सन १९८०-८२… आणि चाळीस-बेचाळीस वर्षांपूर्वीची ती शमा.. आताच्या मला ती बरीचशी अनोळखी वाटते, म्हणून हे तृतीयपुरुषी संबोधन! त्यावेळची डोळ्यांत स्वप्नं असणारी, मनात आदर्श बाळगणारी, त्या आदर्शाप्रति ओतप्रोत निष्ठा ठेवणारी शमा… आजूबाजूला काही गफलत दिसली तर त्याचाही दोष स्वत:च्या वागण्यात, कृतीत शोधणारी शमा… आजच्या काळाच्या चष्म्यातून बघितलं तर तीस-बत्तीस वर्षांची बाई काही मुलगी राहिलेली नसते. जगातले बरे-वाईट अनुभव घेऊन, तावूनसुलाखून निघालेली परिपक्व बाई असते ती… तिची आदर्शांची झापडं तोपर्यंत बऱ्यापैकी गळून पडलेली असतात… बऱ्या-वाईटाला पचवून ती थोडी निबर किंवा ‘मॅच्युअर’ झालेली असते.
‘तोलूनमापून आत-बाहेर वागणं, कटकारस्थानं करणं’ माहीत नसावं अशी सरळधोपट, निष्कपट मनं होती त्यापैकी बहुतेकांची! आणि म्हणून सिनेमा-नाटकातील वायफळ वांगी व कथा-कादंबऱ्यांत आढळणाऱ्या ढालगज कारस्थानी व्यक्तिरेखा तिथंच सोडून द्यायच्या, वास्तव काय तेवढं स्वीकारायचं असं मानणारी मध्यममार्गी मनं होती ती! ‘रोमँटिसिझम’ तोपर्यंत थोडा मागे पडला असला, तरी जगाकडे सकारात्मक कुतूहलानं पाहण्यासाठी लागणारी रसिक कोवळीक शमाकडे अजूनही जागृत होती!
म्हणूनच ‘व्यक्ती’ किंवा ‘कलाकार’ म्हणून मी त्या वेळच्या शमाकडे पाहते; तेव्हा ती मला दूरस्थ वाटते. भाबडी वाटते – भोळी नव्हे हं, भाबडी! आदर्शांची पट्टी डोळ्यांवर बांधली की दृष्टी अधू होते ना – तशी! पण चोख, निर्मळ! परिस्थितीचा फायदा घेणारे लोक आजूबाजूला सर्वत्र असतात, हे माहीत असूनही आपल्याला तसे लोक भेटण्याची सुतराम शक्यता नाही, असं मानून नि:शंकपणे जगणारी… नृत्यातल्या खाचखळग्याच्या वाटा निष्ठेनं, धैर्यानं चालू पाहणारी… शमा!
रोहिणीताईंकडे तिनं नृत्य शिकायला सुरुवात करून एव्हाना वीस वर्षं उलटलेली. नृत्य जगण्याचा अविभाज्य भाग बनलेला. पहिली दहा-बारा वर्षं केवळ ‘छंद’ म्हणून नृत्य करणाऱ्या शमाला या छंदाचं पर्यवसान ‘जीवनकृती’ बनण्यात कधी झालं, हे स्वत:लाच न उमगलेलं! आठवड्यातून केवळ चार तास नृत्य शिकणाऱ्या शमाला नृत्याचा अविरत ध्यास लागला… नृत्य तिला रात्रंदिवस खुणावू लागलं… इतर तारुण्यसुलभ आकर्षणांच्या तुलनेत नृत्याचं आकर्षण अधिक प्रभावी, अधिक झपाटणारं ठरायला लागलं…
‘मला जन्मभरासाठी ‘नृत्य’च करायचं आहे’ असं आई-वडिलांना ठामपणे सांगण्याचं धैर्यही शमाला नृत्यप्रेमानंच दिलं, असं आता वाटतं. नृत्यप्रेमानं भारलेल्या शमाचे विचार पैसा, सुरक्षितता, स्वास्थ्य इ. कुठल्याही गोष्टींची तमा न बाळगणारे… नृत्यच मला दिशा दाखवते, मार्ग दाखवते अशी गाढ श्रद्धा ठेवणारे… मागे वळून बघताना वाटतं, ‘हे नृत्यप्रेमच भविष्यात शमाचं खरंखुरं निरपेक्ष साथीदार बनलं! जन्मभराचं सवंगडी झालं. सुखदु:खाचं भागीदार झालं. स्फूर्ती देणारं, बळ देणारं, अक्षय्य तारुण्य प्रदान करणारं संगी-सोबती झालं.’
