रधों आणि स्त्री-लैंगिकता

र. धों. कर्वे यांच्या प्रखर बुद्धिवादाचा आजच्या बुद्धिमांद्य आलेल्या समाजाला परिचय व्हावा, या हेतूने महाराष्ट्र फाऊंडेशनने (अमेरिका) रधोंवर www.radhonkarve.com हे संकेतस्थळ तयार केले आहे.

र. धों. कर्वे यांच्या प्रखर बुद्धिवादाचा आजच्या बुद्धिमांद्य आलेल्या समाजाला परिचय व्हावा, या हेतूने महाराष्ट्र फाऊंडेशनने (अमेरिका) रधोंवर http://www.radhonkarve.com हे संकेतस्थळ तयार केले आहे. रधोंनी लोकांमध्ये वैचारिक जागृती करण्यासाठी ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक त्यांच्या मृत्यूपर्यंत चालवले. या संकेतस्थळावर ‘समाजस्वास्थ्य’चे सर्व अंक विनामूल्य उपलब्ध होणार आहेत. या संकेतस्थळाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते उद्या (३० मे) होत आहे. त्यानिमित्ताने डॉ. अंजली जोशी यांचा हा संपादित लेख..
संततिनियमनाचे भारतातील आद्य पुरस्कर्ते म्हणून र. धों. कर्वे यांचे नाव महाराष्ट्राला सुपरिचित आहे. १९२१ मध्ये पत्नी मालतीबाईंसमवेत भारतातले पहिले संततिनियमन केंद्र सुरू करून त्यांनी या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर १९२७ मध्ये ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक चालू केले. हे मासिक, ग्रंथलेखन आणि केंद्राद्वारे मार्गदर्शन व साधने पुरविणे अशा सर्व आघाडय़ांवरून १९५३ पर्यंत- म्हणजे सुमारे पंचवीस वर्षांपेक्षाही जास्त कालावधीपर्यंत या कार्याचा आलेख त्यांनी उंचावत नेला. एखादे कार्य दीर्घकाळ चालू ठेवावयाचे असेल तर त्या कार्याबाबत नुसती आस्था किंवा कळकळ असणे पुरेसे नसते, तर त्यासाठी सैद्धांतिक बैठक पक्की असावी लागते. रधोंनी अंगीकारलेली बुद्धिवादाची/ विवेकवादाची बैठक इतकी भक्कम होती, की त्याच्या बळावरच ते या महान कार्याच्या मार्गावरील अडचणी व विरोध यांना समर्थपणे तोंड देऊ शकले.
रधोंचे मुख्य बलस्थान म्हणजे त्यांची लेखणी. त्यांनी लेखणीची तलवार एकदा परजण्यास सुरुवात केली की ती भल्याभल्यांना गारद करत असे. अत्यंत रोखठोक, मर्मभेदी, तर्कशुद्ध अशी त्यांची भाषा दांभिकतेबद्दलची चीड उफाळून आली की तिरकस व बोचरीही होत असे. रधोंच्या लेखणीने फक्त संततिनियमनाचेच विषय हाताळले नाहीत, तर साहित्यापासून ते अनेक सामाजिक विषयांनाही तिने स्पर्श केला. त्यांचे सर्वात उल्लेखनीय लिखाण म्हणजे कामशास्त्रावरील लिखाण होय. संततिनियमनाचा गाभा म्हणजे ‘निकोप स्त्री-पुरुष कामसंबंध’ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा व अभ्यासाचा विषय होता. १०० वर्षांपूर्वी जेव्हा ‘लैंगिकता’ हा शब्द उच्चारण्यास पुरोगामी लोकही बिचकत होते, अशा समाजात या विषयाची खुलेपणाने चर्चा केल्याशिवाय त्याबद्दलचे अडसर दूर होणार नाहीत, हे त्यांनी जाणले होते. ‘समाजस्वास्थ्य’ मासिकात ते म्हणतात, ‘या मासिकात लैंगिक विषयांना प्राधान्य मिळाले आहे, याचे कारण स्वत:ला बुद्धिवादी म्हणवणारे लोकदेखील या एका विषयात मात्र बुद्धिवादाचा उपयोग करावयास तयार नसतात.’ असा समाज सभोवताली असताना लैंगिकतेचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करून चिकित्सा करणे हे फारच क्रांतिकारी होते. आणि त्याहूनही क्रांतिकारी म्हणजे त्यांनी वेळोवेळी केलेले स्त्री-लैंगिकतेवरचे भाष्य.
