ओंकार बर्वे
डॉक्युमेण्ट्री ही नुसतीच माहिती देणारी नसून पाहणाऱ्याला आतून ढवळून काढणारी असावी. उत्तम पाहण्याचा आणि दाखविण्याचा ध्यास असल्याशिवाय या माध्यमात उतरता येत नाही, याची जाणीव ठेवून काम करीत असलेल्या पुण्यातील तरुण चित्रकर्त्याची गोष्ट. तसेच इतर चित्रप्रकारांच्या तुलनेत सध्या तरी ‘एककल्ली’ प्रवास करीत असलेल्या डॉक्युमेण्ट्री निर्मितीतल्या आव्हानांवर चर्चा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमेश विनायक कुलकर्णी याने मला साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याकरिता त्याच्या टीममध्ये घेतलं, तेव्हा पहिल्याच दिवशी मला एका संगणकासमोर बसवून त्यानं नुकत्याच चित्रित केलेल्या एका डॉक्युमेण्ट्री फिल्मचं जमेल तसं संकलन (एडिटिंग) करण्यास सांगितलं. कोकणातली प्रसिद्ध लोककला, ‘दशावतार’ या विषयावरील ती फिल्म होती. माझा डॉक्युमेण्ट्री वा माहितीपट या प्रकाराशी परिचय झाला तो असा. पुढे जसा मी ‘सिनेमा’ या जादूई विश्वात रमत गेलो तेव्हा काही महत्त्वाच्या डॉक्युमेण्ट्री फिल्म्स पाहिल्या. ‘किल्ला’ या सिनेमाचं चित्रीकरण करत असताना एका सुट्टीच्या दिवशी मी ‘द कोव्ह’ नावाची एक डॉक्युफिल्म बघितली आणि पहिल्यांदाच डॉक्युमेण्ट्री या सिनेमाशैलीने प्रचंड भारावून गेलो. लुई सिहोयोस या दिग्दर्शकाने बनवलेली ही फिल्म जपानमधल्या ‘ताजी’ शहरात होणाऱ्या डॉल्फिन हत्यांविषयी अंतर्बाह्य माहिती देणारी आहे. विषयाच्या गांभीर्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून शूटिंगची परवानगी देण्यास नकार दिला असतानादेखील, सिहोयोस आणि त्याच्या टीमने ज्या पद्धतीने ती फिल्म साकारली आहे, ते बघून डॉक्युमेण्ट्री मेकर्स आणि त्यांच्यातील जिद्दीमुळे मी प्रेरित झालो. त्यानंतर माहितीपटांविषयीचं माझं कुतूहल अधिक वाढत गेलं. त्यामागचं अत्यंत उदासीन व्यावसायिक व्याकरण, प्रेक्षकांचा अभाव, विषय निवडताना देशातील सामाजिक-राजकीय परिस्थितीनुसार बांधली जाणारी अदृश्य अशी बंधनं… हे सगळं माझ्यासमोर उघडं पडू लागलं. गणपतीदरम्यान देखावे पाहायला जाताना लोकांची करमणूक व्हावी इतकीच अपेक्षा असते. दुर्दैवानं अनेक लोक सिनेमा या माध्यमाकडे साधारणत: त्याच मानसिकतेने पाहतात. ही बाब योग्य की अयोग्य हा एका महाचर्चेचा विषय ठरू शकतो. डॉक्युमेण्ट्री या शैलीबद्दल कमालीचं आकर्षण वाटत होतं, पण त्याच वेळेला आपण अशाच प्रकारच्या कुठल्या विषयामध्ये इतकं झपाटून काम करू शकतो का? हा प्रश्न बोचत होता.

२०१७ मध्ये मला ज्योती मावशी (ज्योती सुभाष, तिला तिची मुलगी सोडल्यास, सगळेच मावशी म्हणतात) हिचा फोन आला. ‘‘तुला हमीद दलवाई कोण ठाऊक आहे का?’’ हा मावशीचा पहिला प्रश्न होता. मग एकदम आठवलं, ते लेखक आहेत. मी जरा चाचरतच मावशीला ‘हो’, म्हटले… पलीकडून मावशीने सोडलेला उसासा ऐकू आला. ‘अरे ते एक खूप महत्त्वाचे लेखक होते आणि त्याहीपेक्षा मोठे समाजसुधारक होते. मला त्यांच्या कामावर आणि परिणामी त्यांच्या विचारांवर एक माहितीपट करायचा आहे, तुला आवडेल का, ही फिल्म माझ्याबरोबर डायरेक्ट करायला?’

