझा तुमच्याविषयीचा आदर वाढलाय.’’ नंतर त्यांनी विचारलं, ‘‘आतापर्यंत कोणतं नाटक बरं झालंय?’’

मिरासदार म्हणाले, ‘‘तशी दोन-तीन बरी झालीत. पण विशेष चांगलं झालंय नगरच्या एका संस्थेचं. कोणी मधुकर तोरडमल म्हणून लेखक-दिग्दर्शक आहेत. त्यांचा अभिनयसुद्धा चांगला आहे.’’

अत्रे म्हणाले, ‘‘ते ‘काळं बेट लाल बत्ती’ नाटक का?’’

मिरासदार ‘हो’ म्हणाले.

अत्रे म्हणाले, ‘‘नाटक स्वतंत्र आहे, असं म्हणतोय का? असेलही कदाचित. पण खात्री करून घ्या.’’ पुढे म्हणाले, ‘‘मिरासदार, जरा उभे राहा. मागच्या बाजूला जे पुस्तकांचं कपाट दिसतंय, त्यातल्या वरच्या कप्प्यातली पुस्तकं बघा. ती सगळी इंग्रजी नाटकं आहेत. ही सगळी आम्ही वाचलेली आहेत. तुम्ही नाटकं वाचता का? वाचत चला. खूप काही आपल्याला मिळतं. आजचे लेखक खूप चांगलं लिहितात, पण लेकाचे वाचत नाहीत. त्यांनी वाचलं पाहिजे. आमच्याकडे तेंडुलकर होते. गुणी माणूस. छान लिहायचा. बोलायचा कमी. चांगला रुळला होता आमच्याकडे. पण नोकरी न करता जगण्याचं वेड घेतलं आणि सोडून गेला. आमच्याशी न भांडता आम्हाला सोडून गेलेला हा पहिला महापुरुष.’’

पुढे अशाच गप्पा रंगल्या असता बाहेरून चिठ्ठी आत आली- ‘द. वा. पोतदार आलेले आहेत.’ ते आले. आमच्या खुच्र्याची अदलाबदल झाली अन् बठकीची सूत्रं पोतदारांकडे गेली.

अत्र्यांनी त्यांना विचारलं, ‘‘आज अचानक?’’

पोतदार म्हणाले, ‘‘कुठल्या तरी व्याख्यानमालेचं उद्घाटन करायचंय. गडकऱ्यांवर बोलणार आहे.’’

गडकऱ्यांचं नाव निघताच अत्रे सुखावले. मुळात पोतदारांविषयी त्यांच्या मनात फार आदर असावा असं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. मग विषय गडकऱ्यांवर आला आणि अत्रे गडकऱ्यांविषयीच्या कथा-दंतकथा सांगू लागले.. ‘‘अहो, लोक राईचा पर्वत कसा करतात बघा. म्हणे, गडकरी फार मद्यपान करत. छे हो! कसं करणार? मुळात ते चणीनं लहान. प्रकृती तोळामासा. कधीतरी एखाद् दोन पेग घेतले असतील-नसतील, पण लोक काहीबाही बोलतात.’’ नंतर गडकऱ्यांच्या नाटकांवर, भाषेवर अत्रे दिलखुलास बोलत होते. आमची निघायची वेळ झाली, म्हणून निघालो. पण वाटेत आम्ही दोघं अत्रेदर्शनावर खूप वेळ बोलत होतो. (विशेषत: त्यांच्या विलक्षण स्मरणशक्तीबद्दल!) या आमच्या भेटीनंतर दोनच महिन्यांत अत्रे गेले. तारीख होती- १३ जून १९६९.

