|| मोनिका गजेंद्रगडकर
लेखिका रागिणी पुंडलिक.. नवकथेच्या बिनीच्या शिलेदारांपैकी एक असलेल्या विद्याधर पुंडलिक यांच्या पत्नी. ‘संसारी स्त्री’ ही त्यांची प्रथम ओळख. परंतु त्यांनी लिहिलेल्या ‘साथसंगत’ आणि ‘अश्विन : एक विलापिका’ या पुस्तकांनी त्यांची लेखक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली. नुकतंच त्यांचं निधन झालं. त्यांच्या लेखिका-संपादक कन्येनं जागविलेल्या त्यांच्या या आठवणी..
‘आई’ ही हाक आयुष्यातून अखेर संपून गेली- ६ मे २०१९ या दिवशी. केवळ पंधरा दिवसांचं आईचं आजारपण; आणि आज ती उरली नाही त्याला चाळीसेकदिवस झालेही! एखादं अस्वस्थ करून टाकणारं पुस्तक मिटवून ठेवावं तसं अस्वस्थ करणारं हे आयुष्य मिटवून कुठे ठेवता येतं! – तर आई नसलेल्या या माझ्या आयुष्यात मी संथपणे पावलं टाकत त्याला जोडून घेण्याचा प्रयत्न करते आहे. जी. ए. कुलकर्णी यांच्या पत्रातलं एक वाक्य या काळात कानात सतत गुंजत आहे- ‘आपले एकेक आधार सुटत जातात आणि मग एका क्षणी लक्षात येतं, आता आपणच कुणाचे तरी आधार झालो आहोत!’ क्षणात मोठं करून टाकणारं पोरकेपण जाणवतं आहे, हे खरं; पण आईचा सहवास संपला तरी तिची सोबत मात्र संपली नाही असंही वाटतं आहे. तिची सोबत म्हणजे तिचा अथक आशावाद, तिचं सळसळतं चैतन्य, तिचा टवटवीत जीवनोत्साह, तिच्यावर दबा धरून बसलेल्या अनेक तऱ्हेच्या वेदनांच्या श्वापदांकडे डोळे भिडवून पाहणारी तिची कणखरता.. हे सगळं तिच्या व्यक्तिमत्त्वाचं ‘सत्वरूप’- जे माझ्यासाठी तिच्या पश्चात आधारस्तंभ आहेत.
‘ज्येष्ठ लेखिका रागिणी पुंडलिक यांचे निधन’ अशा बातम्या जेव्हा वर्तमानपत्रांतून पहिल्या पानावर छापून आल्या तेव्हा मनात आलं, आईने या बातम्या वाचल्या असत्या तर म्हणाली असती, ‘अगोबाई! माझ्याबद्दल एवढी बातमी?’ माझ्या वडिलांनंतर- विद्याधर पुंडलिकांनंतर- आपली स्वतंत्र आणि ठसठशीत ओळख निर्माण करणाऱ्या माझ्या आईला जाणीवच नव्हती, की ‘साथसंगत’ आणि ‘अश्विन : एक विलापिका’ यांसारख्या तिच्या पुस्तकांनी ती किती वाचकांच्या पसंतीस उतरली होती; आणि या पुस्तकांनी मराठी साहित्यात किती वरचे स्थान निर्माण केले होते!
