ब्रॉडवे ही न्यूयॉर्कची सुप्रसिद्ध नाटकपेठ. इथे मोठमोठी नाटके उगवतात, बहरतात, दुमदुमतात आणि काही अकाली कोमेजतातही. ‘Fiddler on the Roof’ हे भव्य संगीत नाटक- ‘musical’- १९६४ मध्ये ब्रॉडवेच्या मंचावर झंकारले आणि त्याचे सूर दूरदूरवर निनादले. शोलम अलाइकेमने लिहिलेल्या लघुकथांवर आधारून जोसफ स्टाफनने नाटक आणि नंतर पटकथा लिहिली. तिचा सिनेमा १९७१ मध्ये प्रकाशित झाला. तोही प्रचंड गाजला. दोन्ही माध्यमांमध्ये फिडलरचे काम करणाऱ्या टोपोल या नटाचे नाव सर्वतोमुखी झाले.
मी नुकतीच दिल्ली आणि नोकरी सोडून मुंबईला मुक्काम हलवला होता. ‘नोकरीवर लाथ मारून बाहेर पडले..’ असं म्हणण्याचा प्रघात आहे. पण माझ्या बाबतीत म्हणाल तर बराच काळ दूरदर्शनशी जुळलेल्या रेशीमबंधांची निरगाठ मी अलगद बोटांनी हळूहळू सोडवीत होते. अखेर एके दिवशी गाठ सुटली आणि मी मोकळी झाले. दिल्लीचे घर मात्र मी तसेच ठेवले. भाडे भरीत राहिले. कारण कुठेतरी हक्काच्या चार भिंती आणि डोईवर छप्पर हवे. मुंबईला कायमची राहण्याची सोय झाली नव्हती. पण माझे विंचवाचे बिऱ्हाड तात्पुरते एका मैत्रिणीच्या घरी मी थाटले. चिन्नाचा (म्हणजे तिच्या वडिलांचा) मरीन ड्राइव्हवर ‘गंगाविहार’ या हवेलीत पाचव्या मजल्यावर आलिशान फ्लॅट होता. चिन्ना स्वत: फिल्म इन्स्टिटय़ूटची पदवीधर होती, आणि विलक्षण कलासक्त होती. ठावठिकाणा नसलेले कित्येक धडपडणारे कलाकार (strugglers) ‘गंगाविहार’च्या आसऱ्याला येत. जम बसला की पुढे चालू लागत. नवे खानाबदोश भरती होत. चिन्नाच्या या पॉश धर्मशाळेत अनेक नवोदित सितारे (आणि क्वचित एखादा प्रथितयशदेखील!) राहून गेले आहेत. गिरीश कर्नाड, बी. व्ही. कारंत, ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, जानू बरूआ, अडुर गोपालकृष्णन्, इरफान, पी. के. नायर, रघुवीर यादव, वेणुगोपाल (कॅमेरामन), भास्कर आणि मीना चंदावरकर, अनिता कंवर.. यादी बरीच मोठी आहे. मी बाईमाणूस म्हणून मला छान स्वतंत्र खोली मिळाली. जागेची चिंता तात्पुरती मिटली. पण बाकी काय? महिन्याच्या एक तारखेला आता पाकीट मिळणार नव्हते. फारा दिवसांनी चाकोरीबाहेरचे अर्निबध जीवन जगण्याची पाळी येऊन ठेपली होती. हा अनियमित सिलसिला कुठेतरी माझ्या जिप्सी प्रवृत्तीला सुखावत होता. जास्त फिकीर न करता आला दिवस झेलायचा असं मी ठरवलं.