त्याच दिवशी ‘माणूस’च्या पुढच्या अंकात अत्र्यांवर कोणाला लिहायला सांगायचं, असं श्रीगमांनी विचारलं. एक नाव विजय तेंडुलकरांचं होतं, म्हणून मी त्यांना फोन केला. पण ते मला फोनवर म्हणाले, ‘‘मी ‘किर्लोस्कर’साठी लिहिणार आहे. त्यातून वेगळं काही सुचलं तर पाठवतो.’’ चच्रेमध्ये श्रीगंना अचानक वि. स. खांडेकरांचं नाव सुचलं. पुण्या-मुंबईचे सर्व मान्यवर कोणा ना कोणासाठी लिहीत असतील, कदाचित भाऊसाहेब खांडेकर मोकळे असतील, या विचारानं श्री. ज. जोशी आणि मी कोल्हापूरला जाऊन खांडेकरांची मुलाखत घेण्याचं ठरवलं. श्री. ज. अर्थातच खूश झाले. आम्ही दोघं दुसऱ्या दिवशी निघालो. दुपारी कोल्हापूरला पोहोचलो. खांडेकरांना फोन केला. ते म्हणाले, ‘‘श्री. ज. बरोबर आहेत तर मला अत्र्यांवर गप्पा मारायला आवडेल.’’

तीन-साडेतीनच्या सुमारास आम्ही भाऊसाहेब खांडेकरांकडे पोहोचलो. नुकतीच विश्रांती संपवून ते आपल्या गादीवर बसले होते. पांढरा पायजमा, पांढरा शर्ट, गादीवर पांढरी चादर असं सगळं स्वच्छ वातावरण होतं. दृष्टी अधू होती, पण वाणी खणखणीत अन् स्पष्ट. अत्रे गेल्याचं दु:ख चेहऱ्यावर दिसत होतं. कितीही म्हटलं तरी त्यांचे ते समकालीन साहित्यिक. दोघांचा संबंधही बऱ्यापकी आलेला. नात्यात एक अकृत्रिम जिव्हाळा. भाऊसाहेब बोलायला लागले. जणू ते अत्रेमय झालेले होते. किती बोलू, किती सांगू असा अधीरपणा बोलण्यात होता. मधेच आवाज बारीक व्हायचा, पण एरवी स्पष्ट. म्हणाले, ‘‘खरं सांगू, श्री. ज.? अत्रे हा आमच्या काळातला सिंह. सिंहासारखं जगला आणि अनेक क्षेत्रांत त्यांनी तलवार गाजवली.’’ श्री. जं.नी विचारलं, ‘‘त्यांचा सर्वात कोणता गुण तुम्हाला भावला?’’

क्षणार्धात भाऊसाहेब म्हणाले, ‘‘कल्पनाशक्ती. इमॅजिनेशन पॉवर. ती त्यांच्याकडे भरपूर होती; ज्याचा त्यांनी साहित्यात, नाटक-चित्रपटात उपयोग करून घेतला. यामुळे अनेकदा गमतीही घडत. उदाहरणार्थ- एखाद्या ठिकाणी ते हजर नसतील, तरी तो प्रसंग जर त्यांच्या जिव्हाळ्याचा असेल तर कल्पनेनेच ते त्या प्रसंगात जाऊन उभे राहत. हे करण्यात त्यांचा कोणताही हेतू नसायचा. पण त्या प्रसंगात आपण नाही, हेच त्यांना मनातून मान्य नसायचं. मग ते कल्पनाचित्र रंगवायचे.