हेही वाचा : भयकथांचा भगीरथ…

कधी केलं नाहीये, करून बघू या या विचाराने खरं तर मी त्या फिल्मवर काम करण्यास तयार झालो. ज्योती मावशीवर हमीद दलवाईंचा विलक्षण प्रभाव होता. ती त्यांना प्रत्यक्ष कधी भेटली नव्हती, तिच्या लहानपणी समाजवादी लोकांची सभा तिच्या रहिमतपूरच्या घरी भरत असे, तेव्हा काही वेळा हमीद दलवाई तिथे आल्याचं तिला आठवतं. हमीद दलवाई जिथे लहानाचे मोठे झाले त्या त्यांच्या मिरजोळी नावाच्या गावात, त्यांच्या घरातच चित्रीकरण करण्याची परवानगी आम्हाला मिळाली. आम्ही टीमची बांधणी सुरू केली आणि त्याच दरम्यान ज्योती मावशीनं मला एक सुखद धक्का दिला, ‘‘आपल्या फिल्ममध्ये सहभागी होण्यास नासिरुद्दीन शाह तयार आहेत. त्यांनी दलवाईंच्या पुस्तकाचा अनुवाद वाचला आणि ते त्यांच्या विचारांनी, त्यांच्या कर्तृत्वानी अत्यंत प्रभावित झाले आहेत.’’

एकाएकी, ‘करून बघू या’ हा पर्याय नाहीसा झाला. हमीद दलवाई यांच्या ४० वर्षांपूर्वीच्या विचारांनी जेव्हा ज्योती मावशी, नासिरुद्दीन शाह यांच्यासारखी थोर विचारवादी माणसं जर आजदेखील इतकी प्रेरित होत असतील तर आपल्याला सखोल अभ्यास करून या फिल्मला आणि त्या निमित्ताने एकत्र आलेल्या माणसांना न्याय दिला पाहिजे.

हमीद दलवाईंनी लिहिलेल्या ‘इंधन’ कादंबरीने मला त्यांच्या गावाची ओळख आधीच करून दिली होती. त्यांना अस्वस्थ वाटत असताना ते ज्या वसिष्ठी नदीच्या काठाशी जाऊन लिहीत, विचार करत बसायचे त्या वसिष्ठी नदीवर जेव्हा मी पहिल्यांदा गेलो, तेव्हा काही क्षणांकरता मला पुलंच्या हरी तात्या या व्यक्तिरेखेप्रमाणे आपण इतिहासात पाऊल ठेवल्याची अनुभूती झाली होती.

फिक्शनफिल्म करत असताना तुमच्याकडे पटकथा नावाचं एक गाइड बुक असतं. ते तुम्ही हाताळलं की जसा सिनेमा तुम्हाला करायचा होता त्याच्या जवळपास तुम्ही पोहोचू शकता. पण डॉक्युमेण्ट्री करताना प्रत्येक वेळेस तुम्हाला ही गाइड बुक हाताला धरून नेईलच असं नाही. आणि या शैलीचा अर्कच हा आहे, असं मला वाटतं. आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या व्यक्ती, घटना, इतिहासातील एखादा घटक, लुप्त होऊ घातलेली एखादी संस्कृती, कला, प्रजाती या किंवा अशा प्रकारच्या एखाद्या विषयावर माहितीपट करावा असं वाटणं आणि ते खरोखर मूर्त स्वरूपात आणणं यामधला संघर्ष कळसुबाईच्या शिखराइतका मोठा असतो. पण बहुतांश वेळेस हाच संघर्ष माहितीपट बनविणाऱ्यांना ऊर्जा पुरवत राहतो.

हेही वाचा : भयकथा म्हणजे…

माझ्या वैयक्तिक कुतूहलाची बाब अशी की, या शैलीचं मराठी नामकरण ‘माहितीपट’ असं का झालं असावं? या शैलीचा, त्यात झपाटून काम करणाऱ्या माणसांचा हेतू केवळ तुम्हाला अमुक कशाबद्दलची माहिती द्यावी एवढाच कधीच नसतो. या माध्यमाच्या चित्रकर्त्यांना तुम्हाला आतून ढवळून काढायचं असतं. तुमच्या विचारांना प्रेरणा, चालना द्यायची असते. आनंद पटवर्धन सर त्यांच्या एका फिल्मचं चित्रीकरण १३-१४ वर्षं करत होते. अशा पद्धतीचा ध्यास मनात बाळगून अविश्रांत काम करणाऱ्या माणसाला केवळ तुम्हाला माहिती पुरवायची असेल का? सध्याच्या काळात आपण जगात कुठंही असलो आणि आपल्याला चांगल्या स्पीडच्या इंटरनेट कनेक्शनची सोबत असेल तर आपण कुठल्याही विषयाची, स्थळाची, घटनेची माहिती आपल्या स्मार्ट फोनकडे मागू शकतो. ती माहिती तो स्मार्ट फोन आपल्याला रिल्स, अनुच्छेद, बातम्या अशा विविध पद्धतीनं देतो. अगदी महाभारत, रामायणाचे गाढे अभ्यासकदेखील दीड मिनिटांचे शेकडो एपिसोड करून आपल्याला त्यांच्या मते खऱ्या रामायणात किंवा महाभारतात काय घडलं, हे सांगत असतात. आणि अर्थात त्यात करमणूक होईल याची विशेष काळजी घेतलेली असते. अशा वेगवान काळात दोन-अडीच तासांची डॉक्युमेण्ट्री फिल्म बघण्यात बहुतेक लोकांना तथ्य किंवा रस किंवा दोन्हीही वाटत नाही हे साहजिकच आहे.