आणि अचानक दामूभाई जव्हेरींचे बोलावणे आले. दामूभाईंचे नाव मुंबईच्या नाटय़वर्तुळामध्ये मोठय़ा अदबीने घेतले जाई. ते ‘Indian National Theatre’चे (१९४४) एक संस्थापक सदस्य होते. आणि त्यांच्या ओजस्वी नेतृत्वाखाली I. N. T चांगलीच नावारूपाला आली होती. संस्थेच्या भरभराटीसाठी ते अखंड जागरूक असत. भारतीय लोककला आणि लोकनाटय़े यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी अशोक परांजपे यांच्या नेतृत्वाखाली एक खास संशोधन विभाग आय. एन. टी.ने थाटला होता. साथीला सुरेश चिखले हा सक्षम जिज्ञासू होता. किमान वीस-बावीस वर्षे या विभागाने संशोधनापायी अविरत काम केले. नाना कल्पक योजना राबविल्या. पार खोलात शिरून विविध लोककलांचा वेध घेतला. अलीकडेच चिखल्यांनी सांगितलेल्या एका मजेदार किश्श्यावरून त्यांच्या विलक्षण अनुभवाच्या व्यापाची छान कल्पना येते. ‘जागरण’ या लोककलाप्रकाराचा शोध घेत ते साताऱ्याजवळच्या एका लहानशा खेडय़ात पोहोचले. तिथे वाघ्या-मुरळीच्या लग्नाचा सोहळा होणार होता. कलाकार, प्रेक्षक (भक्त आणि उपासक) सगळे गरीब धनगर. मंचसज्जेचा सोपस्कार, पोषाखाचा तामझाम ते बापडे कुठून करणार? बरं, लग्न म्हटलं की मुंडावळय़ा हव्यातच. मग त्या धनगर कलाकारांनी काय करावं? शेळय़ा-मेंढय़ांच्या वाळक्या लेंडय़ा गुंफून चक्क त्यांच्या मुंडावळय़ा बनवल्या. ज्याच्या अंगात नाटय़कला भिनली आहे, तोच असा कल्पक तोडगा काढू जाणे.Sheer improvisation!!
दामूभाई जव्हेरी हे मुंबईचे एक विख्यात उद्योगपती होते. त्यांना नाटकाचा विलक्षण ध्यास होता. त्या काळात त्यांनी I. N. T. तर्फे ‘Discovery of indial’ची शानदार प्रस्तुती केली होती. त्यांच्या कारकीर्दीत ‘संतू रंगीली’, ‘खेलंदो’, ‘दुम्मस’ अशी अनेक गुजराती नाटके गाजली. प्रवीण जोशीने केलेले ‘मोती विराणु चोक मा’ हे भारतात सर्वप्रथम झालेले भवई लोकनाटय़ दामूभाईंच्याच कारकीर्दीत झाले. एखाद्या वटवृक्षाप्रमाणे त्यांची संस्थेवर छत्रछाया होती. मालतीबेनच्या उत्साही सहयोगामुळे त्यांना एवढी नाटय़सेवा करणे शक्य झाले. पण मालतीबेन गमतीने म्हणत, ‘आय. एन. टी. माझी सवत आहे.’
हिंदी आणि मराठी नाटकं पण I.N.T. मध्ये नेमाने होत असत. संस्थेमधले सगळेच लोक कायम नवीन नाटके, नाटककार आणि दिग्दर्शक यांच्या तपासात असत. या अविरत शोधापायीच दामूभाई मला वाटतं माझ्यापर्यंत येऊन पोचले.
‘फिडलर’ हे मूळ नाटक रशियामध्ये विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात उलगडते. राज्यक्रांतीच्या आधी. १९०५ साली रशियन साम्राज्याचे दोन ढोबळ विभाग पडले. ऑथरेडॉक्स ज्यू- म्हणजे कट्टर यहुदी आणि रशियन ऑथरेडॉक्स ख्रिश्चन- रशियन कट्टर इसाई असे हे दोन तट होते. (माझे पपा रशियन ऑथरेडॉक्स ख्रिश्चन होते.) तर या पाश्र्वभूमीवर लिहिलेल्या बहारदार कथा गुंफून हे नाटक तयार केले गेले होते. कठीण समय आला तरी आपल्या परंपरेशी एकनिष्ठ राहणाऱ्या एका छोटय़ा गावाचे आणि एका गरीब कुटुंबाचे या नाटकात मनोहर दर्शन घडते.