‘‘एक उदाहरण सांगतो. समजा, तुम्ही त्यांना पहिल्यांदा भेटत आहात. साहजिकच त्या पहिल्या भेटीत तुम्ही तुमची जुजबी ओळख करून देता. जात्याच अत्र्यांचा स्वभाव चौकस असल्यामुळे- ‘तुम्ही जोशी म्हणजे मूळ कुठले?’ तुम्ही सांगता- ‘मी वाईचा.’ साहजिकच तुम्ही वाईबद्दल काही माहिती सांगता.. ती कृष्णा नदी, तो घाट, बाजूचं एखादं झाड, झाडाशेजारची ती प्राज्ञ पाठशाळा- असं वर्णन करता. अत्रे कुतूहलाने ते ऐकतात. पुढे तुमचं काम झाल्यावर तुम्ही निघून जाता. मग कल्पना करा- दोन दिवसांनंतर हे माजगावकर अत्र्यांना भेटतात. कुठेतरी गप्पांत वाईचा विषय निघतो. समजा- माजगावकर तोपर्यंत वाईला गेलेले नसतील, तर अत्रे लहान मुलाच्या निरागसपणे  म्हणणार, ‘हे काय? तुम्ही वाईला गेला नाहीत? अहो, जा एकदा. फार छान गाव आहे.  ती नदी, तो घाट, ते झाड, ती प्राज्ञ पाठशाळा..’ असं सगळं वर्णन सांगून अत्रे म्हणतील, ‘अहो, त्या प्राज्ञ पाठशाळेत आमचं एक व्याख्यान झालं होतं. ही गर्दी२२२!’  श्रोत्यांना उभं राहायला जागा नव्हती.’ साहजिकच तुमची कल्पना होणार, की अत्रे आणि वाई यांचा खूपच जवळचा संबंध दिसतोय. तर असे हे अत्रे. त्यांच्यात कुठेतरी एक लहान मूल होतंच होतं. त्या निरागसपणाचं दर्शन मला अनेकदा घडलंय. त्यामुळे काही घोटाळेही झाले. एक सांगतो.. माझा भाऊ दोन वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा. तो फग्र्युसनला असताना अत्रेही त्याच्या आसपास शिकत होते. तो त्यावेळी शर्टाच्या कॉलरच्या आतून पांढरा रुमाल लावायचा. हे त्या काळात थोडं आधुनिक मानलं जायचं. मीही त्या काळात कॉलेजला जात होतो. अत्र्यांनी मला अनेकदा पाहिलंही होतं. पण मी कधी कॉलरला रुमाल लावत नव्हतो. मात्र, अत्र्यांची ठाम समजूत- मीच तो रुमाल लावणारा खांडेकर. मी त्यांना नंतर एक-दोनदा खुलासाही केला. पण ते म्हणायचे, ‘तुम्ही काय सांगताय? मी तुम्हाला रुमाल लावताना पाहिलेलं आहे !’ यावर मी काय बोलणार?’’

श्री. जं.नी तेव्हा एक छान प्रश्न विचारला, ‘‘काय हो, भाऊसाहेब, अत्र्यांनी त्यावेळच्या सर्व समकालीन साहित्यिकांवर झडझडून टीका केली, पण तुमच्यावर त्यांचा विशेष लोभ होता का? तुमच्यावर त्यांनी कधी तोफ डागलेली दिसत नाही.’’

भाऊसाहेब यावर सुरेख बोलले. म्हणाले, ‘‘गरसमज करून घेऊ नका. अत्रे हा आमच्या काळात जंगलातला सिंह होता. आणि सिंहाला जर रोज काही ना काही मोठी शिकार मिळाली तर तो सशाकडे पाहतसुद्धा नाही. या सिंहाला रोज शिकार मिळायची, म्हणून ते या सशाच्या वाटेला कधी गेले नाहीत आणि मी त्यांच्या तावडीत सापडलो नाही. तरी एक प्रसंग सांगतो.

‘‘एकदा माझं वसईला व्याख्यान होतं. व्याख्यान झालं. काही श्रोत्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. एकानं विचारलं, ‘का हो खांडेकर, अत्रे अन् फडके हे दोन दिग्गज एकमेकांचे वाभाडे काढताहेत. यात तुमची भूमिका काय?’ माझ्या प्रकृतिधर्मानुसार या वादात मला पडायचं नसल्याने मी इतकंच म्हणालो, ‘‘मी काय सांगणार? ते दोघेही थोर आहेत.’’

‘‘हे कुणीतरी अत्र्यांच्या कानावर घातलं असावं. अत्रेच ते! त्यांनी तेवढय़ात मला फटका मारलाच. पुढच्या ‘नवयुग’च्या अंकात पहिल्या पानावर अत्र्यांचा लेख. लेखाचं शीर्षक काय? ‘अत्रे-फडके थोर, मग खांडेकर काय पोर?’ यावर मी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.’’

श्री.जं.नी विचारलं, ‘‘अत्र्यांच्या स्वभावाबद्दल तुम्ही काय सांगाल?’’

भाऊसाहेब म्हणाले, ‘‘दोन प्रकारची माणसं असतात. दोन प्रवृत्ती समजा. एकजण असतो, तो कोणतीही कृती करण्यापूर्वी खूप विचार करतो. कधी कधी इतका, की तो कृती करतच नाही. दुसऱ्या प्रकारचा माणूस मनात येताक्षणी धाडकन् कृती करून मोकळा होतो, आणि मग त्याबद्दल विचार करायला लागतो. कधी कधी त्या अविचारी कृतीनं गोत्यातही पडतो. अत्र्यांची प्रवृत्ती दुसऱ्या प्रकारात मोडणारी होती. त्यामुळे ते अनेकदा गोत्यातही येत.’’