लहानपणापासून मी आईला पाहत आले ते लवलवत्या गवताच्या पात्यासारखं उत्साहानं झुळझुळताना. त्या उत्साहाने ती सतत काही ना काही उद्योगांत मग्न असायची. आळस, झोप हे तिचे शत्रू होते. कुठे हॉलच्या कोपऱ्यातल्या स्टॅण्डवर इकेबाना पद्धतीची फुलापानांची रचना कर, कुठे जुन्या चिंध्यांतून गोधडय़ा, कुशन कव्हर्स शिवत बस. (आम्हा मुलांचे सर्व कपडे तीच शिवायची, ते वेगळं!) अण्णांची ती हक्काची लेखनिक होतीच. शिवाय घरी येणाऱ्या सततच्या लेखक मंडळींची ऊठबस पाहणं, त्यांना नुसता चहा न देता हौसेहौसेने पदार्थ करून घालणं, उरलेल्या वेळात होमिओपॅथीचा कोर्स करून औषधं देणं, आम्हा तिघा मुलांच्या अभ्यासाकडे पाहणं, आणि त्यातच अण्णांच्या व्याख्यानांची, लेखनाची तंत्रं, मूड सांभाळणं.. एक ना अनेक. तिचा ठेंगणाठुसका बांधा दिवसभर चपळपणे धावाधाव करत असायचा; पण कधी ‘मी दमले’ हे शब्द तिच्या तोंडून यायचे नाहीत. तिचं व्यक्तित्व जात्याच प्रसन्न, हसरं आणि बोलकं होतं. ती पटकन् समोरच्या व्यक्तीला बोलण्यातून आपलंसं करून टाकी. अगदी अनोळखी व्यक्ती असली तरी तिच्यातला इतकासाही गुण तिच्या नजरेत यायचा आणि त्या गुणाचं दिलदार मनानं ती थेट कौतुक करायची. तिच्यासाठी कुणी इतकंसं जरी केलं तरी त्याबद्दलच्या कृतज्ञतेनं तिचं मन भरून यायचं आणि ती पुन:पुन्हा ती कृतज्ञता त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत राहायची. शेवटच्या आजारपणात तिची सेवा करणाऱ्या नर्सेस, वॉर्डबॉय यांच्याशी तर तिची चांगलीच मैत्री जमून गेली होती! तिच्यातली ती उत्फुल्लता पाहून समोरचाही उत्फुल्ल होऊन जाई, असं तिच्यात एक प्रभावी लाघवीपण होतं. आणि त्या लाघवीपणाला वात्सल्याचा अलवार स्पर्शही होता.
हॉस्पिटलमधून तिला घरी आणताना आजारपणाचं म्लान उतरलेपण असूनही ती एखाद्या बाहुलीसारखी दिसत होती. सतेज. गोरीपान. पांढऱ्याशुभ्र केसांची पिटुकली वेणी घालून माझी वाट पाहत बसलेल्या आईचा निरोप तिथल्या नर्सेसनाही घेणं जड झालं होतं. आदल्याच दिवशी ‘मी जगेन का गं?’ असं तिने विचारलं होतं. पण खिन्न, उदासपणे नाही; त्याच जीवनोत्साहाने! हृदयाच्या मरणासन्न वेदना सोसताना ‘आयसीयू’तल्या तिच्या शांत, थंडगार खोलीतल्या बेडवर ती हृदयाची जोरदार लागलेली धाप परतवत बसलेली असायची. मनात रामरक्षा, मारुती स्तोत्र म्हणत! ‘त्यातल्या उच्चारांकडे लक्ष दिलं की वेदना जाणवत नाही,’ असं ती म्हणायची. सोसण्यातूनही जागवणाऱ्या तिच्या या आशावादाकडे पाहताना थक्क व्हायला व्हायचं. तिचा धपापणारा तो जीव पाहून माझ्या जिवाचं पाणी व्हायचं. तर माझे भरून आलेले डोळे हात लांबवून पुसण्याचा प्रयत्न करत ती म्हणायची, ‘काळजी नको करूस. मी बरी होणार आहे.’ कुठून आणला होता तिने हा चिवट आशावाद? ती ‘अश्विन : एक विलापिका’मध्ये लिहिते- ‘मर्यादित असलेल्या आपल्या जगण्याला आकार आणि अर्थ देण्याचा प्रयत्न आपणच कसली तरी श्रद्धा उराशी बाळगून करायचा असतो, हे मी मनाला शिकवलं.’ मला वाटतं, तिने श्रद्धा ठेवली ती याच आशावादावर. मुलाच्या अकाली जाण्याचं दु:ख, त्या दु:खाने लेखक पतीतलं लेखकपण आटत जाण्याचं दु:ख, त्याला त्यातून जडलेला पार्किसन्ससारखा आजार.. आलेलं नैराश्य.. मग वैधव्याचा चटका लवकर बसण्याचं दु:ख.. शिवाय अनुच्चारित अशा अनेक वेदना तिच्या वाटय़ाला आलेल्या होत्याच. पण दु:खांना तिने स्वत:भोवती विळखा घालू दिला नाही. विलाप केला तोही स्वत:लाच ऐकू जाईल इतक्या मूकपणे! मी तर म्हणेन, या वेदनांकडून तिने स्वत:ला ‘वाढवून’ घेतलं. सोशीकतेने कधी कधी माणूस कडवट होऊन जातं. पण ती तशीही झाली नाही. अशाही आयुष्याबद्दलची तिची असोशी यत्किचिंतही कमी झाली नाही.
