|| समीर गायकवाड
नव्वदीपार केलेला म्हातारा सायबू राठोड अजूनही रोज गावात येतो. उदास झालेल्या पाराच्या कट्टय़ावर फिकट चेहऱ्याने बसून असतो तेव्हा अस्ताला जाणारा सूर्य त्याच्या डोळ्यांत उतरतो, कानाकोपरा धुंडाळतो. त्याला हवं ते न गवसल्यामुळे क्षितिजाकडं धाव घेतो. अंधारात लुप्त होऊन सायबूचं रहस्य शोधत राहतो. सायबूच्या मागावर चंद्राला पाठवतो. तोही हरतो. मग नव्या उमेदीने सूर्य पुन्हा उगवतो. पण सायबूचं सत्य काही केल्या उमगत नाही. सायबू म्हणजे वठलेल्या लिंबाचा बुंधा! लिंब वठत चालला की आधी त्याच्या डोकीवरच्या फांद्या जळू लागतात. पानं काळीपिवळी होऊन झडू लागतात. उरतात त्या केवळ काटक्या. वठलेल्या लिंबावर पक्षीदेखील घरटं बांधत नाहीत. सायबूचंही असंच काहीसं होतं. वय झाल्यानं त्याच्या अंगाची कातडी लोंबत होती. पाठीत बाक आला होता. ढोपराची हाडं वर आली होती. पायातलं बळ मात्र टिकून होतं. नडगीच्या हाडावर चटका दिलेला डाग वागवत दिवस मावळायच्या बेतात असताना तो गावात यायचा.
गावाबाहेरच्या तांडय़ावरल्या वस्तीत सायबू राठोडचं घर होतं. त्याच्या कळत्या वयापासून बापासोबत दारू गाळायचं काम तो करायचा. आई तारीबाईसोबत गावातल्या किराणा दुकानातून नवसागराच्या वडय़ा आणायचं काम तो करायचा. गाव आपल्या आईला ‘याडी’ म्हणायचं म्हणून त्यानंही एक-दोनदा आईला याडी म्हटलं, तर सायबूच्या बापानं- चरणूनं त्याला कपडे काढून फोकानं हाणला होता. चरणू राठोड एक नंबरचा तरकटी माणूस. दारू गाळताना तो दारुडा कधी झाला, हे त्यालाच उमगलं नव्हतं. एकदा चरणूच पुरता तर्र्र झालेला. तेव्हा तांडय़ावर आलेल्या माणसांत काही वाईट नजरेचे नवाडे होते. त्यातल्या एकाने चरणूला डिवचले. पिसाळलेला चरणू होलगडत उठला. झोकांडय़ा खात घरात शिरत त्यानं तारीबाईला बाहेर खेचलं. तिच्या मुस्कटात दोन ठेवून दिल्या. ओढणीला हात घातला. दारुडय़ांनी कनपटीला बांधलेल्या नोटा सायबूपुढे ढिल्या करताच त्याला अजून चेव चढला. इतका वेळ दाराआड दडून आपल्या बापाची आगळीक पाहणारा सायबू त्वेषानं पुढे झाला. त्यानं आईला मागे ओढत बापाच्या पेकाटात लाथ घातली. चवताळलेल्या चरणूने सायबूवर झेपावत त्याला दाबले. बघेही त्याच्या मदतीला धावले. मागचा पुढचा विचार न करता त्यानं दारूभट्टीच्या चुलीतलं जळतं लाकूड बाहेर ओढून सायबूच्या नडगीवर धरलं. पोरवयीन सायबू जिवाच्या आकांतानं ओरडत होता. तारीबाई पुढे झाली. पण तशाही अवस्थेत सायबूने तिला मागे ओढले. बापाने दिलेल्या डागण्या सायबूच्या नडगीवर जन्मखूण बनून आयुष्यभर सोबत राहिल्या. त्याचे व्रण मनावर कोरले गेले. त्यानं पुऱ्या आयुष्यात बापाचा दुस्वास केला. तारीबाई दुखण्यात अकाली मरून गेली. त्याचं उरलंसुरलं सुखही करपून गेलं. रिवाजानुसार त्याचं लग्न झालं. झिलनसोबत त्याचा संसार यथातथाच झाला. फारशा अपेक्षा नसणारी, सामान्य विचारांची, चौकटबद्ध स्त्रीत्वात चिणून गेलेली साधी-भोळी पोर होती ती. सासऱ्याला भिऊन आणि नवऱ्यापासून अंतर राखून जगताना सायबूच्या मनात तिचं वेगळं स्थान कधीच निर्माण झालं नाही. तिच्या तऱ्हेवाईक वागण्याने सायबू उदास झाला. बाकीच्यांना जशी खंडीभर पोरंबाळं झाली तशी त्यानं होऊ दिली नाहीत. तीन पोरं आणि एका पोरीवरच त्यानं हात आखडता घेतला. सायबूचा थोरला पोरगा श्रीमंत्या हा चरणूच्या वाटेवरचा निघाला. धाकटय़ाला सायबूच्या प्रयत्नामुळे शाळेची गोडी लागली. तर मधल्या पोरानं दोन्ही भावांना समान साथ दिली. दारू ढोसून पोटाचं खोकं झालेल्या चरणूचा खेळ आटोपण्याआधी तरुण श्रीमंत्यानं सायबूचा विरोध झुगारत त्याचा धंदा सांभाळला. यामुळे सायबू खचला.
