डॉ. नीलांबरी कुलकर्णी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुहास कुलकर्णी यांचा ‘अवलिये आप्त’ हा व्यक्तिचित्रणात्मक लेखांचा संग्रह आहे. लेखकाचा पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरताना अनेकांशी परिचय झाला, स्नेह जुळला. त्याहीपलीकडे जाऊन त्यांच्यातले काही जण आप्तही झाले. त्यातल्या काही व्यक्तींचा स्वभाव, जगणं हे दुनियादारीपेक्षा, समाजाच्या चाकोरीपेक्षा हटके आहे, त्यांच्यात विलक्षण अवलियापण आहे असे लेखकाला ठळकपणे जाणवले. या अवलियांचे लेखकाला स्वत:ला जे अनुभव आले, त्यातून त्यांना जाणवलेली त्या व्यक्तींची स्वभावचित्रे त्यांनी या पुस्तकात रेखाटली आहेत. डॉ. अरूण टिकेकर, अनिल अवचट, सदा डुंबरे, निरंजन घाटे, निळू दामले, ना. धों. महानोर, आमटे कुटुंबीय यांच्याविषयीचे हे व्यक्तिचित्रणात्मक लेख आहेत. अर्थातच या व्यक्तिचित्रणांना लेखकाच्या अनुभवांचे, त्यातून तयार झालेल्या त्यांच्याबद्दलच्या मतांचे व्यक्तिनिष्ठ संदर्भ आहेत.

कोणत्याही व्यक्तिचित्रणातून व्यक्तीचा स्वभाव, लेखकाने केलेले त्या व्यक्तीच्या आयुष्याचे आकलन, मूल्यमापन जसे व्यक्त होते तसेच त्यांच्याकडे पाहावयाची लेखकाची दृष्टी आणि दृष्टिकोणाचाही एक अंत:स्तर असतो. या व्यक्तिचित्रणांमधून पत्रकाराची विश्लेषक नजर तर सुस्पष्टपणे जाणवते. लेखक त्या, त्या व्यक्तींसोबतचे प्रसंग निव्वळ सांगत नाही, तर त्यांचे विश्लेषण करून त्यातून त्या व्यक्तीची जाणवलेली स्वभाववैशिष्टय़े नोंदवतो. लेखकाच्या त्यांच्यासोबतच्या नात्याला असलेली कालखंडाची चौकट साधारणपणे १९९० ते २०२० ही असली तरी त्या प्रत्येकाचे वेगळेपण लेखकाने अचूक टिपले आहे. संपादक म्हणून डॉ. अरूण टिकेकर व सदा डुंबरे यांची बलस्थाने, लेखक म्हणून अनिल अवचट, निरंजन घाटे, निळू दामले यांचे व्यवच्छेदकत्व आदी गुणांचा चांगलाच प्रत्यय या लेखांतून येतो. काळाच्या व्यापक पटावर या सगळ्या मंडळींचे मोठेपण, ऐतिहासिक स्थान नेमके कशात आहे हे लेखक सांगू शकला आहे. कारण पत्रकारितेच्या क्षेत्राची सखोल माहिती व आकलन त्यामागे आहे. त्यामुळेच जरी हे व्यक्तिचित्रण करणारे लेख असले तरी साधारणपणे ७०-७५ नंतरचा काळ, त्यातील महत्त्वाच्या राजकीय-सामाजिक घटना, पत्रकारितेचे प्रवाह, तत्कालीन वातावरण, जागतिक संदर्भ या सगळ्याची पार्श्वभूमी या लेखांना लाभली आहे. त्याबरोबरच भोवतालाबाबतची माहिती, गंभीर निरीक्षणे व निष्कर्षही त्यात येतात. उदा. विजय तेंडुलकर आणि निळू दामलेंनी घडवलेली महानगरीय भाषा व शैली. जातिनिष्ठ शोषणावर, र्सवकष दमनकारी सत्तेवर मात करण्यासाठी बाबा आढावांनी घेतलेली राजकीय भूमिका यामुळे या लेखसंग्रहाला काही अंशी संदर्भमूल्यही प्राप्त झाले आहे.

