‘ब्रिक्स’ या पाच देशांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी ब्राझीलला रवाना होणार आहेत. विकास बँक स्थापन करून आंतरराष्ट्रीय वित्तीय संघटनांच्या सुधारणांबाबत १४  आणि १५ जुलै रोजी होणाऱ्या या परिषदेत निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
रविवारी रात्री बर्लिनमध्ये वास्तव्य केल्यानंतर ब्राझीलच्या ईशान्येकडील भागांत असलेल्या फोर्टालेझा येथे होणाऱ्या परिषदेला हजर राहण्यासाठी मोदी रवाना होणार आहेत. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या प्रतिनिधींशी भेट होण्याची संधी मोदी यांना प्रथमच मिळणार आहे.
बर्लिनमध्ये मोदी जर्मनीच्या चान्सलर अ‍ॅन्जेला मर्केल यांची भेट घेणार होते. मात्र जर्मनी फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्याने मर्केल या ब्राझीलला जाणार आहेत. त्यामुळे मोदी आणि मर्केल यांची भेट रद्द करण्यात आली आहे. मोदी यांच्यासमवेत केंद्रीय अर्थराज्यमंत्री निर्मला सीतारामन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ए. के. दोवल, परराष्ट्र सचिव सुजाता सिंग आणि अर्थ सचिव अरविंद मायाराम यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. गेल्या वर्षी दरबानमध्ये जे निर्णय घेण्यात आले होते त्याचा पाठपुरावा या सहाव्या शिखर परिषदेत केला जाणार आहे. त्यामुळे भारताच्या नव्या पंतप्रधानांना जागतिक पातळीवरील नेत्यांची भेट घेण्याची संधी मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi to leave for 6th brics summit