श्रीमंत्यानं चरणूच्या सगळ्या सीमा लांघत केमिकल वापरत गावठी दारूचा धंदा असा काही फार्मात आणला की गावानं तोंडात बोटं घातली. अख्खं गाव झिंगू लागलं. आयाबायांचे तळतळाट सायबूच्या कानी येऊ लागले. बापाने जे केलं तेच पोराला करताना पाहून त्याला अपराधी वाटलं. पुढे जाऊन त्याची पोरं वायली झाली. वस्तीवरची भावकीदेखील घर सोडून दुसरीकडे गेली. आपणही वस्ती सोडून गेलो तर श्रीमंत्या अजून बेफिकीर होईल आणि त्याच्या हातून अघोरी कृत्य घडेल, या भीतीने तो त्याच्यापाशीच राहिला. श्रीमंत्याचं लग्न लावून दिलं तरी त्याच्यात फरक पडला नाही. त्यानं मुळात बायकोला सहवासच लाभू दिला नाही. त्याच्या आयुष्याची झिंगच वेगळी होती. लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी त्याच्या घरात पाळणा हलला तेव्हा सायबूला हायसे वाटले. पण त्याची आशा खोटी ठरली. श्रीमंत्याच्या वर्तणुकीत कसलाही बदल झाला नाही. दारूअड्डय़ामुळे सायबूच्या घरादाराची लक्तरे वेशीवर केव्हाच टांगली होती; त्यात भर पडू लागली होती लुटमारीची, लबाडीची, नशेखोरीची, दमदाटीची. वर्षांमागून वर्षे जात राहिली. पोलिसांच्या धाडी नेहमीच्या झाल्या. भांडणतंटे जणू पाचवीला पुजले गेले. नंतर तर श्रीमंत्यानं सायबूवरदेखील हात उचलायला मागेपुढे पाहिले नाही. आधी बापाकडून आणि नंतर पोराकडून मार खाणारा सायबू घुमा झाला. त्याच्या मनात हजार विचारांचा जहरी नाग फणा काढू लागला.