पुरुषप्रधान संस्कृतीत होणारी स्त्रीची गळचेपी, स्त्रीशिक्षण, स्त्री-पुरुष समानता अशा विषयांवर लोकजागृती करणारे व त्यावर काम करणारे समाजसुधारक त्या काळात आजूबाजूला होते; पण स्त्री-लैंगिकतेसारख्या विषयाला हात घालणे ही फारच उत्तुंग झेप होती. फक्त भारतातच नव्हे, तर जागतिक पटलावरही कामशास्त्राबाबत पुरेशी जागृती येणे बाकी होते व स्त्री-लैंगिकतेचे दालन अजून खुलेही झाले नव्हते, अशा काळात या अस्पर्श विषयावर जाहीरपणे लिहिणे हे केवळ धारिष्टय़ाचेच नव्हते, तर ते काळाच्या कित्येक पावले पुढे असल्याचेही द्योतक होते.
रधोंनी स्त्रीचा ‘व्यक्ती’ म्हणून मानवी भूमिकेतून केलेला विचार त्यांना अधिक उंचीवर घेऊन जातो. त्यांनी लैंगिकतेत स्त्री-पुरुष असा भेद केला नाही. किंबहुना, या दोघांकडेही त्यांनी एक व्यक्ती किंवा मानव अशा एकात्मतेनेच पाहिले. त्यामुळे जागृती दोघांमध्येही करावयास हवी; पण धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, पारंपरिक नीतिनियम पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या बाबतीत जाचक व कडवे असल्यामुळे स्त्रियांच्या कामवासनेचा कोंडमारा जास्त होतो, असे त्यांचे निरीक्षण होते. या कोंडमाऱ्याला त्यांनी सर्वप्रथम वाचा फोडली.
स्त्री-लैंगिकतेला असलेली सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शरीरशास्त्रीय अशी अनेक परिमाणे त्यांनी उलगडून दाखवली. कामवासनेचा संबंध पापाशी जोडणे, तद्नुषंगिक इंद्रिये अश्लील ठरविणे अशा धर्मकल्पनांवर ते तुटून पडत. विनय, पावित्र्य, कौमार्य, पातिव्रत्य अशा केवळ स्त्रियांनाच लागू असणाऱ्या सामाजिक नीतिनियमांमधला दुटप्पीपणा त्यांना सहन होत नसे. त्यावर ते कडाडून हल्ला करत. धार्मिक कायदा पुरुषांना कसे झुकते माप देतो हे सांगताना ते म्हणतात, ‘‘हल्लीच्या धार्मिक कायद्याने स्त्रियांवर समागमाची सक्ती असते. हा रानटीपणा आहे. याबाबतीत वेश्यांस जे स्वातंत्र्य असते तेही विवाहित स्त्रियांना नसते.’’ ‘‘स्वातंत्र्याचे पाणी अंगात मुरल्याशिवाय स्त्रियांची स्थिती कधीही सुधारणे शक्य नाही,’’ हे ते पोटतिडिकीने सांगत. रधोंना अभिप्रेत असणारे स्वातंत्र्य हे केवळ आर्थिक, शैक्षणिक अशा स्वरूपाचे नव्हते, तर ते विचारांचे स्वातंत्र्य होते. स्त्री वैचारिकदृष्टय़ा स्वावलंबी झाली पाहिजे, स्वत:च्या हक्कांचा लढा तिने स्वत: पुढे येऊन लढला पाहिजे, पारंपरिक बंधनांतून स्वत:ची सुटका करून घेतली पाहिजे यासाठी ते सतत आवाहन करत. वेळप्रसंगी स्त्रियांना फटकारायलाही ते मागेपुढे पाहत नसत. ‘‘विवाह हा बहुतेक स्त्रियांचा धंदा असतो. त्यांस पुष्कळ वेळा स्वत:चे पोट भरण्याची अक्कल नसते व ज्यांस असेल त्यांसही विवाहामुळे अधिक सुखात राहता येईल असे वाटते, किंवा स्वत:ची जबाबदारी स्वत:वर घ्यावयास नको असते..’’ अशा शब्दांत ते स्त्रियांना खरमरीतपणे सुनावतात.
