जी बाब टी.व्ही.ची तीच टेलिफोनची. शेजारच्या डॉ. कुलकर्णीचा फोन नंबर द्वारा म्हणून आमच्या नातेवाईकांना सांगण्यात आम्हाला कमीपणा नव्हता. आमच्या पँटीचे बॉटम ४० इंच असायचे. गुरुशर्ट घातला की, आमची मान राजेश खन्नासारखी ऑटोमॅटिक वाकडी व्हायची. कॉलेजला जायला आमच्याकडे बहिणीची लेडिज सायकल होती. ती वापरण्यात आम्हाला कधी कमीपणा वाटला नाही. बाइक्सचा आजच्यासारखा उदय झालेला नव्हता. नाही म्हणायला राजदूत नावाची माहेरवाशीण जाऊबाई आणि एक जावा होती, पण खरे राज्य होते ते हमारा बजाजचे. चेतक आठ वर्षांनी, फिएट १२ वर्षांनी, टेलिफोन जनरल कॅटेगरीत १८ वर्षांनी मिळायचा. या साऱ्या गोष्टींनी आम्हाला वाट पाहायला शिकवले. प्रतीक्षेतला परमानंद दिला. नेसकॅफे अवतरली अन् आम्हाला जीवनातल्या ‘इन्स्टंट’पणाची चटक लागली. आता आम्हाला वाट पाहणे ‘सहेनारे’ झाले अन् गोष्टी उद्या-परवा नाही तर काल व्हाव्यात असे वाटू लागले. ७०-८० च्या दशकात कॅमेरा ही आमच्यासाठी अप्रूप गोष्ट होती. रिळातले ३६ च्या ३६ फोटो चांगले यायलाच पाहिजेत, नाही तर पसे फुकट गेल्यासारखे वाटायचे. प्रिन्टस् डेव्हलप करून यायला तीन-चार दिवस लागायचे, हे सांगितल्यावर आमची नातवंडे ‘आजोबा, किती बॅकवर्ड होतात,’ असे म्हणतात. पण त्या बॅकवर्डनेसमुळे आम्ही वाट पाहायला शिकलो हे खरे. ‘आबा’चे म्युझिक, नझिया हसनचे ‘आप जैसा कोई’ हे आमच्यासाठी आजच्या भाषेत ‘रॉकिंग’ होते. घरातली टी.व्ही., फ्रीज आणि मिक्सर.. ही आमची ‘गॅजेटस्’ होती, पण या साऱ्यात आम्ही सुखी होतो. आजच्या दृष्टीने आम्ही ‘टेक्नॉलॉजिकली चॅलेज्ण्ड’ होतो.
आज साधने आहेत, सुख हरवलंय. आयुष्यात रंग अवतीभोवती आहेत, आत नाहीयेत. कोलाहल आहे, सूर गमावलाय. मिठय़ा आहेत, स्पर्श हरवलाय. हे सगळं मला अस्वस्थ करतंय. नव्या पिढीच्या एका प्रतिनिधीला हे सांगितल्यावर तो म्हणाला, ‘‘अंकल, पुढच्या १० वर्षांत मोबाइल फोन, स्क्रीन, टच-स्क्रीन हे सगळं नाहीसं होईल. माणसं एकमेकांशी मनगटावरच्या घडय़ाळातून बोलतील, ऑर्डर देतील, पशाचे व्यवहार करतील आणि अक्षरे स्क्रीनवर नाही तर तुमच्या डोळ्यांसमोर हवेत उमटतील, आपण त्याला ‘हेड-अप-डिस्प्ले’ म्हणू.
..मला गरगरायला लागले. डोळ्यांसमोर अक्षरे.. म्हणजे आता माणसे निदान फोनचे यंत्र कानाला लावून रस्त्याने चालतात, क्रॉस करतात, ड्राइव्ह करतात. तेव्हा तर ती फक्त हवेत बोटे फिरवतील.. अदृश्य अक्षरांना स्पर्श करतील.. हवेतल्या हवेत बोलतील.. प्रतिसाद म्हणून हसतील.. डाफरतील.. फक्त एकमेकांशी बोलणार नाहीत.
..मी पटकन डोळे मिटून घेतले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2014 रोजी प्रकाशित
तेव्हा आणि उद्या
परवा ‘व्हॉटस् अप’वर एका अनोळखी फोनमित्राचा मेसेज आला अन् मी अंतर्मुख झालो. मेसेज होता ६०-७०-८० च्या दशकात मनाने वावरणाऱ्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीयासाठी.
First published on: 20-04-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व जनात...मनात बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then tomorrow