मुंबईत बुधवारी आम आदमी पक्षाने (आप)जोरदार शक्ती प्रदर्शन करीत लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. या वेळी आपच्या नेत्यांनी भाजप व काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गॅस गैरव्यवहार प्रकरणी मोदी मूग गिळून गप्प का बसले आहेत, असा सवाल त्यांनी केला. रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी व भाजप यांचे साटेलोटे आहे, असा आरोपही त्यांनी केला.  
दोन दिवसांपूर्वी आपने महाराष्ट्रातील सहा लोकसभा मतदारसंघातील आपले उमेदवार जाहीर केले. त्यानंतर लगेच गुरुवारी मुंबईत जाहीर सभा घेतली. अंधेरी पश्चिम येथील संत रामदास मैदानावर झालेल्या आपच्या पहिल्याच सभेला कार्यकर्त्यांनी चांगली गर्दी केली होती. सभेच्या माध्यमातून आपने शक्तिप्रदर्शन करीत निवडणूक प्रचाराचीही सुरुवात केली. या वेळी पक्षाचे नेते योगेंद्र यादव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां व आपच्या उमेदवार मेधा पाटकर, अंजली दमानिया, मयांक गांधी, मीरा सन्याल, विजय पांढरे, मारुती भापकर, तसेच ललित बाबर, मोहन आडसूळ, अजित सावंत, उल्का महाजन आदी प्रमुख नेते-कार्यकर्ते उपस्थित होते.
योगेंद्र यादव यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला. टू जी स्पेक्ट्रम, राष्ट्रकूल घोटाळा, आदर्श गैरव्यवहार, याबद्दल राहुल गांधी का काही बोलत नाही, असा प्रश्न त्यांनी केला. काँग्रेसने आदर्श प्रकरणी एका मुख्यमंत्र्यावर कारवाई केली, परंतु इतरांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस व भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.  भाजप व अंबानी यांची मिलीभगत आहे, म्हणूनच  रिलायन्सच्या गॅस गैरव्यवहार प्रकरणी मोदी यांनी मौन धारण केले आहे, असा आरोप त्यांनी केला. उद्योगपतींकडून आपण एक रुपयाही घेतला नाही, असा मोदी दावा करतात, तर मग गुजरातमध्ये अदानी ग्रुप कसा मोठा झाला, त्याचे रहस्य काय, असा सवाल यादव यांनी केला.  
महाराष्ट्रातील सरकारचे व बिल्डरांचे साटेलोटे आहे, असा आरोप मेधा पाटकर यांनी केला. तर नागपुरात भाजपचे नेते नितीन गडकरी यांचा पराभव करणार, अशी घोषणा अंजली दमानिया यांनी केली. आपची ताकद भाजपला कळेलच, असे त्या म्हणाल्या. राज ठाकरेंच्या तोडफोडीच्या राजकारणावरही त्यांनी टीका केला.