‘पार्टीयाना’ प्रकल्पाच्या घवघवीत अपयशानंतर मी कानाला खडा लावला. पुन्हा टेलिव्हिजनच्या फंदात पडायचं नाही. निदान स्वत:च्या अक्कलहुशारीच्या (किंवा खिशाच्या) बळावर यापुढे कसलाच टेलिकार्यक्रम
एव्हाना इतर वाहिन्या सुरू झाल्या होत्या. त्या दूरदर्शनइतक्या सरकारी नियमांमध्ये जखडलेल्या नव्हत्या. तेव्हा त्यांचा राष्ट्रवाहिनीला बऱ्यापैकी शह बसला. मला झी टीव्हीने पाचारण केले. त्यांना तासाभराची टेलिनाटिका हवी होती. रंजनप्रधान, तुफान विनोदी अशी. अद्भुतनगरीमध्ये घडत असली तर उत्तमच. मारुतीच्या शेपटीप्रमाणे लांबत जाणाऱ्या शृंखलेपेक्षा एका ठोस, दमदार कृतीवर लक्ष केंद्रित करणे मला सोयीचे वाटले. दूरदर्शनसाठी मी आता ‘घर की मुरगी दाल बराबर’ ठरले होते. त्या तुलनेनं झीचं आमंत्रण अतिशय सन्मानपूर्वक आणि अगत्याचं होतं. त्यामुळे ते निश्चितच सुखावह वाटलं. बरं, त्यांचं बजेटही चांगलं होतं. मी त्यांना ‘हो’ म्हटलं. त्यांना हवी तशी महालात उलगडणारी एक अद्भुत कथा माझ्याकडे होती. राजमहालाच्या दालनांमधून लपंडाव खेळणारी. तिच्यात मूर्ख राजा, भोळसट राणी, लुच्चा प्रधान, बालिश राजकन्या, नखरेल नर्तकी, उमदा मुशाफिर अशा रंगतदार पात्रांची सतत साखळीची शिवाशिवी होती. थोडक्यात, गोष्ट खेळकर होती. ती ‘झी’च्या अधिकाऱ्यांना आवडली.
माझ्या कोणत्याही कलाकृतीसाठी मी नट फार परिश्रमपूर्वक निवडते. नाटक, सिनेमा, टी. व्ही. कार्यक्रम- काही असो. कलाकार भूमिकेत फिट्ट बसला की र्अध काम तिथंच होतं असा माझा अनुभव आहे. नेहमीपेक्षा जरा ‘हटके’ कलाकार घ्यायला मला विशेष आवडतं. ‘प्याराना’ हा निखळ फार्स होता. प्रेमाचा गडबडगुंडा. चक्रमादित्य राजासाठी मोहन आगाशे ठरला. मोहन पुण्याला आमच्या चिल्ड्रन्स थिएटरमध्ये काम करायचा. ‘झाली काय गंमत..’ या माझ्या बालनाटकात त्याने लाकडदंडय़ाचे झकास काम केलं होतं. तो आता पुण्याला
राजकुमारी पिंपळपल्लवीची (पिंपल) भूमिका वारसाहक्काने विनीने केली. राजघराणं छान जमून गेलं. बेरक्या प्रधानासाठी मी माझा आवडता नट रघुवीर यादव याला गाठलं. त्याला ‘मेस्सी साब’ या चित्रपटातल्या प्रमुख भूमिकेबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. माझ्या ‘दिशा’ चित्रपटात त्याने सोमा या शेतमजुराची व्यक्तिरेखा अतिशय ताकदीने उभी केली होती. मुंगेरीलालची त्याची टेलिसीरिअलसुद्धा गाजली होती. पण बोटावर मोजण्याइतक्या या काही भूमिका सोडल्या, तर त्याला त्याच्या योग्यतेला साजेल असं काम मिळालं नाही.
