I Do Not Like That Man. I Must Get To Know Him Better. – Abraham Lincoln
मला हे लिंकनचं वाक्य खूप आवडतं. जी माणसं आपल्याला समजत नाहीत किंवा आपण समजावून घेऊ शकत नाही, ती माणसं आपल्याला आवडत नाहीत आणि त्यांच्याबद्दलची एक परकेपणाची, असुरक्षिततेची भावना आपल्या मनात निर्माण होते. आज जेव्हा आपण जग जवळ आलं आहे असं म्हणतो तेव्हा अशा अनेक नवीन, अनोळखी आणि आपल्यापेक्षा वेगळ्या असणाऱ्या लोकांशी आणि त्यांच्या संस्कृतींशी आपला परिचय होत आहे, त्यांच्यासोबत काम करावे लागत आहे. अशा संस्कृती आणि त्यांच्या-आपल्यातला फरक आपण ढोबळमानाने जरी समजावून घेऊ शकलो तरी आपण ही परस्परांबद्दलची अविश्वासाची आणि भीतीची भावना नक्कीच थोडी कमी करू शकतो.
पण हे कसं करणार? ग्रीट हॉफस्टेड यांनी वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतींची तुलना करणारी Cultural Dimensions Theory ऐंशीच्या दशकात विकसित केली. यात देशांच्या संस्कृतींमधील मूल्यं काही सांस्कृतिक परिमाणांवर dimensions) मोजण्यात आली.
हॉफस्टेड यांनी सुरुवात चार परिमाणांपासून केली आणि कालांतराने त्यात दोन नवीन परिमाणांची भर घालण्यात आली. आज या सिद्धान्ताचा उपयोग जगभरात सांस्कृतिक मानसशास्त्र, आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन आणि संस्कृतींमधला संवाद या विषयांत मोठय़ा प्रमाणावर करण्यात येतो.
हॉफस्टेड यांनी खालील सहा परिमाणांवर संस्कृतींचे मूल्यमापन केले.
(१) अधिकार केंद्रापासूनचे अंतर (Power Distance Index) – यात अधिकारांचे किती केंद्रीकरण (High Index) वा विकेंद्रीकरण (Low Index) झाले आहे, हे ज्यांच्या हाती अधिकार नाहीत अशांच्या दृष्टिकोनातून मोजले जाते. जेथे अधिकारांचे जास्त केंद्रीकरण झाले आहे, तिथे केवळ काही माणसांना निर्णयाचा अधिकार असतो आणि बाकीच्यांनी त्याचे पालन करावे ही अपेक्षा असते. याउलट, विकेंद्रित व्यवस्थेत सर्वाना आपले मत मांडण्याचा अधिकार असतो. थोडक्यात, एखाद्या संस्कृतीत समतेला किती महत्त्व दिले जाते, हे ज्यांना असमान वागणूक मिळण्याची शक्यता असते, त्यांच्या दृष्टिकोनातून मोजले जाते.
(२) व्यक्तिस्वातंत्र्यवाद विरुद्ध समूहवाद (Individualism Vs Collectivism) – मागील लेखात बघितल्याप्रमाणे, यात समाजात व्यक्तीला आणि तिच्या अधिकाराला महत्त्व दिले जाते की समूहाच्या विचाराला, हे कळून येते. समूहवादी समाज कोणत्या तरी धाग्याने बांधलेले असतात. तर व्यक्तिस्वातंत्र्यवादात प्रत्येक माणूस दुसऱ्या कोणावर अवलंबून न राहता आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतो. साम्यवादी व्यवस्था असणारे चीन, रशिया यांसारखे देश या निर्देशांकात कमी गुण मिळवतात, तर भांडवलशाही अमेरिका हा व्यक्तिस्वातंत्र्यवादाचा पुरस्कार करणारा देश म्हणून समोर येतो.
(३) अनिश्चितता टाळण्याची वृत्ती (Uncertainty Avoidance Index) – एखादी संस्कृती, समाज अनिश्चितता कशा प्रकारे हाताळते हे याद्वारे मोजले जाते. ज्या संस्कृतीमध्ये अनिश्चितता टाळण्याची वृत्ती जास्त असते त्या समाजात खूप सारे नियम, कायदे, चालीरीती याद्वारे अपेक्षित असे वर्तन आणि परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. याचे उदाहरण म्हणजे जपान. त्यांच्यात सामाजिक शिष्टाचारांना खूप महत्त्व दिले जाते. वेळ पाळणे, नमस्काराच्या आणि चहा पिण्याच्या पद्धती (‘सोहळा’च खरं तर!) हे सगळे याचेच दृश्य रूप आहे. खूप खोलात जाऊन नियोजन करणे हा फायदा, तर मुक्त विचार, सर्जनशीलतेवर आणि जोखीम घेण्यावर येणारी बंधने हा या विचारसरणीचा एक तोटा असतो. त्यामानाने भारतात आपण अनिश्चिततेचा खुल्या मनाने स्वीकार करतो. आणि ती हाताळायची आपली पद्धत आता जगातही प्रसिद्ध झाली आहे- जुगाड!