या नाटकाचा व्यंकटेश माडगूळकरांनी केलेला स्वैर अनुवाद ‘बिकट वाट वहिवाट’ I. N. T ने करण्याचे ठरवले आणि त्यासाठी दामूभाईंनी मला पाचारण केले. मी या नाटकाचे दिग्दर्शन करीन का? फार मोठे प्रलोभन होते. पण मी यापूर्वी कधी संगीत नाटक बसवले नव्हते- मुलांचे ‘पत्तेनगरीत’ हे नाटक सोडले तर! माझी अडचण मी दामूभाईंना बोलून दाखवली. ‘ती तू काळजी करू नकोस,’ दामूभाई म्हणाले, ‘नाटकाचे संगीत सांभाळायला फार मातब्बर व्यक्ती आमच्या मनात आहे.’ ती ‘मातब्बर व्यक्ती’ म्हणजे पं. जितेन्द्र अभिषेकी! दुधात साखर आणि वर केशरही! दामूभाईंचा विचार बदलण्याच्या आत मी झटकन ‘हो’ म्हणून टाकले.
काय आम्ही हरवले, काय मागे राहिले?
काही नाही, फक्त आमुचे लहानुले फुलगांव..
आणि मग दाही दिशांना सर्व गावकरी पांगतात.
नाटक बसवायचे मी उत्साहाने कबूल केले आणि मग माझी झोपच उडाली. हळूहळू त्या एकूण प्रकल्पाच्या अवाढव्य आव्हानाची कल्पना आली. चाळीस-पन्नास पात्रे, ‘अनेक-स्थळी’ नेपथ्य, सतत दृश्यबदल, दहा-बारा गाणी, सात-आठ समूहनाच, एक भव्यदिव्य स्वप्नप्रवेश- सगळाच प्रकार मतीला गुंगी आणणारा. त्यातून मुंबईच्या तशा नवख्या कर्मभूमीमध्ये मी अगदीच परकी. सभोवतालचे सगळे चेहरे अनोळखी. कसं जमणार? कधी नव्हे असा माझा आत्मविश्वास डळमळला.
दामूभाईंनी माझी व्यथा ओळखली. मला ते आग्रहाने घरी घेऊन गेले. मालतीबाईंचे सुग्रास गुजराती जेवण आणि तितक्याच रोचक, मनमोकळय़ा गप्पा झाल्या. दामूभाई म्हणाले, ‘‘सईबेन, तुला लढाईला रणांगणात एकटीला धाडत नाही. ही लढाई सगळय़ांची आहे! तू सुरुवात तर कर! दहा दिवस वाट पाहू. त्यानंतर नाही हिंमत बळावली, तर मग आवजो. तुला मी मोकळी करीन.. केम?’’
‘‘ठीक छे दामूभाई. सारू छे.’’
तालमी सुरू होण्याआधी दुर्दैवाने मी नाटककाराचा रोष ओढवून घेतला. प्रत्येक तालीम त्यांच्या देखरेखीखाली झाली पाहिजे, असे व्यंकटेश माडगूळकरांचे म्हणणे होते. मला अर्थातच ही सक्ती मान्य नव्हती. त्यांच्या संहितेशी मी प्रामाणिक राहीन, त्यांच्या मान्यतेखेरीज काहीही बदल करणार नाही, अशी मी त्यांना हमी दिली. पण मला वाटतं त्यांचं समाधान झालं नाही. ते तालमीपासून दूर राहिले.
अभिषेकींची सगळी गाणी एकाहून एक सरस चाली लावून तयार होती. आमच्या बैठकींमध्ये ही कर्णमधुर गाणी त्यांच्याकडून ऐकणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. ते अतिशय मनमिळाऊ आणि गमते होते. विनोद सांगून सांगून बेजार करीत. पण ते ऐकवल्यानंतरच त्यांच्या सुरावटीचा गिरसप्पा कोसळत असे. संगीताच्या अगाध ज्ञानाबरोबरच नाटय़ाविष्काराचीही त्यांना अचूक जाण होती. प्रसंग, पात्र, मूड हे सर्व जोखूनच ते गाण्याचा बाज आणि साज ठरवीत. त्यांची निवड नेहमीच अचूक असे.
संगीताचे तर ठरले. आता कलाकार निवडायचे होते. फक्त चाळीस-पन्नास! तेही गाण्याचे अंग असलेले. (क्रमश:)