एके दिवशी श्रीमंत्यानं आपल्या किशोरवयीन मुलाला ढवळणीच्या दांडक्यानं गुरासारखं बदडून काढलं. आडव्या आलेल्या बायकोचे दात पाडले. सायबूने पोलिसात तक्रार देताच त्यांनी कारवाईचं नाटक केलं. पण काही दिवसांत पहिले पाढे पंचावन्न झाले. सायबू पुरता हताश झाला. एके रात्री त्यानं मनात निश्चय केला आणि दिवस उजाडताच सगळं त्याच्या मनाजोगतं घडत गेलं. तो वैशाखातला रखरखीत दिवस होता. श्रीमंत्याच्या अड्डय़ावर त्या दिवशी टेम्पो भरून मालाची आवक झाली. सगळी पिंपं उतरवून घेतली गेली. काळ्यापिवळ्या गुळांच्या माश्यांनी लगडलेल्या ढेपी, नवसागरच्या वडय़ांचा ढीग, युरियाचं फेसाटून निघालेलं दुधाळ पाणी असा मामला होता. भकाभका आग ओकणाऱ्या भट्टीवरच्या लोखंडी बॅरेलमध्ये एकेक करून सामग्री ओतली गेली. टुकार पोरे मदतीला घेऊन श्रीमंत्या स्वत: रबरी टय़ूबमध्ये दारू भरून देत होता. सायकलवरून माल रवाना होत होता. बघता बघता दारुडेही बऱ्यापैकी गोळा झाले. दिवस मावळेपर्यंत दारू गाळली जात होती. घशाखाली उतरत होती. भांडी रिती होत होती. चार बॅरल दारू चुलीवर तशीच ठेवून अंधार होताच श्रीमंत्या तिथंच लोळत पडला. त्याचे फुकटे कामगार दारू ढोसून, वाटय़ाचे पैसे घेऊन चालते झाले. किर्र्र अंधार होताच तिथं छुप्या पावलांनी हालचाल झाली. आवाज न करता दोन पिंपं खाली ओतली गेली. दारूचा चिखल झाला. काडी ओढल्याचा आवाज आला आणि फक्कन् भट्टय़ा पेटल्या. दारू पेटली. कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. आगीचे लोळ उठले. दारूच्या नशेत तर्र्र असलेला श्रीमंत्या आगीने होरपळू लागला, किंचाळ्या फोडू लागला. इतका आवाज होऊनही त्याच्या बायकोला जाग कसली ती आली नाही. जणू काही तिला कुणीतरी पाजल्यानं नशा झालेली. बराच वेळ सुरू असलेल्या आगीच्या तांडवात श्रीमंत्याची राखरांगोळी झाली.
आवाजानं गोळा झालेल्या लोकांनी, नंतर आलेल्या पोलिसांनी शंभर प्रश्न केले, पण सायबूला काहीच सांगता आलं नाही. पेटत्या भट्टीत दारू सांडून स्फोट झाल्यानं श्रीमंत्या मरण पावल्याचा निष्कर्ष निघाला. श्रीमंत्याची बायको आपली पोरंबाळं घेऊन कायमची माहेरी निघून गेली. सायबूच्या डोक्यावर परिणाम झाला. त्याच्या भाऊबंदांनी त्याला हात दिला. सायबूच्या बाकीच्या पोरांनी त्याला आपल्यासोबत येण्याचा खूप आग्रह केला, पण मातीच्या ओढीने भळभळणारा सायबू झिलनला सोबत घेऊन भावंडापाशीच राहिला. त्याची मुलं सणावाराला येत राहिली. बिरूदेवाच्या यात्रेला त्याचं येणं-जाणं होत राहिलं. काळ पुढे जात राहिला. थकलेली झिलन देवाघरी गेली आणि सायबू खऱ्या अर्थाने एकाकी पडला. अंगाचं चिपाड झालं तरी अंत:करणातली मायेची ओल, अपराधीपणाचा सल त्याला जगवत राहिला. आता तिशीतल्या कुठल्याही पोराला सायबू आपला श्रीमंत्या समजतो. त्याच्या गळ्यात पडतो. ढसाढसा रडतो. चार-पाच वर्षांचं कुणाचंही पोर वस्तीवरून उचलून आणून गावात येतो. आपला नातू सोबत आणलाय.. असं म्हणत वेडय़ासारखा हसतो आणि हसता हसता रडतो. अस्ताला जाणारा सूर्य जेव्हा सायबूच्या डोळ्यात उतरतो तेव्हा त्याला त्या रात्रीच्या आगीची धग जाणवते.
वस्तीवर परतल्यावर रोज रात्री त्याला आजूबाजूला आग लागल्याचं स्वप्न पडतं. श्रीमंत्याच्या किंकाळ्या कानात घुमतात. मग लाल घागरा-चोळी घातलेली, कशिदा-कवडय़ांनी, आरशांच्या तुकडय़ांनी सजवलेली भडक रंगाची ओढणी घेतलेली झिलन, नाहीतर तारीबाई त्याला गोंजारत राहतात. दंडात वाकी घातलेल्या त्यांच्या हातात कधी हस्तिदंती, शिंगाच्या, नाही तर पितळी बांगडय़ा असतात. त्यांना कवेत घेत घामेजलेला सायबू डोळे घट्ट मिटून घेतो. पहाटेस त्याला डोळा लागतो तेव्हा देहातली धग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते.. जी त्याला जगवतेही आणि खंगवतेही!
sameerbapu@gmail.com