हम्फ्री बोगार्ट, जेम्स कॅग्नी, रॉड स्टीगर, मिकी रूनी, अँटनी क्वीन, होसे फेरर, बेटी डेव्हिस, जोन क्रॉफर्ड, जेन वायमन या नामांकित पाश्चिमात्य नट-नटींना रूढार्थाने स्वरूपसुंदर असं चुकूनही म्हणता येणार नाही; पण त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि कलानैपुण्य एवढं समर्थ होतं, की ती मंडळी कीर्तिशिखरावर अनेक र्वष तळपली. आपल्याकडे चॉकलेट हीरो वा हीरॉइन असेल तरच पडद्यावर दिसणार. एरवी पडदा खेचायलासुद्धा कुणी त्यांना उभं करणार नाही. राजनर्तकीचा शोध घेत घेत आम्ही थेट लोकनाटय़ाच्या फडापर्यंत पोहोचलो आणि एका नव्या नृत्यांगनेचा शोध लागला. सुरेखा पुणेकर. या बाईंचं नाव अलीकडे गाजू लागलं होतं. त्यांच्या अदाकारीचा बाजच वेगळा होता. लावणीनाचाचा नेहमीचा थयथयाट इथे नव्हता. उलट, मंचाच्या मध्यभागी एक पाय पुढे पसरून त्या साथीदारांच्या मध्यात बसल्या आणि खडय़ा आवाजात त्यांनी एकापाठोपाठ एक मादक अशा बैठकीच्या लावण्या पेश केल्या. क्वचित हाताच्या पंजाची भावपूर्ण मुद्रा, पावलाचा ठेका आणि बोलका चेहरा एवढय़ा भांडवलावर त्यांनी गच्च-भरला प्रेक्षक खिळवून ठेवला. अशा लावणीला घरंदाज लावणी म्हणावं का, असा विचार मनात येऊन गेला. बाईंना भेटायला नंतर आम्ही ग्रीनरूममध्ये गेलो. टेलिव्हिजन इ.बाबत त्या अगदीच अनभिज्ञ होत्या. त्या काहीशा गांगरून गेल्या. मग त्यांच्या वतीने कुणीएक इसम पुढे झाला आणि आम्ही रीतसर बोलणी केली. सुरेखाबाईंचा कॅमेराशी पहिला सामना हा फार मजेशीर प्रकार होता. फडातून त्या सरळ स्टुडिओत आल्या होत्या. साहजिकच तिथले दिवे, माइक्स, फट्कन वाजणारा क्लॅपबोर्ड, अंगावर चाल करून येणारा कॅमेरा हे सगळं अद्भुत विश्व पाहून त्या गांगरून जाणं अगदी स्वाभाविक होतं. त्यांच्या ‘टेक’च्या वेळेला त्या आपला संवाद म्हणत तरातरा चालू लागत, ते थेट शॉटच्या बाहेर. वाक्य संपेपर्यंत त्या चालतच राहायच्या. सेटवरची तमाम मंडळी त्या गेल्या त्या दिशेने अवाक् होऊन पाहत राहायची. हळूहळू त्यांनी शूटिंगचं तंत्र आत्मसात केलं. संकलन केलेलं नाटक पडद्यावर जेव्हा पेश झालं तेव्हा या प्रभातफेरीचा कुणाला संशयसुद्धा आला नाही. तर प्रीतीप्रमाणेच सुरेखा पुणेकर हीसुद्धा आमची काहीशी ‘हटके’ निवड होती.
समीर धर्माधिकारी हा मॉडेल म्हणून परिचित होता. नुकताच तो या नव्या माध्यमाकडे वळला होता. शॉट सुरू झाला, की तो आखडून जायचा. मग तो कॅमेराला घाबरायचा की मला, कोण जाणे. पण मुशाफिर म्हणून तो शोभला मात्र छान. पुढे खूप वर्षांनी मी त्याला एका मराठी चित्रपटात पाहिलं. छान सहज काम केलं होतं त्यानं. बरं वाटलं.
‘प्याराना’चं चित्रण आम्ही F. T. I. च्या भव्य परिसरात करावं असं मोहननं सुचवलं. तो तेव्हा तिथे प्रमुख संचालक होता. जेव्हा त्याला त्याचं शूटिंग नसे तेव्हा आपल्या ऑफिसमध्ये बसून रोजचं काम करता येई. राजाच्या वेशात, डोक्यावर हीऽ भलीथोरली पगडी पेलत मोहन आपल्या खुर्चीत बसून मिनिस्ट्रीशी टेलिफोनवरून वार्तालाप करी, ते दृश्य मोठं प्रेक्षणीय असे. F. T. I. I. च्या मागच्या बाजूला पुष्कळ झाडी होती. छोटेखानी जंगलच म्हणा ना! एक मोठा हौद होता. आता तो कोरडा होता. पण फार पूर्वी तुडुंब भरलेल्या याच हौदात ‘प्रभात चित्र’च्या कित्येक नावाजलेल्या चित्रपटांमधले बोलके प्रसंग चित्रित केले गेले होते.
