अत्यंत मोजके कार्यक्रम होऊनही ज्या प्रयोगाला मोठी प्रतिष्ठा लाभली असा ‘लावणीतील भक्तिदर्शन’ हा एक महत्त्वाचा मंचीय प्रयोग होता. या प्रयोगामुळे ‘ज्ञानोबा उत्पात’ हे नाव सर्वतोमुखी झाले. मूळच्या प्रसिद्धीपराङ्मुख ज्ञानोबांना प्रकाशात आणण्याचे काम पं. भीमसेन जोशी आणि पु. ल. देशपांडे या साधक कलाश्रेष्ठांनी केले. आजही या प्रयोगाच्या आणि ज्ञानोबांच्या आठवणी रसिकांच्या चर्चेत असतात.
‘ज्ञानोबा उत्पात’ हे ठळक नाव आपल्यासमोर प्रकर्षांने आलेले असले, तरी त्यांच्यामागे लावणी गायनाची काही पिढय़ांची परंपरा होती. स्वत: ‘लावणी’ हा रचनाप्रकार किमान नाथकालीन आणि तत्पूर्वीही दीड-दोन शतके अस्तित्वात असलेला असा होता. वर्गीकरण करता येईल एवढे वैविध्य या रचना प्रकारात होते. लावणीच्या आकृतिबंधनाविषयी काही संशोधन पूर्वी झालेले असले, तरी या रचनाप्रकाराविषयीची विस्तृत माहिती एकत्रितपणे सामान्य वाचकांसमोर येणे आवश्यक होते. उत्पात घराण्यातील लावणी-परंपरा व ‘लावणीतील भक्तिदर्शन’ या प्रयोगाविषयीचे तपशीलही वाचकांना उपलब्ध होणे गरजेचे होते. ही गरज लक्षात घेऊन या कार्यक्रमात निवेदकाच्या रूपात सहभागी असलेले वसंतराव उत्पात यांनी ‘उत्पातांचा लावणी इतिहास’ हे पुस्तक लिहिले आहे. ललितकलांच्या अभ्यासकांना एक काहीसे अपरिचित दालन या पुस्तकामुळे खुले झाले आहे.
माध्यमिक शिक्षक म्हणून तीस वर्षे उत्तम कामगिरी करून सेवानिवृत्त झालेल्या वसंतराव उत्पातांचा मन:पिंड निरंतर अभ्यासकाचा आहे. ‘मराठी भाषा सौष्ठव’, ‘संस्कृत साहित्य परिचय’, ‘मराठीचे मूळ व्याकरण’ इत्यादी पुस्तकांमधून त्यांच्या अभ्यासाचा प्रत्यय येतो. त्यांचे लेखन तात्कालिक लोकप्रियतेसाठी केलेले नाही. अभ्यासकांच्या पुढच्या पिढय़ांसाठी पथदर्शक असे हे लेखन आहे.
ज्ञानोबा उत्पातांनी ‘मराठी पारंपरिक लावणी’ हे पुस्तक स्वत: संपादित केलेले होते, पण त्यात काही त्रुटी राहून गेल्याची रूखरूख त्यांना लागून राहिली होती. उत्पातांच्या लावणी इतिहासावर सांगोपांग विचार करणारे पुस्तक वसंतरावांनी लिहावे, अशी ज्ञानोबांची सूचना होती. ज्ञानोबा आणि वसंतरावांचे बंधू वा. भ. उत्पात यांनी सर्व सहकार्यही वसंतरावांना देऊ केलेले होते. मात्र एका अकल्पित विधिलिखितानुसार ज्ञानोबा आणि वा. भ. उत्पात यांचे निधन २० जुलै २००६ या एकाच दिवशी झाले आणि वसंतरावांवर एकहाती हे पुस्तक पूर्ण करण्याची जबाबदारी आली. ही जबाबदारी वसंतरावांनी सर्व सामर्थ्यांनिशी पूर्ण केली आहे, याचे प्रत्यंतर ‘उत्पातांचा लावणी इतिहास’ वाचताना प्रत्येक पृष्ठागणिक येते.
पुस्तकातील पहिले प्रकरण ‘लावणीविषयी थोडेसे’ या शीर्षकाचे असले, तरी त्याचे स्वरूप ‘लावणीविषयी पुष्कळसे’ असे आहे. आज मन्मथ शिवलिंग (१५६०-१६१३) या कवीची लावणी, उपलब्ध असलेली सर्वात जुनी लावणी मानली जात असली, तरी त्याच्या खूप पूर्वीच्या अज्ञानसिद्धाने आणि त्याचे गुरू नागनाथ-नागेश यांनी तेराव्या शतकात लावणीचे पूर्वरुप लिहिले होते, ही माहिती या प्रकरणातून मिळते. लावणीची व्याप्ती, तिचे स्वरूप, तिच्यातील संगीत, ‘लावणी’ या शब्दाची व्युत्पत्ती, लावणीची वैशिष्टय़े, तिच्या सादरीकरणाचे स्वरूप, लावण्यांचे प्रकार अशा अनेकांगी, मुद्देसूद विवेचनामुळे हे प्रकरण समृद्ध बनले आहे.