आजारपण येण्याच्या अगदी काही दिवस आधी ती मला म्हणाली होती, ‘अलीकडे सगळ्या आयुष्याचा विचार करताना मला वाटतं, मुलगा जाण्याचं दु:ख सोडलं तर आयुष्य काही वाईट नाही गेलं. नवरा कमी मिळाला, पण प्रतिभावान मिळाला. तुम्ही दोघं गुणी आहातच. तू तर मला माझे गेलेले ते दिवस परत दिलेस- तुझ्या लेखनाने. अजून काय हवं नं?’ आहे त्यात समाधान मानायची तिची वृत्तीच होती. मी अचंबित झाले होते, ते ‘मुलगा जाण्याचं दु:ख सोडलं तर’ या तिच्या वाक्याने! मला कधी कधी तिची ही सकारात्मक दृष्टी भाबडी वाटायची. पण ते भाबडेपण नव्हतं. ती लहानपणी खेळाडू होती. रिंग टेनिसची चॅम्पियनशिप मिळवलेली. सांगायची- ‘मैदानावर खेळलं की मन मोकळं नि उमदं राहतं. मॅचेस हरताना वाईट वाटायचं; पण हरणं हा तर खेळातला अपरिहार्य भाग. मग लक्षात आल्यावर स्वत:च्या पराभवाकडेही तटस्थपणे पाहता येऊ लागलं.’ कदाचित आयुष्यालाही ती एक खेळच मानून खिलाडूवृत्तीने आपलं आयुष्यही खेळण्याचा प्रयत्न करत गेली असावी!
अण्णा आणि आई दोघं वृत्तीने परस्परविरोधी. अण्णा तीव्र संवेदनशील, भावनाप्रधान. भावनांच्या आहारी जाणं याची मुभा जणू लेखक म्हणून आपल्याला आहेच- असं मानणारे. आणि आई अगदी उलट. व्यवहारी. कटाक्षाने भावनांचा अंतर ठेवून विचार करणारी. खंबीरही तेवढीच. एका शहाणीव घेऊन जशी जन्माला आलेली. अण्णा बुद्धिवादी, पण निराशावादी. आणि आई फक्त नि फक्त आशावादी! म्हणूनच तिला कठीण काळात प्रत्येक वेळी आधार सापडला तो स्वत:चाच.. स्वत:वरच्या विश्वासाचा. या विश्वासातून तिला तिचे शब्द सापडले, जे अण्णांच्या शब्दांपेक्षा वेगळे होते. ‘साथसंगत’ हा तिच्या नि अण्णांच्या सहजीवनाचा आलेख होता, तसाच तिचा आत्माविष्कारही होता. आधीच्या लेखकपत्नींच्या आत्मकथनाच्या सुरापेक्षा तिचा स्वर सौम्य, सालस असा होता. एक तर तिला तिचा लेखक पती सर्वस्वी भावला होता. त्याला तिने दिलेली मन:पूर्वक साथ तिने आपल्या आत्मकथनातून आळवली होती. बरोबरीने तिची आयुष्याकडे पाहण्याची साधी, सरळ दृष्टी एका संसारी स्त्रीची होती. त्यात निकोपता होती. तसंच तिच्या हसऱ्या, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंबही त्यात होतं. त्यामुळे तिच्या ‘साथसंगत’मध्ये सात्त्विक सच्चेपण दिसलं, जे वाचकांच्या पसंतीस उतरलं. तिला आपलं लेखन पोहोचल्याचं अप्रूप वाटलं; पण आपण लेखिका झालो, लेखक पतीच्या छायेत वावरताना