स्त्रीच्या शरीरावर व मनावर केवळ तिचा स्वत:चाच हक्क असला पाहिजे, ती नवऱ्याची किंवा इतर कुणाचीही मालमत्ता नाही, हे ते ठणकावून सांगत. प्रचलित विवाहसंस्था स्त्रियांवरच्या मालकी हक्काचे कसे छुपे समर्थन करते, हे सांगताना त्यांच्या लेखणीला धार येई. स्त्रीला मालमत्ता समजणाऱ्या व्यक्तींबद्दल- अगदी ते तिचे वडील असले तरी ते भीडभाड ठेवत नसत. एका लेखात ते म्हणतात, ‘‘स्वत:च्या मुलीचा संबंध तिच्या मर्जीविरुद्ध अयोग्य माणसाशी जुळवणारे बाप वेश्यांच्या मध्यस्थांपेक्षाही नीच दर्जाचे आहेत.’’
रधोंनी मुक्त समागम स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. दोन व्यक्तींची परस्परसंमती असेल तर कायद्याला त्यांच्या सुखाच्या आड येण्याचे कारण नाही अशी त्यांची भूमिका होती. समागम हा सर्वाचा मूलभूत हक्क आहे. स्त्रियांनाही लैंगिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे यासाठी ते आग्रही होते. संभोगसुखासाठी किंवा अपत्यप्राप्तीसाठी स्त्रीला नवऱ्याची ताबेदारी सहन करण्याची गरज नाही. ‘‘कोणत्याही स्त्रीस अपत्याचा हक्क असला पाहिजे व याकरिता तिला कोणाचीही गुलामगिरी पत्करावी लागता कामा नये,’’ हे ते कळकळीने सांगत. स्त्रियांचे आर्थिक स्वातंत्र्यही ज्या काळात समाजाच्या पुरेसे पचनी पडले नव्हते, त्या काळात स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्याचा आग्रह धरणे हे त्यांच्या द्रष्टेपणाचे निदर्शक आहे.
एकत्र कुटुंबात राहणाऱ्या विवाहित स्त्रियांची लैंगिक घुसमट जशी त्यांनी शब्दबद्ध केली, तशीच एकटय़ा राहणाऱ्या स्त्रियांच्या घुसमटीलाही त्यांनी वाचा फोडली. एकटय़ा स्त्रियांची लैंगिक घुसमट ही विवाहित स्त्रियांपेक्षा व एकटय़ा पुरुषांपेक्षा जास्त होत असेल हे त्यांनी समजून घेतले. ‘‘ज्या पुरुषांना लग्न करायचं नाही किंवा ज्यांचं लग्न होत नाही, त्यांना लैंगिक सुखासाठी वेश्या उपलब्ध असू शकतात; मग ज्या स्त्रिया लग्न करीत नाहीत किंवा ज्यांची लग्नं होत नाहीत किंवा ज्या विधवा, परित्यक्ता आहेत, त्यांनी काय करावं? या स्त्रियांनाही स्वत:चं लैंगिक सुख घेण्याचं स्वातंत्र्य हवं,’’ असं मत व्यक्त करून एकटय़ा स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्याचा प्रश्नही त्यांनी ऐरणीवर आणला. एकटय़ा राहणाऱ्या स्त्रियांप्रमाणे वेश्यांच्या मानसिकतेचाही विचार त्यांनी केला. ‘‘आपले डोके विकणाऱ्या वकिलापेक्षा वेश्येला हीन का समजावे?’’ असा सवाल उभा करून वेश्यांना हीन मानणे ही शिवी आहे, असे खडे बोल त्यांनी सुनावले.
कामवासनेला नीती-अनीतीच्या, पाप-पुण्याच्या तराजूत तोलण्यास ते कडाडून विरोध करत. लैंगिक नीतीची त्यांची भूमिका अगदी सडेतोड आहे. ‘‘कोणावरही जुलूम होता कामा नये, रोगांचा प्रसार होऊ नये व सामाजिक दृष्टीने अनिष्ट संतती होता कामा नये..’’ ही नीती स्त्री-पुरुष दोघांसाठीही समान आहे. ते म्हणतात, ‘‘कोण किती जेवतो यावरून जशी कोणाची किंमत ठरवणे योग्य नाही, त्याचप्रमाणे कोणाचा किती स्त्रियांशी किंवा पुरुषांशी संबंध आहे यावरून कोणाचीही किंमत कमी किंवा जास्त होत नाही.’’ थोडक्यात, कामवासनेवरून स्त्री-पुरुषांवर शिक्के मारणे किंवा त्यांना कुठल्याही चौकटीत कोंबणे कसे चुकीचे आहे व कामक्षुधेला वेगळे नियम न लावता तिला झोप, भूक अशा इतर क्षुधांसारखेच समजले पाहिजे, हे त्यांचे तर्कशुद्ध प्रतिपादन निश्चितच मननीय आहे.