चित्रपट निर्मिती, मग तो व्यावसायिक धाटणीचा चित्रपट असो वा डॉक्युमेण्ट्री फिल्म असो, हा अत्यंत खर्चीक मामला आहे. किमान गुंतवलेले पैसे परत मिळावेत हे अर्थात कुठल्याही निर्मात्याला वाटत असतं. भारतात पैसे खर्च करून डॉक्युमेण्ट्री फिल्म बघतील अशा प्रेक्षकांची संख्या खूप कमी आहे. अमेरिकेत, जर्मनीत काही बड्या स्टुडिओजचं पाठबळ असलेल्या आणि वैश्विक महत्त्व, संदर्भ असलेल्या विषयांवरील डॉक्युमेण्ट्री फिल्म्स रीतसर रिलीज केल्या जातात. भारतात तशा पद्धतीचं नियोजन नाही. अगदी इतक्यातच दोन भारतीय डॉक्युमेण्ट्री फिल्म्स, ‘द एलिफन्ट व्हिस्परर्स’ आणि ‘ऑल दॅट ब्रिद्स’ अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्करपर्यंत पोहोचल्या हे आपण सगळ्यांनी ऐकलं, काही प्रमाणात मिरवलं देखील, पण किती जणांनी त्या फिल्म्स बघण्याकरता प्रयत्न केले असतील ही शंका मनात येते. त्यामुळे डॉक्युमेण्ट्री फिल्म्स ही शैली एककल्लीच राहिली आहे असं वाटतं.

वर उल्लेख केलेल्या ‘द कोव्ह’ ही फिल्म तयार झाली तेव्हा त्याचं प्रदर्शन कुठेही होऊ नये म्हणून जपानी राजकीय व्यवस्था शक्य ते करत होती. त्या फिल्मचा दिग्दर्शक लुई सिहोयोस आणि त्याच्या टीममधली काही मंडळी आपापल्या छातीवर पोर्टेबल टीव्ही स्क्रीन्स लटकवून युनाइटेड नेशनच्या एका सभेमध्ये शिरले. प्रत्येक स्क्रीनवर फिल्म सुरू होती. त्यांना अखेर तिथे फिल्म दाखवण्याची परवानगी मिळाली. पुढे या फिल्मलादेखील त्यावर्षीची सर्वोत्तम डॉक्युमेण्ट्री फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आकाशपाळण्यातील धाडस..

एक इमेज डोळ्यासमोर फ्लॅश झाली. डॉक्युमेण्ट्री फिल्म्सचे चित्रकर्ते आपल्या छातीवर टीव्ही स्क्रीन्स लटकावून गर्दीने खचाखच भरलेल्या पुण्यातील एफ.सी रोडवर उभे आहेत. असो.
दोन महिन्यांपूर्वी मी ‘एफटीआयआय’ करता गेस्ट डायरेक्टर म्हणून एक डॉक्युमेण्ट्री फिल्म केली. मनोरुग्ण लोकांकरता असलेल्या एका अनाथ आश्रमात आम्ही त्याचं चित्रीकरण केलं. तिथल्या एक पेशंट बाईंची मुलाखत करत असताना त्यांनी ‘मला हे सगळं कशासाठी करत आहात’ विचारलं. मी त्यांना स्टुडंट प्रोजेक्ट आहे. ‘या जागेवर आणि तुमच्यावर एक फिल्म बनवतो आहोत’ असं उत्तर दिलं. त्यावर त्यांनी फिल्म कुठे दाखवणार अशी चौकशी केली. मी त्यांना सांगितलं कुठेच दाखवली जाणार नाही, या मुलांना त्याचे गुण मिळणार फक्त. हे ऐकून त्यांचं वाक्य – ‘कोण बघणार नसेल तर बनवायची कशाला?’

सर्वसामान्यांच्या मनात आज तरी डॉक्युमेण्ट्रीबाबत मुख्य धारेतल्या चित्रपटाइतकी आस्था आणि कुतूहल नाही. पण ते सारं निर्माण करणं हे पुढल्या काळात नव्या दमाच्या डॉक्युमेण्ट्री मेकर्ससाठी आव्हान आहे. ओटीटी माध्यमांच्या वाढत्या पसाऱ्यात संधी म्हणून या प्रकाराकडे पाहिल्यास उत्तमोत्तम विषयांची चणचण बिलकुल नाही.

डॉ. गो. ब. देगलुरकर यांच्या मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्रातील अभ्यासावर आधारीत ‘मूर्तिमंत’ हा माहितीपट. ‘द सिंगिंग माईस’, ‘कोहम’ या डॉक्युमेण्ट्रीसाठी काम. याशिवाय चित्रपट लेखन आणि दिग्दर्शन. ‘थ्री ऑफ अस’ या चित्रपटासाठी सहपटकथालेखन. ‘दीड’ हा मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर.
om.barve@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We the documentary maker interest and curiosity while making a documentary css
Show comments