‘शोध’, ‘पूल’ आणि ‘अंधाराचं गाव’ ही पुस्तकत्रयी म्हणजे किशोर साहित्यातील एक नवा आविष्कार आहे. बालसाहित्यिक स्वाती राजे यांची ही तीन पुस्तकं – खरं तर छोटय़ाशा रंगीत पुस्तिका अलीकडेच प्रकाशित झाल्या आहेत. या तीन पुस्तिका म्हणजेच तीन कथा असून, कथेला साजेशी अॅनिमेटेड चित्रं या पुस्तकात आहेत. त्यामुळे तिन्ही कथा जिवंत होतात.
‘धुळकोबाला’ (धुळीचा कण) वाटणारा सूर्याबद्दलचा राग ही ‘शोध’ या कथेतील एक गंमतीशीर गोष्ट आहे आणि यातील धुळकोबा हे निर्जीव पात्र त्याच्या अॅनिमेटेड चित्रांमुळे सजीव वाटतं. खरं तर संपूर्ण पुस्तकाचीच छपाई रंगीत कागदावर झाल्याने ही पुस्तकं हाताळण्याचा आनंदही काही औरच!अरुणाचल प्रदेशमधली छोटी मिरी, जुनाट विचारांची तिची आजी, तिच्या प्रदेशातल्या लोहित नदीवरचा पूल, शाळेला जाताना मिरीची होणारी तारांबळ या साऱ्यातून लेखिकेनं सीमाभागातला सुरक्षेचा प्रश्न, तिथल्या लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा अपरिहार्य भाग झालेले लष्कराचे तळ असं तिथलं सामाजिक वास्तव मोठय़ा शिताफीनं हलक्याफुलक्या भाषेत रेखाटलं आहे. त्यामुळे ‘पूल’ ही कथा मनोरंजनासह अरुणाचल प्रदेशातील लोकांचं, लहान मुलांचं जगणंही सांगते.
‘अंधाराचा गाव’ या कथेतली चिमुकली साऊ, तिच्या आजीचं आणि तिचं काव्यमय संभाषण, आजीनं साऊला सांगितलेली राक्षसाची, अंधाराची आणि सुंदर निळ्या स्वप्नपक्ष्याची गोष्ट विचार करायला लावणारी आहे. स्त्री – पुरुषांच्या पारंपरिक भूमिका, श्रमाची विभागणी, दोघांच्या अभिव्यक्तीतील फरक या बाबींचा नव्यानं केलेला विचार आणि मांडणी हे या कथेचं एक महत्त्वाचं वैशिष्टय़.
बालसाहित्य किंवा किशोरांसाठीचं साहित्य म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर त्यातूनही पारंपरिक धारणांचा पुनर्विचार करता येतो, हे स्वाती राजे ठळकपणे दाखवून देतात. राजेश भावसार यांची यातील चित्रं व मुखपृष्ठांमुळे पुस्तकं देखणी झाली आहेत.
‘अंधाराचा गाव’, ‘शोध’, ‘पूल ’- स्वाती राजे
रोहन प्रकाशन
पृष्ठे – अनुक्रमे – १६, १६, १६
किंमत – ८० रुपये (प्रत्येकी)