नंतर जवळजवळ तीन-चार तास भाऊसाहेब अत्र्यांबद्दल अनेक कथा, दंतकथा, किस्से अन् कहाण्या सांगत राहिले.

‘खरं म्हणजे अत्र्यांच्या विनोदावर प्रभाव होता तात्यासाहेबांचा- म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा. पण अत्रे स्वत:ला शिष्य म्हणवून घ्यायचे राम गणेश गडकऱ्यांचे. यात कोल्हटकरांचा ओसरता आणि गडकऱ्यांचा वाढता प्रभाव याचा जसा वाटा असेल, तसा अत्र्यांच्या कल्पनाशक्तीचाही भाग असणार..’ असं मार्मिक विश्लेषण करणारी विधानंही भाऊसाहेबांनी केली.

संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही भाऊसाहेबांच्या घरातून बाहेर पडलो. परतताना श्री. ज. आणि मी अत्र्यांवरच  बोलत होतो. श्री. ज. म्हणाले, ‘‘काय विलक्षण प्रतिभावान माणूस होता हा! साहित्य, नाटक, चित्रपट, राजकारण, पत्रकारिता, शिक्षण क्षेत्र- ज्या ज्या ठिकाणी त्यांनी पाऊल टाकलं, तिथे तिथे आपली नाममुद्रा उमटवली. गेल्या अर्धशतकभर महाराष्ट्राचं साहित्यिक अन् सांस्कृतिक क्षेत्र अत्र्यांनी अक्षरश: व्यापून टाकलं होतं.’’

भाऊसाहेबांचं बोलणं मनात घोळत असतानाच मला अत्र्यांबद्दल मंगेश पाडगावकरांशी झालेल्या आमच्या गप्पांची आठवण झाली. अत्र्यांचं साहित्य आणि वादळी आयुष्य याबद्दल बोलणं चालू असताना पाडगावकर म्हणाले होते, ‘‘विनोदातून भल्याभल्यांची रेवडी उडवणारे अत्रे, घणाघाती अग्रलेखांमधून समोरच्याला जेरीला आणणारे अत्रे, हजारोंच्या सभा वक्तृत्वाने दणाणून टाकणारे अत्रे ही अत्र्यांची रूपं सगळ्यांनाच माहीत आहेत. पण अत्र्यांच्या एका विद्यार्थ्यांनं त्यांचं एक हळवं, भावुक रूपही मला सांगितलं होतं. अत्रे या विद्यार्थ्यांच्या वर्गाला मराठी शिकवायचे. एकदा कवितेचा तास होता. पावसात भिजलेल्या, कुडकुडणाऱ्या पाखरावरची कविता अत्रे शिकवत होते. ती कविता अत्र्यांनी इतकी तल्लीन होऊन शिकवली! करुणरसानं भरलेली ती कविता शिकवताना ते स्वत:ही इतके भावुक झाले, की वर्गातल्या कितीतरी मुलांच्या डोळ्यांना झर लागली.

‘‘मात्र, आयुष्यातल्या नंतरच्या उलाढालींमध्ये अत्रे बदलत गेले. आपल्या तोंडून बाहेर पडणाऱ्या शब्दांच्या सामर्थ्यांवर हजारोंचा जनसमुदाय आपण झुलवू शकतो याचा साक्षात्कार झाल्यावर तर त्यांनी आपल्या अवघ्या शरीरालाच माईक बनवून टाकलं. या माईकमधून उमटणारा ध्वनी जसजसा वाढत गेला; तसतसा त्या भावुक अत्र्यांचा आवाज क्षीण होत गेला. एक प्रचंड अवाढव्य सार्वजनिक व्यक्तिमत्व लाभलेल्या ‘विश्वरूप’ आचार्य अत्र्यांपुढे ते हळवे, ‘सुकुमार’ अत्रे अधिकाधिक अंग चोरत गेले.’’

आज जेव्हा जेव्हा अत्र्यांची आठवण येते, तेव्हा पाडगावकरांचे हे शब्द माझा पाठलाग करतात.

rajhansprakashansales@gmail.com