ज्याचं प्रतिबिंब बघायचं आम्ही नाकारतो.. तोच आमचा अंतिम क्षण दोन्ही हात पसरून स्वागताला उभा असतो आणि नेमकं त्या क्षणी लक्षात येतं की, द्यायचं राहून गेलं.. मनातलं बोलायचं राहून गेलं.. खूप काही करायचं राहून गेलं.. खरं तर जगायचंच राहून गेलं!
असंच एक गावठाण.. नाव महत्त्वाचं नाही. गावाबाहेरचा पाणवठा.. तळं.. निळेशार पाणी! काठावरच्या झाडांच्या लांबलेल्या सावल्या.. परतीची उन्हं कलंडलेली.. एखाददुसरं हडकलेलं कुत्रं सोडलं तर चिटपाखरूही नाही.. आणि या साऱ्या गूढरम्य सांजवेळी पाण्यात पाय सोडून बसलेले ते दोघे.. लांबून दिसतायत फक्त आकृत्या.. सावल्यांसारख्या.. स्त्री/पुरुष भेदाभेद कठीण.. आकृत्या अस्पष्ट.. अव्यक्त आणि त्यांच्यातलं संभाषण गहिरं.. गूढगर्भ.. एका कोणत्याही व्यक्तीचं नाव देण्याचं कारणच नाही. कारण तुमच्या-माझ्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचं आणि अंताचं प्रतीक अशा त्या दोन प्रतिमा.. एक जीवन अन् दुसरी मृत्यू.. सांजवेळी गप्पा रंगलेल्या.. मृत्यू जीवनाला विचारत होता, ‘‘का रे, प्रत्येक जण माझा एवढा द्वेष करतो अन् तुझ्यावर एवढे प्रेम!’’ जीवन उत्तरते,‘‘ कारण मी एक सुंदर असत्य आहे आणि तू दु:खदायक सत्य.’’
आयुष्य जगता जगता माणूस इतका त्यात गुरफटतो की, त्याचं खऱ्या-खोटय़ाचं भान सुटतं. असत्याची सवय लागते, कधी कधी त्याचं व्यसन होतं आणि मग तेच जीवनाचा मूलाधार बनतं. मग गल्ली-दिल्लीतल्या राजकारणापासून ते घरातल्या भाऊबंदकीपर्यंत खोटेपणाच्या कुबडय़ा. मग आयुष्यातल्या रोजच्या व्यवहारात नाती जपायची धडपड चालू होते. त्या नात्यांमध्ये आयुष्य भरायचं तेवढं राहून जातं. आम्हाला अशीच नाती मिरवायची सवय जडते. ती जपणं-जोपासणं आम्हाला मानवत नाही.
आम्ही लालबागच्या चाळीतून ठाण्याचा टॉवरमध्ये शिफ्ट होतो, पण हे शिफ्टिंग केवळ भौगोलिक न राहता आम्हाला अंतर्बाह्य़ बदलून टाकतं. आम्ही मुखवटे जपायला शिकतो.. शिमग्यातल्या सोंग्यासारखे. आमचे चेहरे सुरकुतताहेत, हरवतायत हे आमच्या ध्यानात येत नाही. आम्हाला घरात एलईडी कलर टीव्ही ३२ इंच चालत नाही, आम्ही ४४ इंचचा आग्रह धरतो. पण आमचं आयुष्य आकुंचित होतेय हे आम्ही विसरतो. टीव्हीच्या कलर रिझोल्युशनचा आग्रह धरणारे आम्ही जीवन बेरंगी होतंय किंवा बेगडी रंगांनी खुलतंय हे विसरून जातो. आयपॅड, आयफोन, आयपॉड सांभाळणारे आम्ही आमच्या खऱ्या आयुष्याला मात्र वृद्धाश्रमात पाठवतो. घरातल्या मंडळीशी आमचा संवाद व्हॉटस् अप अन् ट्विटरवर होतो. आयुष्यातली स्थित्यंतरं स्वीकारताना आम्ही फक्त भौतिकतेचा विचार करतो. अधिक पगार, अधिक सवलती, विकेन्ड.. आम्हाला आयुष्य इतके रंगीन, चमकदार वाटतं की, हे सर्व शुगर कोटेड टॅब्लेटसारखं फसवं मिथ/मिथ्या आहे, हे जाणवत नाही. भाषा इंग्रजी असली तर मिथ आणि मायमराठी असली तर मिथ्या.. पण भाषेचा हा सिग्नल आमच्यापर्यंत पोहचत नाही आणि पोहचलाच तर आमची थांबायची तयारी नसते.
.. मृत्यूचा तर आम्ही विचारही करू इच्छित नाही. त्याचा उल्लेख आम्ही टाळतो. जणू काही अमर असल्याचं उसनं अवसान आणून आम्ही रोज आमचीच फसगत करतो. शाळेत, कार्यालयात आम्ही इतरांचा कळत नकळत स्पर्धात्मक द्वेष करायला शिकतो. पण वाईटातल्या वाईटाकडूनही काही चांगलं घेण्यासारखं असतं हे विसरतो. आम्ही त्याचा द्वेष पाहतो, पण त्वेष घेत नाही. जे करायचं ते झपाटून, झपाटल्यासारखं हे आम्हाला जाणवत नाही. आमच्याकडे वेळ असतो, उमेद असते, पण पसा नसतो. दुसऱ्या खंडात पसा असतो, शक्ती असते, पण वेळ नसतो आणि तिसऱ्या भागात पसा आणि वेळ असतो, पण उत्साह नसतो. मग आम्ही आमच्याच चुकांची भलामण करायला शिकतो. आमच्या चुकांचे आम्ही उत्तम वकील बनतो. तर इतरांच्या चुकांचे न्यायाधीश. येणारा प्रत्येक दिवस खरं तर आमच्यासाठी एक संधी असतो. पण आम्ही आमच्या कोषातून बाहेर पडायचं नाकारतो. आम्हाला भराभर चालायला आवडतं म्हणून आम्ही एकटेच चालतो. सगळे मिळून चाललो तर आपण लांबवर चालू हे आमच्या पचनी पडत नाही.
.. आणि या अशा भराभर चालताना एक दिवस आम्हाला तो भेटतो.. ज्याचा आम्ही उल्लेख टाळलेला असतो. ज्याची सावलीसुद्धा आम्हाला सहन होत नाही.. ज्याचं प्रतििबब बघायचं आम्ही नाकारतो.. तोच आमचा अंतिम क्षण! आमच्या जीवनाचा निवाडा बनलेला मृत्यू. तो दोन्ही हात पसरून स्वागताला उभा असतो आणि नेमकं त्या क्षणी लक्षात येतं की, द्यायचं राहून गेलं.. मनातलं बोलायचं राहून गेलं.. खूप काही करायचं राहून गेलं.. खरं तर जगायचंच राहून गेलं.
..परवा पाणवठय़ावरच्या त्या दोन सावल्या मलाही भेटल्या.. माझ्याकडे पाहून मंद स्मित करीत होत्या. जीवनानं माझ्याकडे पाहून दोन्ही हात पसरले अन् मला हाक मारली.. मृत्यू छातीवर हातांची घडी घालून नि:शब्द उभा होता.. त्यानं घडी मोडून माझ्याकडे हात पसरायच्या आधीच धावत जाऊन मी जीवनाच्या कुशीत शिरलो.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व जनात...मनात बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two shadows
First published on: 12-10-2014 at 01:07 IST