मंदार अनंत भारदे
जगण्याच्या सक्तीने ३६४ दिवस एखाद्याची लाल करावी लागत असेल तर होळीच्या दिवशी साजेसा, आपल्या मनातला खरा खरा काळा रंग त्याला फासावा. स्वत:चा चेहरा लपवायची सोय झाल्यावर दुसऱ्याचे खरे रूप उघडे पाडायची संधी मिळते ती अजिबात सोडू नये. आपल्या तोंडावर रंग लागला की ज्यांनी ज्यांनी आपले जगणे घुसमटवून टाकले आणि तरीही ज्यांना आपल्याला ते आजवर ऐकवता आले नाही त्या त्या सगळय़ांना उलटय़ा हाताने बोंब मारून ते ऐकवून टाकावे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल तेव्हा मिळेल, पण बोंब मारायला अभिजात कलेचा दर्जा मिळणे ही अत्यंत तातडीची गोष्ट आहे.
चित्र काढायला रंग लागतात लिहायला कागद पेन किंवा कॉम्प्युटर लागतो, अभिनय करायला सहकलाकार किंवा रंगमंच लागतो, पण तुमच्या असे लक्षात येईल की बोंब मारायला दुसरे काहीही लागत नाही इतकी ही स्वयंभू कला आहे. प्रेम, कृतार्थता, तुसडेपणा जितके स्वयंभू आहे तितकेच बोंब मारणे देखील स्वयंभू आहे. बोंब मारण्यातली सर्वोच्च प्रज्ञा व्यक्त करायला ‘ठणाणा’ हा शब्द बोंब शब्दापूर्वी वापरतात. इतके नेमके फार कमी शब्द कोणत्याही भाषेत तुम्हाला सापडतील. तुम्हाला कोणत्याही शब्दकोशात ठणाणा या शब्दाबद्दल फारशी माहिती मिळणार नाही, पण ‘ठणाणा’ या ध्वनीने जो अर्थ प्रतीत होतो त्याबद्दल सगळय़ांनाच अगदी नेमकी जाणीव आहे.
निरनिराळय़ा प्राचीन रुढी-परंपरा या गळून पडण्याच्या काळात ही बोंब मारण्याची सनातन रुढी आजही आपले तेज कशामुळे टिकवून असावी, याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला अचंबित व्हायला होते. आजच्या काळात बोंब मारणे सुकर व्हावे म्हणून २४ तास रतीब घालणाऱ्या वृत्तवाहिन्या आहेत. या कमी म्हणून की काय ट्विटर, फेसबुक अशा सोशल चावडय़ा आहेत. एखाद्याशी अगदी खाजगी व्यक्तिगत बोंब मारायची असेल तर व्हाट्सअप आहे. मग तरीही या बोंब मारण्याच्या सणाची प्रासंगिकता काय असेल?
भवतालामध्ये घडणाऱ्या घटनांनी बोंब मारायची गरज जिवंत ठेवली असावी असे मानायला जागा आहे. ज्यातून घडणाऱ्या विनोदाकडे एरव्ही उघडपणे विनोद म्हणून पाहायची वा बोलायची सोय नाही.काही दिवसापूर्वी अचानकच कोणीही मागणी केलेली नसताना, शेजारच्या मैदानात असणाऱ्या मंदिरातून पहाटे चार वाजता लाऊड स्पीकरवर आरती करायला आणि भजन लावायला सुरुवात झाली. एखाद्याचा असा समज होईल की उत्तम रागदारीतील किंवा कोणत्यातरी विद्वान आणि सुरेल गायकाने गायलेली भजने किंवा गीते असतील, तर तसेही नाही. नाही म्हणजे तसे असते तरीही पहाटे चार वाजता आणि तेही रोज कोणत्या तरी बुवाचे गायन ऐकणे हे अडचणीचे झाले असते. पण इथे तर गंमत अशी होती की, आयोजकांची अभिरुची ही कोणत्या तरी रिमिक्स कलाकाराने हिंदूी लोकप्रिय गाण्याची चाल घेऊन श्री गुरुदत्त किंवा श्रीराम यांच्यावर बनवलेल्या डुप्लिकेट गाण्याच्या पलीकडे नव्हती. गंमत म्हणजे सगळी मिळून त्याच्याकडे पाच सहा गाणीच होती आणि त्यांचीच तो पहाटे चार ते नऊ या वेळेत अक्षरश: शेकडो वेळेला आवर्तने करीत असे.
खूप वेळेला तुम्ही असे करत जाऊ नका त्याने झोपमोड होते आणि मुळातच रोज सकाळी ही असली भजने ऐकणे हे अतीव कंटाळय़ाचे आहे असे सांगूनही तमाम परिसराला भक्तिमय बनवण्याचा कोणत्या तरी योजकांचा उमाळा हा इतका तीव्र होता की त्यांनी ते कधीही बंद केले नाही. मशिदीवर दिवसातून पाच वेळा अजान ऐकायला येते ते तुम्हाला चालते, पण आमच्या मंदिरातील आरतीचा मात्र तुम्हाला विटाळ होतो असला काहीतरी अति विराट युक्तिवाद केला आणि ‘श्री देवा वा वा, गुरुदेवा वारे वा’ हे पुष्पा चित्रपटातील ‘ उअंता वाव वावा , उ ऊ अंता वाव वावा’ या गाण्यावर बेतलेले भजन मोठय़ाने लावले. माझ्यासारख्यांनी ज्यांना उअंटा वावा, ऊ उ अंटा व्वाव वावा या चालीवरचे देवाचे भजन ऐकायचे नसेल त्यांनी पाकिस्तानातच जायला हवे असे ठणकावून सांगितले. हे सारे गेले कितीतरी महिने सुरू आहे, पण त्याला आता काहीही करता येत नाही आणि काही केल्या ते थांबवताही येत नाही.
कोणत्या तरी एका मौलवीने नऊ वर्षांवरील मुलींनी मुलगे आणि मुली जिथे एकत्र शिकतात अशा शाळेत जाऊच नये आणि तसेच तिने जीवनावश्यक असे जुजबी शिक्षण घरीच घेतले पाहिजे असा फतवा काढला. हा फतवा सगळय़ा मोहल्ल्यात फिरवला गेला आणि काही शिकलेल्या आणि बहुतांश अजिबात न शिकलेल्या लोकांच्या झुंडीने नुकत्याच शाळेत जायला लागलेल्या मुलींना शाळेत येण्यापासून वंचित केले आणि मौलवीच्या फतव्याची अंमलबजावणी केली.आपापल्या धर्माचे झेंडे नाचवीत निघालेल्या या धर्माधांच्या झुंडी आणि झेंडे गाडण्याचे त्यांचे अनिवार उमाळे यांच्याबद्दल आपण काहीही करू शकत नाही; आणि ‘मूग’ हेच पूर्णान्न मानून ते गिळून गप्प बसतो हे नेहमीचेच.
दुसऱ्याने काय ‘खायला’ पाहिजे याबद्दल लोकांचे आग्रह आहेत. काय ‘ल्यायला’ पाहिजे याहीबद्दल आहेत, दुसऱ्याने काय ‘गायला’ पाहिजे याहीबद्दल आग्रह आहेत. लोकांनी कसे ‘हागाय’ला पाहिजे याबद्दलचीही एखादी आचारसंहिता असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही.तुमच्या टमरेलाचा आकार आणि बसण्याची दिशा शास्त्रसंमत आहे की नाही हे तपासून बघायला तुमच्या संडासाचे दरवाजे उघडून लोक येतील हे आपले अगदी उंबरठय़ापर्यंत आलेले भविष्य आहे आणि तेव्हाही भरपूर महाभाग असे निघतील जे म्हणतील की त्यांचे धर्मगुरू त्यांच्या संडासात शतकानुशतके डोकावून बघतात तेव्हा तुम्हाला ते खटकत नाही; आणि आता कुठे जागृत झालेले आपले धर्मगुरू आपल्या लोकांच्या संडासात डोकावून बघायला लागलेत तर त्याचा मात्र तुम्हाला त्रास होतो! दर वेळेला धर्म, जाती, रुढी, परंपरा यांच्या झुंडीच माणसाचं जगणं गुदमरून टाकतात असंही नाही! कधी कधी नात्यांचे फासही असे कवटाळून बसतात की माणसाला मोकळा श्वासही घेता येऊ नये.
समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून नातं सांभाळण्याच्या नादात गिळून टाकलेल्या शब्दांनी आजवर किती जणांना विषबाधा झाली असेल याची गणती कशी करणार?सगळय़ा मौल्यवान गोष्टी इतक्या नाजूक असतात की छोटय़ाशा धक्क्यानेही फुटून जातात आणि त्याचे तुकडे तुकडे होतात. या नाजूकपणाला नात्यांचा तरी अपवाद का असावा?फट म्हणता कोसळून पडतील की काय या धास्तीने सांभाळून ठेवलेली नाती, कायम दुसऱ्याने सर्टिफाय केले तरच जपले जाऊ शकणारे चारित्र्य, स्वीकारतोस की नाही असा पर्याय न देता पार पाडावी लागणारी कर्तव्ये आणि या सगळय़ाच्यावर दशांगुळे उरणारी मी. काहीही केले तरी समोरचा मला समजावून घेऊच शकणार नाही अशी चिरंतन हुरहुर आणि त्यामुळे जगण्याची झालेली क्लासिक कुचंबणा!
धुळवडीच्या दिवशी आधी स्वत:च्या चेहऱ्यावर रंग लावून आपला चेहरा-मोहरा जगापासून लपवावा. नंतर स्वत:च्या पिशवीत सगळे रंग गोळा करावेत आणि मग जगातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो रंग लावावा, ज्या ज्या रंगाचा तो आपल्याला वाटत आलेला आहे.कोणत्या तरी जगण्याच्या सक्तीने ३६४ दिवस एखाद्याची लाल करावी लागत असेल तर आजच्या दिवशी साजेसा, आपल्या मनातला खरा खरा काळा रंग त्याला फासावा. स्वत:चा चेहेरा लपवायची सोय झाल्यावर दुसऱ्याचे खरे रूप उघडे पाडायची संधी मिळते ती अजिबात सोडू नये. आपल्या तोंडावर रंग लागला की ज्यांनी ज्यांनी आपले जगणे घुसमटवून टाकले आणि तरीही ज्यांना आपल्याला ते आजवर ऐकवता आले नाही त्या त्या सगळय़ांना उलटय़ा हाताने बोंब मारून ते ऐकवून टाकावे.
एखाद्या माजोरडय़ाचा चेहरा लाल रंगाने रंगवता आला तर माजू नये आणि संधी मिळाली तर एखाद्या चेहऱ्यावर गुलाबी रंग लावायला लाजूही नये. ज्याला त्याला त्याच्या साजेशा रंगात रंगवण्याची आणि जे जे मनात साठले आहे ते बोलून टाकून बाहेर काढून टाकण्याची कला आपल्याला साधायलाच पाहिजे. आज चेहऱ्यावर रंग लावून स्पष्ट बोंब मारत असाल तरी हरकत नाही. पण बोलून मोकळे होण्यासारखी उन्मनी अवस्था नाही. लवकरात लवकर चेहेऱ्यावर रंग न लावताही जे जे गैर आहे त्या विरुद्ध नि:संकोच बोंब मारता यायला हवी आणि हेही कळायला हवे की रंगाच्या डब्यात हिरवा, लाल, निळा, भगवा एकत्र गुण्या गोविंदाने नांदतात आणि प्रत्येक चेहेऱ्यावर सारेच साजरे दिसतात.
mandar.bharde@gmail.com