स्त्री-लैंगिकतेचे अनेकविध पैलू त्यांनी लिखाणातून वेळोवेळी विशद केलेच, परंतु शरीराची स्वच्छता हाही लैंगिक नीतीचा एक भाग आहे असा अभिनव सिद्धांत मांडून त्यांनी लैंगिक नीतीला अजून एक व्यापक परिमाण दिले. शरीरस्वच्छता हा घटक कामसंबंधांत सहसा दुर्लक्षिला जातो. त्याकडे लक्ष वेधून गुदद्वाराची, जननेंद्रियांची, तोंडाची स्वच्छता कशी राखावी हे सांगून त्यांचे निरोगी कामजीवनातले महत्त्व ते वर्णन करतात. पुरुष जर अशी स्वच्छता पाळत नसतील, तोंड नीट धुवत नसतील तर स्त्रियांना शरीरसंबंधांत कसा त्रास होऊ शकतो याचं वास्तवदर्शी चित्रण ते करतात. स्त्रियांच्या भूमिकेत शिरून त्यांना असा त्रास होत असावा व त्यामुळे त्यांची कामवासना विझून जात असावी, याचे त्यांनी केलेले विश्लेषण थक्क करते.
कपडय़ांमुळे स्त्री-शरीराबद्दल फाजील उत्सुकता निर्माण होते. अश्लीलतेचे मूळ त्यातच आहे. या मुळावरच घाला घालण्यासाठी रधोंनी अजून एक धाडसी पाऊल उचलले. ते म्हणजे ‘समाजस्वास्थ्या’च्या मुखपृष्ठावर नग्न स्त्रीचे चित्र छापण्यास त्यांनी सुरुवात केली. स्त्री-शरीराकडे पाहताना अश्लीलतेचे भूत मानगुटीवरून उतरवून निकोप दृष्टीने त्याकडे पाहता यावे म्हणून त्यांनी केलेले हे धाडस अभूतपूर्व होते.
रधोंनी टिपलेला स्त्री-लैंगिकतेचा एक लक्षवेधी आणि महत्त्वाचा पैलू म्हणजे स्त्रिया कामतृप्तीचा उत्कर्षिबदू कसा गाठू शकतात याबद्दलचे त्यांनी केलेले विवेचन. ते मुळातून वाचले पाहिजे. त्यांचा याबाबतीतला अभ्यास म्हणजे द्रष्टेपणाची कमाल मर्यादा आहे. पुढे ५०-६० च्या दशकात त्यांचे याबाबतीतील निरीक्षण शास्त्रीय पुराव्यावर सिद्ध झाले; पण त्याचे सूतोवाच रधोंनी दोन दशके आधीच केले होते. ‘आधुनिक कामशास्त्र’ पुस्तकात तर त्यांनी स्त्री-जननेंद्रियांच्या रचनेबद्दल, तिच्या अंतर्वस्त्रांबद्दल, तिच्या कामोद्दीपनाबद्दल, कामचेतनेच्या पर्यायाबद्दल, रतिक्रियेत तिला येणाऱ्या अडचणींबद्दल, योनिमार्गाच्या स्वच्छतेबद्दल इतके काटेकोर व विस्तृत विवेचन केले आहे की आधुनिक स्त्रियांनाही स्वत:च्या शरीरप्रक्रियांची इतकी तपशीलवार माहिती नसावी.
लैंगिकतेच्या अभ्यासात मानदंड ठरलेले अल्फ्रेड किन्से (१९५३), मास्टर्स व जॉन्सन (१९६६), शिआ हाइट (१९७६) यांचे अभ्यास नंतरच्या काळात जगापुढे आले, तेव्हा रधों हयात नव्हते; पण त्यांचे निष्कर्ष पाहिले तर रधोंची स्त्री-लैंगिकतेबद्दलची कितीतरी निरीक्षणे अचूक होती याचा पडताळा मात्र येतो व त्यांच्या कार्याची महती अजूनच दृढ होते. रधोंच्या कार्यात एकनिष्ठतेने साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी मालतीबाई किंवा त्यांच्या कार्याशी समरस झालेल्या शकुंतलाबाई यांनी स्त्रियांचे लैंगिक अनुभव गोळा केले होते का, याची माहिती आढळून येत नाही. त्यामुळे रधोंच्या अभ्यासाचे माहितीस्रोत काय, हे गुलदस्त्यातच राहिले आहे.