इतकी र्वष आपली ओळख झाकोळून गेली होती, ती प्रकाशात आली वगैरे जाणिवांचा साक्षात्कार तिला झाला असंबिसं काही घडलं नाही. ती मनाने जशी थेट, स्वच्छ स्त्री होती तशीच राहिली. कधी कधी तिच्या गुणांची कदर झाली नव्हती- अण्णांकडून, घराकडून. छोटे-मोठे अन्यायही तिच्या वाटय़ाला आले होते; पण त्याचा सल ती उगाळत राहिली नाही. ‘माझी घुसमट झाली, मीही कुणी व्यक्ती होते..’ वगैरे वाक्यं तिच्या या आत्मकथनात शोधूनही सापडत नाहीत. स्त्रीवाद, स्त्रीचं आत्मभान, अस्तित्वभान वगैरे शब्द तिच्या कोशात नव्हतेच. पण तरीही तिचं आत्मकथन हे तिच्या व्यक्तित्वाचा तिने घेतलेला सजग असा शोध होता; जो एका अर्थाने तिला गवसलेल्या आत्मभानाचा तिचा असा अर्थ होता. पुढे जाऊन तिने पाऊल उचलले ते अश्विनच्या मृत्यूवर लिहिण्याचे. आपल्या मुलाच्या आकस्मिक मृत्यूला कवटाळताना नियतीने विद्रूप केलेला तिच्या आईपणाचा चेहरा त्यात रेखाटताना तिची दमछाक झाली. अश्विनचं जाणं म्हणजे तिच्या आयुष्यात निर्माण झालेलं एक भलंमोठं विवर होतं. ते लिहिणं म्हणजे पुन्हा ते अनुभवणं. पण ती हटली नाही. स्वत:मधलं हळवं, दुखरं आईपण तिने पणाला लावलं. ती लिहिते- ‘मी स्वत:ला खाली जाऊ देतानाच उसळी घेऊन वर आणलं- निराशा सोडून. अपार दु:खाची दोन्ही टोकं क्षितिजावर रोवून माझ्या उरलेल्या आयुष्याचं इंद्रधनुष्य उभं करण्याचा सतत प्रयत्न करत राहिले.’ ‘अश्विन’ लिहिल्यानंतर दु:ख पेलून धरण्यासाठी ती जणू आणखीनच समर्थ झाली अशी. पुढे तिने शब्दांची साथ घट्ट धरून ठेवली. ‘अक्षरमैत्री’, ‘महाभारत- रामायण कथा’, ‘लहानपण’ (जे अप्रकाशित आहे.) अशी एकेक पुस्तकं ती लिहीत गेली आणि स्वत:तूनच ती एक नवी अशी निर्माणही होत गेली. तिच्या संवादी शैलीवर खूश असलेले अनेक वाचक तिला मिळाले. एक मर्यादित साहित्यिक वर्तुळ लाभलं. ती लेखिका म्हणून लोकांना हवीशी वाटत गेली. रोज संध्याकाळी केसात एक तरी फूल माळून साहित्य परिषदेच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावणं; संगीत, नाटक, सिनेमा आदी कलांचा रसिकतेने आस्वाद घेणं, वाचन करणं; लेखकांशी, वक्त्यांशी गप्पा, चर्चा करणं.. हे तिचे परमावधीचे आनंद तिचे जीवनरसच होऊन गेले होते. थोडक्यात, तिने तिचे आशूनंतरचे, पतीनिधनानंतरचे जगणे असे समृद्ध, प्रगल्भ करून टाकले. संसारी गृहिणी ही तिची ओळख धूसर करून टाकत तिनेच ती अशी विस्तारत नेली.