शमाच्या लहानपणी म्हणजे पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी नृत्याच्या क्लासला पाठवणारे आई-वडील फार क्वचित… कारण त्या वेळी नृत्याला आजच्यासारखी प्रतिष्ठा नव्हती; परंतु स्वातंत्र्यानंतरच्या त्या काळात आपल्या मुलांना जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत, अशी एकजात सर्व मध्यमवर्गीय कुटुंबांची धारणा होती. सर्व पालक अनंत आघाड्यांवर मुलांसाठी कष्ट उपसत होते. स्वातंत्र्य मिळालंय, आता मेहनत करणाऱ्याला ‘मरण’ नाही, असा भक्कम आशावाद त्यांच्या ठायी होता. मध्यमवर्गीय पालकांच्या आपल्या मुलांकडून खूप अपेक्षा होत्या, उमेद होती.
पालक त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत, झटत. मुलांचं व्यक्तिमत्त्व सक्षम, चौफेर व्हावं या उद्देशानं शमाच्या आई-वडिलांनी शमाला शाळेच्या व्यतिरिक्त संस्कृत, इंग्लिश, हिंदी, गणित इत्यादी परीक्षांना बसवलं. सायकल, पोहोणं, सर्व तऱ्हेचे खेळ खेळण्यासाठी मुभा दिली, प्रोत्साहन दिलं. मुख्य म्हणजे सचोटी, शुचिता, सतत कष्ट करण्याची तयारी; प्रामाणिकपणा आजन्म सांभाळायला हवा अशी जगण्याची मूल्यं दिली. त्यांच्या मध्यमवर्गीय कक्षेत जे जे करण्यासारखं होतं, ते ते आणि त्यापलीकडे जाऊनही बरंच काही त्यांनी केलं. त्यांच्या तीनही मुलांना घडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कुठे कसर सोडली नाही. त्यांच्या दूरदर्शीपणाची गोमटी फळंच खायला मिळत आहेत आज!
तरीही नृत्यच करिअर करायचं म्हटल्यावर वडिलांच्या रागाचा पारा थर्मामीटर फोडून बाहेर पडला. ते कोपिष्टच होते, पण आई मवाळ. शिवाय ‘शमा’ म्हणजे तिच्या गळ्यातला ‘ताईत’. अशा वेळी आईच्या मनाची काय ओढाताण झाली असेल याची कल्पना मी सहज करू शकते. एकीकडे वडिलांच्या रास्त रागाला तोंड द्यायचं नि दुसरीकडे शमाच्या हेकटपणाचा, हटवादीपणाचा सामना करायचा. तर्क, समजूतदारपणा, सबुरी यातलं काही एक शमाच्या नृत्यप्रेमासमोर टिकण्यासारखं नव्हतं! मध्यमवर्गीय साधारण दिसणाऱ्या मुलीनं नृत्य करायचं वेडपट ध्येय ठेवणं, तद्दन मूर्खपणाचं आहे, असं वडिलांचं ठाम मत होतं.
आणि आपल्या या मताचा उद्घोष ते संतापानं सर्वांसमोर हजारदा करायचे. कोणत्याही मुलीला स्वकष्टाच्या कमाईनं सन्मानानं जगता आलं पाहिजे, परावलंबित्व नको अशी मूलभूत व माफक अपेक्षा होती त्यांची! वडिलांची ती अपेक्षा चूक होती असं कसं म्हणता येईल? त्यांचं म्हणणं आणि संताप सयुक्तिक होता, स्वाभाविक होता. नाचाचं हे खर्चीक प्रकरण कसं काय निभावणार, अशी चिंता त्यांना भेडसावत असावी. ते रागारागानं म्हणायचे, ‘‘मी आहे तोपर्यंत बघतो तुला. नंतर तुझ्या नशिबात जे काही वाढून ठेवलं असेल, ते भोगायची तयारी ठेव. तू आणि तुझं प्राक्तन!’’
पुढे अनेक वर्षांनी वयाची पन्नाशी उलटल्यावर, शिवाय वैवाहिक आयुष्यात आणि नृत्य व्यवसायात स्थिरस्थावर झाल्यावर ऐंशी वर्षांच्या वडिलांना मी शहाजोगपणे म्हटलं, ‘‘तुम्ही इतकी वर्षं टिकणार माहीत असतं तर लग्न केलंच नसतं मी कधी!’‘ ‘चोरावर मोर’ म्हणतात ते असं! पण वडिलांची त्या काळची हतबुद्ध अवस्था मी आता समजू शकते. शमा हट्टाला पेटलेली. ‘नृत्य करत राहणं’ हा तिच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न होता. बेचैनी, उदासीनता, अस्थिरता व निराशा यांचं सावट आल्यासारखे वर्ष-सहा महिने उलटले. मग एका विलक्षण दैवयोगानं परिस्थितीला काट दिली व एका अतर्क्य योगायोगानं शमा रोहिणीताईंची सून झाली. शमानं सुटकेचा दीर्घ नि:श्वास सोडला, कारण डोक्यातली सारी स्वप्नं पाहायला ती आता मुक्त झाली होती.