रधोंनी स्त्री-लैंगिकतेच्या अनुषंगाने मांडलेली अनेक मते विवाद्य ठरली. वादाच्या भोवऱ्यांत ती किती अडकली असतील याची गणतीच नाही. त्यांच्या लिखाणावर भरले गेलेले अश्लीलतेचे खटले त्या काळात खूप गाजले. निरोगी स्त्री-लैंगिकतेमध्ये केंद्रस्थानी असलेल्या स्वेच्छा व स्वातंत्र्य या दोन्हींचा पाठपुरावा त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत केला.
रधोंनी सुरू केलेल्या कार्यास आता शंभर वर्ष उलटून गेली आहेत. निदान आज तरी त्यांचे विचार आपण पेलवू शकलो आहोत का? शंभर वर्षांपूर्वी होता तसाच चोरटेपणा कामसंबंधात अजूनही आहे. लैंगिकता म्हणजे पाप ही समजूत तशीच टिकून आहे. अश्लीलतेची भावनाही तशीच टिकून आहे. उलट, अश्लीलतेला नवीन नवीन परिमाणे मिळत आहेत. आज किती स्त्रिया कुठल्याही अडसरांशिवाय लैंगिकतेची खुलेपणाने चर्चा करू शकतात? त्याबद्दल स्वतंत्र मते मांडण्याचे धाडस दाखवू शकतात? मग रधोंना अभिप्रेत असणारे स्त्रीचे लैंगिक स्वातंत्र्य तर कोसो दूर आहे. प्रश्न विचारणेच जिथे कुलूपबंद होत आहे, तिथे रधोंसारखी तर्कशुद्धता रुजणार कशी? कौमार्य, पावित्र्य, विनय अशा ज्या धर्मकल्पनांवर रधोंनी आसूड ओढले होते त्याच आता संस्कृतीच्या मखरात बसून नव्याने साजऱ्या होत आहेत. बा रूपाबाबत स्त्रियांची सजगता वाढली आहे; पण रधों म्हणत होते त्या शरीरांतर्गत स्वच्छतेचं काय? त्याबाबतची जागृती अजूनही प्राथमिक अवस्थेतच आहे. कामसाहित्याचा महापूर उसळला आहे; पण त्यामुळे लैंगिकतेबद्दलचा दृष्टिकोन प्रगल्भ झाला आहे की अजूनही मागासच आहे? अशा साहित्यात स्त्रीला एक मानव म्हणून पाहिले जाते की भोगवस्तू म्हणून? लैंगिकतेबद्दल काठाकाठाने बोलले जात आहे; पण रधोंसारखी त्या विषयात थेट बुडी मारण्याची हिंमत व धाडस आज कुणी का दाखवू शकत नाही?
रधोंचे विचार पेलणे तेव्हाही सोपे नव्हते आणि अजूनही नाही. पण आज रधों वाचताना वाटते, की त्यांचा प्रत्येक शब्द आजही तितकाच लागू आहे. त्यांची निरीक्षणे तितकीच अचूक आहेत. त्यांचा बिनतोड युक्तिवाद खोडून काढता येणे आजही कठीण आहे. आणि त्यांची कळकळ आजही तितकीच आतपर्यंत भिडणारी आहे. आजूबाजूला काळोख पसरला असताना विवेकवादाची मशाल त्यांनी समर्थपणे पेटती ठेवली. पण आज इतक्या वर्षांनंतरही गाभ्यातले बदल झालेच नाहीत. उलट, काही पावले आपण मागेच गेलो आहोत. आजही तसाच काळोख आहे. उलट, तो अजून मिट्ट झाला आहे. विवेकवादाची मशाल दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे. ती पेटती ठेवण्यासाठी १०० वर्षांपूर्वीच्या समाजाला रधोंची जितकी गरज होती त्याहीपेक्षा जास्त गरज आजच्या समाजाला आहे.
anjaleejoshi@gmail.Com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Radho femininity maharashtra foundation social health amy

Next Story
अभिजात: कधीही न माणसाळलेलं वादळ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी