त्यादिवशी माझ्याकडे एक जोडपं आलं होतं. नवीनच. म्हणजे काही महिनेच लग्नाला झाले असावेत असं वाटत होतं. या जोडप्यातील नवऱ्याचा चेहराच सर्व काही बोलत होता. आत येत असताना त्याचे पडलेले खांदे, उतरलेला मलूल चेहरा बरंच काही सांगून गेला. त्यातच समोरच्या दोन खुच्र्यावर बसताना दोघांमध्ये जरा जास्त अंतर ठेऊन त्याचं बसणं, दोघांच्या नात्यात आलेला दुरावा सांगत होता. म्हणजेच एक तर त्याच्या मनातलं निराशेचं मळभ त्यांच्या नात्यावर परिणाम करतं झालं होतं. किंवा नात्यात आलेला दुरावा त्याच्या मनावर निराशेचं सावट निर्माण करत असावा, असा मी मनातल्या मनात एक प्राथमिक अंदाज मांडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानेच मग सुरुवात केली, ‘माझं नाव प्रतीक आणि ही माझी पत्नी प्रणाली. आमच्या लग्नाला सहा महिने झाले, पण काहीच चांगलं वाटत नाही. मला तर आता अगदी निराश वाटतंय. कसाबसा नोकरी करतोय. आजच प्रोजेक्ट लीडरचा ओरडा खाऊन आलोय की, कामात नीट लक्ष नाही, चुका होत आहेत वगरे.. मला भूक लागत नाही, झोप येत नाही. कशात आनंद वाटत नाही. आज तीन-चार महिने झाले आमच्यात शारीरिक संबंधसुद्धा आलेले नाहीत, म्हणजे मला इच्छाच होत नाही. पूर्वी मी टीव्ही एन्जॉय करायचो. सिनेमाला जायचो. आज मला यातलं काहीच करावंसं वाटत नाही.’

‘तू जे सांगितलंस त्यावरून तुला नैराश्य आलंय प्रतीक. तुझ्या हावभावांवरून ते अगदी स्पष्टपणे कळतंय. पण तुला काय वाटतं, काय कारण असावं असं वाटण्यामागे?’ मी विचारलं.

‘डॉक्टर, जरा मला एकटय़ालाच बोलता येईल का?’ त्याने असं म्हटल्यावर मी त्याच्या पत्नीला बाहेर बसायला सांगितलं. ‘डॉक्टर, खरं सांगू का, लग्न झाल्यावर आनंद दुणावतो. आपण सातव्या आस्मानावर असतो, असं म्हणतात. पण मला काहीच तसं वाटत नाही. माझा माझ्या पत्नीने भ्रमनिरास केला आहे. मला जसा वाटला होता किंवा मला जसा हवा तसा तिचा स्वभाव नाही, तसं तिचं वागणं नाही.’

प्रतीकने आपल्या मनात त्याच्या पत्नीची एक प्रतिमा निर्माण केली होती. त्याची पत्नी खूप हसरी, खेळकर असावी. तिने अधूनमधून रुसावे, याने तिचा रुसवा काढावा. तिने सारखी त्याच्या भोवती रुंजी घालावी, त्याच्याबरोबर तिने सगळेच सिनेमा-नाटकं एन्जॉय करावीत. त्याला पसारा आवडायचा. त्याला  सुट्टीच्या दिवशी आठ-आठ, नऊ-नऊ वाजेपर्यंत लोळत पडायला आवडायचं आणि तिला लवकर उठायची सवय. त्याच्या सेक्सविषयीच्या कल्पना एकदम रोमॅण्टिक होत्या, तिच्या त्याप्रमाणे नाहीत, असं त्याला वाटत होतं. त्यामुळेच त्याचा भ्रमनिरास झाला होता. जणू ‘सातव्या आस्मान’वर जायच्या ऐवजी  तो खालीच कोसळला होता.

मी त्याला विचारलं, ‘तुमचं ठरवून लग्न झालं आहे. मग या गोष्टींचा अंदाज आधी का नाही घेतलास? आधीच याविषयी तिच्याबरोबर चर्चा का नाही केली?’

‘मी तिच्या रूपावरच एवढा भाळलो होतो की, काय कळत नाही. पण थोडी चर्चा केली होती, पण ती लांब राहायला असल्यानेदेखील तेवढय़ा भेटी होऊ शकल्या नाहीत.’

‘पण प्रतीक, तुम्ही तर व्हॉट्स अप, एफबीच्या जमान्यातले असूनही फोनवर किंवा नेटवरही थोडीफार चर्चा होऊ शकली असती. अर्थात त्याला समोरासमोर बसून केलेल्या चच्रेएवढी सर नक्कीच नाही, हे खरे! पण तरीही हे शक्य झालं अतं. मग का नाही केलं?’

‘हो खरंच, पण सुचलं नाही. हे अगदी नक्की!’ मग त्याच्या पत्नीशी चर्चा केली. तिला कळतच नव्हतं त्याला का नराश्य आलं आहे ते. तो तिला त्याविषयी काही सांगत नव्हता. तिने आधी प्रयत्न केला त्याला विचारण्याचा, पण त्याची चिडचिड बघून ती गप्प बसली. तिच्याशी बोलल्यावर तिच्या जोडीदाराविषयी काही विशिष्ट कल्पना आहेत, असं वाटलं नाही. उलट ‘अ‍ॅडजस्ट’ करण्याची, समायोजन करण्याची तिची तयारी दिसली. नैराश्यामुळे प्रतीकचा भावनिक गोंधळ झाला होता, कामावर परिणाम होत होता व त्या दोघांमधला संवाद खुंटल्यामुळे त्यांचे नाते उमलण्याआधीच कोमेजणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण हा परिणाम होता. त्याचं लग्न किंवा वैवाहिक जीवन ही तणावदायी घटना होती. मग त्या घटनेचा तो परिणाम होता का? सामान्यपणे असंच बोललं जाईल की, काय प्रतीकचं लग्न झालं आणि तो निराश झाला. लग्न किंवा बायकोच त्याला जबाबदार! पण तसं नव्हतं.  याला त्याच्या वैवाहिक जीवन किंवा पती-पत्नीचं नातं याविषयीच्या साचेबद्ध कल्पना अथवा विचारसरणी कारणीभूत होती. त्या साच्यात प्रणाली चपखल बसलीच पाहिजे, असा त्याचा दुराग्रह होता. ती तशी नव्हती किंवा त्या साच्यात बसू शकणार नाही असं लक्षात आल्यावर दुराग्रही प्रतीक सातव्या आस्मानवरून खाली कोसळला होता. त्याचा पती-पत्नीच्या ‘परफेक्ट’ नात्याचा दुराग्रह होता. तसंच त्या चौकटीत तिने लगेच मावावे हाही हट्टाग्रह होता. मग त्यामुळे नराश्याच्या विरूप भावनांचा तो बळी ठरला होता.

कुठचंही नातं चौकटीत बसणारं नसतं. तर दोघांच्या चौकटी, वर्तुळं हातात हात घातल्यासारखी पुढे जाणं अपेक्षित असतं. आणि त्यासाठी काही महिन्यांपासून ते काही वर्षांपर्यंत काळ जावा लागतो. जोडीदाराचा त्याच्या गुणदोषांसकट ‘स्वीकार’ करणं म्हणजे सहचर्य, सहजीवन हा झाला रॅशनल किंवा विवेकी विचार!

तो त्याला पडताळून पाहायला शिकवणं, त्यानंतर येणारा भावनिक अनुभव तपासणं, त्याच्या पत्नीचंही त्याप्रमाणे समुपदेशन करणं व त्याच्या जोडीला औषधोपचार या पुढच्या पायऱ्या असणार होत्या.

प्रतीक त्या पायऱ्या किती आपणहून लवचिकतेने चढतो, त्यावर त्यांच्या सहजीवनाचा वेलू बहरणार का ते ठरणार होतं!

ं६िं्र३स्र्ंिँ८ी1972@ॠें्र’.ूे

मराठीतील सर्व माझिया मना बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relationship grows on understanding