या सर्व व्यक्तींकडून आपल्या भोवतालाचे, त्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भाच्या जटिलतेचे आकलन करून घेण्याबाबतीत अनेक गोष्टी लेखक शिकला आहे. त्याबद्दलचे कृतज्ञ उल्लेख यात येतात. या व्यक्तींची स्वभाववैशिष्टय़े, माणूस म्हणून असणारे त्यांचे मोठेपण लेखकाने जसे रेखाटले आहे, तशीच त्यांच्या लिखाणाची वैशिष्टय़े, लेखन किंवा कार्यामागील प्रेरणा, भाषाशैली यांचाही थोडक्यात, पण विश्लेषक वेध घेतला आहे. या व्यक्तींसंबंधातली अनेक गमतीदार निरीक्षणेही लेखकाने नोंदवली आहेत. उदा. विकास आमटे यांच्या दृष्टीने माणसांचे दोन प्रकार आहेत : आनंदवनात येऊन गेलेली आणि न आलेली! किंवा डॉ. अरूण टिकेकर यांच्यात मुरलेली ब्रिटिश साहेबी परंपरा, निरंजन घाटे यांनी घेतलेली सहा-सात टोपणनावे. यातील काही व्यक्तींच्या बाबतीत त्यांची स्वप्रतिमा काय आहे याचा वेध घेऊन त्याचेही अर्थनिर्णयन लेखकाने केले आहे. अपवाद वगळता कोणाच्याही शारीरिक किंवा बा व्यक्तिमत्त्वाचे वर्णन त्यांनी केलेले नाही. अशा प्रसिद्ध व्यक्तींच्या आवडीनिवडी, त्यांचे छंद अशा खासगी बाबींत वाचकांना कुतूहल असते. त्याबाबतीतही कुठे कुठे ओझरतेच उल्लेख केले आहेत. यातल्या प्रत्येक आप्ताचा ट्रेडमार्क ठरणारा डायलॉग किंवा वाक्य लेखकाने नोंदवले आहे. असाच लेखकाचाही एक आवडता शब्दप्रयोग आहे- ‘ड्रायिव्हग फोर्स’! या सगळ्या व्यक्तींकडून प्रेम, आपुलकी, विश्वास, कौतुकाचा लाभ लेखकाला झाला आहे. मात्र, या प्रत्येक नात्यात ‘ड्रायिव्हग फोर्स’ या ज्येष्ठ व्यक्तीच होत्या असे लेखक म्हणतो. नवोदित पत्रकाराचा संकोच, दडपण दूर करून, त्याच्यातले गुण हेरून त्याच्याशी स्नेहाचे नाते जोडण्याचा मोठेपणा या मंडळींनी दाखवला म्हणूनच ते लेखकाचे आप्त बनू शकले.

टीकाटिप्पणी, राजकारण, होऊन गेलेले प्रकल्प या कशात न गुंतता सतत काम करत राहण्यामागे या सगळ्यांच्या व्यक्तिमत्त्वामधील सकारात्मक दृष्टिकोण आहे. हा संस्कार लेखकाच्या व्यक्तिमत्त्वावरही झालेला आहे. त्यामुळे या व्यक्तींची नकारात्मक वैशिष्टय़े, वादग्रस्त बाबी त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून मांडल्या आहेत किंवा मग त्यावर टिप्पणी करणे लेखकाने टाळले आहे. हे सर्व ज्येष्ठ नुसते आप्त नाहीत, तर लेखकाचे ‘गुरुजी’ आहेत. पारंपरिक गुरू-शिष्य परंपरा व त्यातून येणारी बांधिलकी या मूल्यांचा लेखकावर असलेला प्रभाव यात स्पष्टपणे जाणवतो. यामागचे कारण हे की, कोणत्याही विचारसरणी वा भूमिकेचे काचणारे बंधन न होऊ देता मोकळ्या, उदारमतवादी भूमिकेतून काम करण्याची लेखकाची खासियत आहे. जग सतत बदलत असते, त्यामुळे पूर्वसुरींच्या भूमिका जशाच्या तशा न स्वीकारता तरुण पिढीने समकालीन संदर्भात त्यांचा नव्याने विचार केला पाहिजे, हा विचारही लेखकाच्या मूल्यजाणिवेचा भाग आहे. त्यामुळे त्याचे या मंडळींशी मतभेद व वादविवादही झाले. काहींनी हे मतभेद सामंजस्याने स्वीकारले, तर कोणी नाराजीने. लेखकाचे या व्यक्तींसंदर्भातल्या प्रत्येक बाबीवर- अगदी कादंबरी या साहित्यप्रकाराच्या वैशिष्टय़ांवरही स्वतंत्र मत आहे. मग ते वाचकांना पटो वा न पटो.

या सर्व लेखांची रचना विशिष्ट पद्धतीने केलेली आहे. लेखाच्या प्रारंभी त्या व्यक्तीचा जनमान्य परिचय आणि लेखकाची पहिली भेट यांचे कथन येते आणि मग त्यांच्या अधिक परिचयातून हळूहळू जुळत गेलेल्या नात्याचा प्रवास व त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे लेखकाला जाणवलेले पैलू उलगडत जातात. लेखांची भाषा वास्तवदर्शी, लेखकाला दिसलेल्या तथ्याचा सुस्पष्ट वेध घेणारी आहे. लेखकाने ही व्यक्तिचित्रे रेखाटताना अनुभवांच्या अभिव्यक्तीच्या गरजेनुसार काही नव्या, लक्षणीय शब्दांची भर टाकली आहे. व्यक्तिचित्रे, चरित्रे, आत्मचरित्रे यांचा एक वाचकवर्ग असतो. सुप्रसिद्ध, प्रेरणादायी व्यक्तींविषयी, त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायचे कुतूहल असते. पत्रकारिता, लेखन व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा पत्रकाराच्या नजरेने टिपलेला हा लेखसंग्रह ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करतो.

‘अवलिये आप्त’- सुहास कुलकर्णी, समकालीन प्रकाशन,
पाने- १८०, किंमत- २०० रुपये.
neelambari.kulkarni@yahoo.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Realistic profiles suhas kulkarni article author amy