‘शेजारी’चा क्लायमॅक्सचा प्रवेश- मिर्झा आणि जिवबा हे शेजारी मित्र तुफान पुरामधून आपली नाव धरणाकडे घेऊन जातात, ते थरारक दृश्य; ‘संत ज्ञानेश्वर’ चित्रपटात नुकत्याच पाण्यातून बाहेर पडलेल्या ज्ञानेशांच्या ओल्या पावलांच्या ठशांचा मागोवा घेऊन त्यांना पुष्पांजली वाहणाऱ्या नर्मदाचं भावदर्शन; आणि ‘संत तुकाराम’मध्ये मूर्त झालेला इंद्रायणी नदीचा घाट- हा सर्व सिनेइतिहास इथेच घडला होता. शांताराम आठवले यांच्या ‘प्रभातकाल’ या वेधक पुस्तकामध्ये हा सारा रोमहर्षक ‘ऑंखो देखा’ तपशील वाचायला मिळतो. या पावनभूमीत पुढे असंख्य चित्रपटांचं शूटिंग झालं. मी बालचित्र समितीमध्ये प्रमुख प्रोडय़ुसर असताना ‘सिकंदर’ हा बालपट केला होता. त्याचंही चित्रीकरण इथेच केलं होतं. आता ‘प्याराना’च्या निमित्ताने पुन्हा योग जुळून आला होता. आम्ही बाहेरचे सर्व देखावे इथेच तयार केले. राजकुमारी पिंपल घोडय़ावर बसून मुशाफिराला भेटते, ते इथेच.
‘प्याराना’चे महालाचे प्रवेश मात्र आम्ही पुण्याच्या येरवडा परिसराजवळ असलेल्या आलिशान आगाखान पॅलेसमध्ये चित्रित केले. आगाखान पॅलेसच्या परिसरात ‘नॅशनल मॉडेल स्कूल’ ही शाळा वसली होती. नावारूपाला आली होती. माझी दोन्ही मुलं अगदी लहान असताना काही र्वष या शाळेत शिकली. प्रिन्सिपल नगरवाला हे या शाळेचे प्रमुख होते. ते अतिशय रसिक आणि दिलदार होते. शाळेच्या राजेशाही दालनांमधून काम करायला त्यांनी आम्हाला आनंदाने परवानगी दिली. एवढंच नाही, तर काय हवं-नको ते, ते आवर्जून पाहत असत. आम्हाला उपडं करायचं वाळूचं घडय़ाळ मिळत नव्हतं, ते त्यांनी पुरवलं. वेळ पाहायला म्हणून वरच्यावर खिशातून ते घडय़ाळ काढून भुळुभुळु ओघळणारी वाळू पाहून रघुवीर किती वाजले, ते खात्रीपूर्वक सांगत असे. (तेव्हा मनगटी घडय़ाळं कुठली?)
..तर ‘प्याराना’ तयार झाली. आम्ही सगळे बऱ्यापैकी खूश होतो. पण प्रत्यक्षात जेव्हा ती प्रस्तुत झाली तेव्हा आमची प्रचंड निराशा झाली. कारण दर आठ-दहा मिनिटांनी जाहिरातींचा वर्षांव व्हायचा. मला वाटतं, की याआधी (आणि नंतरही!) एवढय़ा सलग जाहिराती मी कधीच पाहिल्या नसतील. त्या प्रस्तुतीमध्ये शेवटी अशी वेळ आली, की मधे मधे नाटिका दाखवल्यामुळे जाहिरातींमध्ये व्यत्यय येतो आहे की काय, असं वाटू लागलं. शेवटी वैतागून मी टी. व्ही. बंद केला. पूर्ण नाटिका पाहिलीच नाही.
पुढे सोनी टी. व्ही.च्या आमंत्रणावरून एका नव्या सीरियलच्या निर्मितीबद्दल चर्चा करण्यासाठी मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते. चांगली मनमोकळी चर्चा झाली. माझी कल्पना त्यांना आवडली. त्यांच्या अटी मला मान्य झाल्या. एकच अडचण होती- त्यांना किमान ५२ कडींची ग्वाही मी द्यायला हवी होती. हे शक्य नव्हतं. मी सौजन्यपूर्वक दिलगिरी व्यक्त केली आणि पुन्हा प्रकाशवाणीच्या वाटेला जायचं नाही असा निश्चय करून घरी परतले. ‘प्याराना’ ही माझी टी. व्ही.वरची अखेरची सलामी ठरली.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2014 रोजी प्रकाशित
‘प्याराना’
‘पार्टीयाना’ प्रकल्पाच्या घवघवीत अपयशानंतर मी कानाला खडा लावला. पुन्हा टेलिव्हिजनच्या फंदात पडायचं नाही.
First published on: 23-11-2014 at 12:57 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pyarana in ftii pune