(४) पुरुषत्व आणि स्त्रीत्व (Masculinity vs. Femininity) – याचा संबंध समाजातील पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्या संख्येवर अवलंबून नाही. पुरुषत्व म्हणजे इथे यश, पसा, प्रसिद्धी, भौतिक सुख मिळवण्याची वृत्ती, तर स्त्रीत्व म्हणजे सहकार्य, समाजातील दुर्बल घटकांची काळजी आणि बा यशापेक्षा उत्तम प्रकारे जीवन जगण्याकडे असलेला कल असा अर्थ अपेक्षित आहे. पसा, गाडी, बंगला यांत यश मोजणारा आपला भारतीय समाज म्हणूनच पुरुषत्वाकडे झुकलेला आहे असे आपण म्हणू शकतो. तर स्वीडन, नॉर्वे, नेदरलँड हे जगात सर्वात जास्त ‘स्त्रीत्व’ असलेले देश आहेत.
(५) दीर्घकालीन विरुद्ध अल्पकालीन दृष्टी (Long-Term Orientation vs. Short- Term Orientation) – यात लोकांचे वागणे हे भविष्याच्या दृष्टीने दीर्घकालीन परिणामांचा विचार करणारे आहे का? त्यांचे विचार हे अल्पकालीन किंवा भूतकाळावर जास्त केंद्रित झाले आहेत, हे दर्शवले जाते. अमेरिकेत भविष्यासाठी पशाची बचत करण्याची वृत्ती कमी आहे. आणि हे एक अल्पकालीन दृष्टी असण्याचंच उदाहरण आहे. याच्या उलट जपानमध्ये लोकांचा बचतीवर खूप विश्वास आहे. तसेच जपानमध्ये नोकरी किंवा व्यवसाय हा आयुष्यभराची बांधिलकी यादृष्टीने बघितला जातो.
(६) योगी विरुद्ध भोगी (Restraint vs.Indulgence) – इथे ‘योगी’ हा शब्द संयम ठेवण्याची वृत्ती, तर ‘भोगी’ हा जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती या अर्थाने वापरण्यात आला आहे. या निर्देशांकानुसार, एखादी संस्कृती किती सहजतेने आणि मुक्ततेने लोकांना जीवनाचा आनंद लुटू देते हे दर्शवले जाते. अमेरिका अर्थातच यात जास्त गुण मिळवते. तर भारत, चीन, रशिया यांसारखे देश सामाजिक, राजकीय, धार्मिक नीतिनियमांमुळे यात जास्त संयमित समाज म्हणून दिसून येतात.
या सहा परिमाणांवरून आपल्याला वेगळ्या संस्कृती आणि त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीबद्दल बरीच माहिती मिळते. आज हॉफस्टेड यांच्या या सिद्धान्तांचा उपयोग आंतरराष्ट्रीय व्यापार करणाऱ्यांसाठी, बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांसाठी होऊ शकतो/ होत आहे. हॉफस्टेड यांनी केलेले सांस्कृतिक विश्लेषण हे देशपातळीवर केवळ एकच संस्कृती आहे असे समजून केले जाते, म्हणून त्यावर टीकाही झाली आहे. तरीदेखील जगाला समजावून घेण्याचा प्रयत्न करणारा सिद्धान्त म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. शेवटी संस्कृती म्हणजे तरी काय? पु. ल. देशपांडे म्हणतात तसे- ‘‘..संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी.. वांग्याचे भरीत.. ‘गणपती बाप्पा मोरया’ची मुक्त आरोळी.. ‘दिव्या दिव्या दिपत्कार’..’’ या व अशा अनेक गोष्टी मिळून जे तयार होतं त्याला आपण ‘संस्कृती’ म्हणतो. विचारसरणी, चालीरीती, परंपरा, भाषा या सर्वातून शेवटी आपल्याला या सर्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या माणसापर्यंत पोहोचायचे आहे आणि त्याला समजावून घ्यायचे आहे, हे लक्षात ठेवले म्हणजे झाले. नाही का?
parag2211@gmail.com