‘उत्पात समाजाचा इतिहास’ हे केवळ दहा पृष्ठांचे दुसरे प्रकरण उत्पात घराण्याची कलासाधना कोणत्या मुशीतून घडली, त्याची संसूचना देणारे आहे. रुक्मिणीने कृष्णाला पाठविलेले प्रेमपत्र ज्या सुदेव ब्राह्मणाच्या हाती तिने पाठविले, त्या सुदेव ब्राह्मणाचे उत्पात हे वंशज आहेत. एका दिव्य प्रणयाचे साक्षीदार असणाऱ्या उत्पातांनी लावणीसारख्या सशक्त शृंगारकवितेची आराधना करणे औचित्याचे ठरते. ही पुण्याई पुढच्या अनेक पिढय़ांना पुरेल, यात शंका नाही.
‘उत्पात घराण्यातील लावणी गायकांची परंपरा’ या तिसऱ्या प्रकरणात तीन पिढय़ांची कलासाधना अंतर्भूत आहे. बाळकोबा यांच्यापासून ज्ञात असणारी ही परंपरा भगवान गोपाळ तथा दादबा व ज्ञानेश्वर गोपाळ तथा ज्ञानोबा उत्पात यांनी पुढे नेली. (लावणीतील भक्तिदर्शनामुळे प्रसिद्ध झालेले ज्ञानेश्वर विठ्ठल तथा ज्ञानोबा उत्पात त्यापुढच्या पिढीतील आहेत. नामसाधम्र्यामुळे या दोन ज्ञानोबांविषयी संभ्रम निर्माण होतो.) मच्छिंद्र गणेश उत्पात, पिलोबा ऐतवाडकर, रामचंद्र कृष्णाजी व वामन रामचंद्र उत्पात, शंकराप्पा मंगळवेढेकर, रंगाप्पा उत्पात, लावणीसम्राज्ञी गोदावरी पुणेकर आधीच्या पिढीतील साधकांनंतर ज्ञानोबा (द्वितीय) व त्यांच्यानंतरच्या पिढीतील कलावंतांच्या साधनेचा परिचय या प्रकरणातून घडतो. प्रापंचिक जबाबदाऱ्या न टाळताही अव्वल श्रेणीची कलासाधना कशी करता येते, याचे ज्ञानोबा (द्वितीय) हे अनुकरणीय उदाहरण आहे.
‘लावणीतील भक्तिदर्शन’साठीचे एक स्वतंत्र प्रकरणच या पुस्तकात आहे. या कार्यक्रमाने यशाचे आणि लोकप्रियतेचे मापदंड प्रस्थापित केलेले आहेत. या कार्यक्रमाची वसंतरावांनी केलेली संहिता सारांशरूपात या प्रकरणामध्ये समाविष्ट आहे. या संहितेतल्या प्रत्येक शब्दाविषयी विचार करीत ही संहिता वाचली गेली पाहिजे. कार्यक्रमाची संहिता कशी असावी, याचा तो वस्तुपाठ आहे.
अभिप्राय, कार्यक्रमाच्या वेळी घडलेले किस्से यांविषयी दुय्यम श्रेणीची प्रकरणे पुस्तकात आहेत. शैला दातार यांचा अभिप्राय नोंदविण्यासारखा आहे हे खरे, परंतु पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत या प्रकरणांचा संक्षेप करणे इष्ट ठरेल.
मृणाल परांजपे यांनी केलेले काही लावण्यांचे स्वरलिपी लेखन लावण्यांच्या अभ्यासाला नवी दिशा देणारे आहे. या स्वरलिपीलेखनासोबतच या लावण्यांमधील काव्यसौंदर्य आणि स्वरसौंदर्य यांविषयीचे विवेचक लेखन त्यांनी करणे आवश्यक आहे. लावण्यांच्या प्रारंभी त्यांनी त्रोटक परिचय दिलाही आहे, परंतु तो अपुरा आहे. संगीताच्या सर्व शाखांचा अभ्यास असणाऱ्या मृणाल परांजपे यांनी हे प्रकरण विस्तारश: लिहायला हवे. तसा तर तो स्वतंत्र पुस्तकाचाही विषय ठरू शकतो.
वसंतरावांकडून ‘उत्पातांचा लावणी इतिहास’ लिहून झाला, प्रसिद्धही झाला. त्यांचे प्रेरणास्थान असलेले ज्ञानोबा उत्पात हे पुस्तक पाहण्यासाठी आज आपल्यात नाहीत. ते असते तर तृप्तीची, समाधानाची पावती त्यांनी नक्कीच दिली असती. तेवढी गुणवत्ता या पुस्तकामध्ये नि:संशयपणे आहे.
‘उत्पातांचा लावणी इतिहास’- वसंत भगवान उत्पात, प्रकाशक : विनय वासुदेव उत्पात, पंढरपूर, पृष्ठे- १३२, मूल्य-रु. २२०.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व रसग्रहण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rasgrahan book book review
First published on: 09-09-2012 at 01:47 IST