नाही म्हणायला तिचा आत्यंतिक काटकसरी स्वभाव मला नि अण्णांना खटकायचा. कधी कधी ती नको इतकी हट्टीही होती. कदाचित या हट्टीपणातूनच तिच्यात जिद्द निर्माण होत असावी. आणि या जिद्दीतून कमालीची महत्त्वाकांक्षाही. पुत्रशोकाने कोसळून गेलेल्या आपल्या नवऱ्यामधलं दौर्बल्य तिच्या खंबीरपणाला मानवत नव्हतं. तिच्यातल्या जिद्दीने तिने त्यांना उभं करू पाहिलं. त्यांच्यातलं कोमेजतं लेखकपण परजत ठेवण्यासाठी जिवाचं रान केलं. प्रसंगी ती त्यांची ‘आई’ झाली. ‘तुम्ही लिहायलाच हवं, तो तुमचा आत्मा आहे,’ असं वेळोवेळी म्हणत आपल्या महत्त्वाकांक्षेचा टेकू ती त्यांना देऊ करत राहिली. गमतीने म्हणायचं झालं तर- तिला शक्य असतं तर तिने त्यांच्या मनात निर्मितीप्रक्रियाही सुरू करून दिली असती! तिची महत्त्वाकांक्षी वृत्ती आम्हा मुलांची प्रेरणास्रोत होती. सातत्य, परिश्रम, चिकाटी यांनी सगळं काही साध्य होऊ शकतं यावर तिचा विश्वास होता. आणि तो विश्वास तिने अगदी आपल्या नातवंडांपर्यंत संस्काराच्या रूपाने रुजवण्याचा प्रयत्न केला. माझा मोठा भाऊ संजय याने पोस्ट ग्रॅज्युएशन करायलाच हवं, ही तिचीच जबरदस्त इच्छा होती. त्यासाठी तिने त्याच्या बरोबरीने कष्ट घेतले.. अगदी नोट्स काढण्यापर्यंत!
आई आणि मी- आम्हा दोघींचं नातं लहानपणापासूनच खेळकर, मोकळं होतं. मी सर्वस्वी पितृमुखी असूनही माझी ओढ आईकडे जास्त होती. पिढीतल्या अंतरामुळे आम्हा दोघींत टोकाचे वादविवाद फारसे कधी झाले नाहीत. तिने मला मोकळेपण दिलं होतं, तसंच स्वातंत्र्यही. गेल्या काही वर्षांत तर आमचं नातं मायलेकीसारखं राहिलंच नव्हतं. आम्ही एकमेकींच्या सख्या झालो होतो. माझ्या कथांची, लेखनाची ओळ न् ओळ तिला ऐकण्याची तहान असे आणि माझ्या निर्मितीत सर्वतोपरीने सहभागी होण्याची तिची आस असे. तिचे अभिप्राय नेमके, मार्मिक असत. आणि तिच्या लेखनावर माझी नजर एका संपादकाची असे. ती कायम हसून म्हणे, ‘माझं लेखन वाचताना ना तू माझी लेक असतेस, ना मैत्रीण. असतेस फक्त चुका काढणारी संपादक!’ पण याही वयात ती पुनर्लेखन हौसेने करत राहायची. आमचा संवाद, चर्चा चालूच राही.. साहित्यावर, राजकारणावर, गाणं, उत्कृष्ट सिनेमे, माणसं.. विषय संपतच नसत. माझं व्याख्यान म्हणा, कथावाचन म्हणा, अगदी माझा सतारीचा रियाज म्हणा.. ऐकताना तिचे डोळे कौतुकाने, अभिमानाने ओथंबून जात. मग तिचं एक म्हणणं पुनरावृत्त होई- ‘जगावेगळा नवरा मला मिळाला. त्याचं नाव, यश हीच लौकिकदृष्टय़ा मला श्रीमंती वाटायची. पण तू माझं वैभव आहेस. नवरा अर्धाग असतो, हे खरं गं; पण तू माझ्या मुशीतून जन्म घेतलेली. माझं आईपण तू फळाला आणलंस! आता सांगते, तुझ्या अण्णांपेक्षाही तू मला जास्त सुख दिलंस- लेखिका बनून. माझी ही वाक्यं कायम लक्षात ठेव बरं का, मी नसताना..’
‘आई नसताना..’ ते दिवस येतीलच कसे इतक्यात? असं वाटत असतानाच ती गेलीही. तिच्या अखेरच्या दिवशी तिच्या पार थकलेल्या चेहऱ्यावरून हात फिरवत मी म्हणाले होते, ‘किती सहन केलंस बाई. रात्रभर जागी आहेस. आता शांत झोप.’ तिने माझे हेही शब्द निमूट ऐकले. मृत्यू तिला अलगद घेऊन गेला. तिच्या अस्थींचं विसर्जन मी आणि माझ्या भावाने- संजयने सिंहगडावर अश्विन जिथे पडला त्या तानाजी कडय़ाजवळच्या भूमीतच वृक्षारोपण करून केलं. आता ती अश्विनबरोबर त्याच मातीत मिसळून गेली आहे.
आई गेली आणि तिच्यातली माझी सखीही!
monikagadkar@gmail.com